ही कहाणी सुरू होते अकबराच्या काळापासून...
उदयपूरच्या शिसोदीया राजवंशातील एक शाखा चंबळच्या काठी माळव्यातील रामपुरा (मध्यप्रदेशात) येथील चंद्रावत राजे यांची!
चंद्रावत घराण्याची मोगल निष्ठा-
यांचा मूळ पुरुष दुर्गासिंग हा प्रथम राणाप्रताप याच्या पदरी होता. मोगलांची सत्ता वाढल्यावर तो पुढे अकबराच्या पदरी लागला. दुर्गासिंग अकबराच्या विश्वासू सरदारांपैकी होता. त्याने महत्त्वाच्या अनेक मोठ्या हुद्द्यांवर कामे केली. आग्रा आणि अजमेर या प्रांताचा प्रशासक म्हणून त्याने काम पाहिले. तो वयाच्या ऐंशीव्या वर्षी मरण पावला. त्याच्या मृत्यूपश्चात त्याची जहागीर त्याचा मुलगा राव चंदा याला देण्यात आली.
राव चंदाचा मुलगा रावदूदा हा सन १६३३ मध्ये दौलताबादच्या वेढ्यात निकराने लढत असता मारला गेला. त्याचा मुलगा सन १६३६ मध्ये शहाजीराजां विरुध्द चाललेल्या युद्धात होता.
त्याला कोणी मूलबाळ नसल्यमुळे त्याचे नंतर रामपूरची गादी राव चंदाचा दुसरा मुलगा राव मुकुंद याचा मुलगा राव रूपसिंग याला देण्यात आली.
राव रूपसिंग यानेही राजपुत्र औरंगजेब याच्याबरोबर मध्य आशियातील बाल्ख बदरूशान येथील मोहिमेत चांगली कामगिरी बजावली. तो सन १६५० मध्ये वारला तेव्हा त्याची जाहागीर त्याचा मुलगा राव अमरसिंग याला देण्यात आली.
अमरसिंगाचा संबंध शिवाजी महाराजांच्या चरित्रात येतो.
राव अमरसिंग आणि त्याचा मुलगा राव मोहकमसिंग यांची तैनात दक्षिणेतील मोगल सैन्यात झाली होती.
सन १६७१ मध्ये मराठ्यांनी नाशिक जिल्ह्यातील बागलाणात असलेला साल्हेरचा किल्ला जिंकून घेतला. तो परत घ्यावा म्हणून मोगलांनी शिकस्तीचे प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी सन १६७२ मध्ये साल्हेर गडास वेढा दिला. तो उठवावा म्हणून शिवाजी महाराजांनी साल्हेरला मोठे सैन्य धाडले. मोगल आणि मराठे यांची साल्हेर येथे निकराची लढाई होऊन त्या लढाईत अमरसिंग मारला गेला आणि त्याचा मुलगा मोहकमसिंग हा मराठ्यांच्या कैदेत सापडला.¹
अमरसिंग मारला गेला पण त्याची कीर्ती सर्वत्र झाली असे कवी भूषण म्हणतो,
सिव सरजासो जंगुजुरी, चंदावत रजवंत
राव अमर गो अमरपुर, समर रही रजवंत
मोगल इतिहासकार भीमसेन सक्सेना हा साल्हेरच्या युद्धाचे वेळी सेनापती बहादूरखानाच्या छावणीमध्ये हजर होता तो म्हणतो,
"मोगलांनी साल्हेर गडाला वेढा घातला होता. बातमी आली की मराठे मोगलांवर तुटून पडले. इखलासखान मियाना आणि मोहकमसिंग हे जखमी होऊन मराठ्यांच्या हाती सापडले. मोहकमसिंग हा राव अमरसिंग याचा मुलगा. स्वतः अमरसिंग आणि त्याचे सहकारी हे निकराने लढत असतांना मारले गेले. मोगलांचा सगळा सरंजाम मराठ्यांच्या हाती पडला. बहादूरखान तातडीने रवाना झाला पण तो बागलाणात येऊन पोहोचेपर्यंत मराठे कोकणात उतरले होते. मोगलांचा सगळा सरंजाम लुटून ते आपल्याबरोबर घेऊन गेले."
मोहकमसिंग आणि इखलासखान यांनी जबर खंडणी भरून मराठ्यांच्या कैदेतून आपली सुटका करून घेतली. अशा रीतीने या चंद्रावत घराण्याच्या नुसत्या पिढ्याच मोजल्या तर दुर्गासिंग व त्याचा मुलगा राव चंदा, राव चंदाची दोन मुले राव दूदा आणि राव मुकुंद, राव मुकुंदचा मुलगा राव रूपसिंग, रूपसिंगाचा मुलगा अमरसिंग आणि त्याचा मुलगा मोहकमसिंग अशा या मोगलनिष्ठ घराण्याच्या सहा पिढ्या होतात.
याघराण्यातील इतर योद्ध्याप्रमाणे अमरसिंग साल्हेर येथे लढाईत मारला गेला आणि त्याचा मुलगा मोहकमसिंग गंभीर जखमी झाला.
अश्या या एकनिष्ठ घराण्याचे मोगलांनी काय चीज केले ?
औरंगजेब बादशहाच्या कारकिर्दीत येथून पुढे आता या निष्ठावान घराण्याला अक्षरशः अग्निदिव्यातून जावे लागले. त्याचीच ही करुण कहाणी आता सुरू होत आहे..!!
गोपालसिंगाचा विश्वास घात-
सन १६८१ मध्ये औरंगजेब दक्षिणेमध्ये उतरला त्यावेळी मोहकमसिंगाचा मुलगा गोपालसिंग हा दक्षिणेत तैनात होता. तेव्हापासून तर जिंजीच्या वेढा आणि पश्चात तो शहजादा बेदरबख्त याच्या फौजेत तैनात होता. त्याला दोन हजार जात व दीड हजार स्वार अशी मनसब होती.²
त्याचा धाकटा मुलगा हिम्मतसिंग त्याच्यासोबत तर मोठा मुलगा रतनसिंग माळव्यात जहागिरीचा(रामपूर) कारभार बघत होता. पण अचानक त्याने बापाकडे खर्चासाठी रक्कम पाठविणे बंद केले. त्याने बापाची जहागीर बळकावली आणि बापाच्या कारभाऱ्यांना हाकलून लावले. गोपालसिंगाची अवस्था बिकट झाली. शहजाद्याच्या छावणीतून निघून तो ब्रह्मपुरीस बादशहाच्या छावणीत विनंतीसाठी दाखल झाला.³
मात्र बरेच दिवस त्याला बादशहाची भेट मिळाली नाही. उलट शहजादा बेदरबख्त ची परवानगी घेतल्याशिवाय का आला म्हणून बादशहाच रागावला.
६ सप्टेंबर (१६९९) रोजी गोपालसिंगाने रुहुल्लाखानाला (औरंगजेबाच्या मावस बहिणीचा नातू) विनंती केली. रुहुल्लाखानाने बादशहाला विनंती केली की: "शहाजादा बेदारबख्त याच्या फौजेत तैनात असलेला राव गोपालसिंग हा विपन्नास्थितीमुळे बेदारबख्ताच्या फौजेतून आला असून छावणीच्या चौकीत पडून आहे. तो पिढीजाद सेवक आहे. आपल्या भेटीची अपेक्षा बाळगून आहे."
यावर बादशहा रुहुल्लाखानास म्हणाला, 'त्याला म्हणावे, तुला देशी जाण्यास परवानगी मिळणार नाही. भेट घेऊन आपल्या तैनातीच्या जागेवर (बेदारबख्ताच्या फौजेत) जात असेल तर त्याने मला भेटावे, नाहीतर नाही, मर्जी त्याची.'⁴
काही दिवस थांबून १० सप्टेंबर (१६९९) रोजी गोपालसिंग याने पुन्हा यारअलीबेग व बक्षि मुखलिसखान यांच्या द्वारे बादशहाला विनंती केली की : "माझा मुलगा रतनसिंग याने माझे सगळे वतन बळकाविले आहे. मी तर येथे सैन्यात नोकरी बजावीत आहे. माझ्या मुलाच्या या आतताईपणामुळे माझी फार दुर्दशा झाली आहे. रतनसिंगाला हुजुरात बोलावण्याबाबत गुर्जबर्दार पाठविण्यात आला नाही. रतनसिंग सध्या उज्जैनच्या सुभ्यात तैनात झाला आहे. मला देशी जाण्याची परवानगी असावी. मी तेथील व्यवस्था लावून पुन्हा हुजुरापाशी येईन."
यावर बादशहाने आज्ञा केली की, "राव गोपालसिंग याने जाण्याची जरूर नाही. रतनसिंगाला हुजुरात पाठविण्याबद्दल मुख्तारखान (माळव्याचा सुभेदार) याला लिहिण्यात यावे.' ⁵
आपल्याला आपल्या जहागिरीवर जाऊन येण्याची परवानगी मिळावी अशी त्याची विनंती बादशहाने साफ नाकारली. हताश होऊन गोपालसिंगाला बेदरबख्तच्या छावणीत परत जावे लागले.
मोगल मराठा संघर्षात साल १७०० सुरू झाले. गोपालसिंगाच्या मनातही वादळ सुरू होते.
शहाजादा बेदरबख्त याच्या छावणीत असताना डोक्यात मुंग्यांचे वारूळ फुटावे अशी बातमी त्याच्या कानावर येऊन आदळली.!
९ एप्रिल १७०० रोजी बादशहापुढे माळवा सुभ्याची ती बातमी वाचण्यात आली-
राव गोपालसिंग याचा मुलगा रतनसिंग रामपुर चा जमीनदार होता. तो माळव्याचा सुभेदार मुख्तारखान याजकडे गेला आणि धर्मांतर करून मुसलमान झाला. ही बातमी कळल्यावर बादशहांनी रतनसिंगला त्याचा बाप गोपाळसिंग याच्या जागी, गोपाळसिंगाचे वतन याचा जमीनदार (राजा) म्हणून मान्यता दिली. रतनसिंगला दीड हजार जात व एक हजार स्वार अशी मनसब देण्यात आली.
यावर बादशहाने आज्ञा केली की: "रतनसिंगला खिलतीची वस्त्रे, एक घोडा एक हत्ती व ध्वज हे पाठवण्यात यावे. बादशहांनी रतनसिंगला राजा 'इस्लामखान' ही पदवी दिली. मनसबीचे व किताब दिल्याचे फर्मान खास तयार करून पाठवावे अशी बादशहाने आज्ञा केली."⁶
अरेरे.. बादशाहने आपल्या पिढीजात सेवेतील राव गोपालसिंग चंद्रावत याच्या निष्ठेचा काहीच विचार केला नाही..?
गोपालसिंगाचा तो बेईमान मुलगा म्हणजे रतनसिंग जो आता राजा इस्लामखान बनून रामपूरच्या जहागिरीचा मालक बनला होता.!
..आणि मनातल्या प्रचंड वादळासह तीन साडे-तीन हजारांच आपलं सैन्य घेऊन गोपालसिंग आपल्या मायदेशी रामपूऱ्याच्या जहागिरीकडे सुसाट दौडत निघाला.!
आपल्या घोड्यापेक्षाही तेज दौडणार्या त्याच्या मनात एकच इच्छा होती, की जहागिरीवर जावे आणि आपल्या दगाबाज धर्मभ्रष्ट मुलाला तेथून हाकलून लावावे!!!
रतनसिंगाने जहागिरीसाठी आपले सत्व तर गमावलेच होते याशिवाय इतर कोणते करार औरंगजेबाशी केले होते, ते औरंगजेबाने माळव्याच्या सुभेदाराला पाठवलेल्या एका पत्रावरून लक्षात येते. त्यात औरंगजेब माळव्याच्या सुभेदाराला म्हणतो-
"रतनसिंग उर्फ इस्लाम खान याने वचन दिले होते की माझी आई, बहीण आणि बरेच राजपूत यांना मी मुसलमान करीन. त्याची आई आणि रजपूत मुसलमान होणे हा त्यांच्या मर्जीचा प्रश्न आहे पण त्याची बहीण असेल तर तिला त्याच्या जवळून बाहेर काढावे म्हणजे एखाद्या बरोबर तिचा निका लावून घेता येईल." ⁷
अरेरे..काय म्हणावे याला, संपत्तीसाठी बेईमानीची पराकाष्ठा !
असो,
गोपालसिंग निघून गेल्याची बातमी बादशाहाला कळविण्यात आली-
"२७ एप्रिल १७०० रोजी बादशहांना पुढील हकीकत कळविण्यात आली. राव गोपालसिंग चंद्रावत हा शहाजादा बेदारबख्त (औरंगजेबाचा नातू) याच्या फौज तैनात होता. त्याला कळले की आपला मुलगा मुसलमान झाला. त्याला राजा इस्लामखान ही पदवी देण्यात आली असून आपली जहागीर त्याच्या नावाने करण्यात आली आहे. हे ऐकून मनात विपरीत बंडखोरीचे विचार बाळगून तो बेदारबख्तच्या छावणीतून निघून आपल्या देशाकडे पळाला आहे."
यावर बादशहाने आज्ञा केली की- "वाटेतील सर्व फौजदार व सुभेदार यांना हुकूम पाठवा. गोपालसिंग कुठेही सापडला तर त्याला पकडावा अगर ठार मारावे."⁸
पाठोपाठ (२९ एप्रिल १७००) "अनव्याचा( बुंदेलखंड) फौजदार शेर अफगाण खान याने माळव्याच्या सुभेदारापाशी रुजू व्हावे आणि गोपालसिंग चंद्रावत याचे परिपत्य करावे" अशी आज्ञा झाली.⁹
अरेरे.. काय हा दुर्दैवी विलास!
ज्या छावणीमध्ये गोपालसिंग मोगलांसाठी इमानदारीने लढला होता, त्याच छावणीत आता त्याला बंडखोर आणि फरारी म्हणून घोषित करण्यात आले.! आणि औरंगजेब बादशहाच्या आज्ञेने त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी झाले ते जिंदा या मुर्दा.!¹⁰
आता माळव्याचा सुभेदार मुख्तारखान आणि मार्गातील सर्व मोगल सैन्य अधिकारी त्याच्या पिछाडीवर होते!!!
गोपालसिंग बिचारा आता काय करू शकत होता, जहागिरीच्या मोहापाई इस्लाम स्वीकारून आपल्या बापाला दगा देणारा रतनसिंग उर्फ इस्लामखान सुरक्षित होता. त्याच्या केसालाही धक्का लावणे आता शक्य नव्हते कारण त्याच्या पाठीशी खुद्द औरंगजेब बादशहा खडा होता.! याउलट गोपालसिंगच आता आश्रयदात्याच्या शोधात भटकत होता.
मात्र धर्मांतरासाठी इतरांच्या कुटुंबांमध्ये बेईमानाचे विष कालवणाऱ्या औरंगजेबाला सुद्धा नियतीने तोच धडा शिकविला होता. त्याचा प्रिय शहजादा अकबर त्याच्याशी बंड करून कसा रानोमाळ भटकला होता. गोपालसिंगचे दुःख औरंगजेबाच्या नशिबीही लिहिलेले होते.
असो,
१० जून १७००,
माळ्याचा सुभेदार मुक्तारखान याने बादशहाला लिहून कळविले की-राव गोपालसिंग चंद्रावत हा या प्रांतात आला असून तो उपद्रव करण्याच्या उद्देशाने सैन्य गोळा करीत आहे. या भागातील जमीनदार व फौजदार यांनी मला लवकर येऊन मिळावे अशा आज्ञा मुद्दाम गुर्जबर्दारांच्या हस्ते रवाना व्हाव्या."¹¹
कोट्याचा (राजस्थान) राजा रामसिंग हाडा हा मोगल फौजेत तैनात होता. मायदेशी असलेला त्याचा मुलगा भीमसिंग याने गोपालसिंगाला थोडीबहुत मदत केली. ही बातमी माळव्याचा सुभेदार मुख्तारखान याने बादशहाला कळवली-
"रामसिंग हाडा याचा मुलगा भीमसिंग याने राव गोपालसिंग चंद्रावत याला सहा हजार रुपये व कापडाच्या दोन पेट्या दिल्या, याशिवाय त्याने राव गोपालसिंगाला आपल्या इलाख्यात आश्रय दिला. काय आज्ञा ?"
बादशहाने यावर लगेच आज्ञा केली की- "रामसिंग व त्याचा मुलगा भिमसिंग यांचे मान-मरातब, मनसब काय आहेत हे चौकशी करून कळवावे."¹² (अर्थात शिक्षा करण्यासाठी)
आपण गोपालसिंगाला शरण दिल्याची बातमी बादशहाला लागली असे समजल्यावर भीमसिंगाने घाबरून गोपालसिंगाला आपल्या राज्यातून बाहेर काढले.
आता बादशहाने माळव्याच्या सुभ्यात राव गोपालसिंग चंद्रावताचे परिपत्य करण्यासाठी शहाजादा आजमशहा याची नियुक्ती केली.¹³
१३ जुलै(१७००) रोजी बादशहाने आपला बक्षी मुखलीस खान याला शहाजादा आजमशहा याच्याबरोबर पाठविण्यात येणाऱ्या लष्कराचा तपशील मागितला. आजम शहा बरोबर एकोणवीस हजार सहाशे स्वार, माळव्याचा सुभेदार मुक्तारखान, अजमेरचा सुभेदार सय्यद अब्दुल्लाखान, ग्वाल्हेरचा फौजदार जाननिसार खान, राजा जयसिंग(सवाई), इंद्रसिंग व बहादूर सिंग (उदयपूरचा राणा अमरसिंग याचे काका) व राव सुजानसिंग (बिकानेर चा राजा स्वरूप सिंग याचा भाऊ) यांचा समावेश करण्यात आला होता.
बादशहाने आजमशहाला देण्यासाठी बक्षीस म्हणून इराकी घोडे, तुर्की घोडे, मोती-पाचू यांचा तुरा असा नजराणा काढून ठेवला.
बादशहा आजम शहाला म्हणाला-"तयार व्हा, गोपाळ सिंग चंद्रावत व दुष्ट छत्रसाल बुंदेला यांच्या परिपत्यासाठी मी तुम्हाला माळवा सुभ्या कडे पाठवीत आहे."¹⁴
बादशहाने आजमशहाला नदीपार होण्यासाठी टेंभुर्णीच्या घाटावर दहा नावांचा बंदोबस्त करण्यासाठी सांगितले.¹⁵
आणि १७ जुलै(१७००) रोजी शहजादा आजम शहा फौज बंद होऊन बादशहाचा निरोप घेऊन माळव्याच्या सुभ्या कडे जाण्यासाठी निघाला.¹⁶
तिकडे बादशहाच्या भितीने कोट्याच्या (राजस्थान) राज्यात मिळालेला आश्रय फार काळ टिकला नाही. मग गोपालसिंग बुंदीच्या राज्यात गेला. तिथेही मोगलांनी त्याचा पाठलाग सोडला नाही. त्याविषयी माळव्याचा सुभेदार मुखतारखान हा बादशहाला कळवितो की-
"माझा मुलगा इफ्तिखारखान हा राव गोपालसिंग याच्या परिपत्यासाठी गेला होता. या प्रांतातील फौजदार जमीनदार व त्यांचे कारभारी यांनी त्याच्याशी सहकार्य केले. इफ्तिखारखान बुंदीला पोहोचला त्यावेळी राव बुदसिंग बूंदी चा राजा याचा कारभारी त्याला येऊन मिळाला नाही. राव गोपालसिंग हा पळून उदयपूरच्या जमीनदाराच्या (महाराणा) मुलुखात गेला."
वरील बातमी समजताच बादशहाने बूंदीचा राजा राव बुधसिंग याची मनसब दोनशे स्वारांनी कमी केली!
गोपालसिंग जो उदयपूरच्या राण्याच्या राज्यात आश्रयाला गेला होता. त्याविषयी भीमसेन सक्सेना म्हणतो की त्याला उदयपूर कडूनही मदत मिळाली नाही. एक तर गोपाल सिंगाची जहागीर त्याला परत मिळवून देणे हे उदयपूरच्या आवाक्याबाहेर असावे किंवा आमचे भाऊबंद असूनही आम्हाला सोडून हे राजे मोगलांना जाऊन मिळाले, आता त्यांनी या चुकीची फळे भोगावी अशी त्यांची भावना असावी असे भीमसेन म्हणतो.¹⁷
खरेच, पिढ्यान् पिढ्या मोगलांची निष्ठेने सेवा करणाऱ्या गोपालसिंगाच्या घराण्याने आपल्या निष्ठेचे हे फलित कधी स्वप्नातही अपेक्षिले होते काय?
गोपालसिंगाची वापसी-
गोपालसिंगाची आता अक्षरशः उपासमार होऊ लागली, त्याला कुठेच थारा मिळेना !!
अनेक वर्षे भटकल्यावर तो शेवटी १७०३ मध्ये औरंगजेबाकडे परत आला.¹⁸
त्यावेळी बादशहाचा मुक्काम पुण्यात होता. गोपालसिंगाची दशा पाहून औरंगजेब स्तब्ध झाला !
याच्या मुलाला चिथावून आपण त्याला अक्षरशः देशोधडीला लावले याची औरंगजेबाला क्षणभर का होईना, खंत वाटली असेल..
खुद्द औरंगजेबाचा मुलगा अकबर हा इराणात रानोमाळ भटकत होता याचीही त्याला आठवण झाली असावी.
भीमसेन सक्सेना म्हणतो- राजा गोपालसिंग चंद्रावत याची परिस्थिती शोचनीय झाली. तो बादशहापाशी आला. त्याला बादशहाने मनसब दिली. हैदराबाद प्रांतातील कौलास भागाची फौजदारी त्यास देण्यात आली पण त्याची जहागीर त्यास मिळाली नाही.
केवल अगतिक होऊनच गोपालसिंग हा औरंगजेबाकडे परत आला होता पण सूडाची प्रखर भावना त्याच्या मनात होती.!¹⁹
गोपालसिंग मराठ्यांच्या फौजेत-
थोड्याच काळात मोगलांची पिढीजात नोकरी सोडून गोपालसिंग मराठ्यांना जाऊन मिळाला. धनाजी जाधव याने गुजरातेत आक्रमण केले त्यावेळी गोपालसिंग हा मराठ्यांच्या सैन्यात होता.!
४ मार्च १७०६ रोजी भडोच पासून १४ मैलावर रतनपुर येथे मोगल आणि मराठ्यांमध्ये निकराची लढाई झाली. मोगलांचा प्रचंड पराभव झाला. अनेक मोगल सरदार मारले गेले. या लढाईत गोपालसिंगाने मात्र मराठ्यांच्या तर्फे हिरीरीने भाग घेतला. यानंतर लवकरच औरंगजेब हा २० फेब्रुवारी १७०७ रोजी मरण पावला. आता गोपालसिंगाला मोकळीक झाली. तो माळव्यात पोहोचून रतनसिंग उर्फ इस्लाम खान याच्या तावडीतून आपली जहागीर सोडवून घेण्याच्या मागे लागला. पण रतनसिंगाच्या वाढत्या बळामुळे गोपालसिंगास संधी मिळेना. शेवटी ती चालून आली १७१२ मध्ये!
बारा वर्षांच्या तपाची समाप्ती-
औरंगजेबाचा मुलगा बहादुरशहा हा १७१२ च्या सुरुवातीला मरण पावला. गादीसाठी त्याच्या चारी मुलांत लढाया होऊन तिघेजण ठार मारले गेले आणि सर्वात मोठा भाऊ जहांदारशहा याला गादी मिळाली. त्या अंदाधुंदीचा लाभ घेऊन रतनसिंग उर्फ इस्लामखान याने माळव्याचा बराच भाग बळकावला होता.
पण लवकरच मोगल बादशहा कडून माळवा सुभ्यावर अमानत खानाची नेमणूक झाली. राजा रतनसिंग उर्फ इस्लामखान याला माळव्याचा दावा सोडायचा नव्हता. उलट त्याने नवीन सुभेदाराला खोटेच भासविले की मोगल बादशहा जहांदरशहाचा मुख्यप्रधान जुल्फिकारखान याने आपल्याला गुप्त पत्र पाठविले असून "तू माळव्याचा दावा सोडू नकोस" असे आपल्याला बजावले आहे. सुभेदारीचा हवाला अमानतखानाला देण्यात तो टाळाटाळ करू लागला.
शेवटी युद्धाचा प्रसंग आला. रहीमबेग ठाणेदार याला अमानतखानाने सारंगपूरला(ठाण्यावर) पाठविले.
दिलेरखान अफगाण आणि राजा इस्लामखान हे चार-पाच हजार सैन्य घेऊन त्याच्यावर घसरले, आणि त्याला त्यांनी ठाण्यातून काढून लावले. ठाण्यातील अनेक माणसे मारली गेली अगर कैद झाली.
अमानत खानापाशी तीन हजारांच्या वर सैन्य नव्हते. त्यातूनही चार-पाचशे स्वार सारंगपूरच्या ठाण्यावर मारले गेले होते. उलट राजा इस्लाम खान(रतन सिंग) याच्यापाशी दहा-बारा हजार स्वार व पायदळ असे सैन्य होते. यातच त्याचा दोस्त मुहम्मदखान रोहीला (भोपळचा) हा सुद्धा त्याला येऊन मिळाला.
अमानतखान सारंगपूरला पोहोचला. ओढ्याच्या काठावर इस्लामखान याचे सैन्य पसरलेले त्याला दिसले. राजा इस्लामखानाचा सरदार दिलेरखान चार-पाच हजार घेऊन अमानतखानाच्या उजव्या फळीवर तुटून पडला.
राजा इस्लामखानाने आपले दहा-बारा हजार सैन्य तीन सरदारात वाटून दिले. अमानत खानाला सर्व बाजूंनी घेरून टाकावे असा त्याचा बेत होता. पण अमानत खान शौर्याने लढत होता. अमानत खानाचा साडू दिलावरखान हा सुद्धा रणभूमीवर इतरत्र निकराने लढण्यात गुंतला होता.
अमानत खानाचा मित्र आणि सरदार खानजहान उर्फ अन्वरखान हा डाव्या फळीवर होता. हा अमानत खानाचा एकमेव मातब्बर सरदार आहे हे ओळखून राजा इस्लाम खानाचा सेनापती दिलेरखान त्याच्यावर चालून गेला. मोठी हातघाईची लढाई झाली. दिलेरखानाने आपला हत्ती अन्वरखानजवळ नेऊन भिडविला. मात्र इतक्यात अन्वरखानाने आपली बंदूक चालविली आणि दिलेरखान ठार झाला!
याच सुमारास राजा इस्लामखान हा घोड्यावर बसून सैन्याच्या मध्यभागी लढाईचे संचलन करीत होता. आणि अचानक पणे एक गोळी सुसाटपणे आली आणि राजा इस्लामखान उर्फ रतनसिंग याच्या आयुष्याचा वेध घेऊन गेली.!! इस्लामखान पडला! अमानतखानाच्या सैन्यापैकी कुणीतरी हत्याराने त्याचे डोके कापून आणले!!
भीमसेन सक्सेना म्हणतो की, वार्ता अशी उठली की ही गोळी खुद्द गोपालसिंगानेच चालवली होती. ²⁰
असो, कदाचित तसे असेलही, एका पुत्राने आपला पुत्रधर्म भ्रष्ट करून बापाशी केलेल्या गद्दारीची ही शिक्षा असेल तर त्यात नवल काय.
असो, अमानतखानाला दणदणीत विजय मिळाल्याने गोपालसिंगाने आपली जहागीर रामपुरकडे धाव घेतली. अखेर कित्येक वर्षे अशी झुंज देऊन त्याने जाहगिरीचा ताबा मिळविला होता.
रामपूरला आल्यावर आपला तो पुष्तैनी राजवाडा त्याने गंगेच्या जलाने शुद्ध केला. गोपालसिंगाने उदयपूरच्या राण्याला पत्र लिहून कळविले की, आपण आता मोगलांचे नाहीत आपले आहोत. मांडलिक म्हणून आमचा स्वीकार करावा. अशी ही विनंती मान्य करण्यात आली आणि रामपूरचे चंद्रावत सरदार पुन्हा उदयपूरच्या राज्यात सामील झाले.²¹
बारा वर्षांच्या तपाची समाप्ती झाली होती. गोपालसिंगाने आपला सूड पूर्ण केला होता. काय हा लढा त्याने फक्त आपली जहागीर मिळवण्यासाठी दिला होता..? नव्हे सत्तेच्या मोहापायी साक्षात बापाशी हरामखोरी करणाऱ्या दगाबाज पुत्राला धडा शिकविण्यासाठी दिला होता.
अशी आहे कथा पिता-पुत्रांची, जिद्दी गोपालसिंगाची आणि धर्मभ्रष्ट रतनसिंगाची, जो पुत्रधर्म पाळावयास हवा होता आणि जो त्याने पाळला नाही. खरेतर बापाशी अन् मातृभूमीशी बेइमानी करणाऱ्या राजा इस्लामखानाची!!
असो, इतिहासाचं हे पान राजा राव गोपालसिंग चंद्रावता साठी!
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्तइतिहास।।
संदर्भ-
1-तारीखे दिलकुशा (मोगल आणि मराठे), स.से.पगडी खं-३,२३८
2-मोगल दरबाराची बातमीपत्रे१६८५-१७००, पान३१
3-मोगल दरबाराची बातमीपत्रे१६८५-१७००,६ ऑगस्ट१६९९ ,पान२४
4-मोगल दरबाराची बातमीपत्रे१६८५-१७००,६ सप्टेंबर, पान३१
5-मोगल दरबाराची बातमीपत्रे१६८५-१७००,१० सप्टेंबर,पान३१
6-मोगल दरबाराची बातमीपत्रे१६८५-१७००, पान१२६
7-नियतीच्या विख्यात औरंगजेब,स.से.पगडी खं-२,१३२०
8-मोगल दरबाराची बातमीपत्रे१६८५-१७००, पान१३८
9-मोगल दरबाराची बातमीपत्रे१६८५-१७००, पान१३९
10-मोगल दरबाराची बातमीपत्रे१६८५-१७००,२१ मे१७००,पान१४८
11-मोगल दरबाराची बातमीपत्रे१६८५-१७००, पान१५६
12-मोगल दरबाराची बातमीपत्रे१६८५-१७००, १२जुन १७००, पान१५६
13-मोगल दरबाराची बातमीपत्रे १६८५-१७००,१० जुलै१७००,१६४
14-मोगल दरबाराची बातमीपत्रे १६८५-१७००, १३ जूलै१७००, पा.१६७
15-मोगल दरबाराची बातमीपत्रे१६८५-१७००, १६ जुलै१७००,पा.१६९
16-मोगल दरबाराची बातमीपत्रे१६८५-१७००, पान१६९
17-नियतीच्या विळख्यात औरंगजेब,स.से.पगडी खं२, पा.१३१८
18-मोगल आणि मराठे (तारीखे दिलकुशा), स.से.पगडी,खं३, पा. ३३९
19-मोगल आणि मराठे (तारीखे दिलकुशा), स.से.पगडी खं३,पा. ३३९
20-नियतीच्या विख्यात औरंगजेब,स.से.पगडी खं२,पा.१३२०
21-नियतीच्या विख्यात औरंगजेब,स.से.पगडी खं२,पा.१३२०.
Comments
Post a Comment
... मग कशी वाटली पोस्ट