सावनूर च्या नवाबाच्या घराण्यात मराठे आणि सावनूरकर यांच्यातील परस्पर संबंधाच्या अनेक कथा प्रचलित आहेत. सावनूरकर नवाबांना पेशव्यांनी प्रेमाने वागविले. हैदर अली व टिपू यांच्या आक्रमणापासून त्यांना संरक्षण दिले. ते का तर त्याचे मूळ एका बखरीत सापडते.
दिलेरजंगी घराण्यातील बखरीत पुढील मजकूर असून तो माधवराव पेशवे यांच्या सावनूर मधील जन्मासंबंधी चा आहे-
"लोक म्हणतात की नानासाहेब पेशवे यांची बायको गोपिकाबाई गरोदर होती. ती त्याच दिवशी प्रसूत झाली. पुत्र झाला. तेणेकरून नानासाहेबास परम संतोष होऊन बहुतेकास इनाम दिले. पुत्राचे नाव माधवराव ठेविले. बाळंतिणीस सावनूरात ठेवून आपण खुद्द फौजसुद्धा निघून गेले. नवाब साहेबांनी बाळंतिणीचे व मुलाचे चांगल्या रीतीने संरक्षण करून काही दिवसानंतर त्यास उंची वस्त्र देऊन मुलाचे अंगावर जडजवाहीर व मोत्याचे दागिने ठेवून बरोबर लोक देऊन पुण्यास रवाना केले. या कारणाने माधवराव नवाब साहेबास मामा म्हणत होते."
प्रस्तुत कथा नानासाहेबांच्या पहिल्या मोहिमेची आहे. नानासाहेब पेशवे आणि सावनूरचे नवाब यांच्यामध्ये लढाई होऊन तह झाला होता. मजीदखानाने पेशव्यांना ३६ महल दिले. मजीदखानाजवळ फक्त २२ महल आणि तीन सरकार राहिले.
|
येल्लूर किल्ला:पेशवे नानासाहेब व यांच्यातील लढाई चे ठिकाण |
खरेतर विजापूरचा सुप्रसिद्ध बहलोलखान ज्याची प्रतापराव गुजर यांच्याशी लढाई झाली होती त्याचेच हे घराणे होय.
ते असे झाले की, विजापूरचा शेवटचा आदिलशहा शिकंदर याने अब्दुल करीम बहलोलखानाला बंकापूर जहागीरमधील २२ महल रीतसर बहाल केले आणि पुढे विजापूरच्या अस्तानंतर सावनूर संस्थानचा उदय झाला. पुढे हे संस्थान औरंगजेबाच्या अधीन राहिले.
|
सावनूर चे संस्थान |
पेशव्यांनी सावनूरवर चढाई केली, तेव्हा पेशवे नानासाहेब आणि मजीदखान यांमध्ये तह झाला तसेच माधवरावांच्या जन्मामुळे कायम ऋणानुबंध निर्माण झाले.
पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांचे शत्रू चोहीकडे बंड करून उठले. म्हैसूरच्या वडियार घराण्याची सत्ता हैदरअलीच्या हातात आली. १७६१ नंतर हैदरअलीने म्हैसूर राज्याचा विस्तार सुरू केला. परिणामी मराठ्यांना दक्षिण कर्नाटकातील आपली ठाणी गमवावी लागली. १७६३ मध्ये हैदरअलीने दक्षिण कर्नाटकातील बिदनूर राज्य बुडविले. बिदूनूरची राणी विरम्मा ही त्याच्या कैदेत सापडली.
होय बिदनूरचे राज्य, ज्याने कधीकाळी राजाराम महाराजांना आश्रय दिला होता.
चन्नमा राणीने राजाराम महाराजांना तिच्या राज्यातून सुखरूपपणे वाट देऊन सर्व प्रकारचे साहाय्य देऊ केले. संकटग्रस्त मराठा राजास साहाय्य करणे हा तिने राजधर्म मानला आणि औरंगजेबाच्या संभाव्य क्रोधाची तमा न बाळगता तिने महाराजांच्या प्रवासाची गुप्तपणे चोख व्यवस्था केली. राणीच्या या साहाय्यामुळेच मराठ्यांचा राजा आपल्या सहकार्यांनिशी तुंगभद्रेच्या तिरावरील शिमोग्यास सुखरूपपणे पोहोचला.
त्याच राज्याची राणी आज कैदेत पडली होती.!
असो हैदरअलीने यानंतर तुंगभद्रा ओलांडून सावनूरच्या छोट्या राज्यावर स्वारी केली. सावनूर च्या नावाबावर त्याने जबर खंडणी बसविली.
पुण्याच्या दरबारातील अल्पवयीन पेशवा माधवराव आणि अधिकार ताब्यात घेऊ पाहणारा चुलता राघोबा यांच्यातील घर भांडणामुळे हैदरअलीचा ताबडतोब प्रतिकार करणे शक्य झाले नाही. पण अधिकाराची सूत्रे पूर्णपणे आपल्या हाती आल्यावर माधवरावांनी पुढील दहा वर्षे तेजतर्रार मोहिमा काढून शत्रूंना परास्त केले. निजाम, रोहिले, राजपूत, जाट यांना मराठ्यांच्या शक्तीची पुन्हा जाणीव झाली.
सन १७६४ मध्ये माधवरावांनी हैदर अलीवर स्वतः स्वारी केली. हैदरने पेशव्यांचा मोड करण्याकरिता आपल्या सर्व प्रयत्नांची शिकस्त करून पाहिली; पण माधवराव पेशव्यांपुढे त्याचा टिकाव लागेना. म्हणून सावनूर व इतर बराच मुलूख, त्याचप्रमाणे लढाईचे खर्चाबद्दल म्हणून ३२ लक्ष रूपये देऊन त्याने पेशव्यांशी तह केला.
