गत तीन सालापासून मोगल सुभेदार बहादूरखान व महाराजांचे राजकारण विजापूरच्या भोवती फिरत होते. आदिलशाहीची अवस्था पूर्वी प्रमाणे मजबूत राहिली नव्हती. विजापूरचा आली आदिलशहा ह्याच्या मृत्यूपासून (२४ नोव्हेंबर १६७२) आदिलशाहीचे सारे वैभव संपुष्टात आले होते. त्याचा वारस सिकंदर हा वयाने लहान असल्याने त्याच्या नावे अबेसिनियान अर्थात दरबारातील दक्षिण गटाचा पुढारी खवासखानच सत्ता हातात घेऊन कारभार हाकीत होता. वजीर दक्षिण गटाचा नेता खवासखान तर सरसेनापती हा आफगाण गटाचा नेता बहलोलखान पठाण असे कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांचा विरोध करीत. आफगाणी व दक्षिणी अशा मुस्लीम गटांचा झगडा माजल्याने प्रशासन विस्कळीत झाले होते. विजापूरचा सरसेनापती बहलोलखान खवासखानाचे कोणतेच हुकुम पाळीत नव्हता. खावासखानाने अफगाण गटाचा बिमोड करण्यासाठी गुप्तपणे मोगलांचा दक्षिण सुभ्साचा सुभेदार बहादुरखान यास मदत मागितली. तसे बहादूरखान १९ ऑक्टोबर १६७५ रोजी भिमातीरास खवासखानाच्या भेटीसाठी आला. त्यालाही महाराजांविरुद्ध युद्ध करायचे होते व आदिलशाहीतून लाभ मिळवायचा होता. झालेल्या भेटीत त्याने वझीर खवासखानाला मदत देण्याचा व त्या बदल्यात महाराजांविरुद्ध मोहीम काढण्याचा करार केला. बहलोलखानास या हालचालींचा सुगावा लागला. त्यानेही एक गुप्त योजना आखली. ११ नोव्हेंबर १६७५ रोजी बहालोल्खानाने खवासखानाला भोजनास बोलावून भरपूर मद्य पाजले आणि बेहोशीत कैद करून आपली जहागीर बंकापुर येथे कैदखान्यात टाकले. पश्चात लगेच विजापुरी जाऊन त्याने आदिलशहाकडून वझिरी प्राप्त केली.
बहादुरखानाने महाराजांविरुद्ध खवासखानाशी केलेली राजनीती अशारीतीने फसली. बहलोलखानाने वजीर बनातच दक्षिणी गटाचा सफाया करणे सुरु केले. यामुळे दक्षिणी गटानेही बंड आरंभिले. यात जानेवारी १६७६ मध्ये बहालोलचा प्रमुख सल्लागार खिज्रखानपन्नी याला एका दक्षिणी गटाच्या सरदाराने ठार केले. त्या बदल्यात बहलोलखानाने बंकापुरास कैदेत असलेल्या खवासखानाला ठार केले. यानंतर दक्षिणी गटाचा नेता शर्जाखान व बहलोलखान यांच्यात युद्ध झाले. त्यात बहलोलच्या अफगाण गटाचा विजय झाला तर शर्जाखान सोलापूरास बहादुरखानाच्या(मोगलांच्या) आश्रयास निघून गेला. अर्थात बहादुरखानाने यावेळी दक्षिण गटाला पाठींबा देऊन विजापुरी बहलोल प्रणीत अफगाण प्रशासनाचा निषेध केला. कारण बहादुराखानाला परिस्थितीचा फायदा घेऊन आदिलशाहीत मोहीम राबवायची होती तर इकडे महाराजांनाही आदिलशाहीची अवस्था पाहून कर्नाटक स्वारी साधायची होती. म्हणून कर्नाटकात जाण्यापूर्वी त्यांनी बहादुराखानाशी सख्यत्वाचा बहाणा सुरु केला होता.
शिवाचात्रापतींच्या राजानितीचा अत्यंत दर्जेदार नमुना म्हणजे कुतुब्शाहाशी व बहादुरखानाशी केलेली परराष्ट्रनीती होय. महाराजांच्या आयुष्यातील सर्वात कीर्तिवान मोहीम ही कर्नाटक स्वारी होय, ज्याला दक्षिण दिग्विजय असेही संबोधले गेले. ज्या राजनीतीने दख्खनचे राजरंग कायमचे बदलून टाकले अशा थोर राजकारणाला सुरुवात झाली होती.
अबुल हसन कुतुब्शाहाशी स्नेह दृढ करावा आणि कर्नाटक व तमिळनाडूतील आदिलशाही मुलुखात आपले वर्चस्व प्रस्थापित करावे असा विचार त्यांच्या मनात आला. विजापूरची आदिलशाही बहलोलखान व त्याच्या पठाण सरदारांच्या वर्चस्वाखाली गेली ही गोष्ट महाराजांना रूचली नाही.
कुतुब्शाहित पठाणांचा प्रभाव नव्हता. तेथील राजकारण हे हिंदू आणि दक्षिणी मुसलमान यांच्याच हातात होते. मादण्णा आणि अाकण्णा हे दोन मुत्सद्दी कुतुब्शाहाचे मुख्य सल्लागार प्रधान होते.
त्याच्या माध्यमांतून कर्नाटकाची मोहीम सध्या करावी असा त्यांचा हेतू होता. तसेच कुतुबशाहीस लागून चंदिचंदावर कडील मुलूखात अदिलशाही शेरखान पठाणाचे वर्चस्व होते. त्यांस आवर घालण्यासाठी शिवाजीचा उपयोग होईल असा विचार मादण्णा व आकण्णा यांनी केला. महाराजांचे कुतुबशहाशी संबंध सलोख्याचेच होते शिवाय मोगल वा अदिलशाहीला टक्कर देणाऱ्या महाराजांच्या सत्तेचे महत्व कुतुबशहास समजले होते. पूर्वी निराजी आणि आता त्यांचा पुत्र प्रल्हाद निराजी हे महाराजांचे भागानगरीचे (हैद्राबाद) राजदूत होते. त्यांच्या मार्फत महाराजांनी कुतुब्शाहास दक्षिणेतील राजकारणातून पठाणांचे वर्चस्व नष्ट करणे किती आवश्यक आहे ते पटविले. मादण्णा पंडीत यांच्या माध्यमातून अबुल हसन कुतुब्शाहाने आपल्या राज्याच्या संरक्षणा करिता दरवर्षी महाराजांना एक लक्ष होण खंडणी द्यावी या अटीवर तह मान्य केला. तहाचा पहिला हफ्ता म्हणून प्रल्हाद निराजी कुतूब्शाहाकडून सहासष्ट हजार होण बरोबर घेऊन रायगडास आले. (जेधे शकावली करीना-कुलकर्णी पृ. ६९)
कर्णाटक स्वारीचा मार्ग मोकळा झाला, राहिली ती पिछाडीवर मोगल आघाडी शांत ठेवण्याची व्यवस्था. तर त्याचे असे जमले की तीन वर्षापूर्वी वायव्य सीमेकडे गेलेल्या औरंगजेब बादशाहने तिकडील बंडे मोडून आतापर्यंत नियंत्रण मिळवले होते. परत फिरून तो ३१ जानेवारीस लाहोरास पोचला होता. आणि ५ एप्रिल १६७६ रोजी तो दिल्लीस दाखल झाला. त्याच्या हुकुमानुसार बहादुरखानाने आधीच विजापुराशी युद्ध घोषित केले होते. या कामात शिवाजीराजानेही आपल्याला सामील व्हावे अशी त्याची मनीषा होती. महाराजांनाही कर्नाटक स्वारी साधायची होती. म्हणून या स्वारीत आपल्या मागे मोगल तटस्थ राहावे असे महाराजांना हवेच होते. शत्रूच्या मनाचा अचूक वेध घेऊन त्याचा राजानितीत्साठी योग्य उपयोग करून घेण्याचे सार्थ कसब महाराजांपाशी होते. त्यांना लगेच निराजी रावजीस बहादुर्खानाकडे पाठवले. मोठा किमती नजराणा सोबत द्यायचे ते विसरले नाहीत. खरेतर महाराज खानची संभावना पेंधीचे गुरु अशी करत. कारण नजराण्याने तो खुश होई. असो, निराजीनी हुशारीने बोलणी मार्गी लावली व वर्षभर महाराजांच्या गैरहजेरीत तो तथास्था राहील असे त्याने मान्य केले. महाराजांच्या कुतानितीचा मोठा विजय होता. याबाबत सभासद बखरकार म्हणतो- त्यास प[एद्गावी बहादूरखान गनीम पाठीवर येईल म्हणून निराजीपंत न्यायाधीश पाठविले. इत्येक द्रव्य अलंकार रत्नखचित पाठवली. त्यास अंतरंग सख्या करून एक वर्षपर्यंत आपणांस कर्नाटक साधावयास लागेल. तुम्ही राज्यास उपद्रव न करणे. असे त्यांस सांगून ठाई संगुंठेविले.(सभासद पृ. १०४)
आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या स्वरीकारिता शेजारच्या सर्व शासकांची परिस्थिती या थोर राजनीतीने अनुकूल अशी घडवून आणली होती. काही महिन्यातच सर्व लष्करी व मुलुकी तयारी झाल्यावर महाराज ६ ऑक्टोबर १६७६ रोजी अर्थात विजयादशमीच्या दिवशी दक्शिन दिग्विजयासाठी निघाले.
संदर्भ- सभासद बखर, चिटणीस बखर, जेधे शकावली-करीना
|| फक्त इतिहास ||
Comments
Post a Comment
... मग कशी वाटली पोस्ट