|
करंजा येथील ब्रिटिश कालीन कान्नव बंगला |
खरे तर मित्रांनो कारंजा जाण्याचे निमित्त म्हणजे जीवशास्त्राच्या पेपरचं व्हॅल्युएशन.!
नुकतेच बोर्डाचे पेपर संपले आणि पेपर तपासणीचा हंगाम सुरु झाला. प्रत्येकच तत्त्वात इतिहास शोधणारी दृष्टी आम्हाला इतिहास दर्शन घडवतेच हे खरेच कारण आमच्या अंतरंगात इतिहास वावरतो.
विदर्भातील प्राचीन असं हे शहर इतिहासातून डोकावत कधी स्वामी नृसिंह सरस्वती यांच्या दिव्यतेने तर कधी शिवछत्रपतींच्या मोगल शहराच्या छाप्याने. याठिकाणी इंग्रज व फ्रेंच कंपनीच्या वखारी होत्या आणि विदर्भ तसे कापसासाठी प्रसिद्ध असे. शकुंतला एक्सप्रेसचा तो इतिहासात गडप झालेला रेल्वेमार्ग सुद्धा ब्रिटिशांनीच आपल्या व्यापारासाठी येथे आणला होता.
करंज ऋषींच्या नावाने वसलेले हे शहर प्राचीन मध्ययुगीन कालखंडात नावाजलेले होते.
नशीब माझे पेपरच्या निमित्ताने तरी मला ह्याचं ते ऐतिहासिक दर्शन घडलं. सुरुवातीपासूनच घरून निघतांना वाटलं होतं की पेपरचा काम झाल्यावर थोडं तरी इतिहासात जाऊन याव, आणि अगदी प्रवेश करतानाच मला या शहराच्या एका प्रमुख सरदाराची भेट व्हावी तशी मला मंगळवारी वेशीची भेट घडून आली.! तिचे विस्तीर्ण स्वरूप काळजात साठवून चौरे विद्यालय कडे निघालो. काम झाल्यावर निघालो ऐतिहासिक दर्शन घेत!
|
गावातील जुने वाडे |
शहरात बरेच लहान-मोठे जुने वाडे बघावयास मिळतात. जुने विटांनी बांधलेलं बांधकाम आणि त्याचे नक्षीदार दरवाजे नजरेस पडले की थोडे थांबून बघावास वाटतं.
स्वामींच्या मंदिराचे दर्शन घेऊन असेच वाडे बघत मी पोहा निघालो वेशीकडे वाड्याबद्दल लोकांना विचारत विचारत. आणि कुणीतरी सांगितलं एका पुराण पुरुषाचे नाव. कान्नव यांचा वाडा!!
|
पोहा वेश |
पोहा वेशीला लागून अगदी जवळच विस्तीर्ण आणि सुरेख विटांच्या बांधणीचे राम मंदिर दिसले. मंदिर आणि आतील गाभार्याचं बांधकाम बघितलं की थोडाबहुत पातूरच्या बालाजीचे मंदिर आणि वाशीमच्या बालाजी मंदिराची आठवण येते. अर्थात कालखंड समान असावा.
|
राम मंदिर |
|
मंदिराच्या आतील सभामंडप |
मंदिरातील पुजारी बुवांना विचारले असता समजले की, हे मंदिर या शहरातील कान्नव घराण्याने बांधलेले आहे. मंदिराच्या समोर एक महादेवाचे देऊळ असून त्याला लागूनच श्री तुकाराम कान्नव यांचे समाधी मंदिर आहे. ही दोन्ही मंदिरे अतिशय सुरेख नक्षिणे नटलेली आहेत.
ब्रिटिश कालखंडात कारंजा शहरांमध्ये कापसाचा मोठा व्यापार चालत असे. कान्नव या घराण्यातील श्री तुकाराम कान्नव पूर्वी निंबाळकर रियासतीत काम करत होते. तेथून व्यापाराच्या निमित्ताने ते कारंजाला स्थायिक झाले. त्यांनी व्यापारामध्ये मोठी उन्नती साधली आणि गावाच्या बाहेर वेशीच्या बाजूला हे राम मंदिर बांधले. त्या बाजूस त्यांची समाधीसुद्धा आहे.
|
मंदिरासमोरील महादेव मंदिर व कानव यांची समाधी |
वेशीतून बाहेर पडल्यावर जवळच कान्नवांचा वंशपरंपरागत वाडा नजरेत भरतो. या वाड्याचे बांधकाम १८९९ मध्ये या घराण्यातील लोकांनी केले.
एका मोठ्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर वड्याचे विस्तीर्ण चित्र नजरेत भरते आणि त्याची ती ब्रिटिश कालखंडातील बांधणी पाहून मन थक्क होऊन जाते. मोठ्या लाकडी बांधकामात हा वाडा बांधला असून त्यावर प्रत्येक ठिकाणी अतिशय सुबक असे कोरीवकाम केलेले आहे ते पाहून कुणी म्हणावे की हे काम लाकडावर केलेले नसून संगमरवर दगडातील असावे तेवढे ते बारीक आणि सुबक असे आहे. बाहेरील लोकांना विचारपूस करत मी वाड्याच्या जवळ गेलो. तिथे एक वयोवृद्ध गृहस्थ मला भेटले. त्यांचे नाव मधुकर कान्नव. आपलं कुतूहल दाखवत मी माझा परिचय दिला आणि ते मला आतील दालनात घेउन गेले.
ते सांगू लागले की पूर्वी आमच्या आजोबा व त्यांच्या वडिलांनी याचे बांधकाम पूर्ण केले. त्याचे आजोबा गोविंदराव, ज्यांना नाईक अशी पदवी मिळाली होती हे व्यापाराच्या निमित्ताने मुंबईत जात असत. तिथे त्यांनी ब्रिटिश वाडे बघितले. मोठ-मोठे हाऊसेस बघितले. तसेच डौलदार घर आपण कारंज्यात बांधावे असे त्यांनी ठरविले. या बांधकामासाठी त्यांनी मुंबईमध्ये असलेले पोर्तुगीज आर्किटेक्चर आणले. पोर्तुगीज बांधणीची छाप या इमारतीवर पहायला मिळते. गोव्याची चर्च म्हणा किंवा मुंबईचे चर्च किंवा कोरलाईचा तो किल्ला, हे सर्व पाहिल्यावर आपल्याला पोर्तुगीच वास्तुशास्त्राची ठेवण या वाड्यामध्ये सुद्धा बघावयास मिळते हे विशेष!
मधुकर काका मला वाड्याची माहिती देत होते. ते म्हणाले, या वाड्याचा पाया खोदताना प्रचंड माती लागल्याने त्यामध्ये जस्त शिसे अशा धातूंचे मिश्रण ओतले गेले. शिवाय येथील वड्याच्या बांधकामासाठी लागणारे लाकूड हे बर्मा येथून बोलावले. आणि चुन्यामध्ये शंखशिंपल्यांचा, बेलफळ आणि मजबूती करिता तागाचा वापर केलेला आहे. भिंतीवर सुद्धा चुन्याचे बहुत प्रमाणात नक्षीकाम केलेले आढळते. ही नक्षी मुंबईतील ऑपेरा हाऊस व इतर ब्रिटिशकालीन जुन्या इमारती सारखी दिसते. शिवाय या इमारतीचं फ्लोरींग सुद्धा याच धर्तीवर बनवलेल आहे. दालनात असलेले साहीत्य, लाकडाचे कोरीव कपाट नजरेत भरतं. उंच आणि भव्य गोल कमानीचे दरवाजे म्हणजेच पोर्तुगीज वास्तुशिल्पाची विशेषता. इमारतीच्या छतावर सुद्धा चून्याने नक्षीकाम केलेले आहे. तसेच दुसऱ्या मजल्यावर असलेल्या हॉलमध्ये त्याकाळातील चिनी मातीच्या कलाकुसरीच्या वस्तू, कुंड्या, लाकडाचे फर्निचर बघावयास मिळते.
एवढेच काय तर दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी असणारा जिनासुद्धा संपूर्णपणे लाकडाने बनवलेला असून आज एक 115 वर्षे झाल्यानंतरही तो मजबूत शाबूत आणि सुबक असा आहे.
कारंज्याचा बंगला श्रीलंकेत.?-
काण्णवांनी हा बंगला बांधल्यानंतर या बंगल्याची महती पार सातासमुद्रापार गेली. इंग्रज राजवटीत श्रीलंका व भारत हे दोन्ही देश असल्याने श्रीलंकन व्हाईसरायच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी तत्कालीन वर्हाड प्रांताच्या इंग्रजांच्या कारभार्यांनी ही बाब मुंबई प्रांताच्या गव्हर्रनरच्या कानी घातली. सरकारी सुत्र फिरली. काण्णवांच्या बंगल्याचे बांधकाम करणारे कारागीर जहाजाने तत्कालीन सिलोनला नेले गेले. तेथे या बंगल्याची प्रतिकृती उभी राहिली. व्हाईसराय हाऊस म्हणून ओळखले जाणारे हे निवासस्थान श्रीलंका स्वतंत्र झाल्यानंतर तिथले पहिले राष्ट्राध्यक्ष सिरीमाओ भंडारनायके यांचे शासकीय निवासस्थान झाले. श्रीलंकन राष्ट्राध्यक्षांचा बंगला काण्णवांच्या बंगल्याची प्रतिकृती आहे. ही आम्हा विदर्भ वासियांना मोठी अभिमानाची बाब आहे..!
असो,
अतिशय डौलदार अशा या विस्तीर्ण पुराण पुरुषाची भेट घेतल्यावर आपल्याच भूमीच किती कौतुक करावंसं वाटतं. आमचा विदर्भ हा केवळ कोळशाची खाण नसून हिऱ्याची खान आहे. सिंदखेड, लोणार, कारंजा, गाविलगड, नरनाळा, पातुर, बाळापुर, मेहकर, वाशिम, चंद्रपूर असे कितीतरी म्हणावे माणिक मोती रत्न या भूमीत आहेत. या हिंद भूमीच्या इतिहासात आमचे स्थान मानाचे आहे. या हिंदुभूमीला तिचा स्वाभिमान विदर्भाच्याच मातीने दिला. हीच आमची संस्कृती आणि हाच आमचा अभिमान !!
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्तइतिहास।।
Comments
Post a Comment
... मग कशी वाटली पोस्ट