इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत असताना सातार्याचा अजिंक्यतारा आणि पश्चात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तळबीड येथील समाधीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो छत्रपती संभाजीराजे यांच्या काळातील एका महत्त्वाच्या पात्राचा वेध घेण्यासाठी..!
ते पात्र म्हणजे-
“आज्ञापत्र धर्माभिमान कर्मकांडपरायण दैवलोकानिष्ठाग्रहताभिमान सत्यसंध समस्त राजकार्य धुरंधर विश्वासनिधी छंदोगामात्य”
ज्याची मुद्रा शंभूराजांच्या राजवटीतील त्याचे महत्त्व सांगून जाते -
“विधीरर्थीमनीषीणामवधीर्नयामवर्तमना। वैशधी: कार्यसिद्धीनाम मुद्रा कलशहस्तगा।।
अर्थात – “सर्व याचकांची इच्छा पूर्ण करणारी, राज्यव्यवहाराचे नियंत्रण करणारी व कार्यसिद्धीचा ठेवा असणारी ही मुद्रा आता कलशाच्या हातात आहे”
छत्रपती शंभुराजेंचा विश्वासनिधी कविकलश ज्याने मृत्यूपर्यंत आपले स्वामींची पाठ सोडली नाही. आज भीमा नदीच्या काठावर असलेल्या त्याच्या समाधी शिवाय त्याचं अस्तित्व कुठेच दिसत नाही. मात्र दक्षिण कोकण मध्ये राजकीय कारभारासाठी त्याचं वास्तव्याच ठिकाण असलेलं मलकापूर शहर बघून तो इतिहास अनुभवण्याची इच्छा मनात होती.
दक्षिण कोकण मध्ये त्याच्या वाड्याचे ठिकाण आणि शेवटी परशुराम पंतप्रतिनिधी यांच्या जहागिरीचे ठिकाण म्हणजेच मलकापूर.!
दक्षिण कोकणच्या सागरी किनाऱ्यावरून अनुस्कुरा या घाट मार्गाने कराड,सातारा व कोल्हापूर या प्रमुख शहरांकडे जाता येते.
आणि या अनुस्कुरा घाटातील शिवकालीन एक महत्त्वाचे नाक्याचे शहर म्हणजे मलकापूर होय.! मलकापूर हे सागरावरून देशावर येणाऱ्या प्रमुख व्यापारी घाट मार्गावर वसलेले प्राचीन शहर ! या घाट मार्गावर रक्षण व नियंत्रण करण्यासाठी मलकापूर शहर म्हणजे मध्ययुगीन कालखंडातील महत्त्वाचे नाके होय.
इतिहासातील सुप्रसिद्ध बंदर राजापूर कडे जाण्यासाठी मलकापूर राहून जावे लागते.
पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज, अरब आणि इतर देशी व्यापाऱ्यांना अरबी समुद्रातील माल किनाऱ्यावरून देशावर नेण्यासाठी व देशावरील माल किनाऱ्यावर आणण्यासाठी हा एक प्रमुख घाट मार्ग होता.
या शहरामध्ये एक विस्तीर्ण तटबंदीयुक्त गढी व राजवाडा निर्माण केला होता.
सातारा मार्गाहून कराडवरुन अनुस्कुरा घाटाकडे वळून आम्ही मलकापुरात पोचलो. मुख्य रस्त्याच्या डावीकडे वळून कवि कशाच्या वाड्याचा शोध घेऊ लागलो.
या वास्तूचे महत्त्व सांगायचे तर शंभू राजांचा विश्वासनिधी कवी कलश हा येथील राजवाड्यात राहत असे. तिथे त्याच्या अखत्यारीतील अश्वदल असे. इकडील मुलखाचा कारभार करण्यासाठी तो बर्याचदा मलकापुरात थांबत असे. बादशहा औरंगजेबाचा बंडखोर पुत्र अकबर हा सुद्धा दुर्गादास सोबत कवी कलशाला भेटावयास मलकापुरात येत असे. आणि महत्त्वाचे म्हणजे कवी कलश या भागात असतानाच त्याचे शिर्क्यांशी भांडण उद्भवले. शिर्क्यांनी कशाला पराभूत केले व मलकापूर वर स्वारी करून कलशाची घोडे पागा आणि राजवाडा उध्वस्त केला. कवी कलश आश्रयासाठी जवळ असलेल्या विशाळगडावर गेला. शंभूराजेंना रायगडावर ही खबरबात मिळताच ते तातडीने निवडक सैन्यासह कवी कलशाच्या मदतीस धावले आणि त्यांनी शिर्क्यांना युद्धात परास्त केले. शिर्के बादशहाकडे गेले आणि शंभुराजे पन्हाळ्याच्या व्यवस्थेसाठी निघून गेले. कारण शेख निजाम मुकर्रबखान हा पन्हाळ्याकडे वेढा देण्यासाठी निघाला होता. मात्र झाले सारेच विपरीत.!!
असो आज मलकापुरातील हा राजवाडा "पंतप्रतिनिधी विशाळगड सरकार" या नावाने मालकीचा आहे. पंतप्रतिनिधी अर्थात शाहूकालीन परशराम पंत प्रतिनिधी होत. आज मात्र हा वाडा आणि याच्या तटबंद्या प्रतीक्षेत आहेत मायेच्या..!
शंभूराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली मलकापूर नगरी तुम्ही पण कधीतरी पाहून घ्या. कारण ढासळलेल्या तटबंद्या आणि जीर्ण राजवाड्यातील फक्त कथा असतील भविष्यात..!
- प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्त इतिहास।।
होय आठवतं
ReplyDelete