Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

शिव-छत्रसाल भेटीतून नॅशनल डिफेंस अकेडमी चे बीजारोपण-


" हे पराक्रमी राजन तू आपल्या शत्रूंचा नाश कर आणि विजय संपादन कर. आपल्या देशावर अधिकार मिळवून तेथे आपले राज्य स्थापन कर. बादशहाच्या सैन्याची परवा करू नकोस. कपटी तुर्कांवर विश्वास ठेवू नकोस. मोगलांचा नाश कर. मोगल तुझ्यावर आक्रमण करतील तर मी तुझे सहाय्य करीन. तुला स्वतंत्र ठेवण्याचे मी वचन देतो. मोगल ज्या-ज्या वेळी माझ्यावर चालून आले त्या त्या वेळी भवानी देवीने मला साहाय्य केले. देवी भवानीच्या कृपेमुळे मला मोगलांच्या प्रचंड शक्तीची मुळीच भीती वाटत नाही. त्यांनी दग्याने माझ्यावर अनेक वेळा वार करण्याचे प्रयत्न केले. पण मी त्यांच्यावर तलवार चालविली आणि त्यांचा नाश केला. यासाठी तू सत्वर आपल्या देशाला परत जा, सैन्य तयार कर आणि मोगलांना बुंदेलखंडातून हाकलून लाव. सदैव आपल्या हातात नागवी तलवार बाळगून युद्धासाठी तयार राहा. परमेश्वर तुला जरूर यश मिळवून देईन. रणांगणात शौर्य गाजविणे हाच क्षत्रियांचा धर्म आहे. यात मृत्यू आला तर स्वर्ग प्राप्त होतो आणि जय मिळाल्यास राज्य आणि अमर कीर्ती यांचा लाभ होतो. यासाठी तू आपल्या देशाला जाऊन विजय संपादन कर.."
असे बोलून महाराजांनी छत्रसाल राजाला तलवार भेट दिली असे 'छत्रप्रकाश' या समकालीन ग्रंथात वर्णिले आहे.
शिवाजी महाराज आणि छत्रसाल यांची भेट म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे.

महाराजांनी मोगल सत्ते विरुद्ध जो लढा पुकारला होता त्याचे भारतव्यापी स्वरूप या घटनेने सिद्ध झाले. इतकेच नव्हे तर या घटनेचे परिणाम पुढे मराठ्यांच्या उत्तरेकडील राजकारणात त्यांना फार उपयोगी पडले.
शिवाजी महाराजांकडून स्फूर्ती घेऊन मोगलांविरुद्ध छत्रसालने बुंदेलखंडात स्वतंत्र राज्याची स्थापना केली आणि पुढे मोहम्मद बंगश ने बुंदेलखंडावर स्वारी केली त्यावेळी छत्रसालाने जुने स्नेहसंबंधाची आठवणं करून मदतीसाठी बाजीराव पेशव्याकडे धाव घेतली. बाजीरावाच्या झंजावातापुढे मोगल हैराण झाले. या मदतीने खुश होउन छत्रसालने वार्षिक बत्तीस लाखाचे उत्पन्न असलेला मुलूख बाजीरावास नजर केला. एवढेच नाही तर सोयरसंबंधही केला. मराठी व बुंदेले यांच्या या सहकार्यातूनच मराठ्यांचा बुंदेल खंडात यमुना तीरापर्यंत जम बसला आणि दिल्लीची सत्ता त्यांच्या टप्प्यात येऊ लागली. या सर्व राजकीय उत्कर्षाचे मूळ शिव-छत्रसाल भेटीत आहे.
मराठी ऐतिहासिक साधने या प्रसंगाबाबत फार काही बोलत नाहीत मात्र सुदैवाने समकालीन इतिहासकार भीमसेन सक्सेना आणि छत्रसाल यांचा परिचय होता. त्याच्या फारशी भाषेतील आत्मचरित्रात या भेटीचा उल्लेख केलेला आहे. याशिवाय छत्रसालाचा राजकवी लाल कवी यांनी लिहिलेल्या "छत्रप्रकाश" या छत्रसाल चरित्रपर महाकाव्यात या भेटीचे तपशीलवार वर्णन आले आहे. शिवरायांनी छत्रसालाच्या कमरेला भवानी नामांकित तलवार बांधली आणि त्याला आशीर्वाद दिला असा प्रसंग या काव्यात आहे.
या समकालीन पुराव्यावरून भेटीची घटनाही आता निस्संशय झाली आहे. पण भीमसेन सक्सेनाचा ग्रंथ काय किंवा छत्रप्रकाश महाकाव्य काय, यावरून भेट नक्की कोठे झाली ? छत्रसाल हा महाराजांपाशी किती दिवस होता..? येथे त्याने आणखी काही काम केले काय..? याचा बोध होत नाही. याबद्दल हुरहुर राहते. सुदैवाने छत्रसालाचा पत्रव्यवहार प्रकाशित झाला आहे. त्याला ऐंशी वर्षांचे आयुष्य लाभले. तो तसा तलवारबहाद्दर तसा उत्तम पैकी कवी व लेखक होता. स्वामी प्राणनाथ हे त्याचे गुरू. त्यांनाही आपल्या या शिष्याचे अपार कौतुक होते. त्यांनी आपल्या 'तारतम्य सागर' या काव्यात छत्रसाल व शिवाजी महाराज या दोघांचाही उल्लेख पुढील शब्दांत केला आहे-
"पातने सुनोरे बुंदेले छत्रसालने आगे आय खडाले तलवार सेवाने लई सारासार, साईचे कियो सेनापती सरदार. "
सुप्रसिद्ध हिंदी संशोधक डॉक्टर महेंद्र प्रताप सिंह हे दिल्ली विद्यापीठातील देशबंधू कॉलेजमध्ये हिंदीचे प्राध्यापक होते. यावर त्यांनी फार मोठे संशोधन केले आहे. या विषयांवर त्यांचे दोन ग्रंथ प्रसिद्ध आहेत. एक लाल कविकृत छत्रप्रकाश या महाकाव्याची संपादन आणि दोन 'ऐतिहासिक प्रमाणावली और छत्रसाल' म्हणजे छत्रसाल आणि समकालीन यांची ऐतिहासिक कागदपत्रे. या ग्रंथात छत्रसालाचा पत्र संग्रह छापला आहे. पन्ना ही छत्रसालाची राजधानी. तेथील दप्तरखान्यात ही पत्रे सुरक्षित आहेत. या ग्रंथात एकंदरीत ९८ पत्रे छापली आहेत.
आपल्या या पत्रातून छत्रसालाने कुठेतरी शिवाजी महाराजांची आठवण काढली. आपल्या मुलांना आपल्या आयुष्यातील जुन्या आठवणी तो सांगत आहे. शिवाजी महाराजांना आपण भेटलो हे सांगत असतांना तो सहजपणे लिहून गेला की आपण पुणे मुक्कामी महाराजांना भेटलो. तेथे बरेच दिवस होतो. अत्यंत आश्चर्य म्हणजे तो म्हणतो  मी छत्रपती शिवाजी महाराजांपाशी धनुर्विद्या शिकलो. शिवाजी महाराज छत्रसालला धनुर्विद्या शिकवितात ही गोष्ट विलक्षण म्हटली पाहिजे.

ही गोष्ट त्याने आपल्या पत्रात आपल्या मृत्यूच्या एक वर्षांपूर्वी म्हणजे १७३१ मध्ये लिहिली आहे. हे पत्र त्याचा मुलगा जगतराज याच्या नावे आहे. मूळ पत्र पाहा-
"औरंगजेब बादशहाने पचास वरस राज करो. बनके बखत मै शिवाजी के पास पुना को गये. खबर नही आए के हम कोन साल में गए तीस पैतीस बरस गई...विद्या सीखी. बान चलावो वगैरा. जो हम वहा से आए सो बादसाहसे हमने बैर ठान लयो... आदो बदी ५ संवत १७८७ मुक्काम मऊ."
वरील शब्द शिवचरित्रातील एका अज्ञात पैलूकडे आपले लक्ष खेचून घेतात. पुणे मुक्कामी शिवाजी महाराजांनी छत्रसालाला धनुर्विद्या शिकविली आणि औरंगजेबाला प्रखर विरोध करण्याची संथा दिली ! धनुर्विदा शिवाजी महाराजानी शिष्योत्तम छत्रसाल आणि मुक्काम पुणे. नॅशनल डिफेंस अकेडमीचे हे सतराव्या शतकातील बीजरूपच ! हे विलोभनीय दृश्य छत्रसालाच्या पत्रात सापडले म्हणून जमले. या प्रशिक्षणाचे सुंदर चित्र तयार करून घेऊन खडकवासल्याच्या आणि पुण्यात उद्यानाजवळ ठेवायला हवे. कारण अगदी दूर बुंदेलखंडातील राजा येथे प्रशिक्षणासाठी येतो आणि खुद्द छत्रपती त्यास प्रशिक्षण देतात म्हणजे थोरच राष्ट्रीय सामाजिक कर्तव्य ! आणखी एका पत्रावरून छत्रसालाने पुण्यात असताना काही मंत्र तंत्र विद्या हस्तगत केली होती असे दिसते. "मी शिवाजी महाराजांकडे गेलो होतो, तिथे मी ही गुणकारी मंत्रविद्या शिकून घेतली. मोगल सरदार अन्वर खान याने आम्हाला मुठ मारण्याचा (खैरागड च्या लढाईत) उद्योग केला होता. आम्ही ती मुठ परतवून लावली." असे तो म्हणतो.
असो, शिव-छत्रसाल भेटीचे ते ठिकाण पुणे आहे हे त्याने त्याच्या पत्रातून व्यक्त केले म्हणून बरे झाले. मात्र छत्रसाल राज्याची ही भेट पुढे बाजीरावाच्या काळात मदतीची हाक ठरली. शिवछत्रपतींनी राजाला दिलेले वचन जणू बाजीरावानेच पाळले. अर्थात सत्पुरुषांची वचने पाळावयास नियती समर्थ असते आणि ती वचने पूर्ण करण्यास नियतीच सत्पुरुष निर्माण करते.! आणि यातूनच मराठा साम्राज्याची उत्तरेत तोफ कडाडली ! मराठी तट्टांनी यमुनेचे पाणी प्याले आणि लाल किल्ल्यात मुक्काम करून अटकेपार झेंडे फडकविले..!! पण एक मात्र खरेच, पुण्याचे नॅशनल डिफेंस अकेडमी चे बीजरोपण तेव्हाच घडले नव्हते काय..?
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्त इतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts