Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

अद्भूत साक्षात्कार- लोणार...


 लोणारला मालेगाव होऊन तसे तासाभरात पोचता येते. मामाचा गाव म्हणुन बऱ्याचदा चढ्या घोड्याने बघितलेला गाव इतिहासातून बघण्याचा खरा योग आता सुमारे पंधरा वर्षांनी आला!
लोणार नगराचा पहिला संदर्भ ऋग्वेदामध्ये आला आहे. त्यातील मधुमता नावाचे नगर हे लोणार आहे. पुराणकथेनुसार कश्यप ऋषींना १३ बायका होत्या, त्यातील दिती नावाच्या बायकोपासून गयासूर, कोल्हासूर व लवणासूर नावाचे पुत्र झाले. तिघांनीही शिवाची तपश्चर्या केली. त्यामुळे शिव प्रसन्न झाले व त्यांना मरण अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये मिळेल असा वर दिला. पण अमरत्व दिले नाही. वर मिळाल्यावर दैत्यांच्या क्रोध व क्रौर्य मुळे देवतांनी त्यांचा वध केला.! ब्राह्मदेवाने गयासूराचा वध केला ते स्थान बिहार येथिल ब्रह्मगया ठरले तर शंकराने कोल्हासूराचा वध केला ते कोल्हापूर किंवा रूद्रगया ठरले, आणि विष्णूने लवणासूराचा वध केला ते लोणार !
श्रीविष्णूच्या अंगठ्याला लागलेले रक्त धुन्या करिता गंगाभोगावती अवतरल्या व दगडावर बसून विष्णूने स्नान केले. पुढे याच भोगावती कुंडात श्रीरामाने सुद्धा स्नान केले. युधिष्ठीरानेही येथे पित्याचे श्राद्ध केल्याचे पुराण सांगते.
लोणार सरोवर-
लवणासूर लपून बसला ते हेच लोणार विवर. ज्यास नाभीतीर्थ, पद्मसरोवर, तारातीर्थ, विराजतीर्थ किंवा बैरजतीर्थ असेही म्हणतात. तुलसिदास रामायणातही याचा उल्लेख आहे. ब्रिटीश अधिकारी जे. ई. अलेक्झांडर यांनी सन १८२३ मध्ये या विवराची नोंद केली. तसेच ऐन-ए-अकबरी, पद्म पुराण व स्कंध पुराण यासारख्या प्राचीन ग्रंथातही विवराचा संदर्भ आढळतो.
हे महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातील उल्कापातामुळे तयार झालेले बेसॉल्ट अर्थात अग्नीजन्य खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. पन्नास हजार वर्षांपूर्वी या सरोवराची निर्मिती मंगळा वरील अशनी आदळल्याने झाली असावी असा दावा काही संशोधक करतात. हा दावा प्रबळ करणारा पुरावा डॉ. तांबेकर यांच्या या संशोधनामुळे सापडला आहे. या सरोवरात मंगळावरील विषाणू सापडला असून 'बेसिलस ओडीसी' असे त्याचे नाव आहे. इ.स. २००४ मध्ये नासाच्या अंतराळ यानाने मंगळावरील मोहिमेत या विषाणूचे अस्तित्त्व शोधले होते. असो, या विवराचा व्यास १.८ किमी तर सरोवराचा परिघ ४.८ किमी एवढा भरतो. पॄष्ठभागापासून याची खोली १३७ मी एवढी भरते.
सरोवरातील पाणी तसे खारे आहे. त्यात मोठ्या प्रमाणात salt आहेत. पाणी alkaline असून ph 11 पर्यंत भरते. Halomonas ,Paracoccus, Klebsiella, Slackia, Actinopolyspora इत्यादि प्रजातीचे nitrogen fixing bacteria या पाण्यात आढळतात. विशेष म्हणजे या पाण्यातील जीवसॄष्टी इतरत्र सापडत नाही.
पेनगंगा व पूर्णा नावाचे दोन गोड्या पाण्याचे झरे वरून वाहत सरोवरास मिळतात. लोणारतज्ञ प्रा बुगदाने यांनी लोणारचा इतिहास बराच प्रकाशात आणला आहे.
ऐतिहासिक दॄष्टिने पाहिल्यास समजते की लोणार मौर्य साम्राज्यात मोडत होते. हे दक्षिण मार्गावरील मुख्य ठीकाण असल्याने त्यास दक्षिणद्वारही म्हणत. गुप्त कालात येथे वाकाटकांचे राज्य होते. पुढे सातवाहन आणि नंतर राष्ट्रकुटांनी येथे शासन केले. होयसाळ व यादवांनीही यात योगदान दिले. प्रत्येक राजवटीत नवीन देवळ बनली वा जुनी घडविली गेली. ही देवळ तलावाच्या सभोवताली व धारेजवळ आहेत. दूरदेशातून अनेक ऋषि-महात्मे तपस्येस व देव दर्शनास येत. मात्र अल्लाउद्दिन खिल्जीच्या आक्रमनाने काही नासधूस झाली व पुढे बहामनी, निजामशाही, मोगल या दिर्घ परकिय राजवटिंमध्ये लोणारचे दिव्यत्व झाकोळून गेले. पुढे सन १७०० मध्ये निजामाच्या व नानासाहेब पेशवे यांच्या कालात येथील वास्तूंना सुकाळ आला. निजामाचा दिवान राजा चंदुमल याचेकडून मंदिराचा वहिवाट खर्च देण्यात आला. पंडित-ब्राम्हण नियुक्त झाले व दिप-धुपाने पुनश्च येथील परिसर दरवळून उठला.

