मेहकर अर्थात शारंगधराचा आशीश प्राप्त प्राचीन मेघंकर नगरी आज गोंगाट आणि गजबजाटाने वेढून गेली आहे. इतिहास मनात साठवून बसलेले पुराणपुरूष एकाकी पण साक्षि भावाने आम्हास काहीतरी सांगण्याचा प्रयत्न नेहमिच करतात. पण आम्ही आपल्या व्यस्त आणि ग्रस्त जीवनात हरखून गर्दीतुन वाट काढत आपल्या हॉर्नचा घोषा राबवत उसासे टाकत कसेतरी येथून पळ काढण्याचा यशस्वी प्रयत्न नेहमिच करतो.
असेच एक दिवस मी मालेगावहून चिखलीस जावयास निघालो. मध्यंतरी मेहकरहून जाताना मला पेनगंगेच्या काठावरील प्राचीन असे एक सुंदर पण जीर्णोद्धाराच्या प्रतिक्षेत असलेले भव्य देऊळ दिसले. पेनगंगेच्या पुलावरून जाण्याआधिच डाव्या बाजूस गाडीमधून या देवळाचा घुमट नेहमिच लक्ष वेधून घेतो ते त्याच्या पुरातन नक्षिदार बांधनीने. म्हनुन नेहमिच जिज्ञासा होते. मात्र वाटल की,आता जाऊन बघावच की काय रहस्य दडलय या घुमटामागे ते !
एक लोखंडी गेट पार करून गेल्यावर मी देवळाच्या आवारात दाखल झालो. थोडी चौकशी केली असता एक सज्जन मला येऊन भेटले. ते होते शरद लक्ष्मन गिरी, या देवळाचे वहिवाटदार.
या देवळाबद्दल "मेघंकरचा शारंगधर" या ग्रंथातही चार-पाच ओळींपेक्षा अधिक माहिती दिलेली नाही. मात्र शरद गिरी यांनी मला बरीच माहिती पुरवीली.
मित्रांनो, काही पुराणपुरूषांची कथा पानांवर छापली गेली नसली तरी त्यांचे जीर्ण -एकाकी पण बुलंद अस्तीत्व खुद्द काळाचे साक्षि आहे.
हे देऊळ दत्तांचे असून पुरातन असे आहे. मुर्ती प्राचीन आहे. देवळाचा परिसर भव्य असून पूर्वी त्यास चोहोबाजूंनी भव्य तटबंदि होती. तटबंदिला भक्कम चार बुरूजांचा आधार होता. मात्र काळाच्या ओघात तट नामशेष झाले. देऊळाच्या उजव्या बाजूस राहाण्यासाठी एक भव्य दगडी वास्तू होती, ती आज नसून फक्त काही दगडी नक्षिदार खांब त्याची साक्ष देतात. मात्र १६ व्या शतकात विटा-चून्याने शेजारीच एक दुसरी मठ वास्तू बांधली गेली. ती सुद्धा बहुतांश पडक्या अवस्थेत आहे. देवळाचे बांधकामही विट-चून्याचे आहे. त्यासाठी आवारात एक मोठा चूनखडीचा घाना होता, त्याचे अवशेष बघावयास मिळतात.
एक पुरातन पण भरपूर पाणी असलेली दगडी बांधनिची विहीर एका बाजूस आहे. शहरात नळ योजना होणेपूर्वी गावकरी याच विहीरीचे पाणी नेत असत.
|
शिलालेख व मठाचे अवशेष |
देवळास लागून उजव्या बाजूस एक समाधि आहे. गिरींच्या मते कुणी ऋषी श्रीहरी यांची ती असावी. तसा शिलालेख समाधिवर कोरलेला आहे. लिपि देवनागरी असून बहुतभाग झिजला आहे. तरी "संवत्सरे शके १६४८" व "श्रीहरी ऋषी" अशी काही कोरीव अक्षरे वाचता येतात. बाकी भाग तर्कानेच काढावा लागतो. या शकावरुन हा शिलालेख सन १७२४ चे सुमारास निर्मीत आहे.
इतिहास म्हणतो की १६ व्या शतकात हा भाग सिंदखेडचे राजे जाधव यांच्या अख्त्यारीत मोडत होता. मेहकर महालही त्यांच्या अख्त्यारीत होता. आणि पुरातन राजकिय प्रथेनुसार मठांना दिवाबत्ती व इतर उत्सवकार्यासाठी तत्कालिन राजप्रशासनाकडून खर्च भागवण्यास जहागीर वा जमीन दिली जाई. तसेच अशी जमिन या मठालाही मिळाली होती. जवळील शोवगा येथील जमिन या देवळास सनदेत खर्चासाठी मोईन मिळाली होती. पण कुळकायद्याने ती अाता वाहनाऱ्याकडे गेली.
शरद गिरी यांच्या मते सेवागिर महाराज हे पूर्वी या मठाचे महंत होऊन गेले. पश्चात गणेशगिर महाराज महंत झाले. पश्चात गुरूगुलजार पुरी व नंतर शंकरगिरी यांनी महंत म्हनुन काम पाहिले. ब्रह्मचारी महंत श्रीशंकर गिरी हे या मठाचे शेवटचे महंत समजले जातात. पश्चात त्यांनी या मठाची वहिवाट विष्णुगिरी नारायनगिरी यांना दिली व नंतर ते देखभालीचे काम आज श्री शरद लक्ष्मन गिरी यांच्याकडे अाले आहे.
एक लक्षनिय बाब ही की, पूर्वी जसे मठास राज्य व्यवस्थेप्रमाणे दिवाबत्तीची सोय केली जाई तशी सोय शासनानेही केली होती. ती किती ...तर तब्बल २९६ ₹ वार्षीक एवढी. पण गेल्या सहा वर्षांपासून तीसुद्धा बंद झाली आहे.
|
देवळातील ते भूयार व बाहेरील ती विहिर |
देवळाच्या गाभाऱ्यात पुरातन दत्त मुर्ती आहे. गाभाऱ्याखाली मोठे तळघर आहे. ज्यात बसून महंत गोसावी ध्यान धारणा करीत. मात्र तळघरात एक बंद भूयार आहे. गिरींच्यामते हा भूयारी मार्ग बाहेरील विहीरीकडे जातो.
चून्या-वीटांचा आवाका आणि लहान-थोरांची पुष्ते अन् राजगाद्यांची घडामोड पाहिलेल्या या पुराणपुरूषाच्या अंतरंगात बहूत रहस्य दडून बसले.
येथील भूयाराप्रमाणे अशा कित्येक गोष्टी इतिहासात रहस्य बनून बेमालूम राहिल्या मनाच्या विविध कप्प्यांप्रमाणे तुमच्या नी माझ्या....!
||फक्तइतिहास||
http://www.faktitihas.blogspot.in
Comments
Post a Comment
... मग कशी वाटली पोस्ट