Skip to main content

Featured

नागझरी आणि दरेगाव येथील वास्तुशिल्पांची अनुभूती..

  मित्रांनो, या भारत भूमीवर प्राचीन सुंदर कलाकृती जगप्रसिद्ध आहेत, मात्र सामान्य दर्जाची, कमी कलाकृतीची दुर्लक्षित असलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आजही खेड्याबाऱ्मध्ये बरीच आहेत. अशा दुर्लक्षित इतिहास पुरुषांचा शोध मनाला नेहमीच असतो. आज बुलडाणा जिल्ह्यात फिरत असताना नेहमीप्रमाणे शोध घेतल्यावर समजले की शेंदुर्जनाच्या जवळ दोन ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मग काय, आम्हाला इतिहासात टाईम ट्रॅव्हल करण्याची संधी चालून आली.! मित्रांनो,  शेंदुर्जन(सिंदखेड तालुका) येथून उजवीकडे वळून आम्ही साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर नागझरी फाट्यावरून डावीकडे वळलो. एक किलोमीटर अंतरावर नागझरी हा छोटा गाव लागला. या गावाच्या पिछाडीवर अतिशय खडतर रस्त्याने खाली उतरत एक किलोमीटर मोटर सायकलने गेल्यावर आम्ही डोंगराच्या कुशीत एका रमणीय ठिकाणास पोचलो. येथे एक प्राचीन महादेवाचे देवालय असून त्यासमोर धार कुंड आहे. देवालय बाह्य दर्शनी पाहिल्यास सुंदर कलाकृतीचे असून लहान लहान विटांनी बांधलेले दिसते. देवालयाचा जीर्णोद्धार झाला असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. असो, देवालयात प्रवेश केल्यावर हेमाडपंथी बांधणीचे सहा दगडी स्तंभ दिसत...

छत्रपतींनी केला सप्तकोटेश्वराचा जिर्णोद्धार


सन १६६८ मध्ये गोव्याच्या आक्रमणात शिवाजीराजांनी बारदेश प्रांतातील भातग्राम नार्वे येथील सप्तकोटेश्वर नावाचे एक जीर्ण मंदिर आढळले. पंचगंगा नदीकाठी असलेले हे मंदिर नार्वे गावी होते. हे देऊळ कोकणमधिल सहा पुरातन मुख्य देवतांपैकी एक मानले जाई. गोव्यामधल्या बाराव्या शतकातील कदंब घराण्याचे हे कुलदैवत होते. त्यांच्या बिरुदात ह्याचा उल्लेख सापडतो -

श्रीसप्तकोटेश्वरलब्धवरप्रसाद श्रीकादंबवीर"

बहमनीच्या काळात तिसवाडीयेथील मूळ देऊळ पाडण्यात आले होते व पुढे कित्येक वर्ष ते तसेच पडून राहिले. त्यातील शिवपिंडी बाहेर काढून शेताच्या बांधाखाली गाडण्यात आली म्हणजे त्यावरून लोक चालत जातील. त्यानंतर विजयनगरच्या काळात बुक्कदेवरायाने ह्या देवळाचा जीर्णोद्धार केला व त्याला गतवैभव प्राप्त झाले. 
इसवीसन १५१० मधे पोर्तुगीजांनी हा प्रांत बळकावला व गोमांतकातील देवळांवर अवकळा आली. सन १६४० मध्ये तिसवाडीचे हे देऊळ पोर्तूगीजांनी नष्ट केले. पुन्हा त्यातील शिवपिंडी काढून विहिरीच्या काठावर बसवली गेली म्हणजे बाटलेले ख्रिस्ती त्यावर पाय ठेऊन विहिरीतील पाणी काढतील. मात्र भतग्रामातील एका देसायाने ती शिवपिंडी विहिरीवरुन काढली व नार्वे गावी नेऊन नवीन देऊळ बांधले. हे कळल्यावर पोर्तुगीजांनी ते देऊळ पाडले नाही पण त्यावर जबर कर बसवला. पण पोर्तूगीज अमलात ते हळूहळु जीर्णावस्थेत पडले.

गोव्याच्या स्वारीवेळी शिवाजीमहाराज जेव्हा वेंगुर्ल्याहुन नारव्यास गेले तेव्हा त्यांना हे मोडकळीस आलेले देऊळ दिसले. त्यांनी हे देऊळ पुन्हा उभारायचे ठरविले व आपल्या लोकांना तसे आदेश दिले. १३ नोव्हेंबर १६६८ रोजी त्याच्या पुनर्बांधणीची तयारी सुरु झाली. देवळाच्या प्रवेशदारावर खालिल शिलालेख कोरवलेला आहे, जो या जीर्णोद्धाराची साक्ष देतो. तो आजही पहावयास मिळतो.
सप्तकोटेश्वराच्या प्रवेशदारावरील शिलालेख- 

श्रीसप्तकोटीश शके १५९० किलकाब्दे कार्तिक कृष्ण पंचम्यां सोमे श्रीशिवराज्ञा देवालयस्य प्रारंभाः ।। 

हा शिलालेख साक्षि आहे जुलूमाचे स्तोम कितीही माजो,अखेर सत्य व मानवधर्म प्रस्थापित होतोच!

शासकाने रयतेवर शासन अवश्य करावे. मात्र त्यासाठी रयतेची देवळे भंगावी लागत नाहीत. कारणे देवळे नव्हेत तर ती त्यांची मनं आहेत व खरं शासन हे रयतेच्या मनावर असावे लागते. व ते मदतीने व निर्मीतीतून साधता येते. 
||फक्तइतिहास||

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts