मित्रांनो, मालेगावहून तासाभराच्या अन् अकोल्याहून अर्ध्यातासाच्या अंतरावर असलेले बाळापूर तसे सर्वांस परिचीत. पण मी अनुभवलेली ती किल्ले बाळापूरची ट्रेक-
मान आणि महिषी या दोन नद्यांच्या संगमावर अगदी मधोमध एका टेकडीवर बाळापूरचा पाण्याने वेढलेला बुलंद किल्ला दूरूनच काळजात धडकी भरवतो. किल्ल्याच्या शेजारीच बालादेवीचे प्राचीन देऊळ आहे. देवीच्या नावावरूनच गावाचे नाव बाळापूर पडले आहे.
हा किल्ला औरंगजेब बादशहाचा दुसरा शहाजादा आज्जमशहा याने सन १७२१ साली बांधायला सुरूवात केली होती. पुढे त्याचे बांधकाम इस्माईल खान या अचलपूरच्या नवाबाने सन १७५७ पूर्ण केले.
मित्रांनो, बाळापूरचा इतिहास शोधत असतांना मला आणखी काही महत्त्वाची गोष्टी आढळल्या. त्या अशा-
एक म्हणजे सन१६६५ साली ज्या वेळी औरंगजेब बादशहाने मिर्झाराजा जयसिंग यांना शिवाजी महाराजांवर मोहिम करायला दक्षिणेत पाठविले त्या सुमारास त्यांनी नदीच्या काठावर एक भव्य छत्री बांधली. ही छत्री २५फुट चौरस असून तब्बल ३३फुट उंच अशी मोठी भव्य दिव्य आहे.
एकदा मोठ्या पूराने छत्रीच्या पायास काही नुकसान झाले होते तेव्हा जयपूरहुन त्याच्या दुरूस्तीसाठी ३००० रू खर्च करण्यात आले होते.
दुसरी अतीमहत्वाची बाब म्हणजे पुरंदरच्या तहानंतर महाराज बाल संभाजीराजांसह आग्यास गेले. तेथून सुटून आल्यावर त्यांनी सन १६६७ साली बादशहाशी नमते धोरण ठेऊन तह केला होता. या तहानुसार बादशहाने संभाजीराजांस सात हजारी मनसब बहाल केली होती.(सभासद७३)
या मनसबीच्या सैन्य खर्चासाठी संभाजीराजांना वऱ्हाड व खानदेशात मिळून पंधरा लाख होनांची जहागीर दिली होती. वऱ्हाडातील तो परगणा म्हणजेच आपले बाळापूर होय.!!!
यावेळी संभाजीराजांचे वय १० वर्षे होते. प्रतापराव गुजर, मकाजी आनंदराव, निराजी रावजी, रावजी सोमनाथ व लष्कर घेऊन संभाजीराजे शहाजाद्याकडे औरंगाबादेस राहत. संभाजीराजे आपल्या जहागीरीचा कारभार या सहकाऱ्यांच्या मदतीने बघत. कधी ते बाळापूर आदि जहागीरीकडे आलेही असतील. पण वय लहान असल्याने बहुतेक कारभार मुतालिक म्हणून रावजी सोमनाथ व निराजी बघत असल्याने संभवत नाही. शिवाय इतिहासात बाळापूर भेटीची नोंद नाही. असो, पण कधिकाळी बाळापूर हा शंभूराजांच्या जहागीरीचा भाग होता याचे समाधान अन् अभिमान सार्थ आहे.!!
आता किल्ल्याविषयी बोलू-
दोन नद्यांच्या मधोमध असलेल्या या बाळापूरच्या किल्ल्याला दुहेरी बांधणीची भक्कम तटबंदी असून जागोजाग बुलंद आणि उंच बुरूज बांधून संरक्षणाची पुरेशी सिद्धता केलेली आहे.
त्याला कारण म्हणजे तत्कालिन इतिहासातील त्याचे भौगोलिक स्थान. हा किल्ला अकोला -जळगाव या प्रमुख मार्गावर वसलेला आहे. तत्कालिन मोगल खानदेशची राजधानी बुऱ्हाणपूर व वऱ्हाड सुभ्यास जोडणाऱ्या प्रमुख मार्गावर बाळापूर वसलेले आहे. तसेच बुलडाना,नरनाळा सरकार, वाशीम सरकार व अकोला सरकार यांना जोडणारे हे मोगलकालीन शहर होते.
(सरकार अर्थात मोगलकालिन जिल्हा)
बाळापूर किल्ल्याचा प्रवेशमार्ग उत्तरेकडून आहे. या प्रवेशमार्गावर तीन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा चौरस अशा भक्कम बुरुजामध्ये आहे. या उत्तराभिमुख दरवाजातून आत गेल्यावर दुसरा दरवाजा असून तो पश्चिमेकडे तोंड करून आहे. हे लाकडी दरवाजे अजूनही पहायला मिळतात. दारावरच्या कमानीवर महिरप आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूला तटबंदी असून समोर उत्तराभिमुख असा तिसरा दरवाजा आहे. यालाही महिरप केलेली आहे.
थोडक्यात उत्तर-पश्चिम-उत्तर अशी या दरवाज्यांची मांडणी आहे.
तिसऱ्या दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्यामध्ये आपला प्रवेश होतो. आतल्या इमारती जुन्या असून त्यांची दुरुस्ती करून त्यामध्ये सध्या पंचायत समिती वगैरे काही सरकारी कार्यालये केलेली आहेत.
तटबंदीवर चढण्यासाठी जागोजाग पायऱ्या केलेल्या दिसतात. या तटबंदीची रूंदी तीन मीटर एवढी भरते.
पावसाळ्यात किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी नद्यांच्या पाण्याचा विळखा पडतो. २००० साली नद्यांना आलेल्या महापुरात तटबंदीचा काही भाग ढासळला आहे.
या किल्ल्याला २९ ऑगस्ट, इ.स. १९१२ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. पण तरी त्याच्या दुरूस्तीसाचे योग येत नाही.
असो, शिवछत्रपतिंच्या थोर राजनितीचा, शंभूराजांच्या जहागीरीचा व मिर्झाराजा जयसिंगाच्या दक्षिणेतील कारकीर्दीचा हा साक्षिदार नामशेष व्हावयाच्या आत त्याचे बुलंद रूप आपल्या नजरेच्या कवडश्यात साठवून ठेवा..!
||फक्तइतिहास||
|
पहिले उत्तर द्वार |
|
दुसरे पश्चिम द्वार |
|
तिसरे उत्तर द्वार |
इतर नावाजलेल्या पोस्ट वाचण्यासाठी फोटोवर क्लिक करा-
Gr8 that some one is trying to recall Indian history yet.....
ReplyDeleteHistory repeat itself..
DeleteAmazing sir I would like to experience the adventure= PB
ReplyDelete