रेवदंडा व कोरलईच्या मोहिमेवर-
कान्होजी आंग्रेआणि मराठ्यांच्या सागरी सत्तेची शान तो जलदुर्ग कुलाबा पाहून आम्ही किनाऱ्याने निघालो रेवदंड्याला.
कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये सीमा ही कुंडलिका नदीची खाडीने भेदलेली आहे. खाडीवर साळावचा पुल असल्यामुळे दोन्ही तालुके गाडीमार्गाने जोडले गेले आहेत. कुंडलिका खाडीच्या मुखाजवळ उत्तरबाजूला तो रेवदांड्याचा किल्ला तर तेथून दक्षिणेकडे डोंगरावर नजरेस पडतो तो कोरलाईचा किल्ला!
रेवदंडा गावाचा उल्लेख थेट महाभारत काळात सापडतो. त्याकाळी हे गाव रेवतीक्षेत्र म्हणून प्रसिध्द होते. १५ व्या शतकात रेवदंडा गावाचे महत्व ओळखून पोर्तुगिजांनी खाडीच्या मुखावर किल्ला बांधला.
सन १५१६ मध्ये पोर्तुगिजांनी निजामाकडून कारखान्यासाठी इमारत बांधली, तिला चौकोनी बुरुज म्हणतात.
१५२१ मध्ये नुन द कुन्याने अहमदनगरच्या निजामाकडून चौल घेतले. गुजरातचा सुलतान बहादूरशहाकडून पोर्तुगीजांनी वसई व मुंबई चा मुलूख मिळवला. (यातील मुंबई बेट पोर्तुगीज राजाने इंग्रज राजास मुलीच्या लग्नात आंदन म्हणून दिले.)
पश्चात पोर्तुगिज कप्तान सोज याने १५२८ मध्ये रेवदंडा बांधायला सुरुवात केली.
|
रखवालदार मनोरा-रेवदंडा |
रेवदंडा गडाच्या तटबंदीचा परिघ ५ किमी भरतो. तटबंदी पूर्ण गावाला वेढत असल्यामुळे बहुतेक ठिकाणी ती खाजगी मालमत्तेत गेल्यामुळे पाहाता येत नाही. रेवदंड्यात जाणारा रस्ता तटबंदी फोडून बनवलेला आहे. त्या तटबंदीच्या उजव्या बाजूने गेल्यास आपण प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. प्रवेशद्वारावर पोर्तूगिजांचे राजचिन्ह कोरलेले आहे. प्रवेशद्वाराच्या आत अजून एक दार आहे. त्याच्या पूढे ३ मोठे दगडी गोळे पडलेले आहेत. दरवाज्याच्या माथ्यावर जाण्यासाठी जिना आहे. त्याने वर गेल्यावर भिंतिमध्ये अडकलेला एक तोफ गोळा दिसतो. त्यानंतरचे दुर्गावशेष किनार्याजवळ आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे तटबंदीखाली असलेला भूयारी मार्ग. या भुयारात शिरायला ६ तोंड आहेत. पण सर्व तोंड बंद आहेत. रेवदंडा किल्ल्यावर सातखणी मनोर्याचे सात पैकी चार मजले बाकी आहेत. या मनोर्याला ‘‘पोर्तुगिज आरमाराचा रखवालदार‘‘ म्हणत. कारण या मनोर्यावरुन उत्तरेला मुंबईपर्यंत व दक्षिणेकडे जंजिर्यापर्यंत टेहाळणी करता येत असे. या मनोर्याच्या पायथ्याशी तोफा पडलेल्या आहेत. याशिवाय चर्चचे अवशेष, घरांची, वाड्यांची जोती हे अवशेष आहेत.
रेवदंड्याचा नयनरम्य किनारा मनसोक्त तुडविल्यावर आम्ही कुंडलिका खाडीचा पूल ओलांडून समोर दिसणाऱ्या कोरलईच्या डोंगराकडे निघालो.
सन१५२१ मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने कोरलईचा पोर्तुगीज अधिकारी दियोगु लोपिष दी सिक्वेरा यास चौलगावास किल्ला बांधण्याची परवानगी दिली. त्यांनी कोर्लाईच्या उत्तर किनाऱ्यावर पहिला मजबूत धक्का बांधला. जेमेली कॅरेरी यांनी चर्चिल चौथा या पुस्तकात नमूद केले आहे की, निजाम-उल-मुल्कने पोर्तुगीजांना ३०० पर्शियन किंवा अरेबियन घोडे वाजवी दराने आणून देण्याच्या बदल्यात चौलचा किल्ला बांधण्यासाठी परवानगी दिली. १३ सप्टेंबर इ.स. १५९४ च्या अहमदनगर निजामशहा व पोर्तुगीज यांच्यामध्ये झालेल्या लढाईनंतर किल्ला पोर्तुगीजांकडे आला. एकूण तत्कालिन पोर्तुगीज नौदल हे बलाढ्य असल्याने त्यांना हे शक्य झाले. व छत्रपती अजून यावयाचे होते.
असो,
|
कोरलई |
निमुळत्या टेकडीवर असलेला कोरलाई किल्ला किलोमीटर भर लांब असून तो दक्षिणोत्तर पसरलेला आहे. साधारण ३० मी. पेक्षा याची रुंदी जास्त नाही. ९० मीटर उंचीच्या या किल्ल्यावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. त्यापैकी सागराच्या धक्का्याच्या बाजूस डोंगर चढून आम्ही दर्या दरवाजाकडून किल्ल्यात प्रवेश केला. येथून डावीकडे तो दिंडी दरवाजा तर उजवीकडे आहे चर्च व बालेकिल्ला.
|
मोहिमदार प्रा उगलेसर मुंजाळसर पारडेसर ढोबळेसर आणि मी |
येथून आपल्याला पूर्व व पश्चिमेचे दोन्ही किनारे तसेच कोरलाई गावाचे उत्तम दर्शन घडते. हा परिसर पाहून अनेक मोठी दालने व बुरूज ओलांडून आपण चर्चकडे जातो तेव्हा वाटेत बाजूला छोटेसे महादेवाचे मंदिर लागते. त्यासमोर दोन वृंदावन आहेत. पुढे चालून गेल्यावर दारावर एक पोर्तुगिजांचा शिलालेख दिसतो. याच्या बाजूलाच पिण्याच्या पाण्याचे टाकी आहे. हे पाण्याचे टाकी वरुन पूर्णपणे आच्छादले असून पाणी काढण्यासाठी त्याला झरोके ठेवलेले आहे. हा परिसर पाहून पुढे निघाल्यावर डावीकडील तटबंदीमध्ये एक लहान दार आहे. या दारातून खाली उतरण्यासाठी पायऱ्या केलेल्या असून या मार्गाने आपण दीपगृहात उतरु शकतो.
तटबंदीच्या बुरुजावर बऱ्याच तोफा आहेत. काही दरवाजे
|
ममाद्रि-द-देऊश |
ओलांडून गेल्यावर माद्रि-द-देऊश नावाचे एक मोठे चर्च लागते. अर्थात त्यात मूर्ती नसून ते भयाण पडले आहे. तरी त्याच्या उंच छतावरील नक्षी नजरेस भरते. पोर्तुगीज बांधनीतील दरवाजांच्या व
खिडक्यांच्या गोलाकार कमानी गोवा, वसई आदिंची आठवन करून देतात.
|
पोर्तुगीज ध्वज शिल्प |
चर्च नंतर लागतो बालेकिल्ला. कोरलाईचा हा सर्वोच्च असा हा माथा आहे. हा चारही बाजूने तटबंदीने बांधलेला आहे. या भागामध्ये पायऱ्यांच्या वरच्या बाजूला एक शिलालेख पडलेला आहे. हे प्रवेशद्वार एका पंचकोनी बुरुजाने संरक्षित केलेले आहे. सर्व शिलालेख हे पोर्तूगाली भाषेतील आहेत.
रेवदंडा व कोरलाई असा मुलूख बघतांना इतरत्र खुशाल पहुडलेल्या तोफा दिसल्या. आता जणू बागेतील खेळण्याप्रमाणे त्या पर्यटकांना लूभावून टाकण्याचा केवीलवाना प्रयत्न करताना दिसत होत्या...की बघा आम्ही तोफा आहोत बुवा, पोर्तुगीज~तोफा! आमच्याकडेही जरा या...!
मात्र केविलवान्या मुखाची गार पडलेली ही तोफांची धुडे कधीकाळी सागरी सत्तेने माजून गेली होती.
या विचाराने ती माजोरी धुडे मला पेटलेली भासत होती. त्यांच्या मुखातून निघणारी आग, धूपट, सागरावर हेलकावणारी गलबत दिसत होती. आणि-सोबतच आसमंत भेदून टाकणाऱ्या हर हर महादेवच्या किलकाऱ्यां आणि घोड्यांच्या टापा कर्ण भेदू लागल्या. आणि शौर्यशंभू च्या शौर्याच प्रचंड गलबत नजरेच्या सागरात तरळू लागलं...
... संभाजीराजा छत्रपती होऊन सिंहासनाधिष्ट होत नाही तोच औरंगजेब बादशहा सर्व सामर्थ्यानिशी चालून आला. गत तिन वर्षांपासून औरंगजेब बादशहा आणि छत्रपती संभाजीराजा कल्यानच्या रणात अखंड झुंजत होते. मराठा वीर मरत होते पण हटत नव्हते. वसईहून कल्यानच्या रणांगनात मोगलांना रसद पुरवठा करून पोर्तुगीजांनी मात्र संभाजी राजांना क्रोधित केले. दगलबाज पोर्तुगीजांनी ऐन वख्ताला पाठीत वार केला होता. या रसद पुरवठ्याच्या मोबदल्यात बादशहा कडून संभाजीराजांचा काही किनाऱ्याचा भाग मिळवा याकरीता पोर्तुगीज व्हाईसराय पत्रामध्ये बादशहास चक्क भिक मागू लागला.
मात्र झाले विपरीत, तिन वर्षे झुंजूनही मोगलांना कल्यानच्या रणांगनात यश मिळवता आले नाही. बादशहाने अखेर सन १६८३ च्या एप्रिल महिन्यात कल्यानातून आपले सैन्य व खाडीतून आपले आरमार परत बोलावले. बादशहा परास्त केला, आता वेळ होती दगलबाज पोर्तुगीजांना शासन करण्याची. आणि शंभूराजांनी पोर्तुगीजांविरूद्ध युद्धाचे रणशिंग फुंकले..!
आगीत तेल ओतणारे या आगीपासून दूर राहू म्हणतात तरी कसे... ही आग आता त्यांची राख केल्याशिवाय राहणार नव्हती.! कारण ही गाठ कुन्या सुलतानाशी नव्हती रे बाबा..!
मुंबईच्या खालच्या अंगास किनाऱ्यावरील चौल, रेवदंडा व कोरलाई या पोर्तुगीज किल्ल्यावर संभाजीराजांनी खुद्द आक्रमन केले. जेधे शकावली म्हणते-
शके १६०५ रूधिरोदगारी संवछरे जेष्ठ वद्य ११ संभाजीराजे स्वार होऊन राजापुरास गेले. फिरंगीयासी बिघाड केला, रेवदंडीयासी वेढा घातला ।।
अर्थात खुद्द संभाजीराजे स्वार होऊन रेवदंड्यावर चालून गेले. २२ जुलै १६८३ च्या रात्री मराठ्यांनी रेवदंड्यावर हल्ला केला, पण सुरूवातीस पोर्तुगिजांनी तो उधळून लावला. पश्चात मराठ्यांनी रेवदंड्याला घट्ट वेढा घातला.पेशवा निळोपंतही या मोहीमेत होता.
२ ऑगस्ट १६८३ रोजी २००० स्वार व ६००० पायदळ चौलावरही चालून गेले. रेवदंडा व चौलासोबतच मराठ्यांनी कोरलाई किल्ल्यावर हल्ला चढविला. तटबंदीवर तोफा धडाडू लागल्या. माद्रि-द-देऊश नावाचे चर्चात बसून पाद्री धावा करू लागले. सागराच्या बाजूस किल्ल्यावर चढण्यासाठी असलेल्या पायऱ्याने मराठे चढू लागले. किल्ल्यातून कॅप्टन तोफा चालवून प्रतिकार करू लागला. याच सुमारास निळोपंत पेशवा वसई च्या कोटावर चालून गेला. अशाप्रकारे उत्तर फिरंगानाचा फास आवळला जाऊ लागला. उत्तर फिरंगानाचा फास सुटावा म्हणून घाबरून व्हाईसरायने गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यास वेढा घालण्याची आगळीक केली.
आणि पेशवा निळोपंतावर मोहीम सोपवून संभाजीराजे खुद्द फोंड्याकडे निघून गेले. फोंड्याचे युद्ध जिंकून संभाजीराजे खुद्द गोव्यावर चालून गेले. आणि काही महिन्यात उत्तर व दक्षिन फिरंगान संभाजीराजांच्या घोड्यांच्या टाचेखाली आला. स्वतः स अजिंक्य समजणाऱ्या पोर्तुगीजांच्या अवस्थेचे आपल्या पत्रातून वर्णन करतांना इंग्रज म्हणतात की-
फोंड्यावर जो पोर्तुगीजांचा संपूर्णत: पराभव झाला आहे, त्यामुळे त्यांचा चढेलपणाचा पारा खूपच खाली आला. उत्तरेकडेही त्यांची धूळधान उडाल्याने त्यांची शौर्याची घमेंड आणि क्रूर नाठाळ व्रूत्ती बरीच सुधारेल. राजांशी युद्ध करताना मनुष्य व संपत्ती बलाचा त्यांनी विचार केला नाही. उतावळेपणाच्या परिणामाची जाणीव त्यांना झाली आहे आणि त्यांची मस्ती पूर्णपणे जिरली आहे..(संदर्भ-शौर्यशंभू३३३)
लवकरच व्हाईसरायने तहाची याचना केली. अशाप्रकारे सन १५०० पासून स्वतः स अजिंक्य समजणाऱ्या पोर्तुगीजांना या मराठी राजाने आपल्या तलवारीचे पाणी पाजले. पश्चात चिमाजी आप्पा यांनी काढलेल्या मोहिमेमध्ये सुभानजी माणकर यांनी प्रयत्नांची शिकस्त करून कोरलाईवर ताबा मिळवला व पोर्तुगीजांना हळूहळू वसई आदि मुलूख कायमचा सोडावा लागला.
२५ नोव्हेंबर १७४० रोजी झालेल्या तहानुसार पोर्तुगीजांनी साष्टीतील गावांच्या बदल्यात रेवदंडा व कोर्लईचा ताबा मराठ्यांना दिला. मराठ्यांनंतर १८०६ मध्ये इंग्रजांनी यांचा ताबा घेतला. १८१७ मध्ये आंग्रेने हे किल्ले जिंकले. पण लगेच १८१८ मध्ये रेवदंडा किल्ला इंग्रजाकडे गेला.
असो,
कोरलईच्या त्या किल्ल्यावरून मावळत्या सुर्याचे मोहक दर्शन मोठे मर्म सांगून जात होते....उदय आणि अस्त हा निसर्गाचा नियम मानवासही लागू पडतो !!
सत्ता येतात आणि जातात, मात्र त्यांची कथा सांगावयास तटबंद्या अन् बुरूज मागे राहतात !
सत्तांची खंडरे बनतात पण शौर्य गाथा ह्रदयातून जिवंत राहतात..!!!
फिरंगीयासी परास्त करणाऱ्या, परकिय तोफांचा माज उतरवीणाऱ्या त्या मराठी तलवारीस अन् त्याच्या राजास-शौर्यशंभूस कोट कोट प्रणाम !!!
||फक्तइतिहास||
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
http://www.faktitihas.blogspot.in
Comments
Post a Comment
... मग कशी वाटली पोस्ट