चरित्रलेखनाच्या बाबतीत औरंगजेब हा अतिशय नशीबवान ठरतो कारण शिवाजी महाराजांना त्यांचा सखोल वृत्तांत मांडणारा एकही चरित्रकार लाभला नाही. शिवभारतकार परमानंद तरी बरे लिहून जातो. त्या मनाने औरंगजेबाकडे अनेक चरित्रकार होते. भीमसेन सक्सेना, ईश्वरदास नागर, खाफीखान, साकी मुस्तैदखान शिवाय इरादतखान आणि अनेक अधिकारी ज्यांनी आपला पत्रव्यवहारातून झालेल्या घटनांच्या नोंदी ग्रंथित केलेल्या आहेत. तीसुद्धा अस्सल साधने म्हणून उपलब्ध आहेत.
महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या उद्योगाचे चटके आदिलशाही आणि मोघलांना बसू लागले, तेव्हा साहजिकच फारशी कागदपत्रातून महाराजांना शिव्या मिळू लागल्या. सैतान- हार्देलीन हलकट पाषाण हृदयी, मशहूर परमेश्वर किंवा बादशाही खोप्याच्या वर झाला आहे असा जो थापाड्या नुसते शब्दांचे जाळी विणणारा हरामजादा, धूर्त फसवणूक करणारा अशी अनेक बिरूदे मोगलांनी महाराजांना दिली. महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा उल्लेख शिवा जहन्नमी अर्थात नरकवासी शिवाजी असा कागदोपत्री होऊ लागला. महाराजांच्या मृत्यूचे वर्ष शब्दात देतांना काफर नरकाला गेला अर्थात फारशी मध्ये 'काफर जहन्नम रफ्त" येथपर्यंत फारसी इतिहासकारांची मजल गेली !!संभाजीराजांचा उल्लेख काफर बच्चा असा होई. पण असे असले तरी नकळत का होईना मराठ्यांचे युद्ध मोहिमांचे आणि तेज प्रतापाचे मूळ याच फारसी ग्रंथातूनच अधिक मिळते.
औरंगजेबाचा एक चरित्र लेखक आणि चिटणीस साकी मुस्तैदखान हा शेवटपर्यंत औरंगजेबाच्या सहवासात दक्षिणेत होता. त्याने मासिरे आलमगिरी नावाचा चरित्रग्रंथ बादशहासाठी लिहीला. मोहम्मद हाशीम खाफीखान हा औरंगजेबाचा आणखी एक चित्रकार. याचा बाप शायिस्तेखानावरील छाप्यात च्या वेळी पुण्यात शाहिस्तेखानाचा अधिकारी म्हणून काम करीत होता. स्वतः खाफीखान हा १६८१ मध्ये दक्षिणेत मुघल सैन्यात दाखल झाला. १६९१-९२ मध्ये तो रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी अधिकारी आजच्या भाषेत असिस्टंट कलेक्टर म्हणून काम करीत होता. मोगल साम्राज्याचा इतिहास त्याने १७३४ च्या सुमारास लिहिला असला तरी पाचाडच्या वास्तव्यात त्याला महाराजांबद्दल बरीच माहिती मिळाली. ती त्याने आपल्या ग्रंथात दिली आहे. महाराजांबद्दल गौरवाचे उद्गार काढणारा हाच तो खाफीखान होय..!
आलमगीर नामा आणि मासिरे आलमगिरी ही बोलून-चालून सरकार मान्यच अशी औरंगजेबाची चरित्रे. त्यात शिवाजी महाराजांच कौतुक अपेक्षिणे म्हणजे व्यर्थच.
मोगलांचा अधिकारी भीमसेन सक्सेना यांच्या आत्मचरित्रातून अर्थात तारीखे दिलकुशा या ग्रंथातून महाराजांचे कौतुक जागजागी आले आहे. तो म्हणतो शिवाजी हा एक सत्पुरुष अर्थात "मर्देसालेह" व अद्वितीय शिपाईगडी म्हणजे "सिपाही बेनझीर" होता. तो राजनीति निपुण होता.
खाफीखान रचित मोगल साम्राज्याचा इतिहास हा सरकारी ग्रंथ नव्हे. त्याने मराठ्यांवर अधिक तिखट शब्दात टीका केली आहे. पण महाराजांच्याबद्दल त्याने कौतुकाचे उद्गार काढले आहेत. महाराजांची कडक शिस्त, स्त्रियांबद्दलची त्यांची दाक्षिण्यवृत्ती, परधर्म धार्मिक ग्रंथ, प्रार्थनागृहे यांचा आदर या गोष्टींबद्दल खाफीखानाने महाराजांची प्रशंसा केली आहे. महाराजांच्या प्रेमळ स्वभावाचे खाफीखानाने एक सुंदर उदाहरण दिले आहे तो म्हणतो....
" रायरीच्या किल्ल्याला लागूनच शिवाजीने एक वाडा बांधला होता. रायरीच्या किल्ल्याला लागूनच शिवाजीने एक वाडा बांधला होता. उन्हाळ्यात तेथे पाण्याची फार टंचाई भासे, त्यामुळे तेथील लोकांना अतिशय त्रास होत असे. शिवाजीने बांधलेल्या वाड्यात काही दिवस राहण्याचा मला प्रसंग आला. शिवाजीने आपल्या वाड्याला लागून एक विहीर बांधली होती. तेथे तो बसत असे. विहिरीवर सावकारांच्या बायका आणि इतर गरीब स्त्रिया पाणी भरण्यास येत. त्यांच्या मुलांना तो त्या त्या मोसमातील फळे देत असे. आपण आपल्या आईशी किंवा बहिणीशी ज्याप्रकारे बोलतो त्या प्रकारे तो त्या बायकांशी बोलत असे." असे वर्णन खाफी खानाने केलेले आहे.
एका फारशी आणि तोही शत्रुपक्षीय ग्रंथकारामुळे आपल्याला महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे हृद्य आणि आकर्षक पैलूची ओळख झाली हे विसरता येणार नाही. पाचाडला ती विहीर आणि ती बैठक अद्याप आहे, इतिहासाची साक्ष देत !!!
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
||फक्तइतिहास||
Comments
Post a Comment
... मग कशी वाटली पोस्ट