मित्रांनो,
इतिहास लेखनात साधनांचे महत्त्व फार. व्यक्तीच्या स्वभाव गुणांचे रसायन समजण्यासाठी त्याने वा त्याच्या चिटनीसाने लिहिलेली पत्रे, त्याचे आदेश उपयुक्त ठरतात.
इनायतुल्लाखान हा औरंगजेबाचा विश्वासू चिटणीस आणि पत्र लेखक होता. छत्रपती शंभूराजेंच्या बलिदानानंतर राजाराम महाराज, ताराबाई, संताजी, धनाजी यांच्या कारकीर्दीत मराठ्यांचे किल्ले घेण्यासाठी महाराष्ट्राच्या भूमीत औरंगजेब फिरत असताना त्याच्या आज्ञेनुसार इनायतुल्लाखानाने अनेक पत्रांचे लेखन केले.
औरंगजेब बादशहाच्या आज्ञेनुसार इनायतुल्ला खान याने १७०२ ते १७०७ या कालखंडात लिहिलेल्या पत्रां पैकी काहींचा अनुवाद ज्या ग्रंथामध्ये दिलेला आहे तो म्हणजेच 'अहकामे आलमगिरी' होय.
यातील पत्रे वा आदेश हे औरंगजेबाच्या नजरेखालून गेलेली असल्याने हा ग्रंथ म्हणजे एक अधिकृत साधन म्हणावे लागेल.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर इनायतुल्लाखान याने हे आलमगीराचे आदेश एकत्र केले. जे हैदराबाद येथील दप्तरखान्यात सापडले. या फारसी हस्तलिखितावरून पगडींनी काही पत्रांचा अनुवाद केला. या मूळ पत्रांना तारखा नाहीत आणि पानांचे व पत्रांचे क्रमांकही हस्तलिखितात मागेपुढे झालेले आहेत. मात्र ही उणीव असली तरी त्यांची उपयुक्तता आहेच. विशेषतः मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या अभ्यासासाठी ही उपयुक्तता मोठी आहे. पगडींच्या मुळ ग्रंथात पुरुषोत्तम धाक्रस हे आपल्या प्रास्ताविकात म्हणतात की, 'इतिहासाच्याच नव्हे, तर सर्वसाधारणपणे कोणत्याही वाचकाला ही पत्रे मोलाची वाटतील'. इतिहास संशोधकांना तर 'अहकामे आलमगिरी' हा संशोधनाच्या वाटेतील अमूल्य खजिनाच वाटेल यात शंका नाही.
मराठ्यांचे किल्ले घेत महाराष्ट्रात आपले उत्तरायुष्य लढत काढणाऱ्या औरंगजेबाचा दृष्टिकोन व मनातील भाव व्यक्त करणारे 'अहकामे आलमगिरी' तील काही आदेश बरेच काही सांगून जातात.
सोमनाथ मंदिराला मध्ययुगात चार वेळा झळ लागली बाराशे १२९८ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीचा भाऊ आलपखान, १३९४ मध्ये गुजरात चा सुभेदार मुजफ्फर खान, १४१३ मध्ये गुजरातचा सुलतान अहमदशहा आणि १४६९ मध्ये महमूद बेगडा अशाच या राज्यकर्त्यांनी या देवालयाला उपद्रव दिला. औरंगजेबाच्या कारकीर्दीत १६६९ मध्ये या देवालयात पुन्हा झळ लागली. पण लोक चिकाटीने देवळात पुन्हा पुन्हा पिंडिची स्थापना करीत आणि पूजा चालवीत. या मंदिरासंदर्भात पुन्हा औरंगजेबाने काढलेला आपला एक आदेश-
'सोमनाथाचे मंदिर सोरठ सरकारात समुद्रात किंवा समुद्राच्या काठावर आहे. आमच्या राज्यकारभाराच्या सुरुवातीस ती उध्वस्त होऊन मूर्तीपूजा बंद झाली होती. सध्या काय परिस्थिती आहे माहित नाही. जर मूर्तिपूजक तेथे पुन्हा पूजा करण्यात मग्न असले तर त्या मंदिरांचा हरप्रकारे विध्वंस करावा. त्या इमारतीचे नाव निशाणी राहू नये. त्यांना (मुर्तीपूजाकांना) तेथून हाकलून लावावे. '
यानंतर मंदिरातील पूजा बंद पडली व मोडकळीस आले. मात्र पुढे १७९० च्या सुमारास आहिल्याबाई होळकर यांनी या भग्न मंदिराजवळ एक लहानसे सोमनाथ मंदिर बांधले व तिथेच पुढे दीडशे-पावणेदोनशे वर्षे लोक पूजा करीत राहिले.
असो,
याच सुमारास ४ मार्च १७०६ रोजी धनाजी जाधवाने गुजरातवर आक्रमण करून रतनपुर च्या लढाईत मोगलांचा पराभव केला. नायब सुभेदार व अनेक सरदार पकडले गेले. यावर औरंगजेबाने शहजादा बेदारबख्त याची गुजरात सुभ्यावर नेमणूक केली.
छत्रपती शंभू राजांच्या कारकीर्दीत बादशहाशी हात मिळवणी करणारा मैसूर चा राजा चिक्कदेवराय वडियार याचा मृत्यू झाल्याची बातमी औरंगजेबास कळाली. तेव्हा आपल्या या वफादार राजाबद्दल तो म्हणाला-
'हजराईल अलिया अस्सलाम (अर्थात यम) याच्या जाळ्यात अस्वल आले (दर दाम आमदे) आणि नरकाला गेले. राजाला वारस म्हणून मुलगा किंवा नातू असतील. त्यांचे पुरलेले खजिने काढण्याचे काम आपल्या नायब फौजदारांना उरकत नाही असे दिसते.
तुम्ही ही वेळ साधून त्यांच्याकडून खंडणी म्हणून भक्कम रक्कम घेऊ शकाल तर बरे होईल. असे न होवो की मराठे तेथे ताबा मिळतील आणि संपत्ती घेऊन टाकतील. ही ताकीद समजावी आणि काम करावे. '
औरंगजेबाचा हा प्रस्तुत आदेश मोठा गमतीदार वाटतो. शंभुराजांच्या युद्धात आपल्या बाजूने लढणाऱ्या या राजाबद्दल "तो नरकात गेला" असे उद्गार काढतो. शिवाय ही संधी हेरून आपल्या सुभेदारांनी त्याच्या मुलांकडून भरपूर खंडणी वसूल करावी असे सांगतो.
असे हे साधन औरंगजेबाच्या भावभावनांचे, लालसेचे, कपटाचे, धर्मांधतेचे तर मराठ्यांच्या शौर्याचे आणि तत्कालीन परिस्थितीचे सार्थ विवेचन करते. म्हणूनच महत्त्वाचे ठरते. असो, शेवटी सामान्यांचे आयुष्य आणि मानवतेची कहानी हाच इतिहासाचा विषय असतो....
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
||फक्तइतिहास||
Comments
Post a Comment
... मग कशी वाटली पोस्ट