Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

अहमदशहा अबदालीचे सवाई माधवसिंग यास पत्र-


तिसऱ्या पानिपतच्या रणसंग्रामात परकीय आक्रमक अहमदशहा अब्दाली आणि हिंदुस्थानचे रक्षक मराठे अशा दोन बाजू होत्या. हा लढा परकीय आक्रमणाच्या विरुद्ध असला तरीही काही मुस्लिम देशी सत्ता ह्या नजीब खानाच्या धार्मिक राजकारणाला फसून अहमदशहा अब्दालीच्या पक्षात सामील झाल्या. तर काही हिंदू राजवटी ह्या आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी अब्दालीच्या पक्षात सामील झाल्या. मात्र मराठ्यां सारख्या देशी शक्तीला अब्दालीच्या हस्ते परास्त करून अब्दालीच्या पक्षातील हिंदुस्तानी हिंदू-मुस्लीम त्या राजवटींना काय लाभले..? तर नजीब खान सारख्या संधी साधूंना थोडा लाभ झाला मात्र अयोध्येचा नबाब शुजाउद्दौला निराशा व रिकाम्या हाताने अयोध्येस परतला. दिल्लीच्या राजकारणात सगळे अधिकार शेवटी नजीबलाच प्राप्त झाले. हिंदू-मुस्लीम धर्मयुद्धाचे गारुड रचणाऱ्या त्या नजीबने सुजा उद्दौलाचा राजकीय बळी घेतला होता. आणि अब्दालीच्या पक्षातील मुस्लिमेतर स्वार्थी सत्तानाही काय लाभले.? कारण लवकरच महादजी शिंदे यांच्या नेतृत्वात हिंद भूमीला महान सेनापती लाभला. मराठ्यांचे वर्चस्व दिल्लीसह अखिल हिंदुस्थानात पुन्हा प्रस्थापित झाले.

असो, पानिपताचे युद्ध जिंकल्यानंतर अहमदशहाने हिंदुस्थानच्या सत्तांना पत्र लिहून आपली विजय वार्ता कळविली. असेच एक पत्र त्याने आपल्या पक्षातील जयपूरच्या सवाई माधवसिंगला लिहिले. या पत्रात अहमदशहा अब्दाली सवाई माधवसिंगला पानिपतच्या युद्धाची हकीकत सांगतो. 

या ठिकाणी हे पत्र अभ्यासण्याचा उद्देश हा की, पानिपताच्या युद्धात लढणाऱ्या आमच्या वीरांना आम्ही अनेक दूषणे लावत आलो. कुणाचा पराजय झाला की 'त्याचे पानिपत झाले' अशी म्हण उपहासाने वापरू लागलो. ज्या पानिपताचा आमच्याकडून गौरव आणि अभिमान व्यक्त व्हावा, त्या पानिपताच्या युद्धाला आम्ही चूक समजून त्यात लढलेल्या शूरवीरांचा अपमान करू लागलो.

एवढ्या प्रचंड युद्ध संग्रामात पराजय महत्त्वाचा नसतो तर शौर्यपूर्ण लढा अमर ठरतो.! ज्या पानिपताच्या युद्धाची हेटाळणी आम्ही करतो त्याच पानिपतच्या युद्धात लढलेल्या आमच्या शूर वीरांचा गौरव खुद्द हिंद भूमीचा शत्रू अहमदशहा अब्दाली करून जातो...!!!

बघा पानीपतची हकीकत देतांना अबदाली माधवसिंगला लिहितो- 

“पावसाळा होता. आणि नदीला पूर आला होता. यामुळे नदी ओलांडून पानीपत आणि कर्नालला पोहचणे कठीण होते. शत्रूंनी कुंजपुरा येथे अब्दुस्समखान आणि इतर सरदारांवर या पूर्वीच हल्ला केला होता. यामुळे आमचे विजयी सैन्य शत्रूचा समाचार घेण्यासाठी शहादऱ्यातून बाहेर

पडले. आम्ही यमुना ओलांडली आणि कूच करीत खरोड्याला पोहोचलो. तेथे शत्रूंनी आपले ठाणे बसविले होते.

आमच्या सैन्याने ते सहज काबीज केले आणि शत्रू पक्षातील सर्वांची कत्तल केली. तेथून आमचे सैन्य पानीपतला पोहोचले. दक्षिण्यांनी त्या ठिकाणी मजबूत छावणी कायम केली होती. जवळ जवळ रोज त्यांच्यात आणि आमच्या गाजी सैन्यात चकमकी होऊ लागल्या. गाजीउद्दीन नगरच्या बाहेर गोविंद पंडित (बुंदेला) आपल्या सात हजार सैन्यासहित मारला गेला. नंतर आम्ही चहूकडून शत्रूचा कोंडमारा केला. आम्ही त्यांचा रोज पराजय करीत होतो.

