कनकादित्य सूर्य मंदिर कशेळी
मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणच्या निरागस आणि दिव्यभूमीला स्पर्श करण्याचा योग आला.
आदित्य म्हणजे सूर्य. तसे सूर्य मंदिर भारताबाहेरही आढळतात. त्यापैकी भारतात ओडिशा राज्यातील कोर्णाकचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे.
१२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्या वेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतिक होते. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आन अशी सूचना पुजारीने त्या व्यापाऱ्याला सांगितले. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्ती किनाऱ्यावरील गुहेत आणून ठेवली. त्यानंतर त्याचे जहाज मार्गस्थ झाले.
कशेळी गावात कनकाबाई नावाची एक सूर्योपासक गणिका राहत होती. तिच्या स्वप्नात याच वेळी ही सूर्य मूर्ती आली आणि भगवान सूर्य नारायनाने कनकेला म्हणाले कि ‘तू मला येथून ने आणि तुझ्या गावात मंदिर बांध त्यात माझी स्थापना कर.’
कनकाबाईने ही हकीकत ग्रामस्थांना सांगितली मग ग्रामस्थांनाच्या मदतीने ती सूर्य मूर्ती गावात आणली गेली व स्थापना केली. त्या कनकाबाई मुळे घडले त्यामुळे कनकेचा आदित्य म्हनून कनकादित्य असे या मंदिराला नाव पडले.
किनाऱ्यावर ज्या गुहेत कनकादित्याची मूर्ती सापडली त्यास 'देवाची खोली' म्हणतात.
समुद्रापासून साधारण १५ फूट उंचीवर काळ्या पाषाणात ही नैसर्गिक गुहा आहे जवळजवळ ३०० माणसानं पेक्षा जास्त माणसे यात बसू शकतील एवढी मोठी ही गुहा आहे. आज या नैसर्गिक गुफेत डोंगरावरील थोडा खडक आणि माती पडल्याने ती गुफा बुजल्यासारखी झाली आहे.
![]() |
| देवघळी गुफा जेथे सूर्य मूर्ती ठेवण्यात आली होती |
कनकादित्य सूर्य मंदिर स्थापत्य-
कशेळी गावामध्ये जेथे मूर्ती स्थापन केली तेथे एक भव्य देवालय बांधलेले आहे. हे देवालय कोकणी धाटणीचे असून अतिशय भव्य आणि सुंदर आहे.
मंदिर साधारण ९०० वर्षे प्राचीन आहे. पूर्णतः अस्सल कोकणी कौलारू स्थापत्य शैली येथे पहायला मिळते.
एका भव्य द्वारातून देवालयाच्या आवारात प्रवेश करता येतो. या द्वाराचे दरवाजे सुंदर लाकडी कलाकुसरीचे असून त्यावर सूर्यमंत्र कोरलेला आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मंदिराच्या शेजारील विहरीवर हात-पाय धुऊन आत जाण्याची प्रथा आहे. या विहरीवर पाणी काढण्याची जुनी कोकणी पद्धत पहायला मिळते.
आवारातील देवालयाची प्रमुख इमारत खूपच सुंदर असून गर्भगृह व सभा मंडप अशी रचना आहे. सभा मंडप वेल बुट्टीने नक्षीत लाकडी खांबांवर आधारलेला आहे. सभामंडपातील लाकडी छतावर ज्या विविध देव-देवतांच्या मूर्ती कोरल्या आहेत त्यात अग्निनारायणाची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मूर्तीला सात हात, तीन पाय आणि दोन मुखे आहेत. अग्निनारायण म्हणजे अग्नी. घरातील अग्नीचे स्थान म्हणजे स्वयंपाकघरातील चूल. चूल मांडायची ती तीन दगडांवर म्हणजे पायावर म्हणून तीन पाय. चुलीची अग्निमूखे दोन एक चुलीचे दुसरे वेलाचे म्हणून दोन मुखे. आणि दोन्ही मुखांवर भांडे ठेवण्यासाठी जे छोटे छोटे खूर (उंचवटे) असतात. त्यांमध्ये वैलाचे चार व चुलीचे तीन असे मिळून सात म्हणून सात हात आहेत. संपूर्ण चुलीची जी रचना व तिचे प्रतीकात्मक रूप या अग्निनारायणाच्या मूर्तीत सामावले आहे. (अशा प्रकारची मोठी अग्नीनारायणाची मूर्ती रत्नागिरी शहरातील सत्यनारायण मंदिरात पहायला मिळते.)
कनकादित्य मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याआगोदर दरवाजाच्या वर शेषशायी विष्णूची लाकडात कोरलेली मूर्ती पहायला मिळते एवढी मोठी आणि तीही लाकडात अन्यत्र पाहयला मिळत नाही. या मूर्तीजवळ गरूड आणि लक्ष्मी आहे. तसेच या मूर्तीच्या वरील बाजूस दशावतार कोरलेले आहेत.
प्रत्यक्ष कनकादित्याची मूर्ती काळ्या पाषाणातील मूर्ती अत्यंत सुभक आणि देखणी आहे. या मूर्तीचे पूर्णरूप पहायचे असेल तर पहाटेच्या पूजेच्या (काकड आरतीवेळी) पहायला मिळते. आवर्जून पहाण्यासारखे आहे.
कनकादित्य मंदिरात सुमारे ८५० वर्षापूर्वीचा ताम्रपट आहे. सध्या सुरक्षितेच्या कारणामुळे बॕकेच्या लाॕकरमध्ये ठेवण्यात आला आहे. तीन जाड पत्रे एका कडीत ओवलेली ही ताम्रपट आहेत.
पहिल्या पत्र्यावर गाय,वासरू,तलवार आणि चंद्र-सूर्य कोरलेल्या आहेत.या दानपत्रात द्वितीय भोजराजाचा ४४ ओळीचा संस्कृत लेख कोरलेला आहे. तसेच शिलाहार राजांची वंशावळ दिली आहे. तिसऱ्या पत्राच्या मागील बाजूस मराठीत एक लेख आहे पण तो अस्पष्ट आहे जाणकार म्हणतात हा लेख बनावट आहे.
या ताम्रपटात शिलाहार वंशीय द्वितीय भोजराजाने अट्टविर (अत्ताचे आडिवरे) भागातील कशेळी गाव बारा ब्राम्हणांच्या प्रतिदिन भोजनासाठी दान दिले असा उल्लेख आढळतो.
संदर्भ संपादन:बापट, आशुतोष (५ एप्रिल २०१७). "रमणीय आडिवरे-कशेळी". लोकसत्ता. २५ सप्टेंबर २०१८
येथे सूर्यदेवतेसाठी चांदीचा रथ असून तो अत्यंत देखना आहे.पण तो फक्त उत्सवाच्या वेळीच पहायला मिळतो. मंदिराचे सभामंडप आणि मंदिरावरील कळसावर तांब्याचा पत्रा मुंबईचे शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखतात ते नाना शंकरशेठ यांनी त्यांना पुत्रप्राप्ती झाली म्हणून बांधून दिले.
असो,
निसर्गाचा एक अविष्कार म्हणून आज हौशी लोक देवघळीकडे जातात. मात्र त्याचा दिव्य इतिहास आणि सुंदर स्थापत्य शेजारील कशेळी गावात कणकादित्याच्या रूपात विराजमान आहे हे ते विसरतात. शेवटी सूर्यदेवता ही सुद्धा एक निसर्गचेच प्रतीक आहे..!
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्तइतिहास।।
#Devghali



Comments
Post a Comment
... मग कशी वाटली पोस्ट