Search This Blog
बाजे लष्कराच्या ये छावणीत आपले स्वागत असे हुजूर..
- छावणी
- सफर माझी स्थळांची
- अज्ञातवासातील बार्शी टाकळी येथील कालिंका देवी मंदिर जिल्हा अकोला
- अद्भूत साक्षात्कार- लोणार.!(जिल्हा बुलढाणा)
- कलेचा अप्रतिम नमुना साकेगाव येथील साकेश्वर मंदीर(जिल्हा बुलडाणा)
- भेट कवी कलश यांच्या वाड्याला(जिल्हा कोल्हापूर)
- कान्नव बंगला-कारंजा येथील एका पुराण पुरूषाची भेट(जिल्हा अकोला)
- किल्ले बाळापूर-शंभुराजांची वर्हाडातील जहागीर(जिल्हा अकोला)
- जेव्हा थडगं बोलू लागतं-वाशीम येथील एका ब्रिटिश कालीन SP'चे घाडगे(जिल्हा वाशिम)
- टोका येथील सिद्धेश्वर मंदिर-उत्तरेतील शिल्पकलेचा आविष्कार(जिल्हा औरंगाबाद)
- किल्ले बाणकोट-कथा सांगतोय आर्थर पॉईंट ची
- रेवदंडा व कोरलाई-पोर्तुगीज खंडारे नव्हे ती आमुची शौर्य प्रतीके(जिल्हा रत्नागिरी)
- भुलेश्वर-माळशिरस एक अप्रतिम अनुभव(जिल्हा पुणे)
- स्त्रीशक्तीचा शौर्य स्तंभ-राजुरा (जिल्हा वाशिम)
- श्रीवर्धन हरिहरेश्वर-एक नयनरम्य भेट!
- सातगाव भुसारी मंदिर समूह (जिल्हा बुलढाणा)
- केशवाची एक प्राचीन मूर्ती: कुपटा (जिल्हा वाशिम)
- गणपतीचा वाडा:मैराळडोह-शतकापूर्वीचा दिव्य संकल्प(जिल्हा वाशिम)
- अमृतेश्वर-रतनगडाजवळील शिल्पाविष्कार(जिल्हा नगर)
- अंतरिक्ष पार्श्वनाथ-शिरपूरचे दिव्यत्व (जिल्हा वाशिम)
- दख्खन तक्त: अर्थात भेट जिंजी किल्ल्याची
- शिवपराक्रमाचा साक्षीदार वेल्लोरचा भुईकोट
- मेहकर येथील मध्ययुगीन दत्त मंदिर (जिल्हा बुलढाणा)
- for new title
- सफर माझी दस्तावेजांची
- एक सहज चिंतन: महाराज आणि शाहिस्तेखान
- औरंगजेब बादशहा इराणच्या बादशहाकडे राजदूत पाठवतो तेव्हा..
- आग्र्याच्या दरबारात शिवशंभू
- 'अहकामे आलमगिरी' अर्थात आलमगिराची आज्ञापत्रे
- इतिहासातील दारूबंदीची एक गमतीदार गोष्ट
- मोहम्मद अली जिना यांचे शेवटचे दिवस
- एक होता रोमेल: दुसऱ्या महायुद्धातील एका तेजस्वी सेनापतीची कथा
- शिवछत्र साल भेटीतून पुण्यातील NDA चे बीजारोपण
- कोंडाजी फर्जंद: बेखोफ छत्रपतिचा दिलफेक योद्धा!
- गुलामितून मुक्ती
- चाकणचा वेढा आणि फ्रान्सचा व्यापारी
- राजश्री साहेबांचे शासन:छत्रपती शंभूराजांचे सर्जेराव जेधे यांना ताकीद पत्र.!
- छत्रपतींनी केला सप्तकोटेश्वराचे जीर्णोद्धार
- छत्रपती शंभुराजे विरचित बुधभूषण-||सरोवरस्य||
- कसा होता टिपू सुलतान..?
- बेइमानीची कथा सांगतो कोथळीगड
- पानिपताच्या अंतरंगातील काही..
- पानिपताचे आवतन देणारा थोर धर्मशास्त्रज्ञ शहावली उल्लाह
- दारा शिकोह: एक पुण्यस्मरण..
- दक्षिण दिग्विजयाचे राजकारण-परराष्ट्र धोरणाचा अनोखा नमुना
- निजामाची विनोदी कथा-हुक्का आणि कॉफीची
- पारगड-चंद्रसूर्य असेतो गड जागता ठेवा!
- रणधूरंदर बाजीराव-भूमि कठीण आणि आकाश दूर!!
- समर्थांचे मनाचे श्लोक आणि मन-समजावंन
- मुल्ला मसीहाचे फारसी रामायण
- युद्धाची बारूद शत्रूच्या गोटात-कुलमुखत्यार राणीयेसूबाई साहेब
- महाराज चीनकडे लक्ष ठेवून आहेत!!
- वडले राजिक-छत्रपती शंभुराजांची गोवा मोहीम!
- सकल शास्त्राचा निशा- राजा सरफोजी भोसले तंजावर
- छत्रपती शिवाजी महाराजांचे मोगलांना खरमरीत उत्तर!!
- शिवरायांची राजनीति शत्रू मध्ये भेद-शिवरायांच्या इंटेलिजन्सची एक कथा!
- कथा पिता-पुत्राची:रामपूरच्या चंद्रावत राजांची!
- वीर सावरकर-युद्धाची बारूद शत्रूच्या शिबिरात!
- समकालीन फारशी साधनातून घडणारे दिव्य शिवदर्शन!
- सावनूरचे नवाब माधवराव पेशव्यांचे मामा..?
- हे राज्य व्हावे ही श्रींची ईच्छा-३७१ वर्षापूर्वीचा दिव्य संकल्प!
- मार्मिक भाष्यकार भीमसेन सक्सेना
- Sub Tab
Featured
- Get link
- X
- Other Apps
जानेफळ: इतिहास पुरुषांच्या भेटीचा दुर्लभ योग..!
कधीकाळी ब्रिटिशांनी ‘जानेफळ’ येथे वऱ्हाडच्या पश्चिम भागाचे मुख्यालय (जिल्हा) म्हणून प्रशासन चालवले होते. त्याच ब्रिटिश सत्तेच्या कालखुना कदाचित बघायला मिळतील या हेतूने जानेफळ येथे जाण्याचा योग आला आणि जानेफळच्या विविध इतिहास पुरुषांच्या भेटी घडून आल्या. खरे तर या भेटी म्हणजे निव्वळ योगायोग, कारण मुंदेफळ येथील महाप्रसादाच्या निमित्ताने तेथे जाणे झाले अन् नेहमीप्रमाणे गावातील इतिहासाची खोज सुरू झाली. तेव्हा येथील स्थानिक सचिन वाघमारे सर यांच्या सहकार्याने जानेफळ कडे कूच केले व तेथे भेटले प्रतीक मिटकरी सर आणि पुढील प्रमाणे घडला इतिहासाचा दुर्लभ योग.!
ब्रिटिशकालीन बंगला-
मुंदेफळ येथून जानेफळ फक्त तीन किलोमीटर अंतरावर आहे. मुंदेफळ येथून जानेफळ मध्ये प्रवेश करताना उजव्या बाजूस एक भव्य बंगला करड्या नजरेने रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाला जणू खेचून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो. हा बंगला म्हणजे ब्रिटिश काळातील प्रसिद्ध उद्योजक जमीनदार गोविंदाप्पा मिटकरी यांचा. ब्रिटिश काळात त्यांनी तो बांधला. बरोबरच परिसरात वृक्षारोपण करून सुंदर बाग निर्माण केली.
असो,
दुमजली वाड्याचा खालील भाग दगडी चिऱ्याचा तर वरील भाग लहान विटा आणि चून्याने बनविलेला. मध्यभागी मोठे प्रवेशद्वार आणि त्यावर असलेला व्हरांडा आणि त्याला सुशोभित करणारी लाकडाची छोट्या छोट्या उतरत्या वक्राने निर्माण झालेली मराठ शाहितील कमानदार कलाकुसरीची गवाक्ष.! हायवे वरून उजवीकडे थोडं कच्च्या रस्त्याने झाडाझुडपातून पुढे गेल्यावर दर्शन घडतं या इतिहास पुरुषाचं.! आणि दुमजली वरील या गवाक्षांमधून उभे राहून बघण्यासाठी कोणी नसलं तरीही, प्रत्यक्ष बंगलाच या गवाक्षरूपि नयनातून आपला आवाका आणि इतिहास साठवून निर्विकार बघत असल्याचा भास होतो..!
या बंगल्याला चारी बाजूस चार मोठी दालन आणि मध्यभागी प्रशस्त बैठक तसेच दुसऱ्या मजल्यावर ही अशीच रचना केलेली आहे. डाव्या बाजूस दालनातून वर जाण्यासाठी निमुळता जिना आहे. आज बंगला जीर्ण असला तरी त्याच्या भव्यतेची कल्पना करता येते.
गोविंदाप्पा पुंजाप्पा मिटकरी हे या गावातील ब्रिटिश काळातील नामांकित व्यक्तिमत्व. या वाड्याचा वापर उच्चपदस्थ ब्रिटिश अधिकारी सुद्धा करत असत. गोविंद आप्पा यांचे अनेक संस्थानिकांशी सलोख्याचे संबंध होते. विशेष करून इंदोरच्या संस्थानिकांचा बंगल्यावर भेट पाहुणचार असे. शिवाय जानेफळ येथे ब्रिटिश मुख्यालय असल्याने सरकारी लोकांचा राबता असे.
स्वातंत्र्यानंतर १९५५ मध्ये या बंगल्यामध्ये गोविंदाप्पा मिटकरी यांच्या पत्नी सरस्वतीबाई यांच्या नावाने मिटकरी कुटुंबाने सरस्वती विद्यालय सुरू केले. बरीच वर्षा नंतर विद्यालय नवीन जागेमध्ये गेले. त्यानंतर हा बंगला त्यांच्या वंशाच्या द्वारे वापरला गेला. पण आज मात्र येथे फक्त आठवणी वास करतात..!
बंगल्यामागील झुडपांमध्ये गोविंदाप्पांची समाधी बांधलेली आहे. समाधीचे बांधकाम विटा-चून्याने सुंदर पद्धतीने केले आहे मात्र ती दुर्लक्षित आणि एकाकी आहे, वृक्षांच्या सावलीत विसावलेली..!
आंब्याचे वृक्षारोपण-
गोविंदा आप्पा मिटकरींनी वाटसरूंना सावली मिळावी व मधुर फळे चाखता यावी यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले. ब्रिटिशकालात जानेफळ येथे सन १९०५ मध्ये मेहकर तसेच अमडापूर या दोन्ही मार्गावर सुमारे १००० आंब्यांच्या झाडांचे रोपण केले. त्याबाबत ब्रिटिशांकडून एक लेखी दस्तावेज त्यांना देण्यात आला होता. आजतागायत त्यापैकी बरीच झाडे आजही या भव्य वृक्षारोपणाची साक्षीदार आहेत. तसेच वाटसरूंसाठी त्यांनी एक धर्मशाळा सुद्धा बांधली होती.
मिटकरींचा पोवाडा आणि बाजीरावांचा उल्लेख-
गोविंद आप्पा मिटकरी यांचा जन्म साधारणपणे १८३० सालचा असावा. गोविंदाप्पांचा धर्मदाय मोठा होता. उभारलेल्या अनेक इमारती आज गावात बघायला मिळतात. त्यांच्यावर रचलेल्या पोवाड्यामध्ये त्यांनी केलेले धर्मादाय कार्याचा उल्लेख केलेला आहे. या पोवाड्याची रचना तत्कालीन गावचे पाटील नारायणराव कृपाळ यांनी केली आहे. त्यात गोविंदाप्पा मिटकरींनी मेहकर येथे लोकहितार्थ पैनगंगेच्या पात्रात विहीर बांधण्याचा उल्लेख केला आहे. १८५६ सालात त्यांनी केलेल्या अन्नदानाचा उल्लेख आहे. तसेच खुद्द बाजीराव पेशवे जानेफळ येथे येऊन गेल्याचे पोवाड्यात म्हटले आहे. अर्थात येथून पाच किलोमीटर अंतरावर हिवराबाजी येथे बाजीराव आल्याचे साक्षीदार म्हणून बाजीराव चा गोटा आहे, कदाचित त्याच वेळी बाजीराव जानेफळ मार्गे बाळापुरास वा साखरखेर्डा गेले असावे हे नाकारता येत नाही.
मिटकरी यांची वखार-
गावामध्ये डाव्या बाजूस साधारणपणे शंभर फूट लांबीची दगडी बांधणीची गोडाऊन प्रमाणे दिसणारी एक इमारत ज्याला वखार म्हणतात तिची निर्मिती गोविंदांप्पा मिटकरी यांनी केली. व्यापारी वखार दगडी चिऱ्यांनी बांधलेली आहे.
वखार म्हटले की शिवकालातील ब्रिटिशांच्या वखारींची आठवण होते. निदान राजापूरच्या वखारीची तरी..! अर्थात व्यापार तसेच साठवणुकीचे केंद्र म्हणून वखारीचे महत्त्व. अर्थात वखार निर्माण होण्यासाठी केवळ सामग्रीची गरज नसून व्यापाऱ्याच्या दृष्टिकोनातून योग्य भौगोलिक स्थानाची गरज असते. म्हणून वखारीचे अस्तित्व हे जानेफळ शहराचे भौगोलिक महत्त्व व तत्कालीन व्यापारी केंद्राची साक्ष देते.
तटबंदीने संरक्षित मध्ययुगीन शहर-
जानेफळ हे गाव मेहकर या शहरापासून साधारणपणे वीस किलोमीटर अंतरावर आहे. मेहकर प्रमाणेच ही एक प्रसिद्ध बाजारपेठ असल्याने मेहकरच्या वेशीप्रमाणे या गावाला सुद्धा वेस आणि तटबंदी बांधलेली होती.
मेहकर मध्ये तर जानेफळ कडे जाणाऱ्या एका वेशीचे नाव जानेफळ वेस असे आहे.
जानेफळ मध्ये आता तरी फक्त दोन वेश उरलेल्या आहेत बाकी तटबंदी आणि वेश नष्ट झाल्या आहेत.
एक घोटीवेश, जी घरांनी वेष्ठिलेली असल्याने जवळजवळ अर्ध्यापर्यंत म्हणजेच दाराची आगळ असते तेथ पर्यंत जमिनीत दबलेली आहे. या वेशीवर आतून मध्यभागी कमल पुष्प तसेच वेशीच्या प्रवेशद्वाराच्या वर दोन गज शिल्प कोरलेले आहे.
जानेफळ येथील प्रतिष्ठित श्री संजयजी चांगाडे यांच्या माहितीनुसार घोटीवेश चे मूळ नाव बाळापुर वेश असे आहे. येथून पुढे बाळापुर कडे जाण्यास जुना मार्ग आहे.
दुसरी वेश म्हणजे बुऱ्हाणपुर वेस. खरे तर हा मध्ययुगीन काळातील दळणवळणाचा मार्ग.!
बुऱ्हानपूर हे मोगलकालातील राजधानीचे शहर, म्हणूनच ही वेस मध्ययुगीन सहसंबंधाचा प्रमुख साक्षीदार आहे. जानेफळ वरून काही अंतरावर हिवराबाजी हे गाव लागते जिथे खुद्द बाजीराव चा गोटा हा एक इतिहासाचा साक्षीदार आहे. जानेफळ पुढे एक रस्ता खामगाव तर दुसरा रस्ता बाळापुर जो मध्ययुगीन काळातील एक राजकीय महत्त्वाचे ठाणे म्हणून प्रसिद्ध होते.
मोगल कालखंडातील बाळापुर हे एक महत्त्वाचे ठाणे होते. याशिवाय जानेफळ येथून अमडापुर मार्गे साखरखेर्डा जाता येते. अर्थात ते सुद्धा एक महत्त्वाचे ठाणे. यावरून जानेफळ शहराचे तत्कालीन राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे असलेले भौगोलिक स्थान लक्षात येते.
थोडक्यात यादव कालानंतर सुलतान व बहामणीची सत्ता, त्यानंतर अहमदनगरची निजामशाही. याच कालखंडात जाधव घराण्याच्या उत्कर्षाचा. लखुजी राजे यांना निजामा कडून शिंदखेड ची जहागीर त्यात मेहकर प्रांत सुद्धा मिळाला होता. निजामशाहीच्या अंतकालात चांदबिबी कडून वऱ्हाड अकबर बादशहाच्या ताब्यात गेला. त्यावेळी मोहिमेचे संचालन बाळापुर, शहापूर येथूनच झाले.
मोगल प्रशासनात मेहकर चा उल्लेख सरकार मेहकर अर्थात जिल्हा म्हणून येतो. त्या अंतर्गत जानेफळ येत असे. त्यानंतर निजाम व नागपूरकर भोसले आणि शेवटी ब्रिटिशांच्या अंमलाखाली वऱ्हाड प्रांत आला. काही काळ निजामाकडे मग पुनश्च कर्जाच्या मोबदल्यात ब्रिटिशांच्या ताब्यात वऱ्हाड प्रांत गेला. येथून या शहराच्या इतिहासात भर पाडणारी महत्त्वाची घटना घडली.!
सन १८५८ पासून वऱ्हाडचे पूर्व वऱ्हाड आणि पश्चिम वऱ्हाड असे दोन जिल्हे झाले. पूर्व वऱ्हाडचे ठाणे मुख्यालय अमरावती आणि पश्चिम वऱ्हाड चे ठाणे मुख्यालय अकोला येथे झाले. सन १६६४ मध्ये वणी येथे नवीन जिल्ह्याचे ठिकाण होऊन त्याला यवतमाळ जिल्हा असे नाव मिळाले. त्याचवेळी मेहकर तालुक्यात जानेफळ येथे एक जिल्ह्याची कचेरी तयार झाली त्यात मलकापूर, मेहकर आणि चिखली तालुक्यांचा समावेश करण्यात आला. अर्थात पश्चिम वऱ्हाड मध्ये अकोल्याशिवाय जानेफळ या शहराला आता जिल्ह्याचा मान मिळाला..!
पण वर्षभरानंतर या जिल्ह्याला मेहकर जिल्हा असे नाव प्राप्त झाले. पण सन १८६७ मध्ये थंड हवेची जागा पाहून ब्रिटिशांनी आपल्या जिल्ह्याचे मुख्यालय बुलढाणा येथे हलवले.
असो,
जानेफळची वेश आणि तटबंदी, हे गाव मध्ययुगीन काळातील एक भरभराटीस आलेली बाजारपेठ होती हे सिद्ध होते. तत्कालीन बाजारपेठ या तटबंदीने संरक्षित केलेल्या असायच्या. शिवाय ज्या शहरास ब्रिटिशांनी मुख्यालय म्हणून निवडले त्याचे तत्कालीन राजकीय महत्त्व लक्षात येते.
मिटकरींचे वाडे व शिवमंदिर-
याशिवाय गावातील वैशिष्ट्य म्हणजे येथील वाडे होत. ब्रिटिश काळातील प्रसिद्ध उद्योजक जमीनदार मिटकरी यांचे वंशज आज येथील अनेक वाड्यांमध्ये राहतात. त्यामुळे गावात बरेच वाडे बघायला मिळतात. प्रतीक मिटकरी सर हे त्यांचेच वंशज. त्यांचा वाडा चिरेबंदी असून बाकी बांधकाम छोट्या विटा आणि पांढऱ्या मातीमध्ये केलेले आहे. प्रत्येक वाड्याला एक मोठे भव्य चौरस आकृती प्रवेशद्वार आणि त्या प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस विटांनी घडवलेली उत्कृष्ट कला आणि त्यावर एक लहान गवाक्ष अशी जवळपास सर्वच वाड्यांची ठेवण बघायला मिळते.
साधारणपणे साखरखेर्डा येथील वाड्यांची ठेवणही याच पद्धतीची दिसते.
मिटकरी सर यांच्या वाड्याच्या शेजारी त्यांच्या पूर्वजांची जनावरे, घोडे बांधण्यासाठी असलेली दगडी बांधणीच्या पागा व इतर इमारतींची बरीच खंडरे दिसतात. तसेच त्यांचे मालकीचे श्री महादेवाचे एक सुंदर देवालय आहे.
या देवळाची उभारणी गोविंदाप्पा यांचे वडील पुंजाप्पा यांनी केली आहे. तर सभामंडप व विहिरीचे बांधकाम गोविंदाप्पा यांनी केले आहे. या देवळाचे मुख्य प्रवेशद्वार अगदी वाड्यासारखे भारदस्त आहे. दगडी तटबंदीच्या आतील सभामंडप अनेक खांबांनी युक्त कमानदार बांधणीचा आहे. मिटकरींच्या पोवाड्यामध्ये मिटकरींनी या मंदिरामध्ये सुंदर झुंबरे लावून केलेल्या सजावटीचे वर्णन आहे.
आता मंदिराचे पुनर्निर्माण झाल्याने काही जुना भाग वगळला गेला आहे. तरी हे मंदिर हा एक इतिहासाचा सुंदर ठेवा आहे, शिवाय मिटकरींच्या आयुष्यातील शिवभक्तीची महत्त्वाची आठवण..!
कापसे यांचा वाडा-
श्री प्रतीक मिटकरी सर यांच्या मंदिराच्या अगदी समोर श्री कापसे यांचा तीन मजली वाडा आहे. श्री कापसे यांनी आनंदाने आणि सहकार्याने वाडा बघण्यास परवानगी दिली. वाड्याची ठेव चांगल्या पद्धतीने आहे. वाड्याच्या मध्यभागाला प्रचंड मोठे प्रवेशद्वार आणि दोन्ही बाजूस उप दालने आहेत. वरील भागास गॅलरी सुंदर पारंपारिक लाकडी शिवकालीन लयदार छोट्या वक्र कमानदार धाटणीची आहे. बहुतेक गावातील सर्व वाड्यांना हे समान स्ट्रक्चर आहे.
हा वाडा गोविंदाप्पा मिटकरी यांनी बांधला असून त्यांची वास्तव्य येथे होते. या वाड्यातून सूर्योदय होताच सकाळी मंदिराच्या कलशाचे दर्शन त्यांना होत असे.
कृपाळ पाटील यांची गढी-
गाव मध्ययुगीन काळातील वैभव संपन्न शहर असल्याने वेशी व तटबंदीने संरक्षित केलेले होते. तसेच गावचा कारभार प्रमुख परंपरागत कृपाळ पाटील घराण्याकडे होता. कृपाळ घराण्याची एक साधारणपणे सहा सात एकरात बसेल एवढी प्रचंड मोठी तटबंदी युक्त गढी होती. आज या घडीचे बरेचसे भाग नष्ट झालेले आहेत. मात्र गढिचा एक भाग सुस्थितीत आहे. प्रस्तुत गढिची जमीन कृपाळ घराण्यातील वंशाच्या कडे वाटली गेली असून शाबूत असलेल्या गाडीचा एक भाग निवृत्त शिक्षक श्री अशोक कृपाळ पाटील यांच्या मालकीची आहे. त्यांचे पुत्र श्री समाधान कृपाळ सर यांच्या मदतीने गढिच्या आत प्रवेश करता आला.
गढि अतिशय बुलंद असून आतील बनावट मध्ययुगीन इतिहासाची साक्ष देणारी आहे. गढि मध्ये भिंतीत प्रत्येक ठिकाणी शिवकालीन कमानदार बांधकाम केलेले आहे. दगडी कमानी मध्ययुगीन इतिहासाची जबरदस्त अनुभूती निर्माण करतात. गढिचे दोन मजले शिल्लक आहेत. बरेच काळ या गढि मध्ये कृपाळ पाटील यांचे निवासस्थान होते. गढिच्या वरील भागावर विशिष्ट प्रकारच्या त्रिकोणी आवरणाच्या जंग्या निर्माण केलेल्या आहेत. जेणेकरून गढिवर हल्ला झाल्यास त्या जंग्यांमधून शत्रूवर सुरक्षितपणे मारा करता येईल अशी व्यवस्था केलेली आहे.
बोलती पाषाण, संगती तलवारी.. |
गढिच्या मागील भागात उंचवट्यावर तत्कालीन विहीर बांधलेली आहे. तसेच या विहिरीला दगडी पायऱ्याचा रस्ता बनवलेला आहे. ही पाय विहीर एक विशिष्ट वास्तू आहे.
.. सत्तेची शान अशी |
असा मध्ययुगीन कालखंडातील इतिहासाचा साक्षात्कार घडवणारा हा जंगी इतिहास पुरुषच..! प्रवेश करताच काळजात धडकी उत्पन्न व्हावी अशी तिची बुलंद यष्टी.!
तिच्या उंचच उंच दगडी कमानदार देह यष्टीचा आणि कधीकाळी गाजवलेल्या सरंजामशाही सत्तेचा वास आजही तेथे अनुभवायला मिळतो..!
आपल्या बुलंद अस्तित्वाने पृथ्वीतलावर पाय रोखून निसर्ग नियतीशी झुंज देत भक्कमपणे खडा असलेला हा इतिहास पुरुषच..!
सरंजामशाहीच्या साक्ष कमानी, बंद दाराच्या मुक जबानी |
मुकुंदराज समाधी आणि मंदिर-
गढिच्या जिगर भेटीनंतर आम्ही मुकुंदराज यांच्या समाधीकडे गेलो. सुप्रसिद्ध आद्यकवी मुकुंदराज यांचे समाधी मंदिर जानेफळ मध्ये आहे. त्यांच्या शेजारी अवधूतानंद स्वामी यांची समाधी आहे. खरे तर आद्यकवी मुकुंदराज यांच्यावर विविध भागातील लोकांनी हक्क दाखविले आहेत. जानेफळ येथील त्यांच्या समाधी व्यतिरिक्त आंबेजोगाई आणि भंडारा जिल्ह्यातील अंभोरा शिवाय इतरही ठिकाणी हक्क दाखवण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्ष पुरावा न मिळाल्याने हे दावेच उरले आहेत.
अवधूतानंद स्वामींच्या पोथी मध्ये त्यांनी आपली समाधी आदी कवी मुकुंदराज यांच्या समाधी शेजारी निर्माण करावी असा उल्लेख आला आहे. असो सत्य काय असेल ते सांगता येत नाही मात्र मुकुंदराजांची समाधीरूपी आठवण ही सर्वांना प्रेरित करणारी आहे.!
यादवकालीन मंदिर आणि बारव-
मुकुंदराज यांच्या समाधी मंदिराच्या मागील बाजूस एक लहानसे यादवकालीन पद्धतीचे शिव मंदिर आहे. मंदिराच्या द्वार शाखा अर्धस्तंभाने युक्त असून कमी कलाकुसरीच्या आहेत. या मंदिरासमोर विस्तीर्ण असा बारब चांगल्या स्थितीत आहे. बारावेच्या तळातील काही शिळा निखळल्या आहेत. थोड्या दुरुस्तीने बारावेचे स्वरूप पूर्ववत करता येईल. बारवाची लांबी रुंदी साधारणपणे 30 बाय 30 फुट एवढी असावी. बारवे मध्ये कुठल्याही प्रकारचे देव कोस्टक किंवा शिल्प कोरलेले नाहीत. एकूणच मंदिर आणि बारव १४ व्या शतकात उत्तर यादव कालखंडात निर्माण झालेले असावे.
घृष्णेश्वर मंदिर-
घृष्णेश्वर मंदिर बारावेच्या समोर काही अंतरावर आहे. या मंदिरातील शिवपिंडी आकाराने बरीच मोठी आहे. मंदिर छोट्या विटांनी व चून्याने बांधलेले आहे. मंदिराचे बांधकाम १९ व्या शतकात झाले असावे. हे मंदिर गावातील कुलकर्णी घराण्याकडे आहे.
कुलकर्णी यांचा वाडा-
घृष्णेश्वर मंदिराच्या शेजारीच कुलकर्णी यांचा पुष्तौनी वाडा आहे. याच घराण्याकडे गावचे कुलकर्णी वतन होते. इतर वाड्याप्रमाणे बाह्य स्वरूप आहे. अर्थात शिरोबंदी आणि विटांनी बनलेलं. वाडा आतून प्रशस्त आहे. वडाच्या आतील लाकडी काम व कोरीव स्तंभ वाडे संस्कृतीची आठवण देतात. स्तंभशीर्ष कोरीव असून सुंदर लोलके आहेत. एकूणच वाड्यातील कलाकुसर कलेचा अविष्कार आहे.
हलती दीपमाळ-
गावामध्ये हनुमंताच्या देवालयासमोर एक दीपमाळ आहे, जी पूर्वी हाताने हलविता येत होती. आता सभोवार बांधकाम झाल्याने हलवता येत नाही. हलती दीपमाळ हे सुद्धा येथील एक वैशिष्ट्य आहे.
ब्रिटिश कालीन बाजारपेठ-
मुकुंदराज यांच्या समाधी मंदिराच्या समोर काही अंतरावर गावची बाजारपेठ आहे. येथील बाजारपेठेच्या भव्य प्रांगणात दगडी फाडयांनी बनवलेल्या चौरस खांबांची आणि त्रिकोणी पत्राच्या छपरांची लांबच लांब बाजारपेठ आहे. इमारत बरीच उध्वस्त झाली आहे तरी बराच भाग अस्तित्वात आहे. ब्रिटिश काळात ही बाजारपेठ समृद्ध असली पाहिजे. याच प्रकारची ब्रिटिशकालीन बाजारपेठ छोट्या स्वरूपात साखरखेर्डा येथे खंड अवस्थेत बघायला मिळते.
ब्रिटिशकालीन पूल-
मध्यवर्ती ठिकाण म्हणून जानेफळ येथून मेहकर, अमडापूर, खामगाव आणि बाळापुर या शहरांकडे जाता येते. अर्थात हा दळणवळणाचा हमरस्ता. शिवाय तत्कालीन मेहकर आणि जानेफळ बाजारपेठ यांना जोडणाऱ्या रस्त्याचे महत्त्व. त्या काळात ब्रिटिशांनी मेहकर रस्त्यावर नदीवर दगडी पूल बांधला जो आजही अस्तित्वात आहे.
असो,
तर अशी ही मध्यकालीन इतिहासाची साक्ष देणारी नगरी जिला ब्रिटिश सत्तेच्या मुख्यालयाचा मान मिळाला. ब्रिटिशांच जिल्हा मुख्यालय वास्तव्य येथे अल्पकाळ ठरलं पण जानेफळ मेहकर मार्गावरील त्यांची आठवण देणारा तो ब्रिटिशकालीन पूल आजही सुस्थितीत आहे, शिवाय बाजारपेठेमध्ये त्यांनी निर्माण केलेले दगडी बांधणीचं व्यापारी संकुल आजही बघायला मिळते. ब्रिटिशकालीन पोलीस स्टेशन ते आता राहिले नाही त्या जागेवर अद्यावत पोलीस स्टेशनची इमारत निर्माण झाली आहे. हॉस्पिटलचे सुद्धा नूतनीकरण झाल्याने या ब्रिटिशकालीन कालखुणा नष्ट पावल्या आहेत.
एकूणच मध्यकालापासून तर ब्रिटिश कालापर्यंत अर्थात विस्तीर्ण यादवकालीन बारावे पासून तर भरभराटीस आलेल्या तटबंदीने सुरक्षित असलेल्या नगरा पर्यंत आणि ब्रिटिश मुख्यालयाचा मान प्राप्त झालेल्या आधुनिक जगाचे नेतृत्व करू पाहणाऱ्या शहरापर्यंत चालत आलेला जानेफळ नगरीचा हा ऐतिहासिक प्रवास, जो अनुभवता येतो येथील बारावेच्या पाषाणातून अन हेमाडपंथी मंदिरातून, वैभवशाली पण वृद्धपकाळास आलेल्या प्रशस्त वाड्यातून.. गोविंदाप्पांच्या कार्यातून अन् सत्ता गाजवलेल्या बुरुजातून.. जीर्ण होत चाललेल्या जंगबाज वेशीतून अन् ब्रिटिश सत्तेच्या कालखुणातून...! जिवंत होऊ पाहतो येथील हरेक पाषाण अन् बोलू लागतो इतिहासाची दास्तान..!!!
६ मे २०२४.
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्तइतिहास।।
Comments
Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..
Popular Posts
कोंडाजी फर्जंद - बेखौफ छत्रपतीचा दिलफेक योद्धा...
- Get link
- X
- Other Apps
किल्ले बाळापूर-वर्हाडातील शंभूराजांची जहागीर
- Get link
- X
- Other Apps
एक सहज चिंतन- महाराज आणि शाहिस्तेखान
- Get link
- X
- Other Apps
अद्भूत साक्षात्कार- लोणार...
- Get link
- X
- Other Apps
हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा...३७१ वर्षांपूर्वी चा तो दिव्य संकल्प
- Get link
- X
- Other Apps
श्रीवर्धन- हरिहरेश्वर एक नयनरम्य भेट..
- Get link
- X
- Other Apps
अज्ञातवासातील बार्शी टाकळी येथील कालिंका देवी मंदिर-
- Get link
- X
- Other Apps
गणपतीचा वाडा:शतकापूर्वीचा गणेशोत्सव- मैराळडोह
- Get link
- X
- Other Apps
राजुरा: स्त्रीशक्तीचा शौर्य स्तंभ'
- Get link
- X
- Other Apps
खुप छान स्थळ वर्णन.
ReplyDeleteमाझेच गाव मी नव्याने पहात आहे असे वाटले.
खुप खुप अभिनंदन आणि आभार.
रविंद्र मिटकरी, जानेफळ. (हल्ली मुक्काम वर्धा)
मोबा. नं. 9822238221
अतिशय छान छायाचित्रांसहित वर्णन. सर्व बालपण झर्रकन डोळ्यांसमोरून गेलं. अभिमान वाटला आणि मन हळवं झालं.
ReplyDeleteअनेक धन्यवाद व शुभेच्छा !
दीपक नीळकंठ अजबे
जानेफळ
ह. मु. मुंबई , मो. नं. ९८३३१२४७४७
धन्यवाद, प्रत्येक गावाला इतिहास असतो आणि तो जपला तर पिढ्यांचा अनुबंध कायम राहील..
DeleteWell Done. Proud of you for writing about history of Janephal. Your writing is much appreciated.
ReplyDelete