त्यांच्या छावण्यावर आगीचा वर्षाव करीत होतो आणि कित्येकांना यमलोकी पाठवीत होतो. त्याचा तपशील तुम्हाला कळलाच असेल.

अखेरीस, बुधवार रोजी तोफखाना, घोडदळ आणि पायदळ यांनी युक्त असलेले काफराचे सैन्य छावणीतून बाहेर पडले. गाजींना मारण्याचा त्यांनी निर्धार केला होता. त्यांनी अत्यंत निकराने आमच्या सैन्यावर पुन्हा पुन्हा हल्ले केले. माझ्या दूतांनी मला ही बातमी सांगितली. गेले दोन तीन महिने आमची आणि शत्रूची सैन्ये समोरासमोर

छावणी करून उभी होती. या काळात शत्रूची सैन्ये रोज आपल्या छावणीतून बाहेर पडत आणि आमच्यावर हल्ला करीत. आमच्यात प्रखर युद्धे होत. आणि स्वत:ची अनेक माणसे मृत्युमुखी पडल्यावर शत्रू पराजित होऊन आपल्या छावणीत परत जात असे. असे आतापर्यंत घडत आल्यामुळे आजही तसाच प्रकार असावा असे मला वाटले.

पण त्यांच्या हल्ल्याची बातमी कळताच, त्यांचा मोड करण्याकरिता मी घोड्यावर स्वार झालो आणि मैदानात पोहोचलो. तेथे पोहोचून मी परिस्थितीचे निरीक्षण केले. मला खात्री पटली की आमचा प्रबळ शत्रू दोन लाख स्वार आणि पायदळ, जंगी तोफखाना आणि तीरंदाज याचे सैन्य घेऊन चाल करून येत होता. त्यांच्या रांगा

एका मागे एक अशा सहा कोसापर्यंत पसरल्या होत्या. पुढे चाल करून, बंदुकी आणि बाणांनी हल्ला करण्यात ते अगदी उतावीळ झाले होते. ते पाहून मी पण आपल्या सैन्याची युद्धरचना केली. सैन्याच्या मी उजवी आणि डावी अशा दोन फळ्या केल्या आणि रांगामागे रांगा उभ्या केल्या. मग मी आपल्या पायदळ बंदूकधाऱ्यांना सरकारी

तोफखान्याबरोबर राहून हल्ला करण्यास आज्ञा केली. माझा वजीर शहावलीखान याने आपले दळ घेऊन माझ्या तोफखान्याच्या पाठीशी ठाण मांडून उभे राहावे असा मी त्याला हुकूम केला. वजीर तोफखान्यापाशी येऊन दाखल

होताच युद्धाच्या ज्वाळा भडकल्या. रणभेरी आणि रणशिंगे यांच्या ध्वनीने वीरांच्या अंगात स्फुरण संचारले. हा हा म्हणता सिंहासारखे शूर वीर आणि शक्तिशाली शिपाई विजेप्रमाणे एकमेकावर तुटून पडले. त्यांनी गाजविलेले शौर्य यापूर्वी कधीच दृष्टीस पडले नाही. रुसतुम आणि इस्फिंदारसारख्या वीरांनी हे युद्ध पाहिले असते तर त्यांनी आश्चर्याने आपली बोटे चावली असती. शत्रूंनी इतके शौर्य दाखविले आणि लढण्याची इतकी शर्थ केली की इतरांकडून होणे अशक्य होय. उभयपक्षातील वीरांचे हात रक्तबंबाळ झाले.

युद्धाची सुरुवात तोफा आणि जंबूरकांनी झाली पण लवकरच ती शस्त्रे मागे पडून तल्वारी आणि तीर यांचा मारा सुरू झाला. ती पण मागे पडून शूरवीर बरछ्या, खंजिरी आणि सुरे यांचा उपयोग करू लागले. पुढे पुढे तर उभय पक्षातील वीरांनी हातांनी शत्रूला धरून मारण्याची पराकाष्टा केली. शूर आणि क्रूर शत्रूने (मराठ्यांनी) शौर्याने लढण्यात कोणतीच कसूर केली नाही.

पण परमेश्वराची कृपा माझ्यावर असल्यामुळे, एकाएकी विजयसूचक वारे माझ्या दिशेने वाहू लागले. परमेश्वराच्या इच्छेने दक्षिण्यांचा दणदणीत पराजय झाला. नानाचा मुलगा विश्वासराव आणि भाऊ हे वजीराच्या

दळासमोर लढत होते. ते मारले गेले. त्यांच्या बरोबर कित्येक सरदार मृत्युमुखी पडले. इब्राहीमखान गार्दी आणि त्याचा भाऊ हे जखमी अवस्थेत पाडाव झाले. बापू पंडित (हिंगणे) हाही कैदी झाला. शत्रूचे चाळीस ते पन्नास हजार स्वार आणि शिपाई आमच्या तलवारींना बळी पडले. उरलेल्यांनी पळ काढला. त्यांच्या पाठलागावर मी आपली पथके पाठविली. त्यात शत्रूची पंधरा ते वीस हजार माणसे मारली गेली. मल्हारराव आणि जनकोजी यांचे काय झाले ते कळले नाही. शत्रूंचा तोफखाना, हत्ती, घोडे आणि इतर सगळी मालमत्ता आमच्या हाती सापडली

आहे. जवळ जवळ सगळे हिंदुस्थान माझ्या ताब्यात आले आहे. आणि परमेश्वराने मला दिलेल्या राज्याच्या शत्रूना आपल्या कर्माची चांगलीच शिक्षा झाली आहे. परमेश्वरकृपेने माझ्या हितचिंतकांच्या आशा फलद्रूप होऊ लागल्या आहेत. माझ्या राज्याचे एकनिष्ठ स्नेही यांनी माझ्या कृपेचा लाभ घेण्याची आता वेळ आली आहे. तुम्ही एकनिष्ठ आहात हे वृत्त माझ्या वजीराने मला अनेकदा कळविले आहे. तुम्ही आता माझ्याकडे लवकर आले पाहिजे. या

देशाची व्यवस्था करण्याचे मी ठरविले आहे. त्या हेतूने मी राजेरजवाडे आणि अमीर उमराव यांना पाचारण केले आहे. तुम्ही पण आले पाहिजे. परमेश्वर करील तर तुम्ही पूर्वीपेक्षाही अधिक मानसन्मान आणि वैभव पावाल."


अहमदशहा अब्दाली आपल्या पत्रात म्हणतो-

"युद्धाच्या ज्वाळा भडकल्या. रणभेरी आणि रणशिंगे यांच्या ध्वनीने वीरांच्या अंगात स्फुरण संचारले. हा हा म्हणता सिंहासारखे शूर वीर आणि शक्तिशाली शिपाई विजेप्रमाणे एकमेकावर तुटून पडले. त्यांनी गाजविलेले शौर्य यापूर्वी कधीच दृष्टीस पडले नाही. रुसतुम आणि इस्फिंदारसारख्या वीरांनी हे युद्ध पाहिले असते तर त्यांनी आश्चर्याने आपली बोटे चावली असती."

       इराणच्या इस्लामपूर्व आणि इस्लामेत्तर फारशी काळात बहामन इस्पिंदार, नरिमन, खुस्रो, नौशीखान, बहराम इत्यादी राजे-महाराजे आणि आणि सुहराब, रुस्तुम हे वीर होऊन गेले. अब्दाली आपल्या आणि शत्रूच्या (मराठे) सैनिकांच्या शौर्याचा गौरव करताना म्हणतो की, रुस्तुम आणि इस्पिंदार या वीरांनी हे शौर्य पाहिले असते तर त्यांनीसुद्धा तोंडात बोटे घातली असती असा गौरव करतो.

.......

मराठ्यांच्या जिद्द आणि चिकाटी बद्दल लिहिताना अब्दाली म्हणतो-

"त्यांनी अत्यंत निकराने आमच्या सैन्यावर पुन्हा पुन्हा हल्ले केले."


"उभय पक्षातील वीरांनी हातांनी शत्रूला धरून मारण्याची पराकाष्टा केली"

......

पानिपत म्हणजे नामुष्की, पानिपत म्हणजे पळापळ असे नाही. बघा अहमद शहा अब्दाली म्हणतो-

"शूर आणि क्रूर शत्रूने (मराठ्यांनी) शौर्याने लढण्यात कोणतीच कसूर केली नाही"

      खुद्द शत्रूने (अब्दालीने) आपल्या जबानीने पानिपतात लढलेल्या मराठ्यांच्या शौर्याची ग्वाही द्यावी यापेक्षा मोठा पुरावा तो काय..? आम्ही उगेच तज्ञ बनून लहान-सहान खेकटी काढत पानिपताच्या युद्धात लढलेल्या वीरांची ऊठसूट हेटाळणी करत राहतो. युद्धात लढलेला फक्त वीर असतो, किमान तेवढे तत्व तरी आम्ही शत्रूकडून घ्यावे..!!!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

संदर्भ साधन-

सन १९४५ च्या इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या अधिवेशनात पाटण्याचे सय्यद हसन यांनी दुराणी-रजपूत वाटाघाटी या विषयावर निबंध वाचला. तो अधिवेशनाच्या इतिवृत्तात प्रसिद्ध झाला. या पत्राचा इंग्रजी अनुवादाचा मराठी अनुवाद पगडींनी दिला आहे. सर जदुनाथ सरकार यांनीही त्या पत्राचा इंग्रजी अनुवाद माॅडर्न रिव्ह्यूच्या मे १९४६ च्या अंकात प्रसिद्ध केला आहे.

।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts