कर्नाटक व तामिळनाडूमध्ये मराठ्यांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा सर्वत्र आढळतात. जिंजीच्या जवळच अलीकडे वेलोर नावाचा स्थळदुर्ग आहे.
तिर्थ व्हावेत असे सगळ्यांनाच वाटत. म्हणून केल सर्वांनी तिरूपतीस जायच नियोजन. तसे श्रद्धा आणि आशीर्वाद हा आमचा जीवनाचाच भाग. आणि देवदर्शन म्हणजे पापी मनास पवित्र स्नानच. पण या पवित्र स्नानाशिवाय हवय अचाट शक्तीच आणि बुलंद काळजाच अमोघ रसायन. आणि म्हणून त्यासाठी दक्षिनेतील शिवतिर्थांना भरभरून अनुभवाव अस मनात वाटत होतं. आणि तस नियोजन केल. सोमवारी वाशीमहून सकाळी अमरावती-तिरूपती या ट्रेनमध्ये दोन मित्रांसह बसलो. पण दुसरे दिवशी सकाळी तिरूपतीस न उतरता ६० किमी. अलीकडे पाकाला जंक्शनला उतरलो. तेथून काटपाडीचे तिकिट काढले. पाऊन तासात तेथे पोचलो. मग काटपाडी स्टेशनवरून अॅटो पकडून निघालो अन् मराठ्यांच्या इतिहासास साक्ष असलेली पालार नदी दिसली. जवळच काठावर वेलोरचा बळकट दुर्ग पाण्याने वेष्ठीलेला नजरेस भरत होता. आणि गतकाळात पडलेल्या मराठ्यांच्या वेढ्याची चित्रे, किलकार्या, घोड्यांचे किंकाळने अनुभवास येऊ लागले.
बळकट ग्रॅनाईटची तटबंदी व बेलाग बुरुज ही त्याची बलस्थानं आहेत. खंदकाला सुर्यगुंड" या भूमिगत नाल्याद्वारे पालार नदितून पाण्याची व्यवस्था केली होती. त्यात सदैव पाणी असायचे व त्यात सुसरी, मगरी सोडलेल्या होत्या. त्यामुळे हा दुर्ग अजिंक्य मानला जायचा. इसवी सन १६७७ च्या मे महिन्यात शिवाजी महाराजांनी वेलोरला वेढा घातला. अब्दुल्लाखान नावाच्या एक हबशी किल्लेदाराने निकराने किल्ला लढविला.
वेलोरच्या जवळ दोन टेकड्या आहेत. त्यांना महाराजांनी नावे दिली..साजरा व गोजरा. त्यांवरून मराठा सरदार नरहरी रुद्र यांच्या नेतृत्वाखाली वेलोरवर मराठी फौजा तोफांची सरबत्ती करू लागल्या. चिवट सिद्दी अब्दुल्लाखान अखेपर्यंत लढत राहिला. पण अखेर किल्ल्यात साथीचा रोग पसरल्यामुळे अब्दुल्लाखानाचा नाइलाज झाला. रघुनाथपंत हनुमंते व नरहरी रुद्र यांनी संधी साधली. २२ जुलै १६७८ रोजी वेलोरवर भगवा जरीपटका फडकवला. अशाप्रकारे राजांनी दक्षिणेत आपले अस्तित्व निर्माण केले. पुढे शंभूराजेंच्या मॄत्यूनंतर मोगलांनी रायगडाला जो वेढा दिला, त्यातून निसटून राजाराम महाराज दक्षिणेत आले. तेव्हा त्यांनी प्रथम जिंजीला जाण्यापूर्वी वेलोरात प्रवेश केला होता.
असो, हा किल्ला इ.स.१५६६ त्या सुमारास बांधला गेला. त्यानंतर विजयनगर, तंजावरचे नायक, विजापूर, मराठा, मुघल, ब्रिटिश अशी बरीच स्थित्यंतरं त्यानं अनुभवली. वेलोर म्हणजे वेल अर्थात तामिळभाषेत भाला व उर अर्थात शहर. भालाधारी योद्याचे शहर असे समजले जाते. त्यावरून मुरूगन या भालाधारी देवतेच मंदिर येथे बघावयास मिळते.
जलकान्तेश्वराचे प्राचीन मंदिर हे किल्ल्याचं मुख्य आकर्षण आहे. दक्षिण भारतीय पद्धतीनं केलेलं बांधकाम आणि गोपुरांवर केलेली सुंदर कलाकुसर तत्कालीन विजयनगर कलेची ओळख करून देते. मंदिराच्या आवारातील दगडी खांबांवर विविध प्राणी, काल्पनिक प्राण्यांवर बसलेला योद्धा, असे असंख्य प्रसंग कोरलेले आहेत; जे पाहून आपण केवळ स्तिमित होतो.
या मंदिराशिवाय किल्ल्यामध्ये एक मशीद, टपाल कार्यालय, चर्च, भारतीय पुरातत्व विभागाचं कार्यालय आणि संग्रहालय आहे.
किल्ल्याचा थोडक्यात इतिहास मंदिराबाहेर दिला आहे; मात्र त्यात "साजरा-गोजरा'चा उल्लेख नाही. काही लोकांना विचारायचा निष्फळ प्रयत्नही करू नये. शेवटी टेकडीच्या दिशेने गल्ली-बोळांतून फिरून २० मिनिटांत आम्ही त्या टेकडीवजा डोंगराच्या पायथ्यापर्यंत पोचलो. लोकांनी या टेकड्यांचा वापर "मल विसर्जनासाठी' एवढाच ठेवला आहे. मात्र वेल्लोरभोवती आणि त्यातही किल्ल्यावर मारा करता येईल एवढ्या अंतरावर हे दोनच डोंगर आहेत. असं म्हणतात, की वेल्लोरमध्ये प्रवेश करताना महाराजांना डावीकडे जो डोंगर दिसला, तो साजरा आणि उजवीकडचा तो गोजरा. या तर्कानुसार आम्ही ते पाहिले. त्यावर प्रवेशद्वार, पहारेकाऱ्यांच्या देवड्या, इमारतींचे काही अवशेष आणि बुरुज आहेत. वर भरपूर गवत आणि काटेरी झुडपं माजली आहेत. महाराजांनी याच डोंगरांवर तोफा चढवून वेल्लोरच्या किल्ल्यावर सरबत्ती केली होती. पुढं किल्ल्याचा वेढा १४ महिने चालू राहिला. सिद्दी अब्दुल्लाखानानं माघार घेऊन वेल्लोरचा किल्ला मराठ्यांच्या स्वाधीन केला. हे घडलं १६७८ मध्ये. अर्थात, इथं असा काही इतिहास घडला होता, हे तिथे वस्तीस असलेल्या लोकांच्या मनीही नाही. मात्र जेथे मराठीचा "म लोकांना कळत नाही अशा भूमिवर आपल्या पूर्वजांनी सत्ता गाजवीली याचे सार्थ आश्चर्य आणि अभिमान मनात सारखा उद्दिपित होत होता.
महाराष्ट्रातील किल्ल्यांची सद्यःस्थिती सगळेच जाणतात. मात्र परक्या मुलुखात, महाराजांनी मिळवलेला विजय आणि त्याच्या या साक्षीदारास पाहिल्यावर, स्पर्शल्यावर नक्कीच सार्थक झाल्याचं वाटल.
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
||फक्तइतिहास||
http://www.faktitihas.blogspot.in
Comments
Post a Comment
... मग कशी वाटली पोस्ट