या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. सन १८५३ मध्ये, ब्रिटिश अधिकारी कर्नल मॅकेन्झी यांच्या मते लोणारला ३२ मंदिर व १७ स्मारक, १३ कुंड व ५ शिलालेख आहेत. यापैकी २७ मंदिर, ३ स्मारक व ७ कुंड तलावाच्या आत व काठावर आहेत.
प्रातकाळी अगदी ६ वाजता मी मामांसोबत माझ्या पुतन्या व भाचाला घेऊन लोणार सरोवराकडे निघालो. घाट उतरण्यापूर्वी अफाट तलावाच मोहक दृष्य टिपून घेतल.
शंकर गणेश मंदिर-
हे मंदिर रेस्ट हाऊस पासून सरोवरात उतरताना रामगयेजवळच आहे. हे मातीखाली दाबले गेले होते. त्याच्या आत चौकोनी महादेवाची पिंडी आहे व सुंदर गणपती आहे.
मंदिर उध्वस्त आहे. त्याजवळच रामकुंड आहे. ते पण मातीने भरले आहे व त्याचा झरा बाजूने बगीच्या कडे काढला आहे. माझ्या आईच्या मते पूर्वी या कुंडात गरम पाणी असायचे. मात्र आज तो मातीने भरलेला आहे. याच्या शेजारी आहे रामगयामंदिर-
हे मंदिर उंचभागावर तिन्ही बाजूने सज्जा असणारे आहे. त्यांच्या गर्भगॄहावर वीरासन मधील हनुमान आहे.
मंदिराच्या आत राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती निजामाच्या काळात नष्ट झाल्या आहेत. रामगयेवरून दाट झाडीतूनझपाट्याने चालतांना वाटेतच एक हातभर लांब सुस्त पहुडलेली घोरपड दिसलीन अन् मी दचकलो ! क्षणभर तिचे निरिक्षण करून विचार आला की हे काय अद्भूत अनुभवायास मिळात आहे. कधी प्राचीन सुरेख बांधणीचं देऊळ तर कधी पक्ष्यांची किलबिल, तर कधी निसर्गाचा अविष्कार..खरेच, या ब्रह्मांडात मनुष्य मात्र एक जीव आहे..!

विष्णुमंदिर-
हे मंदिर तलावाकडे नर्सरीतून जाताना डाव्या हाताने आहे या मंदिरावर प्रत्येक स्तंभावर सुंदर शिल्प आहे.गाभार्यात मुर्ती नाही. पण सभामंडपात स्तंभावर गणपती, कॄष्णलीला अशी सुंदर शिल्प आहेत. कमळजा देवीकडे जातांना पुढे लागते वाघ महादेव मंदिर-
हे मंदिर मोठे असावे. पूर्व मंडपात शिरहिन गौरी शिल्प आहे. गाभाऱ्याच्या द्वारावर शिवपरिवार कोरवलेला आहे. स्तंभावरही शिवपुराणातील कथा कोरवलेल्या आहेत.
मोर महादेव मंदिर हे तलावाच्या शेजारी जंगलात ध्वस्तावस्थेत आहे. याच्या स्तंभावर कामशिल्प कोरलेली आहेत.

मोर महादेव
गाभाऱ्यात मूर्ती नाही. पण तलावाच्या सभोवताली बहुतेक शिवमंदिर असल्याने बहुदा यातही शिवलिंग असावे.
येथून तलावाच्या काठावर जाता येते.
Black winged stilt
तलावातील माती लोहकण मिश्रीत आहे, ते चुंबकीय गुणधर्म दाखवतात. पहाटे
तलावावरून उडणारे विविध पक्षी मन वेधून टाकतात.

कमळजा देवीचे मंदिर-
तलावाच्या परिक्रमेत हे अधिक शाबूत व मुख्य समजले जाते. अगदि तलावाच्या काठावर वसलेले असल्याने त्याचे प्रतिबींब तलावात मोठे मोहक दिसते.
देवीचे मंदिर अष्टाकोनी असून गाभाऱ्यात स्तंभ नाहीत. हे चालुक्य कालीन असावे. त्याचा जीर्णोद्धार यादवांनी केला.
मंदिर समोर गोड्यापाण्यची एक विहिर आहे. तिला योनी कुंड, सौभाग्यतिर्थ किंवा सासू- सूनेची विहिर म्हणतात ते खऱ्या व गोड्या पाण्यावरून. मंदिराच्या आवारात चुंबकसूई दिशाहिन होऊन जाते.
देवीची मूर्ती बहूतकरून माहूरच्या देवीसारखा आहे. पुराणात देवीचा उल्लेख पद्मावती देवी असा आहे. त्यानुसार लवणासूराचा वध करण्यासाठी विष्णुसह देवीही आली होती.
तसेच अगस्ती मुनींची पत्नी लोपामुद्राने श्रीराम वनवासात आले तेव्हा सीतेची ओटी भरली होती. अनेक साधुसंतांनी येथे उपासना केली.एका अख्यायिकेनुसार मेहकरच्या कंचनी महालातील राजकुमारीने देवीच्या मंदिरा समोरील दिपस्तंभावरील दिवा महालावरून पाहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती राजकुमारी शिळा बनून खाली कोसळली.
येथून पुढे दाट व उंच झाडीतून चालताना मोहक असे मोरांचे कळप नजरेत भरले.
अंबरखाना मंदिर-देवीच्या मंदिराहून तलावाच्या भोवती काही अंतर चालून गेले की हे अंबरखाना अर्थात सूर्यमंदिर लागते. येथील सूर्यमुर्ती धारेजवळील देवीच्या मंदिरात ठेवलेली आहे. सूर्यदेवतेच्या हातात कमळ व राजदंड आहे.
शुक्राचार्य वेध शाळा-
सरोवर हे पॄथ्वीच्या नाभीशी असल्याने यास नाभीतीर्थ म्हणटले जाते. म्हणूनच येथे प्राचीन अष्टाकोनी वेधशाळा होती. आता फक्त शिवपिंड आहे. मंदिर यादवाकालीन बांधनीचे आहे.
याज्ञवल्केश्वर मंदिर
याज्ञवल्केश्वर मंदिर- हेमाडपंथी जीर्णोद्धाराचे या मंदिराचा काहीसा सभामंडप, नंदि व समोरील भव्य शिवपिंड शाबूत आहे. जवळील कुंड

बुजत आला आहे. याज्ञवल्केश्वर ऋषी हे आयुर्वेद तज्ञ होते. असे म्हणतात की, त्यांनी निर्माण केलेल्या औषध भट्टीची राख जवळच टाकली. आजही लोक अर्धडोकीचे दुखन्यावरील औषधि म्हणून येथील माती नेतात.

सीता न्हानी व कुमारेश्वर मंदिर
याज्ञवल्केश्वर मंदिराहून डोंगर चालत धारतिर्थाकडे जातांना वाटेत राष्ट्रकुट कालीन कुमारेश्वर मंदिर व शेजारी सीता न्हानी लागते.
पुराणानुसार वासुकीचे अकरा पुत्र शंकराच्या तिसऱ्या नेत्राने भस्म झाले होते. मग वासुकीने तप केले व शंकर प्रसन्न होऊन त्यांनी पुत्र जिवंत केले. तेव्हापासून यास
कुमारेश्वर मंदिर म्हणतात. मंदिराच्या समोरच एका भव्य शिळेतून गोड पाण्याची धार उत्सर्जीत होते, ते ललीत तिर्थ. वनवासात असतांना सीतेने येथे स्नान केले म्हणून या धारेस सीता न्हानी संबोधतात. अखंड वाहणारी ही धार आरोग्यवर्धक आहे.
धारतिर्थ-

लवणासूराचा वध केल्यावर श्रीविष्णु चा दाह शांत करण्यासाठी गंगाभोगावती अवतरली ते हे ठीकाण. याला विष्णुगया असेही म्हणतात. पौराणीक दॄष्ट्या ही धार गंगेतून येते. अनंत कालापासून अनेक साधुसंतांनी येथे उपासना करून पवित्र स्नान केले.
धारेच्या जवळील देवीच्या मंदिरात राम-लक्ष्मण सुग्रीवाच्या सेनापतीशी चर्चा करतात, बालीला राम बाण मारत आहेत, कॄष्ण यशोदेस लोणी मागत आहे, शिव-पार्वती, वटसावित्री अशी सुंदर शिल्प आहेत. धारेच्या वर बालविष्णूचे मंदिर आहे. याचा जीर्णोद्धार नागपूरकर भोसल्यांनी केला. वैज्ञानिक दॄष्ट्या ही धार भूगर्भातून १८ किमी अंतरावरून येते.
धारेच्या जवळच ब्राह्मकुंड आहे. जेथे ब्राह्मदेवाने विष्णुच्या स्नानानंतर रक्तरंजीत पाण्याचा कलश ठेवला असे पुराण सांगते. जवळच पापहरेश्वर व हटकेश्वर ही मंदिरं आहेत. मात्र धारेचे पवित्र स्नान केल्यावर आम्ही थेट निघालो मोठा मारोती मंदिराच्या जवळच असलेल्या अंबर तलावाकडे.
मोठ्या मारोती मंदिराच्या आवारात अॅटो थांबवून तेथून पायी अंबर तलावाकडे गेलो. म्हणतात महाकाय उल्कापात होऊन त्याचा अशनी येथे आदळला व हे लहानस सरोवर तयार झाले. मात्र मुख्य सरोवरापेक्षा हे भिन्न आहे. याच्या पाण्यात मोठी सजीवसॄष्टी नांदते.
तलावाच्या काठावर पानकावळ्यांची (great cormorant) व बदकाची शाळाच भरलेली दिसली. एक पांढरा करकोचाही होता त्या शाळेत.
चक्रवाक किंवा ब्राह्मणी बदक (Ruddy Shelduck /Brahminy Duck) हे मुळातले भारताच्या लडाख प्रांतातील व तिबेट मधील आहेत. तेथून ही बदके
हिवाळ्यात भारताच्या दक्षिण भागात स्थलांतर करतात व उन्हाळ्यात पुन्हा तिबेट व लडाखमध्ये परततात. हिमालयातील सर्वाधिक उंच रांग (२१००० फूट) ओलांडून चक्रवाक भारतात येतात, त्यामुळे सर्वाधिक उंचीवरून उडणारे बदक म्हणून या पक्ष्याची ख्याती आहे. विशेष म्हणजे हे जोडीने विहार करतात. तलावाहून परततांना मोठा मारोतीचे दर्शन घेतले. सन
१८४१ मध्ये कानिटकर घराण्यांतील संत पुरूषाने या मारोतीची पुजा केली. १८६५ ला निजामाचे दिवान राजा चंदूमल आले व त्यांनी कारेगाव हे गाव जहांगीर म्हणून दिले. त्यांनी मंदिरही बांधले होते. मुर्तीचा दगड हा चुंबकीय गुणधर्म असणारा आहे असे प्रा. बुगदाने यांचे मत आहे.
इतर मंदिर, कुंड, आश्रम-
यमतीर्थ, औदुंबरतीर्थ, सोमतीर्थ, वायुतीर्थ, अगस्तितीर्थ, गंगासागर कुंड, दैत्यसुदान मंदिर, त्रिपुरूषाचा मठ, मोठा मारोती, राम मंदिर, दुर्गा टेकडी हे सुद्धा पाहाण्यासारखे आहे. अहिल्यादेवी होळकरांच्या कालातील खंडोबाचे देऊळ धारेच्या उत्तरेला आहे.
तसेच येथे सत्चिताश्रम आहे. स्वामी सत्चिताश्रम हे स्वातंत्र्य योद्ध्ये होते. निजाम व इंग्रज या दुहेरी राजव्यवस्थेचा फायदा घेऊन त्यांनी स्वातंत्र्य प्रेमिंना एकत्रीत केले.
पलसिद्ध मठ, आर्य समाज, खटकेश्वर संस्थान, भगवान बाबा संस्थान, वर्धमान गोरक्षन संस्था व मुस्लीम दर्गेही आहेत.
मात्र वेळे अभावी यातील फक्त दैत्यसुदान मंदिर व शेजारील त्रिपुरूषाचा मठ तेवढे बघण्यास आम्ही निघालो.
दैत्यसुदान मंदिर-
सुदान अर्थात कर्दनकाळ ! हे अप्रतिम मंदिर बदामीचा उत्तर चालुक्य राजा विक्रमादित्य म्हणजे विजयादित्य याने पत्नी लोकपालदेवीच्या आग्रहावरून त्रिभूवन कीर्ती नावाच्या स्थापत्य विषारदाकडून अकराव्या शतकात बांधले. हे मंदिर गावामध्ये उंचवट्यावर स्थित आहे.
अजोड, अप्रतिम कलाकॄती पाहून डोळे कॄत्य झाले. मंदिराच्या मंडपात अंधार होता. त्याच्या तिन दरवाज्यातून मंद प्रकाश डोकावत होता. गाभाऱ्यात पायदळी लवणासूरास तुडवणारे श्रीविष्णुंची मुर्ती दिव्याच्या प्रकाशात तेजस्वी भासत होती.
म्हणतात नागपूरकर भोसल्यांनी ब्राह्मगयेला गयासूराच्या छातीवर पाय ठेवून असलेल्या ब्राह्मदेवाच्या मुर्तीप्रमाणे श्रीविष्णूची मुर्ती पाठवली होती.
पण निजामाच्या स्वातंत्र्यासंग्रामाच्या कालात ती भग्न पावली व तिचे मौल्यवान डोळे चोरांनी पळवून नेले. गाभाऱ्यात वरील बाजूस गंधर्व आकाशात चर्चा करीत आहेत व अप्सरा नॄत्य करीत असल्याचे शिल्प आहे. मंडपात श्रीविष्णूद्वारे लवणासूर वध व गंगाभोगावती अवतरणाचे शिल्प
बघावयास मिळाते. संपूर्ण मंदिर हे विविध शिल्पांनी नटलेले आहे. ह्यात देवतांच्या प्रतिमा, कीर्तीमुख पट्टी, वराह, विष्णु-लक्ष्मी शिल्प, कुत्र्यासह भैरव, परशुराम, अंधकासूर वधातील मुंडमाळ धारक नॄत्य शंकर, इराणचा सूर्य पायात बूट व हातात कमळ व राजदंड, इराणचा राजा खुश्रो व चालुक्य राजा विजयादित्य ह्यांच्या मैत्रीचे प्रतिक शिल्प, ब्राह्मा-विष्णू-महेश, शेषनाग-विष्णू, वामन, बलराम कॄतिका रोहिणीसह अशा प्रचंड प्रतिमा पाहून ब्रह्मांड फिरून आल्यासारखं वाटल..!
शेजारीच त्रिपुरूषाचा मठ आहे. यात ब्राह्मा-विष्णू-महेश मुर्ती आहेत. त्यातील महेशमुर्ती गायब आहे. त्याजागेवर गरूडाची मुर्ती आहे. लिळाचरित्रात या मठाचा उल्लेख आहे. चक्रधर स्वामी या मठात राहत असत. येथून एक भूयार तिकडे धारेजवळील पापहरेश्वर मंदिरात जाते. काय म्हणाव या भूमिस...? किती किस्से, किती कथा...किती मोठ्ठा हा इतिहास..! अद्भूत..!
असे हे अद्भूत लोणार म्हणजे अध्यात्म, इतिहास, कला, जीव, रसायन, भौतीक, भूगोल, खगोल अशा सर्वच शास्त्रांचा अनोखा संगम. मानव जीवनाचा संपूर्ण भार आणि त्याचा सार.... खरेतर साक्षात्कार..!
आदि-मध्य-अंत ह्याचे दिव्य ज्ञान ब्राह्मा-विष्णू-महेश मुर्ती देतात..!
महान ऋषिंची ही तपोभूमि आम्हास आत्मकेंद्री व्हावयास सांगते. खाऱ्या सरोवरातून अन् त्यात नांदनाऱ्या जीवातुन, अरण्यातून वाहनाऱ्या मंद वाऱ्यातून, धारेच्या पवित्र पाण्यातून, भव्य देवळातुन अन् त्याच्या दिव्य कथेतून...ती आम्हांस बोलून जाते...तूच तुझ्यातील दैत्य- सुदान...!!!
सरोवराजवळील वेडा राघू

||फक्तइतिहास||
http://www.faktitihas.blogspot.in

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts