शके १५५७ म्हणजेच इ. स. १६४५ च्या एप्रिल महिन्यात १५ तारखेला वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी राजांनी स्वराज्य शपथ वाहिली. रोहिड खोरे आणि वेळवंड खोरे येथील देशपांडे - कुलकर्णी दादाजी नरसप्रभु हे राजांसोबत स्वराज्य कार्यात सहभागी झाले, असे काही वतनदारांकडून आदिलशहाच्या शिरवळ येथील सुभेदार अर्थात अमिन मिया रहिम यास समजले. त्याने ही पुंडाव्याची बातमी विजापूरास बादशहास कळवीली. मात्र कर्णाटकातील लढाया व बादशहाचा आजार यामुळे विजापूराहून काही फौज आली नाही आणि शिरवळचा अमीन शाही फौजेची वाट बघत बसला. आणि हो बादशहाचे धडकी भरवणारे ते फर्मान मात्र शिरवळास धडकले ! त्याने ते फर्मान ३० मार्च १६४५ रोजी शिवाजीराजांचा बालमित्र दादाजीप्रभू (गुप्ते) देशपांडे यांचे वडिल नरसप्रभू देशपांडे यांना पाठविले. प्रत्यक्ष बादशहाचे फर्मान आले हे पाहून नरसप्रभू घाबरले. फर्मानाचा शब्दनशब्द काळजात धडकी भरवून लागला...-
"इजतअसर दादाजी नरसप्रभू देशपांडे कुलकर्णी ता रोहिडखोरे....... सीवाजीराडे फरजंद शहाजीराजे याणे शाहाशी बेमानगी करून तुझे खोरीयांत रोहिडेश्वराचे डोंगराचे आसराण पुंडावेयाने मावले लोक जमाव केला आणि जाऊन पेशजी किल्ल्यावरील (रोहिडा) ठाणे उठवून किल्ल्यात सिरला.
...त्यास तू सामील असून फिसात करून रसिद (रसद वसूल वगैरे)राजे मजकूरनिल्हेस(शिवाजी राजास) देतोस व ठाणे सिरवली(शिरवळ) अरुजू राहत नाही, तनखाही हरदु तपियाचा दिवाणात देत नाहीस. मगरूरीचे जवाब ठाणे व नाईकवाडियास देतो हे जाहिरात आले. हे नामाकुल गोष्ट, तरी ठाणे मजकुरी अमिनासी रुजू राहणे.
हे न जालियास खुदावंत शाह तुजला विजापूरी नेऊन गरदन मारतील व जमेदारी हक्कानु चालनार नाही (अर्थात देशपांडे हे पिढिजात वतन काढले जाईल) हे मनी समजणे. याउपरी दिवाणात रुजू राहणे ११ सफर. "
या पत्रामुळे दादाजी व त्यांचे बाबा चिंतेत असल्याचे कळताच राजांनी त्यांना 'हे राज्य व्हावे हे श्रीचे मनांत फार आहे' या आशयाचे पत्र पाठवले. आपण सुरु केलेले कार्य हे ईश्वरी इच्छेनूसार आहे, ही धारणा त्यांनी ह्या पत्रामधून व्यक्त करून त्यांचे मनोबल वाढवले आहे. ते पत्र...
श्री
राजश्री दादाजी नरसप्रभु देशपांडे व कुलकर्णी ता रोहीरखोरे व वेलवंडखोरे यांसि प्रति सीवाजीराजे सु| खमस अबीन अलफ तुम्हास मेहेरबान वजिराचा विजापुराहून हुकुम आला तो ठाणे सिरवलाहून अमिनानी तुम्हाकडे पाठविला. त्याच वरून तुमचे बाप नरसिबावा हवालदिल जाले वगैरे कितेक बहुतेक लिहले. त्यास शाहासी बेमानगिरी तुम्ही व आम्ही करीत नाही. श्री रोहिडेश्वर तुमचे खोरियातील आदि कुलदेव. तुमचा डोंगरमाथा पठारावर शेंद्रीलगत स्वयंभू आहे. त्यांणी आम्हास यश दिल्हे व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य पूर्ण करून पुरवणार आहे. त्यास बावास हवाल होऊ नये खामाखा सांगावा आणि तुम्ही तो कागद घेऊन सिताब हुजूर येणे. राजश्री श्रीदादापंताचे विध्यमाने बावाचे व तुमचे व आमचे श्रीपासी इनाम झाले ते कायम वज्रप्राय आहे. त्यांत अंतर आम्ही व आमचे वंशज लेकराचे लेकरी वतन वगैरे चालवण्याविसी कमतर करणार नाही. "हे राज्य व्हावे हे श्रीचे मनांत फार आहे" या प्रमाणे बावाचे मनाची खात्री करून तुम्ही येणे. बहुत काय लिहणे.
संदर्भ- शिपसासं खं १ क्र. ५०४
||फक्तइतिहास||
Comments
Post a Comment
... मग कशी वाटली पोस्ट