Skip to main content

Featured

नागझरी आणि दरेगाव येथील वास्तुशिल्पांची अनुभूती..

  मित्रांनो, या भारत भूमीवर प्राचीन सुंदर कलाकृती जगप्रसिद्ध आहेत, मात्र सामान्य दर्जाची, कमी कलाकृतीची दुर्लक्षित असलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आजही खेड्याबाऱ्मध्ये बरीच आहेत. अशा दुर्लक्षित इतिहास पुरुषांचा शोध मनाला नेहमीच असतो. आज बुलडाणा जिल्ह्यात फिरत असताना नेहमीप्रमाणे शोध घेतल्यावर समजले की शेंदुर्जनाच्या जवळ दोन ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मग काय, आम्हाला इतिहासात टाईम ट्रॅव्हल करण्याची संधी चालून आली.! मित्रांनो,  शेंदुर्जन(सिंदखेड तालुका) येथून उजवीकडे वळून आम्ही साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर नागझरी फाट्यावरून डावीकडे वळलो. एक किलोमीटर अंतरावर नागझरी हा छोटा गाव लागला. या गावाच्या पिछाडीवर अतिशय खडतर रस्त्याने खाली उतरत एक किलोमीटर मोटर सायकलने गेल्यावर आम्ही डोंगराच्या कुशीत एका रमणीय ठिकाणास पोचलो. येथे एक प्राचीन महादेवाचे देवालय असून त्यासमोर धार कुंड आहे. देवालय बाह्य दर्शनी पाहिल्यास सुंदर कलाकृतीचे असून लहान लहान विटांनी बांधलेले दिसते. देवालयाचा जीर्णोद्धार झाला असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. असो, देवालयात प्रवेश केल्यावर हेमाडपंथी बांधणीचे सहा दगडी स्तंभ दिसत...

राजा मानसिंगाची शोकांतिका..

 


अकबरकालीन राजा मानसिंग पहिले जयपूरचे राजे आणि एक प्रभावी आणि शक्तिशाली नेतृत्व ज्याने तमाम रजपूत राजांना मोगलांकडे वळविले. 

महाराणा प्रताप वरील अनेकदा मोहीम फसल्यावर अकबराने सरसेनापती म्हणून राजा मानसिंग यांना मैदानात उतरवले. त्या हल्दि घाटिच्या युद्धात मिळवलेल्या विजयाने राजा मानसिंग मोगल दरबारात उच्चपदाला पोचले.

कबूलची मोहीम, बिहार आणि ओरिसा मधील मोहीम अशा अनेक युद्धाचे नेतृत्व त्यांनी केले. एवढेच नाही तर बंगाल, बिहार आणि ओरिसा हे प्रांत जिंकून मोगल साम्राज्यात आणण्याची मोठीच जबाबदारी राजा मानसिंग यांनी अकबराच्या काळात पार पाडली.

अकबर बादशहाने या थोर सेनापतीचा सन्मानही मोठाच केला. दरबारातील नवरत्नांपैकी ते एक होते. कधी प्रमुख सेनापतीपद तर कधी बंगाल, बिहार, ओरिसा, झारखंड अशा सुभ्यांची सुभेदारी देऊन अकबर बादशहाने त्यांचा सन्मान राखला. तसे मानसिंगाच्या आत्या जोधाबाई ही अकबराची राणी तर मानसिंग यांची बहीण मानबाई ही जहांगीर ची राणी, त्यामुळे नातेसंबंधही खासाच होता.

असे हे जयपूरचे राजे आणि मोगल साम्राज्यातील बुलंद असामी मानसिंग मात्र जहांगीरच्या काळातच मागे पडले.

राजकारणात कसे गरजेनुसार व्यक्ती आणि व्यक्तिमत्व बदलत जाते पहा..

जहांगीरने राजा मानसिंगची दक्षिणेमध्ये अचलपूर येथे बदली केली. अचलपूर ही वऱ्हाड सुभ्याची राजधानी.

मानसिंगला मोगल सेनापती अब्दुल रहीम खानेखाना याच्या हाताखाली नेमण्यात आले. राजा मानसिंग हा वयाने आणि दर्जाने खाना पेक्षा मोठा होता. राजकारणातील एवढ्या प्रगाढ धुरंधर माणसाला आपल्या हाताखाली मुक्रर करावे याचा खानाला खेद वाटला.

एका प्रसंगी अहमदनगरच्या मलिक अंबरशी मोगलांचा लढा चालू होता. त्यावेळी राजा मानसिंग याने खानेखाना याला विचारले, "खानसाहेब ही मोहीम तडाखून संपविता येण्यासारखी आहे. यात दिरंगाई चे कारण काय..? तेव्हा खानेखाना म्हणाला, "तुम्ही ओरिसा जिंकला आणि तुम्हाला माझ्या हाताखाली नेमण्यात आले. मी ही मोहीम जिंकली तर मला कुणाच्या हाताखाली काम करावे लागेल म्हणून ती दिरंगाई..."

.. अर्थात राजकारण संपले महत्त्व संपले! असे मोगलांचे धोरण असल्याने ही राजकीय मुत्सद्देगिरी! 

पण राजा मानसिंग सारख्या मोगल राजकारणातील बळींची संख्या बरीच आहे, त्यातलेच एक उदाहरण म्हणजे मिर्झाराजा जयसिंग!

असो, राजा मानसिंगाणे राणा प्रताप आणि मिर्झाराजा जयसिंगाने शिवछत्रपतिला प्रसंगी आपली साथ न देता मोगलांचे विराट स्वरूप आणि वर्चस्व दाखवीले..!

नियतीचा खेळ,,, अपूर्ण कसा राहील.!

शिव-राणा जगामध्ये विराजमान झाले मात्र राजा जयसिंग आणि राजा मानसिंग यांच्या समाध्या आपल्या वंशजांना सुद्धा पारख्या झाल्या..!!!!!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts