Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

सकलकलाशास्त्राचा निशांः राजा शरफोजी-


भोसले घराण्यांनी हिंदुस्तानच्या इतिहासात केलेली कामगिरी अतुल्य आहे. पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे, दुसरे म्हणजे शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजीराजे भोसले यांचे, ज्यांचे राज्य तंजावरास होते. तिसरे म्हणजे नागपूरचे भोसले घराणे. या घराण्यांनी भारताच्या इतिहासाला कलाटणी दिली. स्वराज्याची स्थापना करून शिवाजी महाराजांनी हिंदुस्थानच नव्हे तर व्हिएतनाम सारख्या देशांनाही पारतंत्र्याशी लढण्याची ऊर्जा दिली. नागपूरकर भोसले यांनी मध्य प्रदेश, गोंडवण, उडीसा या मुलखात मराठ्यांची सत्ता बळकट करून महाराष्ट्र धर्म वाढवावा ऐसे केले. पूर्वीच्या गोंडवानात मराठी संस्कृतीची पकड पक्की करून नागपूर, वर्धा आणि भंडारा अशी वीस हजार चौरस मैलांची कायमची भर घातली. मात्र दक्षिण भारताच्या दूरदेशीच्या कर्नाटक-तामिळनाडूच्या अज्ञात मुलुखात महान पिते महाराजा शहाजीराजे नंतर व्यंकोजी राजे यांच्या वंशजांकडे महाराष्ट्रातील मराठी माणसाने कधी लक्षच दिले नाही. दक्षिणेतील जनसागरात बेमालूमपणे मिसळून सेवा करणारे हे घराणे मराठी माणसाला बेमालूम असेच राहिले. मात्र "शौर्यशंभु" या ग्रंथाच्या निर्मितीच्या योगाने मला दूर दक्षिणेच्या या महान प्रभृतींना जाणून घेण्याचे भाग्य लाभले.
दक्षिणेस तंजावरास मराठी सिंहासन स्थापून अधिष्ठित होणारे पहिले राजा म्हणजे व्यंकोजी राजे. छत्रपतींप्रमाणे यांनी जरी हिंदुस्थानचा इतिहास घडविला नसेल तरी आपल्या राज्यातील रयतेची व शेजारील राज्यांची मदत करून त्यांनी दक्षिणच्या जनमानसांत एका उदार राजाची प्रतिमा निर्माण केली. आक्रमक म्हैसूरचा नायक चिक्कदेवराय व विजापूरी सरदारांच्या विरोधात व्यंकोजींनी कमजोर मदुराईच्या नायकास अनेकदा मदत केली. वीर राघवाचा मुलगा नेलुर शिवराम या कवीने "कमलकलानिधी" या संस्कृत ग्रंथात व्यंकोजीराजांच्या उदार वृत्तीचे वर्णन केले आहे. तो म्हणतो-
जसे शिवाजी राजाने मोगलांचा पराभव केला तसे व्यंकोजी राजाने नर्मदेच्या दक्षिणेकडील सर्व राजांचा पराभव करून पाड्यांना म्हैसूरच्या जोखडातून मुक्त केले.
या शिवराम कवीने हा ग्रंथ व्यंकोजीराजांचा नातू  जयसिंह राजास अर्पण केला. रयत कार्यासह साहित्य कला आणि वाड़्मय क्षेत्रातही तंजावरच्या भोसलेंनी केलेली कामगिरी म्हणजे बेलाग अशीच !!
तंजावरच्या भोसले यांच्या पदरी अनेक विद्वानांची गर्दी असे. सांस्कृतिक आणि साहित्यक्षेत्रात तंजावरकर भोसले राजांनी जी विलक्षण कामगिरी केली ती महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने मराठी माणसाला गर्व व सार्थ अभिमान वाटावा अशी बाब आहे. व्यंकोजीराजे व त्यांचे पुत्र शहाजीराजे (१६८४-१७११) यांचे बंधू शरफोजीराजे, दुसरे बंधू तुळजेंद्रराजे,व्यंकोजीचे नातू प्रतापसिंह व पणतू तुळजेंद्रराजे आणि त्यांचा मुलगा शरफोजी भोसले(१७७७-१८३२) अशी या कलाप्रेमी व गुणग्राहक राजांची मालिका आहे. यांपैकी तंजावरचे शेवटचे राजे शरफोजी भोसले यांना इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, लॅटिन या पाश्चात्य भाषां तसेच मराठी, तामिळ, तेलगू, उर्दू, पर्शियन या आशियाई भाषा  अवगत होत्या हे सांगूनही कोणाला खरे वाटणार नाही. इकडे पुण्यात नाना फडणीस असताना एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस शरफोजी राजे हे इंग्रजीत उत्तम कविता करीत होते. "त्यांचे शेक्सपिअरच्या नाटकांचे ज्ञान इतके मार्मिक होते की लॉर्ड बायनर सारख्या कवीलाही ते ह्या बाबतीत मागे टाकतील" असे उद्गार एका युरोपियन प्रवाशाने काढले आहेत. त्यांनी शिक्षणासाठी विद्यालये स्थापन केली. धन्वंतरी महाल म्हणून रुग्णालय आणि वैद्यकीय शिक्षणपिठ स्थापन केले. "नवविद्या वसंतकलाशाला" म्हणून मुद्रणालय चालू केले. शिवाय अनेक विद्वानांना आश्रय दिला. बहुजन समाजाला शिक्षित करण्याचा एक अभिनव प्रयत्न त्यांनी केला. याचे एक उदाहरण म्हणजे त्यांनी आपल्या "कुरवंजी" या नृत्य-नाटकाद्वारे जगाचा भूगोल लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला तो अपूर्वच म्हणावा लागेल !
आज दूरदर्शन, आकाशवाणी, इंटरनेट याद्वारे शिक्षण प्रसाराच्या योजना चालत आहेत. मात्र सव्वा दोनशे वर्षांपूर्वी नृत्य नाटकाच्या माध्यमातून भूगोलाचे ज्ञान देणारा हा एक विलक्षण राजा म्हणावा लागेल. तामिळनाडूमध्ये "कुरवंजी" हे एका लोकप्रिय नाटकाचे स्वरूप आहे. "कुरवंजी" म्हणजे घरोघर दारोदार फिरून टोपल्या वगैरे वस्तू विकताना हात पाहून भविष्य सांगणार्‍या आणि म्हणून सर्वांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या स्त्रिया होत. या नाटकांत अशीच एक "कुरवंजी" इंद्राणीकडे येते आणि आपल्या प्रवासाचे अनुभव सांगत भूगोल आणि खगोल आदींची वर्णने गाण्याच्या माध्यमातून करते. तिचे हे ज्ञान पाहून इंद्रानी थक्क होते. ती कुरवंजीला विचारते की, 'तुला हे सर्व ज्ञान आहे, तू आहेस तरी कोण ?' यावर कुरवंजी आपले खरे स्वरूप प्रकट करीत म्हणते- मी 'महामाया' आहे. परमेश्वराच्या आश्रयाने मी ही सृष्टी निर्माण केली आहे". असे हे भूगोलाची व खगोलाची वर्णने सादर करणारे नाटक मराठी व तमिळ भाषेचे मधू मिश्रणच आहे. शरफोजी हे एक थोर ग्रंथ वेडे राजे म्हणावे लागतील. कारण आपल्या काळात दरवर्षी निर्माण होणारे ग्रंथ व हस्तलिखिते त्यांनी शेकडोंनी गोळा केली. 

त्यांच्या राजवाड्यातील सरस्वती महाल या भागात त्यांच्या पूर्वजांपासून साठविलेला प्राचीन व दुर्मिळ अशा ग्रंथांचा संग्रह होता. त्यात त्यांनी प्रचंड भर घालून महान कार्य केले. आज तंजावरचे 'सरस्वती महाल सरफोजी ग्रंथालय' हे एक दुर्मीळ हस्तलिखितांचे उत्कृष्ट केंद्र म्हणून सबंध जगात प्रसिद्ध आहे. त्यात अनेक भाषांतील प्राचीन अशा जवळजवळ ४०००० हस्तलिखितांचा संग्रह आहे. आणि त्यांची यादीच मुळी बारा खंडात आहे. अश्या या ज्ञान सागराची निर्मिती करून त्याची प्राणापलीकडे जोपासना करून त्याचे संवर्धन करणारा हा विद्वान आणि गुणग्राहक राजा शरफोजी यांचे नाव उच्चारतांना भारतीयांना आनंद वाटावा पण महाराष्ट्रीयांना आनंदाबरोबर अभिमानही वाटावा अशीच ही कर्तबगारी !
भोसले घराण्याचा हा शेवटचा राजा जेव्हा गादीवर आला तोपर्यंत इंग्रजांची तंजावर वरील पकड मजबूत झाली होती. तंजावर खालसा करून शरफोजींना पेन्शनीत काढले होते. मात्र शरफोजींनी आपला दरबार विद्वान व गुणीजनांसाठी खुला केला. इंग्रजांकडून आपल्या वाट्याला आलेल्या संपत्तीचे त्यांनी सोळा कारखाने काढले. त्यावर प्रमुख कारभारी सरखेल नेमून ते आपल्या नाट्यशास्त्रात मग्न झाले. आपला गुरू श्वार्टझ यांच्या स्मरणार्थ तंजावरच्या किल्ल्यात त्यांनी एक स्तंभ उभारला. त्यावर स्वरचित इंग्रजी कविता कोरली. त्यावरील साल १८०३ असे आहे. अनेक युरोपियन प्रवासी या काळात तंजावरला येऊन गेले. हेबर, लॉर्ड बिशप, व्हँलेंटिया, मिडलटन, डॉ. बकनान अशा अनेकांनी शरफोजींबद्दल त्यांच्या विद्वत्तेची व नीतिमत्तेची आणि रुबाबाची स्तुती केली आहे. शरफोजीने स्वतः संगीतरचना केल्या, अनेक पदे रचली,नाट्ये लिहिली. भरतनाट्यमला त्यांनी उत्तेजन दिले. अनेक विद्वान कलावंतांना त्यांनी प्रोत्साहन दिले. चित्रकलेचाही त्यांना बराच नाद होता. त्यांच्या नेत्र रुग्णालयातील रोग्यांच्या डोळ्यांची चित्रे त्यांनी घडविली. त्यात डोळ्यातील सूक्ष्म रंगही दाखविण्यात आले. अशी अप्रतिम चित्रे तंजावरच्या संग्रहालयात आजही बघावयास मिळतात. ग्रंथालयात खुद्द शरफोजींनी  इंग्लंडहून अनेक ग्रंथ मागविले, ते त्यांच्या स्वाक्षर्‍यासह आजही या ग्रंथालयात  उपलब्ध आहेत. सन १८३२ पूर्वीचा हा कालखंड होता हे लक्षात घेतले पाहिजे !!
महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने त्यांची महत्त्वाची कामगिरी म्हणजे बृहदीश्वर देवालयात सन १८०३ मध्ये त्यांनी कोरवून घेतलेला भोसले वंशाचा इतिहास ! हिंदुस्तानात इतका मोठा शिलालेख कुठेही नाही. त्यांच्या विद्या व्यासंगाचा इंग्लंडमध्ये एवढा बोलबाला झाला की त्यांच्या सांगण्यावरून इंग्लंडच्या काही प्रकाशकांनी या संग्रहालयातील महत्त्वाच्या ग्रंथांचे इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध केले. जसे इब्नबतूतचे अरबी भाषेतील ग्रंथ याचे उदाहरण सांगता येईल. 'शाहनामा' या फिरदौसीच्या फारसी महाकाव्याचा मराठी अनुवाद या ग्रंथालयात आजही उपलब्ध आहे. इंग्लंडच्या रॉयल सोसायटीने 'फेलो' म्हणून आशिया खंडातील दोन आसामींना निवडले होते. एक म्हणजे इराणचा शहा आणि दुसरे म्हणजे तंजावरचे शरफोजी राजे भोसले !
स्वराज्य साकारणारे शिव-शंभू जसे शौर्य-साहसाचा दुवा, तसे कला साहित्य व विद्वत्तेचा महादुर्ग साकारणारे राजे शरफोजी हे सकलकलाशास्त्राचा निशां: !!
।।फक्तइतिहास।।
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
परगना मालेगाव, सुभे वत्सगुल्म

Comments

Post a Comment

... मग कशी वाटली पोस्ट

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts