Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

एक होता रोमेल


अर्थात युद्ध केव्हा जिंकण्यासाठी नसावं
..त्याच्याकडून ती सायनाईडची गोळी घेऊन तोंडात टाकत शांतपणे रोमेल म्हणाला,
"युद्धात लढलेल्या सैनिकाचे मृत्यूचे भय केव्हाच गेलेले असते बर्गडॉफ....... फक्त तो कोणाकडून येईल याचेच कुतुहल असते............ आणि मला त्या बाबतीत मृत्यूने नक्कीच निराश केले............! "
-एक होता रोमेल.....


मित्रांनो आज आपण दुसर्‍या महायुद्धातील एका सर्वश्रेष्ठ सेनापतीची मार्मिक कथा वाचूया..
एर्विन रोमेल ज्यास नुसते फील्ड मार्शल रोमेल म्हणून ओळखले जाते.

हा दुसऱ्या महायुद्धातील सर्वात जंगेबहाद्दर प्रसिद्ध जर्मन सेनापती होता. जर्मनीचा महान सेनानायक. रोमेल चा जन्म १८९१ मध्ये स्टुटगार्ट जवळिल हाइडेनहाइम येथे झाला. त्याची जर्मन लष्करामध्ये अधिकारी कॅडेट म्हणून १९१० मध्ये भरती झालि. आणि लवकरच अधिकारीपदावर सेकन्ड लेफ्टनंट म्हणून १९१२ मध्ये नेमणूक झालि. त्यानी पहिल्या महायुद्धात फ्रान्स रोमेनिया व इटलि मधील आघाडिवर काम केले.

पहिल्या महायुद्धानंतर रोमेलनी लष्करी विद्यालयात शिक्षक म्हणून काम केले १९२९-३३ ड्रेसडेन इन्फंट्रि स्कुल त्यानंतर १९३५- ३८ पोस्टडॅम वॉर अकादमी. यावेळेपर्यंत रोमेल एक साधा अधिकारी म्हणूनच ज्ञात होता त्याची सर्वात पहिलि छाप १९३८ मध्ये पडलि जेव्हा त्याला हिटलरच्या सुरक्षेची जवाबदारी सोपवण्यात आलि. त्यानंतर रोमेलने पोलंडच्या आक्रमणामध्ये महत्त्वपुर्ण कामगीरी पार पाडलि.

पोलंड्च्या कामगिरी नंतर रोमेलची मेजर जनरल पदी नियुक्ति झालि. त्याने ७व्या पॅन्झर डिव्हिजनची सुत्रे हाति घेतलि व फ्रान्सच्या आक्रमणात उल्लेखनिय कामगिरी बजावलि.

विन्स्टन चर्चिल ब्रिटिश पार्लमेंटसमोर त्याच्या विषयी म्हणतात-
आपल्यासमोर एक अत्यंत धाडसी आणि बुद्धिमान शत्रू आहे आणि युद्ध बाजूला ठेवून मी म्हणेन की तो एक अत्यंत शूर सेनापतीही आहे.

जनरल एरवीन रोमेल नि:संशय एक श्रेष्ठ आणि बुद्धीमान योद्धा होता.
रोमेलची किर्ती इतकी पसरली होती की सैन्यात एखादी कामगिरी उत्कृष्ट कर असे म्हणण्याऐवजी ती रोमेल सारखी कर असे म्हणायची पद्धत पडली होती. आफ्रीकेच्या वाळवंटात जर्मनीचे ब्रिटीशांशी युद्ध सुरू होते. त्याचा युद्धभुमीवरचा कावेबाजपणा आणि बुद्धिमत्ता याने त्याला “वाळवंटातील कोल्हा” असे टोपणनाव पडले. एकदा ब्रिटिशांच्या आठव्या आर्मीने त्याला कोंडीत पकडले असताना त्याने त्याच्या रणगाड्याच्या अशा हालचाली केल्या की त्यातून उठणार्‍या वाळूच्या धूळीवरून व आवाजावरून ब्रिटीश सैन्याने असे अनुमान काढले की जर्मनांच्या सैन्याची ताकद त्या भागात खूपच आहे आणि त्यांनी तेथून माघार घेतली. दुसर्‍या एका ठिकाणी त्याने अशीच एक युक्ती वापरली. ब्रिटीश विमाने रोज त्या वाळवंटाची छायाचित्रे काढायची. हे जेव्हा रोमेलला कळाले तेव्हा त्याने लगेचच ओळखले की ही विमाने वाळवंटातील रणगाड्यांच्या वाळूत उठणार्‍या पट्ट्यांची छायाचित्रे काढत असणार व त्यावरून जर्मनांच्या ताकदीचा अंदाज बांधत असणार. रोमेलने लगेचच त्यानंतर सलग दोन रात्री त्याच्याकडे जेवढी वाहने होती ती त्या वाळूत इतक्या दूरदूर फिरवली की ब्रिटीशांनी त्याच्या सैन्याचा चुकीचा अंदाज बांधून त्या विभागातून माघार घेतली.

पण अशा या सेनापतीच्या मृत्यूची शोकांतिका फारच मार्मिक आहे -

सन १९४४,
बर्लिनमधला जर्मन राष्ट्रप्रमुखांचा महाल एखाद्या देवाला शोभेलसा होता पण देवालाही परवानगीशिवाय शिरता येणे शक्य नाही असा बांधलेला होता.
आल्बर्ट स्पीअरसारख्या कर्तबगार वास्तुतज्ञाच्या कल्पनेतून बांधल्या गेलेला हा प्रासाद सर्वश्रेष्ठ साम्राज्याच्या सर्वोत्तम सम्राटासाठी साजेसाच होता. सर्वोच्च नेत्याच्या सुरक्षेसाठी सैन्यातून उत्तमोत्तम सैनिक निवडले जात. अशा बळकट कोटात वावरत असलेल्या फ्युअररला(सर्वेसर्वा हिटलर) स्पर्श करायला वार्‍यालासुद्धा सहजासहजी शक्य होत नसे.
प्रत्यक्ष फ्युअररला भेटण्यासाठी कित्येक उच्चपदस्थांची परवानगी घ्यावी लागे. पण त्यांनादेखील फ्युअररचे दर्शन दुरापास्त झाले होते.
पण अशा या सुरक्षेला आणि खुद्द फ्युअररला हादरवून टाकणारी घटना घडली होती. २० जुलैला फ्युअररवरती हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. फ्युअररवर हल्ल्याचा हा काही पहिलाच प्रयत्न नव्हता, पण यावेळी फ्युअररच नव्हे, तर सगळी जर्मनीच हातातून निघून जायची वेळ आली होती.
स्वतः फ्युअरर थरकापला होता. इतरांच्या मृत्युबद्दल बेपर्वा असलेला फ्युअरर आता मात्र स्वतःच्या मृत्यूला इतके जवळून पाहून घाबरून गेला होता. हुकुमशाहीची पकड कशी असावी याचे चालतेबोलते उदाहरण ठरलेला हा हुकुमशहा पकड ढिली होताना बघून गडबडून गेला होता. शत्रूसाठी त्याच्याकडे डावपेच तयार होते मात्र घरातून होणार्‍या या विरोधाच्या तीव्र धारेने तो गोंधळून गेला होता. आणि अखेरीस कोणताही हुकुमशहा जे करेल तेच तो करत होता.

कटात भाग घेतलेल्याच नव्हे तर तशी शंका असणार्‍यांना देखील ठार करण्यात येत होते. कोर्ट मार्शलच्या नावाखाली कुटुंबेच्या कुटुंबे संपवण्यात येत होती. 'माहिती गोळा करणे' या नावाखाली सैतानही लाजेल असे अत्याचार सुरू झाले होते. फ्युअररच्या प्रती निष्ठा दाखवायची अहमहमिका सुरू होती. मात्र फ्युअरर स्वतःच्या सावलीवरदेखील विश्वास ठेवायला तयार नव्हता.

१३ ऑक्टोबरच्या रात्री साडेअकरा वाजता फील्ड मार्शल जनरल विल्यम केटेल फ्युररच्या प्रासादाकडे निघाला होता. आपल्याला कशासाठी बोलावले आहे याची अंधूक कल्पना त्याला आली होती. पण सध्याच्या वातावरणात कोणताही अंदाज चुकीचा ठरत होता. फ्युअररच्या लहरीचा तडाखा कोणाला बसेल याची कसलीच पूर्वसूचना नसे. काहीच दिवसांपूर्वी फ्युअररने एका जनरलला तो केवळ दुसर्‍या एका फितूर जनरलच्या घरी काही प्रसंगी जेवला असल्याच्या कारणाने मारण्याचे आदेश दिले होते. केटेलने रदबदलीचा प्रयत्न करून पाहिला होता पण जेव्हा फ्युअररने त्याच्याकडेच संशयाने पाहिले तेव्हा मात्र केटेलने सरळ त्या जनरलला मारण्याचा आदेश पाठवून दिला.

त्या नजरेच्या आठवणीने केटेलच्या अंगावर आता काटा उभा राहिला.

"स्वत:ला वाचवणे सर्वात महत्वाचे....... बाकी किती मरतात याचा विचार करायची आपल्याला गरज नाही आणि ते आपले कामही नाही" स्वतःशीच बोलून केटेल सुरक्षारक्षकांच्या समोर तपासणीसाठी जाऊन उभा राहिला.

तब्बल ४५ मिनिटे तपासणी झाल्यावर केटेलला मुख्य दिवाणखान्यात नेण्यात आले. दोन सुरक्षारक्षक सतत त्याच्यावर नजर ठेवून होते. त्यांच्या नजरेने केटेल आणखीच अस्वस्थ झाला. पाचच मिनिटात दरवाजा उघडला.

"विल्यम, कसा आहेस मित्रा?"

चटकन केटेल उठून मागे वळला. त्याच्या समोर त्याचा फ्युअरर (हिटलर) उभा होता.

साडेपाच फुटापेक्षा थोडी जास्त उंची, गोरापान चेहरा, उंचीला साजेलसा बांधा, जगप्रसिद्ध चार्ली चॅम्प्लिनसारख्या मिशा, चापून बसवलेले केस एका बाजूला वळवलेले,काळे चकाकणारे बूट आणि कडक इस्त्रीच्या संपूर्ण सैनिकी पोषाखात फादरलँडचा हा सर्वोच्च सेनापती अ‍ॅडॉल्फ हिटलर हसत त्याच्याकडे बघत होता.

तशा स्थितीतही हिटलरचे लाल झालेले डोळे केटेलच्या नजरेतून सुटले नाहीत.

"मी अगदी उत्तम. तुम्ही कसे आहात? आजकाल तुमची भेट दुर्लभ झाली आहे." कसनुसे हसत केटेल म्हणाला.

"भयंकर दिवस आले आहेत फील्ड मार्शल...... खरोखरच भयंकर दिवस! मला सुद्धा तुम्हाला भेटायची इच्छा असतेच पण सुरक्षेमुळे भेटी अवघड होतात" हिटलर हसत म्हणाला.

"अगदी बरोबर........ माझ्या मते सध्या तुमच्या सुरक्षेइतके दुसरे काहीही महत्त्वाचे नाही हे मात्र नक्की. " केटेलने लगेच उत्तर दिले.
हिटलर त्याच्या समोरच्या कोचावर बसला. इतक्या रात्रीदेखील त्याचा चेहरा तजेलदार दिसत होता. मात्र चेहर्‍यावरच्या सुरकुत्या गेल्या काही महिन्यात बर्‍याच वाढल्या होत्या. मृत्यूकडे बघत असलेल्या माणसाकडे सुरकुत्यांबद्दल काळजी करायला कोठून वेळ येणार असा एक विचार चटकन केटेलच्या मनात चमकून गेला.

"तुला मी इथे का बोलावले आहे याची तुला कल्पना आहे का केटेल?" हिटलरने विचारले.

"काही प्रमाणात.... पण सध्या वातावरण इतके गढूळ झाले आहे की नक्की काय ते कृपया तुम्हीच समजावून सांगा" महत्त्व दिल्यावर फ्युअरर कसा खुलतो याची एव्हाना
केटेलला पूर्ण माहिती होती.
"मी तुला रोमेलबद्दल चर्चेसाठी बोलावले आहे." हिटलर उत्तरला.

अत्यंत गंभीर शांतता पसरली. आता फ्युअरर काय म्हणतोय याकडे कानात प्राण आणून केटेल लक्ष देऊ लागला. रोमेल प्रकरण साधेसुधे नव्हते आणि रोमेल हा माणूस सुद्धा साधासुधा नव्हता. जेव्हा फ्युअरर चर्चेसाठी बोलावतो तेव्हा निर्णय बहुतेक वेळा झालेला असतो याची केटेलला जाणीव होती. फ्युअररचा निर्णय झाला होता आणि आता केटेलला त्यासाठीच बोलावण्यात आले होते.
चार-पाच वर्षापूर्वीच्या फ्युअररने काय केले असते हे सांगायला ज्योतिषाची गरज नव्हती. पण खरी मेख तिथेच होती. आजचा फ्युअरर काय करतोय हे कोणीच सांगू शकत नव्हते. पूर्वीचा हिटलर राहिला नाही अशी आवई सैन्यात उठलीच होती. आज केटेलला त्याबाबतीत प्रत्यक्ष निर्णय घेता येणार होता.

आपल्या ग्लासातून अ‍ॅपल ज्युस पिताना फ्युअररची नजर शेकोटीत जळणार्‍या लाकडांवर स्थिर झाली. काही क्षण अशाच भयाण शांततेत गेले. कोणत्याही परिस्थितीत केटेल सुरुवातीला बोलणार नव्हता.
"तुला माहीत आहे मी रोमेलला कधीपासून ओळखतो? " हिटलरने अखेर शांततेचा भंग करत विचारले.

"तुमची आणि रोमेलची मैत्री सर्वश्रुत आहे फ्युअरर. " केटेल उत्तरला.

"मैत्री?" हिटलरला हसू फुटले. " Infanterie greift an वाचून फार प्रभावित झालो मी......... असे पुस्तक लिहिणारा शिक्षण क्षेत्रात गेला पाहिजे. त्याने पुढची पिढी घडवली पाहिजे असे माझ्या मनात आले. आणि मी त्याला भेटलो. त्याला 'हिटलर युथ' च्या कामावर नेमला.
"त्याने 'हिटलर युथ'ला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. या माणसाचा वापर जास्त केला पाहिजे हे माझ्या लक्षात आले. थोडा काळ मी त्याला वॉर अ‍ॅकॅडमी मधे पाठवले. तिथून काही काळात त्याला माझ्या सुरक्षेचा प्रमुख केले. मला त्याला ओळखून घ्यायचा होता. तिथेच माझ्या लक्षात आले की हा विर आहे,त्याला फ्रान्समध्ये पाठवायचा निर्णय घेतला"

केटेलच्या कपाळावरची सूक्ष्म आठी हिटलरच्या नजरेतून सुटली नाही. तो पुढे बोलू लागला.