ज्या बिदनूरच्या विरम्मा राणीस हैदरने कैदेत ठेवले होते तिची सुटका करून माधवरावांनी मोठ्या सन्मानाने तिची पुण्याकडे रवानगी केली. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला, तेव्हा मराठ्यांनी तिच्या वारसांना पुरेशी इनामगाव देऊन त्यांच्या उदरनिर्वाहाची व मानसन्मानाची काळजी वाहिली. विरम्माचे वारस घराणे धारवाडच्या आसपास गावातून नांदत राहिले.
असो,
या नंतर सन १७७० मध्ये माधवरावांनी पुनः हैदरवर स्वारी केली. कारण, सन १७६० मध्ये म्हैसूरचा नामधारी राजा चिक्ककृष्णराज मरण पावला होता. त्याच्या जागी हैदरने त्याचा वडील मुलगा नंदराज यास गादीवर बसविले होते. परंतु पुढे नंदराज स्वतंत्र होण्याची खटपट करीत आहे, असे पाहून हैदरने त्यास बंदीखान्यात टाकले व त्याची मालमत्ता आपणाकडे घेतली. या वर्तनाचा माधवराव पेशव्यांस राग येऊन, त्यांनी निजामांशी दोस्ती करून हैदरवर स्वारी केली. तेव्हा हैदरने मुलूख उजाड करून तलाव फोडून व विहिरीत विष टाकून मराठ्यांस अटकाव करण्याची शिकस्त केली. परंतु मराठे पुढे येऊ लागल्यामुळे निरुपाय होऊन त्याने अप्पाजीराव नावाचा वकील तह करण्याकरिता मराठ्यांकडे पाठविला. त्याने पेशव्यांस २६ लक्ष रुपये लढाईचा खर्च म्हणून व १४ लक्ष दरसाल खंडणी म्हणून देण्याचे कबूल केल्यावरून पेशव्यांनी हैदरशी तह केला.
माधवराव यांच्या हयातीत त्याला डोके वर काढणे जमले नाही.
सन १७७२ मध्ये माधवरावांचा मृत्यू झाल्यावर मात्र परिस्थिती पालटली. रघुनाथरावांचा पक्ष घेऊन हैदरअलीने तुंगभद्रेच्या उत्तरेला पुन्हा मैसूरचा विस्तार चालवला. सन १७७९ मध्ये त्याने सावनूर च्या नवाबाशी वैवाहिक संबंध जोडले. नवाब अब्दुल हकीम यांच्या मुलाला हैदरअली ची मुलगी आणि हैदरअलीच्या मुलाला नवाबाची मुलगी असे वैवाहिक संबंध झाले. तसेच वेळप्रसंगी हैदर अलीला २००० घोडेस्वारांची मदत सावनूर च्या नबाबाने करावी असेही ठरले.
मात्र हैदरअलीच्या मृत्यूनंतर (१७८२) टिपूचे नवाबाशी बिनसले.
सन १७८०मध्ये हैदर अली व इंग्रज यांच्यात घडून आलेल्या युद्धात नवाबाने घोडदळ पाठविण्यास कुचराई केली असा आरोप ठेवून टिपूने सावनूर वर स्वारी केली. तोपर्यंत निजाम-मराठे एका बाजूस तर टिपू दुसऱ्या बाजूस असे युद्ध सुरू झाले. टिपूचे सैंन्य सावनूरच्या समोर आले (ऑक्टोबर १७८६)परंतु सावनूरचा नवाब अब्दुल हकीम खान याने यापूर्वीच सावनूर सोडून मराठ्यांच्या छावणीत आश्रय घेतला होता. मराठ्यांनी अब्दुल हकीमला पाच हजारांचे घोडदळ देऊन मिरजेकडे पाठविले. टिपूने अब्दुल हकीम वर घोडदळाच्या कुचराई बद्दल २१ लाखांची बाकी काढली व सावनूरचा सगळा खजिना ताब्यात घेतला. अब्दुल हकिम च्या मुलाला कडक नजरकैदेत ठेवण्यात आले.
या युद्धाचा शेवट गजेंद्रगड च्या तहाने झाला. (१४फेब्रुवारी१७८७)
येथून पुढे सावनूरचा प्रत्यक्ष कारभार मराठ्यांकडून चालू झाला. अब्दुल हकीम हा पुण्यात राहू लागला. त्याला पेशव्यांकडून दरमहा दहा हजार रुपये पेन्शन देण्यात येई. पुढे सन १७९५ मध्ये त्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्या वारसदारांना हे निवृत्ती वेतन मिळू लागले. पुढे पेन्शनच्या मोबदल्यात सावनूर च्या नवाबांना ४८००० रुपये उत्पन्नाची सावनूर प्रदेशाची २५ खेडी इनाम म्हणून देण्यात आली.
|
पूर्वी मराठा साम्राज्याचा भाग असलेले संस्थांचे नवाब:१८५५-६२ |
सन अठराशे अठरा पर्यंत सावनूरचे नवाब हे पेशव्यांचे जहागीरदार म्हणून नांदले. पुढे इंग्रजी राजवटीत सुद्धा सावनूरचे लहान संस्थान चालू राहिले.
अशीही सावनूरच्या नवाबाची कहानी ज्यांना त्यांच्या आप्तांनी- नातेवाईकांनी लुटले पण मराठ्यांनी टिकवले...!
||फक्तइतिहास||
............................................................ लेखन सीमा.||
Comments
Post a Comment
... मग कशी वाटली पोस्ट