|
सन१६२२ मध्ये स्थापीलेले गणराय |
मैराळडोह" अर्थात मैराळाच्या डोहांनी व्यापलेला एक सामान्य पण परंपरेस जिवापाड जपणारा जिंदादिल गाव!
परंपरा आणि गाव हे तस या भारतभूला संस्कार व संस्क्रुतीची मंगलमय मोहर प्राप्त करून देणार सूत्रच होय. सद्ध्या गणेशोत्सवात सर्वत्र बोलावणं येत ते श्रींच्या प्रसादाचे. मला व माझ्या मित्रांनाही मैराळडोह येथून असेच आमंत्रण आले तेव्हा निघालो.
वाटलं की, वाशीम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील एका छोट्याशा गावात काय असेल.? काय असेल बरे या खेड्यात.?
पण सापडला, सापडला तो पिढ्यान् पिढ्या अखंड जपलेला एक दिव्य अनमोल संस्कार !!
पांडव उमरा येथून वाहून येणारी अडान नदी या गावाला स्पर्शून जाते. अनेक नाल्यांमुळे नदीस तुडूंब पाणी राहते. त्यावरच जवळ सोनल प्रकल्प बांधलेला आहे. वाशीम जिल्ह्याच्या लोकांना हा प्रकल्प मोठा जीवनदायी ठरला आहे. मैराळडोह हा तसा साधारणपणे ४००० लोकसंख्येचा गाव. जेथील शेती हा प्रमुख व्यवसाय. मात्र लोकांची शिक्षणाबाबतची आस्था मोठी लक्षणीय आहे. जेवढा भक्तीभाव लोकांच्या मनात नांदतो, तितकाच शिक्षणाबाबत कळवळा. गावात बहुतकरून धार्मीक वातावरण असून नाथनंगे महाराज, मुंगसाजी महाराज,वाघामाय व पाताळशेष महाराज यांची सुंदर देवालये आहेत. तसेच श्रीराम, हनुमान व महादेव आदि देवतांची देवालये सुद्धा आहेत.
मात्र या छोट्या गावात "गणपतीच्यावाड्यावर" जपला जातो हा दिव्य संस्कार !
येथील गणपतीबाप्पाची स्थापना चक्क मध्ययुगीन काळातील आहे.
सन १६२२ !!!
श्री दौलतराव घुगे हे या सुमारास चित्तोडाहून कुटूंबासह प्रवास करत मैराळडोह या गावी राहावयास आले व त्यांनीच या गणेश मुर्तीची स्थापना केली व आज या मूर्तीस व परंपरेस तब्बल ४३२ वर्षे झाली..! येथील पुंडलीकराव बहादूरराव घुगे व सुमित घुगे यांनी श्री दौलतरावांची संपूर्ण वंशावळ मला दाखवली व बरीच माहिती पुरवली.
|
गणपतीचा वाडा |
येथील श्री गणेशमूर्ती ही साधारणपणे दोन फुट उंच असून निव्वळ मातीने बनलेली आहे.
प्लास्टरच्या या युगात मातीने बनलेली ही प्राचीन मूर्ती खरोखरच एक आश्चर्य आहे!
या गणपतीचे प्राचीनत्व व सिद्धीचा लौकीक एेकून भक्तगन दुरून दर्शनास येतात. काही आपल्या इच्छापूर्तीसाठी नवस करतात. तर पंचक्रोशीतील बरेच राजकारणी आपल्या प्रचाराचा नारळ येथेच फोडून आशीर्वाद प्राप्त करतात.
|
मिरवणुकीतील पूर्वीचा फोटो |
पारंपारीकतेचेच पालन करत गणेशोत्सव व मंदिराचे कार्य पिढ्यान् पिढ्या अखंड चालत आले आहे. कोणतीही संस्था वगैरे हे काम बघत नसून प्रत्यक्ष गावकरी मोठ्या उत्साहात हे कार्य करतात. कोणत्याही प्रकारचे निधी संकलन वा शासन मदतीचा येथे अंर्तभाव नाही.
दरवर्षी गणेशोत्सवात मंदिरातील डाव्या बाजूस असलेल्या गाभाऱ्यातील ही श्रीगणेशमूर्ती काढून तीला रंग दिला जातो. संपूर्ण विधित अभिषेक केल्यावरच श्रीगणेशमूर्ती मंदिरातील उजव्या बाजूस असलेल्या गाभाऱ्यात मांडले जाते. मात्र एकदा श्रीगणेशमूर्ती स्थापना झाल्यावर पूनश्च तीला स्पर्श करणे वर्ज्य मानले जाते. या सुमारास ज्यांनी कुणी हा नियम मोडून मूर्तीस स्पर्श केला त्यांना गाभाऱ्यातून हलने शक्य झाले नाही असे लोक सांगतात.
तसे वर्षभर दररोज नियमीत आरती व सांजदिवाबत्ती असते. मात्र नागपंचमिपासून तर गणेशोत्सवापर्यंत मंदिरासमोर पोथीचे अखंड पारायण केले जाते. साधारणपणे श्रावणमास ते गणपती विसर्जनापर्यंत हे पारायण चालते. समाप्तीचे दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
महाप्रसाद हा तीन दिवस चालतो. सकल गावकरी प्रसाद निर्मीतीत मोठ्या निष्ठेने सहभाग घेतात. गावकरी लोक हे भावीक, सोज्वळ आणि मोठ्या उदार मनाचे आहेत. या उत्सवात ते शेजारील गावकऱ्यांना व शिक्षक-अधिकाऱ्यांना मोठ्या प्रेमाने आवर्जून आमंत्रण देतात. या महाभोजात बरेच लोक न चूकता येतात. यंदा मलाही असचं आमंत्रण आलं व त्यातूनच हे आश्चर्य मलाही कळलं.
असो, विसर्जनाचे दिवशी महाप्रसादाचे नंतर दुपारला या श्रीगणेशाची वाजत-गाजत मिरवणूक निघते. नदित दुसऱ्या लहान मूर्तीस विसर्जीत केले जाते व परंपरागत श्रीगणेशमूर्ती पूनश्च मंदिरातील गाभाऱ्यात स्थापिली जाते.
आज पाच पिढ्यानंतर दौलतराव घुगे यांच्या कुटूंबाचा विस्तार पस्तीस कुटूंबांमध्ये झाला असून ही सर्व कुटूंबे एकत्रीतपणे या उत्सवात एकदिलाने सहभाग घेतात.
श्रीगणेशमूर्तीची मातीची काया जणू सांगून जाते की, शरीर हे नष्वर आहे. आणि श्रीगणपतीचे विशाल उदर हे सांगून जाते की, साठवायच तर ज्ञान साठवा कारण सर्व काही नाशीवंत आहे !
ecofriendly गणेशमूर्ती स्थापन करा असे गेल्या काही दशकांपासून बोलले जाते. मात्र "गणपतीच्या वाड्यातील" ही श्रीगणेशमूर्ती आम्हास गेल्या चार शतकांपासून निसर्गाशी मैत्री करायला सांगत आहे.
गणेशोत्सवात जिथे कोट्यावधि खर्च होतात तिथे अगदि साधेपणाने पैशाची उधळन न करता मुख्य हेतू जो सामाजिक एकोपा, मन:शांती आणि भक्तीतून मिळणारा खरा आनंद कसा साधेपणाने साधता येतो हे इथे आल्यावर कळते.
वाशीम जिल्ह्याच्या इतिहासात अनेक गावांनी, तलावांनी, मंदिरांनी भर घातली. मात्र ४३२ वर्षांपासून अक्षय्य विराजमान दयानिधान श्रीगणेश म्हणजे आधुनिक युगात दौडणाऱ्या माणसास जीवनाचा साक्षात्कार !
पूर्वी ब्रिटीशांना भारतीय लोक फोडूनच आपले शासन अबाधित ठेवता येई. तेव्हा कुठेतरी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवातून सामाजिक एकोपा साधावा या हेतूने उत्सव साजरा केला. कदाचित त्यांच्याही अगोदर सार्वजनिक गणेशोत्सवाचं ते सामाजिक एकतेेचे कार्य अशा सामान्य गावातून झालं म्हणजे थोरच..!
ब्रिटीश गेले मग आता या एकोप्याची आम्हास गरज ना उरावी. पण उलट आता मानसा-मानसातील दुजाभाव व जातीय दुफळी पाहिल्यावर वाटते ते की आता खऱ्या अर्थाने या सार्वजनिक गणेशोत्सवातून बांधिलकी साधण्याची जिकरीची गरज भासत आहे. म्हणून मित्रांनो या कधितरी अनुभवा "गणपतीचा वाडा" आणि त्याची सिद्धी व लोकांची निर्भेळ भक्ती, शुद्ध निष्ठा देवाप्रती व मानसाप्रती. कारण मानव व निसर्गाच्या निष्ठेतून साकार होते तिच खरी ईश्वरनिष्ठा..!
--प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्तइतिहास।।
http://www.faktitihas.blogspot.in
Thanks v much sir nice work...
ReplyDelete