"मला इतर अधिकार्‍यांची नाराजी लक्षात आली होती. पण मी तिकडे दुर्लक्ष केले. मी रोमेलमधला सेनापती पाहिला होता. तुम्ही मात्र तेव्हा फक्त त्याच्यातला माणूस बघत होता, त्याची सेवाज्येष्ठता बघत होता. त्याच्या सभावातले सगळे गुण-दोष मला माहित होते. पण मला तो सीमेवर हवा होता. अत्यंत हुशार डोके आणि धाडसीपणा दाखवत त्याने फ्रान्स गाजवले. आणि तिथून त्याला मी आफ्रिकेत पाठवायचा निर्णय घेतला. पुढचा इतिहास तुला माहित आहेच"

काही क्षण शांततेत गेल्यावर हिटलर म्हणाला, " त्याने असे का केले असेल केटेल? तुझा काय अंदाज? "

आता केटेलला बोलावे लागणार होते. इथून पुढे त्याची मान तलवारीखाली होती. एक चुकीचे मत आणि नंतरचा परिणाम त्याला माहित होता. तो क्षणार्धात प्रचंड तणावाखाली गेला. वाईनचा एक घोट बळजबरीने रिचवून तो म्हणाला
"एखादा माणूस असे का करेल हे सांगता येणे अवघड आहे फ्युअरर. रोमेल सर्वत्र परिचित होता, एक कसदार योद्धा म्हणून....... नाही म्हटले तरी थोडा अहंकार, गर्व याची लागण होणारच"

"पण तू मला तुझा अंदाज नीट सांगत नाहीयेस. की चुकायची भिती वाटते?" हिटलर तीक्ष्ण नजरेने त्याच्याकडे बघत म्हणाला.

"एका सैनिकाला हातात बंदूक देऊन सीमेवर लढायला सांगितले तर तो ते उत्तमरीत्या करेल पण त्याला हातात औषधे देऊन उपचाराला पाठवले तर तो चुकणारच. तुम्ही माझे फ्युअरर आहात. तुमच्यासमोर चुकायची भिती नाही पण कमीपणा निश्चितच वाटतो." एका क्षणानंतर त्याला आपल्याच उत्तराचे कौतुक वाटले. अजूनही त्याने कसलेही उत्तर दिले नव्हते मात्र स्वत:ला उत्तरातून बर्‍याच प्रमाणात मोकळे केले होते.

इतक्यात एक तरूण मुलगा कॉफीचे ट्रे घेऊन आला. त्याला हिटलरने दारातूनच हाताच्या खुणांनी परत पाठवले. मुख्य दिवाणखान्यातील घड्याळात बाराचे ठोके पडू लागले. केटेल हिटलरकडे बघू लागला पण हिटलरचे लक्ष त्याच्याकडे नव्हते. तो ज्वाळांकडे बघत होता. ठोके थांबल्यावर तो भानावर आला. ताडकन उठून उभा राहिला आणि त्याने केटेलला विचारले,
"तुझ्यामते रोमेल दोषी आहे का?"

आता फिरवाफिरवी शक्य नव्हती. हिटलरच्या रागाला तो ओळखून होता. आता उडवाउडवीची उत्तरे दिली तर रोमेल दूर राहिला; आपलेच प्रेत इथून घरी जाईल हे त्याला कळून चुकले. आवाजात शक्य तेव्हढा ठामपणा आणून तो म्हणाला,
"हो फ्युअरर"
"आणि हे तू ठामपणे कसा म्हणू शकतोस?" आता हिटलरने खोलीत येरझार्‍या घालायला सुरुवात केली.
"मी कर्नल हॉफकरची जबानी ऐकली आहे....."
"हॉफकरचे प्रेत मी पाहिले होते...... इतके छळ केल्यावर त्याने माझेही नाव जबानीत घेतले असते"
"असेलही कदाचित. पण आपल्याकडचा तो एकच पुरावा नाही. गॉर्डेलरकडच्या कितीतरी कागदपत्रात फील्ड मार्शल रोमेलचे नाव आहे. इथे योगायोग असू शकत नाही."

पुन्हा एकदा शांतता पसरली. आपल्याजवळचे सगळे मुद्दे केटेलने मांडले होते. आता तो फक्त निर्णय ऐकणार होता. एक क्षणभर आपल्या खांद्यावरचे ओझे कमी झाल्यासारखे त्याला वाटले आणि पुढच्याच क्षणी दुसर्‍याच ओझ्याने त्याची जागा घेतली.
आता तो केवळ निर्णय ऐकणारच नव्हता तर आपला फ्युअरर पूर्वीचाच जोशिला लढवैय्या आहे का हेही तो बघणार होता. सर्व उत्तरे आता मिळणार होती. पूर्वीचा फ्युअरर काय म्हणाला असता हे त्याला माहित होते. समोरचा फ्युअरर काय म्हणतोय हे तो ऐकू लागला.

"रोमेलला शिक्षा होणारच...... व्हायलाच हवी" अखेर हिटलर म्हणाला. केटेलला आनंदाचे भरते आले. ताबडतोब फ्युअररच्या हाताचे चुंबन घ्यावे असे त्याला वाटू लागले.

"पण त्याला आपण ठार करण्याची शिक्षा देऊ शकत नाही. ते फार चूक ठरेल." हिटलर म्हणाला.
आकाशातून एकदम खाली फेकल्यासारखे केटेलला वाटले. कसाबसा स्वतःला सावरत तो म्हणाला
"म्हणजे मी समजलो नाही फ्युअरर. इतर सर्वांना जी शिक्षा तीच रोमेलला शिक्षा. त्याने केलेला गुन्हा साधा नाही"

"तुझ्या लक्षात कसे येत नाही केटेल? त्याला असे देशद्रोहाच्या आरोपाखाली मारले तर सीमेवरच्या सैनिकांना काय वाटेल? गोबेल्सने रोमेलला डोक्यावर चढवून ठेवले आहे. 'जर्मनीचा रक्षणकर्ता' असे लोक त्याला म्हणतात. आफ्रिकेचे युद्ध अजून सामान्य सैनिक विसरला नाही. अशा अवस्थेत त्याला मारले तर कदाचित बंडाळीदेखील होऊ शकते"

एखाद्या वेड्यासारखा केटेल त्याच्या फ्युअररकडे बघत होता.
"पण फ्युअरर, त्याला जिवंत ठेवणे कमालीचे धोकादायक ठरेल. आपण त्याला तुरुंगातही टाकू शकत नाही"
"मग आता काय करायचे म्हणतोस?" हिटलरने त्याला विचारले.
"माझ्याकडे एक उपाय आहे" क्षणार्धात केटेलने सूर बदलला. आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो तो हाच हे त्याच्या लक्षात आले. आता निर्णायक घाव घातला पाहिजे हे त्याच्या लक्षात आले.

"आपण रोमेलला निर्णय करायला सांगू. कोर्ट मार्शल की मृत्यू? " तो म्हणाला.
"आणि त्याने कोर्ट मार्शल निवडले तर? " हिटलरचा आवाज किंचित चढला.
"तो तसे करणार नाही ही जबाबदारी माझी" केटेलने स्मितहास्य करीत उत्तर दिले.

केटेल प्रासादातून बाहेर पडला तेव्हा दोन वाजून गेले होते. हसत हसत आनंदाने हिटलरने त्याला निरोप दिला. घरी येताच केटेलने बायकोला घट्ट मिठी मारली.
"काय म्हणाले फ्युअरर?" त्याच्या पत्नीने विचारले.
"तो आता फ्युअरर उरला नाही. आता फक्त जर्मनीच्या अंताची वाट बघायची" शांतपणे केटेल उद्गारला.

आणि दुसऱ्या दिवशी...
सुमारे ११ वाजता केटेलच्या घराहून एक जर्मन ओपेल जनरल बर्गडॉफ आणि लेफ्टनंट जनरल मिसेलला घेऊन रोमेलच्या घराच्या दिशेने निघाले.

शहरातील उच्चभ्रू वस्तीत रोमेलचे घर होते. जर्मन सैन्याचा त्राता समजल्या जाणार्‍या रोमेलने इतर कुठेही राहणे फ्युअररला मान्य झालेच नसते. अतिथंडीने निष्पर्ण झालेल्या खोडांमुळे त्या दुमजली घराच्या शोभेला थोडा कमीपणा येत होता तरीही दाट खोडांच्या गर्दीत वसलेले हे घर चटकन लक्ष वेधून घेत होते.

साधारण १२ च्या सुमारास गाडी रोमेलच्या घरासमोर थांबली. बर्गडॉफ आणि मिसेल उतरले व एका छान पाऊलवाटेने घराच्या दरवाज्याजवळ पोहोचले. दरवाजा नोकराने उघडला. पूर्ण लष्करी पोशाखातील पाहुणे बघून त्याने सवयीप्रमाणे सलाम ठोकला. मिसेल अन बर्गडॉफ आत शिरले.

"फील्ड मार्शल रोमेलना सांग की जनरल बर्गडॉफ आणि लेफ्टनंट जनरल मिसेल भेटायला आले आहेत" मिसेलने हुकुम सोडला. नोकर वरच्या मजल्यावर गेला.

इतक्यात जिन्यात पावले वाजली आणि दोघांच्या माना तिकडे वळल्या. क्षणार्धात फील्ड मार्शल अर्विन रोमेल दोघांच्या समोर उभा राहिला.!
साडेपाच फुटाहून जरा जास्त उंची, सरळ नाक, एका अस्सल सैनिकाचा बांधा, बारीक ओठ, मागे वळवलेले केस, अंगात लष्करी पोशाख अशा स्थितीत त्या दोघांचा फील्ड मार्शल त्यांच्यासमोर उभा होता. आपल्या हुकुमाचे भान दोघांनाही राहिले नाही. दोघांनी त्याला कडक सॅल्युट ठोकला.
तितक्याच कडकपणे तो स्वीकारून रोमेल हसत म्हणाला,
"या मित्रांनो, घरी येण्यासारखे कोणते काम आज काढलेत?"
मिसेल जरा अस्वस्थ झाला. बर्गडॉफच्या चेहर्‍यावर मात्र छद्मी हास्य पसरले
"काय करणार फील्ड मार्शल, आपल्यासाठीच यावे लागले. युद्धमंत्र्यांचा तसा स्पष्ट आदेशच होता".
रोमेलने चमकून त्याच्याकडे पाहिले. पण दुसर्‍याच क्षणी स्वतःला सावरत तो म्हणाला,
"असे का? अच्छा.........पण काम काय हे तू सांगितले नाहीस"
बर्गडॉफने शांतपणे कोचावर बसत प्रतिप्रश्न केला,
"फील्ड मार्शल, २० जुलैच्या कटाबद्दल तुम्हाला काय माहीत आहे?"

एका क्षणात सगळा प्रकार रोमेलच्या लक्षात आला. या वेळेचीच त्याला काळजी होती. म्हणजे केटेलकडे ही सगळी माहिती पोचली असे मानायला हरकत नव्हती. आणि ज्याअर्थी हे दोन प्यादे इथे आहेत त्याचा अर्थ फ्युअररला ही सगळी माहिती होती. आता कसलेही बचाव चालणार नव्हते हे त्याच्या लक्षात आले. बर्गडॉफबरोबर उंदीर-मांजराचा खेळ खेळण्यात त्याला स्वारस्यही नव्हते. शांतपणे खुर्चीवर बसत तो म्हणाला,
"म्हणजे अखेर गेस्टापो माझ्यापर्यंत पोहोचले तर........ "
"म्हणजे तुम्ही कटाची जबाबदारी नाकारत नाही?" मिसेलने अस्वस्थ होऊन विचारले.

रोमेलला हसू फुटले.
"मित्रा, मी जबाबदारी स्वीकारणे अथवा नाकारणे याचा प्रश्नच इथे उद्भवत नाही. नाझी न्यायव्यवस्थेशी मी चांगला परिचित आहे. माझा अंदाज चुकीचा नसेल तर माझ्यावरील आरोप आणि त्यांच्यावरील निकाल हा आधीच ठरलेला आहे. तुम्ही दोघे फक्त पोस्टमनसारखे पाठवण्यात आलेले आहात. बरोबर ना?"
बर्गडॉफ ताड्कन उठून उभा राहिला. असे काही बोलणे तो सहन करणे शक्यच नव्हते.
"तोंड सांभाळून बोल रोमेल. इथे आम्ही आलो आहोत ते फ्युअररचे निष्ठावान सैनिक म्हणून....... तुझ्यासारखे विश्वासघात आम्ही कधीच केलेले नाहीत."

रोमेलच्या चेहर्‍यवरचे भाव बदलू लागले. रागाने त्याचा चेहरा लालबुंद झाला. कपाळाच्या शिरा ताणल्या गेला. असले छप्पन्न सेनानी त्याने पाहिले होते पण अशा रितीने त्याच्याशी कोणीही बोलण्याचे धारिष्ट्य दाखवले नव्हते. तो आज सेनापती असता तर आत्तापर्यंत या दोघांची शिरे त्याने धडावेगळी केली असती.

पण आता तो सेनानी नव्हता. आणि म्हणूनच आज बर्गडॉफ असे बोलू शकत होता. त्याने एक क्षण दोघांकडे पाहिले. त्याला दोघांचीही कीव आली. ज्या नाझी विचारसरणीच्या चक्रव्यूहातून आपण बाहेर पडलो त्यातून यांची अजून सुटका झालेली नाही हे त्याच्या ध्यानात आले आणि तो शांत होऊ लागला आणि बर्गडॉफला म्हणाला-
"विल्यम, इतर कोणत्याही दिवशी माझ्याशी असे बोलला असतात तर आत्तापर्यंत तुझ्या घरच्यांना तुझ्या मृतदेहाचा ताबा घेण्याचे निरोप गेले असते. पण आज परिस्थितीमुळे तुझ्या हातातल्या गवताच्या काडीसमोर मला माझी तलवार झुकवावी लागत आहे. पण हरकत नाही. विश्वासघात काय असतो हे मी तुला सांगतो."
"तुझा फ्युअरर तुझ्याबरोबर जे करत आहे तो विश्वासघात आहे. जर्मन जनतेबरोबर जे चालू आहे तो विश्वासघात आहे. जर्मन सैन्याबरोबर जे चालू आहे तो विश्वासघात आहे. पण हे तुझ्या लक्षात येणार नाही कारण तू फ्युअररनिष्ठ आहेस, जर्मनीनिष्ठ नाहीस"

"या दोन्हीही सारख्याच गोष्टी आहेत" अत्यंत कोरड्या सुरात बर्गडॉफ म्हणाला.

"तुला मी कसे समजावून सांगू! एक सैनिक म्हणून तू फ्युअररकडे बघतोस. एक माणूस म्हणून मी त्याच्याकडे जेव्हा बघायला लागलो तेव्हा मला एक नेता, एक सेनापती, एक योद्धा दिसणे केव्हाच थांबले. आता मला दिसतो केवळ भेसूर चेहर्‍याचा एक घाबरलेला मनुष्य" काही क्षण थांबत रोमेलने पुन्हा विचारले
"तुला छळछावण्यांबद्दल काय माहित आहे मिसेल ?"
मिसेल इतका वेळ शांत बसला होता. आपल्या दोन ज्येष्ठांमध्ये होत असलेल्या या संभाषणामुळे तो थोडा तणावातच होता. रोमेलच्या प्रश्नाने तो गोंधळला.
"अं..... मुख्यत्वे ज्यूंसाठी त्या बांधण्यात आल्या आहेत. आज आपली परिस्थिती त्यांच्यामुळेच आहे. त्यांना कैदेत ठेवण्यासाठीच त्या आहेत."

"कैदेत????" रोमेल पुन्हा हसू लागला. "बर्गडॉफ, तू तरी सांग. तू अतिशय वरच्या श्रेणीचा अधिकारी आहेस. छळछावण्यांमध्ये काय होते हे तुला माहीत असणारच!! जरा 'कैदेची' माहिती दे की मेसेलला"

बर्गडॉफच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले. अत्यंत छद्मीपणे हसून तो म्हणाला, "ज्यू म्हटले की रोमेलला प्रेमाचे उमाळे येतात हा तर सगळ्या सैन्यात चेष्टेचा विषय झाला आहे. तू फ्युअररला फ्रान्समधून पाठवलेली ज्यूंना चांगली वागणूक देण्याची पत्रे वाचून आम्ही अनेकदा फ्युअररबरोबर त्याबद्दल विनोद केले आहेत. पण तुझ्यासारखे माझ्या मनात त्या घाणेरड्या जातीबद्दल कसलेही प्रेम नाही. खरे पाहता फ्युअररचा तू इतका लाडका का होतास हेच आम्हाला कळत नसे. असे काय मोठे पराक्रम गाजवून आला होतास?"

रोमेल उठून शेकोटीजवळ गेला. लाकडे हलवून त्याने आग पुन्हा पेटवली. शांतपणे ज्वाळांकडे पाहत तो बोलू लागला,
"ते तुला कळणार नाही. माझ्यातल्या सैनिकाला ओळखणारा फ्युअरर होता याचा मला आनंदही होतो अन दु:खही वाटते. आनंद यासाठी की तेव्हाचा फ्युअरर म्हणजे वाळूच्या वादळापलीकडे उभ्या असलेल्या शत्रूच्या सैन्यासारखा होता. त्याचा आदर अन भिती दोन्ही वाटत असे. अगदी एखाद्या थोर सेनापतीची वाटावी तशी............ पण जसजसा वाळूचा पडदा दूर होत गेला तसतसा दिसू लागला एक सामान्य जीव...... आपल्या अहंकाराच्या आगीत जर्मनीला पेटवणारा फ्युअरर, कसलीच वैचारिक बैठक नसलेल्या तत्वांसाठी जगाला वेठीस धरणारा फ्युअरर, सर्व सैन्याचा नेता असलेला पण कोणत्याही सैनिकाची जबाबदारी नाकारणारा फ्युअरर.........."

"आणि दु:ख याचे वाटते की मी यात वाहवत गेलो. फ्रान्समधून जेव्हा परत आलो तेव्हाच मी यातून बाहेर पडायला हवे होते. पण विजयाचा कैफ होता, पाठीवर पडणार्‍या शाबासकीची कृतज्ञता होती, सळसळणारे रक्त होते. या सगळ्यांनी मेंदूचा ताबा घेतला आणि मग चालू झाला रक्तपिपासू राजवटीमध्ये सर्वोच्च पदावर जाण्यासाठी किळसवाणी धडपड........"

"आफ्रिकेत अधिक यश मिळत गेले आणि मी अधिकच सुखावत गेलो. माझ्यातल्या योद्ध्याला हे सगळे सुखावू लागले. हजारोंचे सैन्य माझ्याकडे आदराने बघत होते, सारी जर्मनी मला तिचा 'रक्षणकर्ता' म्हणत होती. या जोषात सत्याचा विसर पडला; नव्हे मी तो पाडला"

"आफ्रिकेतून परत आल्यावर मात्र सगळे नजरेस पडू लागले. जर्मनीची वाताहत दिसू लागली. दोन वेळच्या अन्नासाठी तडफडणार्‍या जनतेसमोरून युद्धसामग्रीने भरलेले ट्रक जाताना पाहून मला हसावे की रडावे ते कळेनासे झाले. छळछावण्या म्हणता म्हणता मृत्यूछावण्या झालेल्या दिसल्या, लक्षावधी लोकांचा थंडपणे केलेला खून दिसला आणि सर्वात जास्त वाईट याचे वाटले की यासाठी काही प्रमाणात मी जबाबदार आहे"

"अशा स्थितीत स्टुपनगेलने एक दिवस २० जुलैचा कट नजरेसमोर आणला आणि मला एक आशेचा किरण दिसला. जर्मनीलाच नव्हे तर सगळ्या जगाला या वेडेपणाच्या झटक्यातून बाहेर काढण्याचा मार्ग!!!! फ्युअररला संपवणे!!!!!! तेव्हढाच उपाय उरला होता, आणि त्यात मी सामील झालो."

सगळी खोली तापलेली होती. मिसेलने रुमाल काढून घाम पुसायला सुरुवात केली. बर्गडॉफ मात्र एकटक रोमेलकडे बघत होता. अखेरीस तो उठून उभा राहिला. घसा खाकरून त्याने शांत आवाजात बोलायला सुरुवात केली,
"फील्ड मार्शल, तुम्हाला २० जुलैच्या कटात सामील असल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. पण तुमची जर्मनीसाठी असलेली निष्ठा बघून तुम्हाला फ्युअररने दोन पर्याय दिले आहेत. "
रोमेल ऐकत होता. शिक्षेची त्याला कल्पना होती पण हे त्याच्यासाठी नवीन होते.

"पर्याय एक. तुमचे कोर्ट मार्शल केले जाईल आणि तुम्हाला अधिकाधिक तीव्र शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न केले जातील. तुम्हाला 'सिप्पेनहफ्ट'च्या गुन्ह्यासाठी शिक्षा दिली जाईल"

आता रोमेलच्या लक्षात आले. हा सगळा खेळ त्याच्या ध्यानात येऊ लागला. 'सिप्पेनहफ्ट' हा जर्मनीत अगदी नेहेमी वापरला जाणारा युक्तिवाद होता. यात आरोपीच्या सर्व कुटुंबासकट त्याला शिक्षा सुनावली जाई. म्हणजे ही सरळ त्याच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी होती. त्याचा संताप वाढू लागला पण बर्गडॉफ बोलत होता.

"पर्याय दोन. तू स्वतःहून आत्महत्या करायचीस. तुझ्या कुटुंबाला संपूर्ण निवृत्तीवेतन मिळेल आणि तुला एका योद्ध्याचे अंत्यसंस्कार मिळतील."
रोमेलचा राग एका क्षणात निवळला. उलट त्याला फ्युअररची दया आली. आपल्या मृत्यूने होऊ शकणार्‍या काल्पनिक उठाव वा सैन्यातील विरोधाच्या भितीने बिचार्‍या फ्युअररने त्याला पर्याय देऊ केले होते. सर्वांचा मृत्यू वा आपला मृत्यू यातून निवड करणे रोमेलला अवघड कधीच नव्हते.

तो बर्गडॉफला म्हणाला,
"मी दुसरा पर्याय स्वीकारतो. फ्युअररची भिती माझ्यापर्यंत पोचली. जर्मनीचे भवितव्य मला स्पष्ट दिसत आहे. नॉर्मंडीच्या किनार्‍यावर मी होतो. तुझे आणि तुझ्या फ्युअररचे दिवस संपलेले आहेत."

अर्ध्या तासात रोमेल त्याच्या बायकामुलांशी भेटून संपूर्ण लष्करी पोषाखात बाहेर आला.

बर्गडॉफच्या गाडीतून ते तिघे आणि गाडीचालक हेन्रिक डूस गावाबाहेरील एका निर्जन जागी आले. मेसेलकडे बघून रोमेल म्हणाला,
"माझी एकच अंतिम इच्छा आहे अर्नी"
"बोला फील्ड मार्शल. तुमची कोणतीही इच्छा मी पूर्ण करेन."
"माझ्या अंत्यसंस्काराच्या वेळी कोणतीही निशाणे फडकावू नका, कसलाही सोहळा करू नका. एका सामान्य जर्मन नागरिकासारखेच मला अखेरच्या प्रवासाला पाठवा"
"मी तुम्हाला वचन देतो फील्ड मार्शल, तुमच्या शब्दांचे तंतोतंत पालन केले जाईल" मेसेल भावनाविवश झाला होता. हेन्रिकला अश्रू आवरत नव्हते.

बर्गडॉफने त्यांना जाण्याची खूण केली. ते दोघे काही अंतरावर गेल्यासारखे वाटल्यावर त्याने खिशातून सायनाईडची गोळी काढली. रोमेलला ती देत खुनशीपणे तो म्हणाला,
"अशा पद्धतीने मृत्यू येईल असे तुम्हाला वाटले नसेल जनरल!!"

त्याच्याकडून ती सायनाईडची गोळी घेऊन तोंडात टाकत शांतपणे रोमेल म्हणाला,
"युद्धात लढलेल्या सैनिकाचे मृत्यूचे भय केव्हाच गेलेले असते बर्गडॉफ....... फक्त तो कोणाकडून येईल याचेच कुतुहल असते............ आणि मला त्या बाबतीत मृत्यूने नक्कीच निराश केले............! "

संध्याकाळी जर्मन रेडिओचा निवेदक अत्यंत दु:खी आवाजात बोलत होता-
"आज दुपारी फील्ड मार्शल जनरल अर्विन रोमेल यांचे आकस्मिक निधन झाले. अपघातातील जखमा तसेच ह्रदयविकाराचा तीव्र झटका असे प्राथमिक कारण डॉक्टरांनी दिलेले आहे. त्यांच्यावर संपूर्ण सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. जर्मनीच्या या श्रेष्ठ सेनानीच्या स्मरणार्थ फ्युअररने एका शोकदिवसाची घोषणा केली आहे"
संपूर्ण जर्मनीवर अवकळा पसरली.
दुसर्‍या दिवशी संपूर्ण नाझी सोहळ्यात रोमेलवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रोमेलचा अंत्यसंस्कार
जरी तो कटात सामिल होता तरी हिटलरच काय तर कुनाचीच छाती नाही झाली ते या योद्ध्याच्या शौर्याची अवहेलना करण्याची. कारण त्याने जर्मनीसाठी जे केल त्याची जाणीव हिटलरला होती वा त्याचा सन्मान करण्याची मनषा खुद्द नियतीच्याच मनात होती!
मित्रांनो,या योद्याची ही मार्मीक कथा हृदयात साठलेली आहे, मधूनच ती कधी वाचावीशी वाटते. कारण योद्धा आणि त्याचे कथानक हे मानवी मनावर परिणाम करते, ते स्फूर्ती देते लढण्याची - शक्ती देते सत्यास धरून मरनाच्या दाढेत शिरण्याची .!
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
||फक्तइतिहास||

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts