भारताच्या फाळणीच्या काही दिवस आधी कराची येथील 'सिंध ऑब्झर्वर' या नियतकालिकाचे संपादक असलेले शर्मा हे पाकिस्तानचे निर्माते महंमद अली जिना यांच्या मर्जीतले खास पत्रकार होते. कारण फाळणी झाल्यावरही जीनांनी त्यांना आग्रहाने कराचीतच ठेवून घेतले होते. जिनांच्या मृत्यूनंतर मात्र शर्मा हे मुंबईला परत आले. तेथे त्यांनी पुन्हा पत्रकारितेचा व्यवसाय स्वीकारला. पाकिस्तानातील आपल्या वास्तव्यावर त्यांनी एक छोटेसे पुस्तक लिहिले आहे. त्याचे नाव 'ए पिप इन्टू पाकिस्तान' (पाकिस्तानात डोकावून पाहता) असे आहे. त्यात जीनांच्या शेवटच्या वर्षाची चांगली माहिती मिळते. त्या पुस्तकावरून जीनांचे शेवटचे वर्ष काही सुखात गेले नाही असे दिसते. गंभीर दुखण्याने ते आजारी होते. शर्मा यांचे हे पुस्तक लहान असे असले तरी अतिशय वाचनीय आहे.
पाकिस्तान निर्मितीनंतर आपले सहकारी सत्ता ग्रहण करतील, आपल्याकडे काहीच अधिकार राहणार नाही आणि आपले सहकारी लियाकत अली खान वगैरे आपल्याकडे दुर्लक्ष करू लागतील... अशावेळी आपली परिस्थिती काय होईल? अशी भीती त्यांना वाटे. भारतात असलेल्या मुंबई राज्याचे आपण, बहुसंख्य मुसलमान असलेल्या पाकिस्तानात आपण उपरेच, असे आज ना उद्या समजले जाण्याची शक्यता आहे. मग इकडे ना तिकडे अशी आपली अवस्था होईल. ही आपत्ती टाळावी म्हणून जिनांनी माऊंटबॅटनचा सल्ला न जुमानता पाकिस्तानच्या गव्हर्नर जनरल पदाची सूत्रे स्वतःच्या हातात घेतली. यामुळे सर्व सत्ता आपल्या हाती येण्याची घाई झालेल्या आपल्या पंजाबी, सिंधी वगैरे सहकाऱ्यांवर आपण नियंत्रण ठेवू शकू असे त्यांना वाटत होते. गव्हर्नर जनरलची सूत्रे हाती असल्यामुळे शेवटपर्यंत त्यांच्या हातात थोडाबहुत तरी अधिकार राहिला पण त्यांचे महत्त्व कमी व्हावयाचे ते झालेच.!
पाकिस्तान निर्मितीनंतर ते खेळत असलेले कश्मीरचे राजकारण त्यांच्या अंगाशी आले होते. पाकिस्तानातून लाखो हिंदू, शीख नागरिक आपली मालमत्ता सोडून भारतात निघून गेले. हे पाकिस्तानला हवेच होते. पण भारतात प्रचंड प्रतिक्रिया होऊन तितक्याच दूर्दशेने भारतातून कोटी-अर्धकोटी मुसलमान पाकिस्तानात येतील याची कल्पना जीनांना आली नव्हती. या भयंकर आघातामुळे ते अक्षरशः हादरून गेले. त्यातून कर्करोगासारखा आजार त्यांना जडला होता. पत्रकार शर्मांनी लिहून ठेवले आहे की आपण कराचीत असताना मुस्लिम लीगच्या एका बैठकीत जीनांनी म्हटले होते-
'आपण भारतात परत जाऊन तेथील नागरिक म्हणून राहावे. अशी आपली इच्छा आहे.'
असो,
जीनांच्या भीती प्रमाणे खरंच त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. उपचारासाठी आणि हवापालट म्हणून ते बलुचिस्तानात जियारत या गावात जाऊन राहिले.
त्यांच्या शेवटच्या दुखण्यात त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर कर्नल इलाही बक्षी यांनी दिलेली माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या १२ सप्टेंबर १९८८ च्या अंकात पहिल्या पानावर छापून आली. ही अतिशय महत्त्वाची आहे. त्यात इलाही बक्षी म्हणतात-
'पाकिस्तानचे संस्थापक कायदेआझम मोहंमद अली जिना यांच्या मृत्यूला चाळीस वर्षे होत आहेत. पाकिस्तानात त्यांचा स्मृतिदिन पाळण्यात येत आहे. पाकिस्तानच्या निर्मितीचे कार्य जीनांच्या हातून झाले पण त्यांचे शेवटचे दिवस मोठ्या हालात गेले. ते त्यांच्या दुखण्यामुळे होते, हे तर झालेच पण त्याला इतर कारणेही होती. जीनांना वाटू लागले होते की आपले निकटचे राजकीय सहकारी हे आपला विश्वासघात करीत आहेत. त्यांचा विशेष रोख लियाकत अली खान यांच्यावर असावा. लियाकत अली खान हे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान. लियाकत अली यांच्या कुटिल आणि हीन कारस्थानांमुळे जीनांची अत्यंत निराशा झाली होती असे दिसते. जीनांनी लियाकत अली ना म्हटले होते ते असे,
'पाकिस्तान निर्माण करण्यात मी फारच मोठी घोडचूक केली असे मला वाटते. आता असे वाटते की, आपण दिल्लीला जावे आणि नेहरूंना असे सांगावे की, मागे केलेला मुर्खपणा आपण विसरून जाऊन पुन्हा आपसात मैत्री करुया!'
कर्नल इलाही बक्षी यांनी ही आपली हकिकत स्वतः पेशावर प्रांताचे माजी शिक्षणमंत्री मोहम्मद याह्याखान यांना सांगितली होती. कर्नल इलाही बक्षी ची ही हकीकत खरी आहे व तिचे समर्थन करणारा पुरावा आहे असे याह्या खान यांनी सांगितले होते.
कर्नल इलाही बक्षी यांनी जीनांच्या शेवटच्या दुखण्याबद्दल एक पुस्तकच लिहिले आहे. त्याचे नाव आहे 'कायदेआझम (जीना) यांचे शेवटचे दिवस.'
मात्र या पुस्तकात वरील माहिती नेमकी वगळण्यात आली ती हेतूपुरस्पर. याबद्दल इलाही बक्षी म्हणतात की हे सगळे मी सांगितले असते तर त्याचे भयंकर परिणाम झाले असते. लोकांनी मला तरी फाडून खाल्ले असते किंवा वरील घटनांना जबाबदार असलेल्या माणसांचा त्यांनी निकाल लावला असता."
डॉक्टर इलाही बक्षी यांनी ही हकीकत १९५२ च्या मे महिन्यात याह्या खान यांना लाहोरच्या अल्बर्ट विक्टर हॉस्पिटलमध्ये सांगितली होती. तोपर्यंत जीनांच्या मृत्यूला चार वर्षे होऊन गेली होती. इलाही बक्षी म्हणाले-
'कायदेआझम जिना हे शेवटच्या दुखण्यात जियारत येथे राहत होते.
त्यांच्या जवळची औषधे संपली, तर पुन्हा औषधे उपलब्ध करून देण्यासाठी आठ-दहा दिवस लगत (लियाकत अली सरकारला). मी तारांवर तारा पाठवली, दूरध्वनीवरून बोलणे करी. पण त्याचा काही उपयोग होत नसे. या गोष्टीचे मला वाईट वाटे. मला सारखे वाटते की, कायदे आझम (जीना) यांचे काही बरे वाईट झाले तर मी त्याबद्दल काय सांगू शकणार? मी माझ्यातर्फे शक्य तितके आपले कर्तव्य पाळले असे मी कसे सांगू शकणार होतो? म्हणून मी घटकांच्या नोंदींची फाईलच तयार करू लागलो. मी तारा पाठवित होतो, त्यापैकी प्रत्येकाची पोच मी जपून ठेवू लागलो. फोनवर मी निरोप पाठवित होतो, त्यांच्याही वेळा मी काळजीपूर्वक नोंदवून ठेवू लागलो. पुढे आपला बचाव करण्याची वेळ येईल तेव्हा वरील नोंदीचा मला उपयोग करून घेता यावा असा माझा हेतू होता.
मी सरकारला कळविले की, जिनांची प्रकृती पाहता मला एक वैद्यकीय मदतनीस देण्यात यावा. शेवटी डॉक्टर रियाज अली शहा यांना माझ्याकडे मदतनीस म्हणून पाठविण्यात आले.
मला वैद्यकीय मदत मिळावा तेवढा एकच हेतु माझा नव्हता. जीनां कडे मी दुर्लक्ष केले असा जर कोणी माझ्यावर आरोप करील तर त्यातून आपला बचाव करून घ्यावा यासाठी सुद्धा मला एक प्रत्यक्ष साक्षीदार हवा होता. पण माझी सावधगिरी अनावश्यक ठरली. जीना कसे वारले याबद्दल मला कोणीही काही विचारले नाही. जिनाचे जियारत सारख्या अडवणी गावी किती हाल झाले, त्यांना जियारत सारख्या गावी का ठेवण्यात आले, याबद्दल कोणी माझ्याशी काही बोलले नाही."
इलाही बक्षी यांची वरील जबानीचे आश्चर्य वाटू लागते की, पाकिस्तान निर्मितीचा जनक म्हणणाऱ्या जिनांची आपल्याच देशात अशी दुर्दशा व्हावी, ही एक मोठी शोकांतिका आहे!
शेवटच्या काळात त्यांना कराचीला आणण्यात आले, यावेळी त्यांची परिस्थिती अतिशय गंभीर झाली होती. गव्हर्नर जनरल या प्रसादात त्यांना पोचविण्यात आले, त्यावेळी पाकिस्तानचे मंत्रिमंडळ एका भोजन समारंभात आणि करमणुकीच्या कार्यक्रमात गुंतले होते.
कार्यक्रम चालू असताना जीनां मरण पावले. पण मंत्रिमंडळाने पाच तासापर्यंत ही बातमी दाबून ठेवली, ती कार्यक्रम संपल्यानंतरच जाहीर केली.!
मुंबईचे माजी राज्यपाल 'श्रीप्रकाश' हे त्यावेळी भारताचे राजदूत म्हणून पाकिस्तानात हजर होते. ते म्हणतात- जीनांचा मृत्यू हा बातमी जाहीर करण्याच्या पाच तास आधीच झाला होता. ही बातमी आपल्याला मिळाली ती पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे इतरांशी चाललेले संभाषण आपल्याला अकस्मातपणे कळले म्हणून. ज्याने पाकिस्तान निर्माण केले, त्याला पाकिस्तानातील सत्ताधारी विचारीत नव्हते, ते (जिना) अत्यवस्थ असताना ते (लियाकत अली सरकार) चैनीत मशगुल होते, हे केवढे विदारक सत्य आहे.?
जीनांचा मृत्यू १३ सप्टेंबर १९४८ या दिवशी झाला. अर्थात पाकिस्तान निर्मितीनंतर अवघ्या १३ महिन्यात जिना वारले.
पाकिस्तान निर्मितीनंतर अवघ्या एक वर्षातच जीनांची अशी स्थिती का व्हावी? या प्रश्नांची काही उत्तरे देता येतील.
मुस्लिम अल्पसंख्य असलेल्या प्रांतातून (मुंबईतून) आलेले जिना अर्थातच मुहाजिर कल्पनेत मांडले गेले.
पाकिस्तान निर्मितीनंतर नवीन नेतृत्वाला ते अडगळी सारखे वाटले कारण आता त्यांची गरज उरली नव्हती.
जिनांची वृत्ती नवीन नेत्यांना रुचणारी नव्हती. जीना यांनी इस्लाम आणि मुसलमान हे हुकमी पत्ते पाकिस्तान निर्मितीसाठी वापरले आणि मिळविली पण मात्र इस्लामी पद्धतीची राज्ययंत्रणा पाहिजे असे आग्रही प्रतिपादन करणाऱ्या नेत्यांना ते उघडपणे विचारीत,' इस्लामी राज्य यंत्रणा हवी असे तुम्ही म्हणता तो कोणता इस्लाम? इस्लाम या नावाखाली ७२ पंथ आहेत. शिया,सुन्नी, मेहदवी, अहमदिया, कादियानी इत्यादी. त्यापैकी कोणत्या पंथाचे राज्य तुम्हाला हवे आहे?'
पाकिस्तानच्या घटना परिषदेच्या संदर्भात बोलताना जिना म्हणाले होते, 'आता पाकिस्तान अस्तित्वात आले आहे. येथे अनेक धर्म आणि पंथ आहेत. धार्मिक अर्थाने त्यांनी आपले आचार-विचार अवश्य पाळावेत पण पाकिस्तानच्या उन्नतीसाठी झटताना आपण अमूक धर्माचे आहोत अशी भावना न ठेवता आपण सर्व पाकिस्तानी नागरिक आहोत याच भावनेने झटावे.'
जीनांचा हा उद्देश अनेक कट्टर नागरिकांना रूचला नाही हे उघड आहे. कारण पाकिस्तानची निर्मितीच मुळात या कट्टरतेच्या आधारावर त्यांनीच निर्माण केली नव्हती काय?
गेल्या अनेक वर्षांचा पाकिस्तानचा इतिहास म्हणजे इस्लामीकरण आणि निधर्मी लोकशाहीकरण यांच्यातील संघर्षाची शोकांतिका आहे.
आपली लोकप्रियता टिकवण्यासाठी तेथील सर्वच राज्यकर्ते हव तसं धार्मिकतेचे शस्त्र वापरण्याचा प्रयत्न करतात.
आपली लोकप्रियता टिकविण्यासाठी चाळीस लाख कादियानी अहमदिया मुसलमानांना मुसलमान समाजातून बाहेर काढून त्यांना अल्पसंख्य जमात ठरवण्याचा विक्रम भुत्तो यांनी केला तर झिया-उल-हक यांनी इस्लामीकरण आणि सुन्नी शरीयत पालनाचा दुराग्रह केला!
नवाज शरीफ, जनरल परवेज मुशर्रफ ते इम्रानखान पर्यंत पाकिस्तानातील अल्पसंख्य हिंदूंचे केले जाणारे इस्लामीकरण!
पाकिस्तानातील आपली लोकप्रियता टिकवण्यासाठी केले जाणारे दहशतवादाचे पालन-पोषण आणि भारतातील घातपाताचे प्रयोजन!
सगळे एकाच माळेचे मणी आहेत असेच दिसून येते. ते हवे तिथे इस्लामचे शस्त्र बाहेर काढतात आणि लोक फसतात, असेच दाखले इतिहासात सापडतात!
पण ज्या शस्त्राची धार बोथट होऊन जाते ते जिनांसारखे अडगळीत फेकून दिले जातात!
जिनांचे काम संपल्यावर पाकिस्तानला त्यांची आवश्यकता राहिली नाही. इतिहासाच्या अडगळीत त्यांना फेकून देण्यात आले. त्यांच्या शेवटच्या दुखण्याची हकिकात त्यांनीच निर्माण केलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन जाते!
मुस्लिम लीग या हत्याराखाली अखंड भारताची लांडगेतोड करण्याचा हरप्रयत्न करणारे पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिना यास आपल्याच कार्यावर अफसोस व्हावा म्हणजे आश्चर्य काय ? जे त्यांनी केले तेच त्यांना मिळाले!
- प्रा. रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्त इतिहास।।
Comments
Post a Comment
... मग कशी वाटली पोस्ट