स्वराज्याचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे श्रीवर्धन व हरिहरेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही (मी, उगले सर, पारडे सर, राऊत सर आणि कुटुंबकबिला) सर्व पुढील प्रवासासाठी निघालो.
हरिहरेश्वरावरून अंदाजे दहा किमी. गेल्यावर बागमांडले व तेथून बोटीने बाणकोटची खाडी अर्थात सावित्री नदी पार करण्यासाठी निघालो. पल्याड वेश्वी नावाचे गाव होते. तेथून गाडीने दोन किलोमीटर गेल्यावर डाव्या बाजूस बाणकोट गाव आहे तर उजव्या बाजूने डोंगर चढून गेल्यावर बाणकोट किल्ल्या जवळ जाता येते अशी माहिती प्राप्त झाली.
म्हणून जाताना किल्ल्याचं दर्शन घेऊन पुढील प्रवासाला निघायचे ठरले. मात्र गर्द आंब्याच्या झाडीने व्यापलेल्या डोंगरावर एकाकी निर्जन दुर्गाने जणू आयुष्याची कथाच सांगितली.!
बाणकोट अर्थात हिम्मतगड हा किल्ला सावित्री नदीच्या मुखावर आहे.
बाणकोट खाडीमार्गे पूर्वी व्यापार चालत असे, ह्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी नदीच्या मुखावर हा किल्ला बांधण्यात आला. बाणकोट किल्ल्यापासुन ३५ किमी अंतरावर असलेला मंडणगड किल्ला आणि द़ासगावची लेणी आजही या जुन्या व्यापारी मार्गाची साक्ष देत उभी आहेत. जसा कल्याणच्या खाडीतून आलेला माल जात असे नाणेघाटातून ! अनेक राजवटी पाहिलेला बाणकोटचा किल्ला 'हिम्मतगड' आणि 'फोर्ट व्हिक्टोरीया' या नावांनीही ओळखाला गेला.
बाणकोटच्या किल्ल्याचा सर्वात जूना उल्लेख ग्रीक प्रवासी प्लिनी ह्याने इसवी सनाच्या पहिल्या शतकात मंदारगिरी किंवा मंदगोर या नावाने केला आहे. मध्यंतरी काही स्थानिक राजवटींच्या ताब्यात हा किल्ला असावा. १५४८ साली हा किल्ला पोर्तुगीजांनी आदिलशहा कडून जिंकून घेतला. तर आदिलशहाकडून हा गड शिवरायांनी जिंकून घेतल्यानंतर किल्ल्याचे हिंमतगड असे नामकरण केले. संभाजीराजांच्या बलिदाना नंतर पुढे बाणकोट जंजिरेकर सिद्धीच्या ताब्यात गेला.
पेशव्यांनी सिद्दीविरुद्व मोहीम उघडेपर्यंत सन १७३३ पर्यंत हा गड सिद्दीच्याच ताब्यात होता. पुढे सन १७३३ मध्ये पेशव्यांचे शूर सरदार बंकाजी महाडिकने बाणकोट सिद्दीकडून काबीज केला. लगेचच दोन वर्षानी सिद्दीने आरमारी हल्ला करून सन १७३५ मध्ये बाणकोट पुन्हा जिंकून घेतला. पुढे पेशव्यांचे शूर सरदार पिलाजीराव जाधवांनी १७३६ ला बाणकोट जिंकून घेतला. मराठय़ांनी या छोटय़ा गडाचे महत्त्व लक्षात घेऊन गडाच्या संरक्षणासाठी ८०० लोकांची नेमणूक करून खबरदारी घेतली होती. पुढे बाणकोट आग्य्रांच्या ताब्यात आला. पेशवे व तुळाजी आंग्रे यांचे बिनसल्यानंतर पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने तुळाजीचा पराभव करण्याचा करार केला.
आंग्र्यांचा बिमोड करण्यासाठी पेशवे व इंग्रज यांचे एकत्र सैन्य सुवर्णदुर्गावर चालून गेलं. त्याचवेळी बाणकोटवर सुध्दा हल्ला झाला. कमांडर जेम्स याने १७५५ मध्ये तो जिंकला व नाव दिलं फोर्ट व्हिक्टोरीया !
तहामुळे परिसरातील ९ गावे इंग्रजांच्या ताब्यात गेली. ब्रिटीशांच्या काळात बाणकोटला व्यापार आणि भौगोलिक स्थानामुळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आणि ते जिल्हा कचेरीचे मुख्य स्थान झाले. मात्र दळणवळणाच्या गैरसोयींमुळे नंतरच्या काळात जिल्हा कचेरी रत्नागिरीस आणली गेली. इंग्रजांनी बाणकोट व्यापारासाठी वापरला. मात्र तो सोयीचा न झाल्याने लवकरच तो पेशव्यांना परत दिला. मात्र पुढे डिसेंबर १८१७ मध्ये सिद्दीच्या दोनशे लोकांची मदत घेऊन इंग्रजांनी हिम्मतगड ऊर्फ बाणकोट कायमचा मराठ्य़ांकडून जिंकून घेतला.!
असो,
ठरल्याप्रमाणे गाडीने वळणदार मार्गाने डोंगरावर चढून गेल्यावर बाणकोट नजरेस भरला.
परिसर अगदी निर्मनुष्य आणि झाडीने व्यापलेला होता. किल्ल्याच्या दुसर्या बाजूने निळाशार सागर उसळत होता.
लाल पाषाणाच्या टेकडीवर बांधलेल्या या किल्ल्याची तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत असून समुद्राच्या बाजूने असलेले भव्य उत्तराभिमुख प्रवेशद्वार नजरेत भरते. महाद्वारात पहुडलेली पोर्तुगीज तोफ कधीकाळी त्यांच्या सत्तेची, खाडीतील व्यापारावर असलेल्या नियंत्रणाची याद देत होती.
किल्ल्याची तटबंदी ७० मीटर रूंद व ३० मीटर उंच असून किल्ल्याचे दोन भव्य बुरुज उत्तराभिमुख आहेत.
प्रवेशद्वाराजवळ उभे राहिल्यास समोर खाडीच्या पलिकडे हरिहरेश्वराचा डोंगर दिसतो. किल्ल्यावरून अथांग समुद्राचे दर्शन घडते. द्वाराची चौकट चौकोनी असून सुंदर महिरप लक्ष्य वेधून घेते. द्वाराच्या वरील गणेशपट्टी स्पष्ट दिसत नाही. आत शिरल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. किल्ल्याच्या डाव्या बाजूस नगारखान्याकडे जाण्यासाठी सुबक पायऱ्यांचा जिना आहे. जवळच एक भुयार सुद्धा आहे. मध्यभागी एका चौथऱ्यावर मारुतीची मूर्ती आहे. त्याच्या बाजूस पश्चिमेस एक दरवाजा आहे तो तटाच्या बाहेर बुरुजाकडे जाते. या बुरुजात मध्यभागी विहीर आहे मात्र दगड माती पडून ती बरीच भरली आहे. किल्ल्याच्या पश्चिमेकडे असलेल्या तटबंदीस लागून खंदक आहे. किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर वायव्येकडे थोडे खाली गेले असता एक दफनभूमी नजरेस पडते. त्यात स्मारक आहे. त्याची मोठी रोचक कथा आहे.
आंगऱ्यांचा हिंमतगड' इंग्रजांचा 'फोर्ट व्हिक्टोरिया' झाल्यावर येथे इंग्रजांचा राबता वाढला.
महाबळेश्वराहून उगम पावणारी सावित्री पुढे वेडी वाकडी वळणे घेत बाणकोटच्या किल्ल्या जवळून सागरास जाऊन मिळते. तेव्हा सावित्रीच्या कडेकडेनेच महाबळेश्वरास जाता येई.
एकदा सन १७९१ मध्ये पुण्याचा रेसिडेंट चार्ल्स मॅलेट याचा मुलगा 'आर्थर मॅलेट' हा मुंबईहून बोटीने सहकुटुंब महाबळेश्वरास जाण्यासाठी निघाला. मात्र प्रवासात त्याची पंचवीस वर्षांची पत्नी 'सोफीया' आणि ३२ दिवसांची मुलगी 'एलेन' या दोघी १३ खलाशांसह बाणकोटच्या खाडीत बुडून मरण पावल्या. त्यांच्या पार्थिव शरीराचा दफनविधी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या स्मशानभूमीत करण्यात आला. या ठिकाणी चौथरा बांधण्यात आला. यास 'ऑर्थर सीट' म्हणून ओळखले जाते. कारण त्यांच्या आठवणीत तो तेथे बसत असे. हे 'ऑर्थर सीट' किल्ल्यावरून स्पष्ट दिसते.
महाबळेश्वरासही उंच टोकावर बसून आर्थर सावित्रीचे विहंगम दृष्य पाहण्यात गढून जाई. ज्यात त्याची पत्नी व मुलगी बुडून मेल्या होत्या. पुढे त्याच जागेला 'आर्थर सीन' पॉईंटचे नाव देण्यात आले.
अनेक वळणं घेत घळा घळा वाहनारी सावित्री आयुष्याच्या वळणावर न थांबता चालत जाण्यास सांगते, काठावरचा हिंम्मतगड कशाही परिस्थितीत स्थितप्रज्ञ राहण्याची हिंमत देतो, तर पायथ्याशी असलेलं स्मशान आणि सागरात सामावणारी सावित्री जीवनाचं अंतिम सत्य विषद करतात असे हे दृष्य..!
म्हणून
वंदन तुजला हे बाणकोटच्या दुर्गा
आलो आज तुझ्या दर्शना ।।
परिस्थितीशी अखंड लढणाऱ्या जलदुर्गा
तुझी स्वच्छता हीच तुला मानवंदना
हीच तुला मानवंदना ।।
दुर्ग स्वराज्याची शान म्हणून त्याच्या पावित्र्याचा मान जपण्यासाठी आम्ही सर्वांनी तेथे थोडी बहूत स्वच्छता केली.
असो,
आज बाणकोट किल्ला अतिशय दुर्लक्षित आहे. इतर किल्ल्याची शोभा त्यास नसली तरी आपल्या प्रभावाने तो सागरी सत्तेचे प्रतीक म्हणून आजही खडा आहे. आतून भरपूर झाडीने व्यापलेला किल्ला आज आपल्या महादरवाजातून पाहतोय की कोणी येतयं का भेटीला ??
नाहीतरी पायथ्याचं कब्रस्थान आणि वाहनारी सावित्री आहेच सोबतीला.!
बाणकोट जणू माणसाची कथाच सांगू पाहतो. की एकदा निवृत्ती झाली की मग हळूहळू लोकांचे वर्तन बदलू लागते, मग शारीरिक तटबंद्या कमजोर होऊ लागतात. सत्ता गेली की शान जाते आणि मग मानही उरत नाही. अन् तलवारीचा सन्मान प्राप्त करणारे तेच छातीठोक बुरुज आज गवताच्या पात्या खाली असे दबून जातात !!
कधीकाळी गर्जणाऱ्या तोफा थंडगार पडतात, अंतर्मुख होऊन आपल्याच विचारात गढून जातात. मग गतकाळातील उलाढाली ह्याच सोबतीला उरतात आणि आयुष्याच्या दिव्य कथा ह्या व्यथा बनून जातात !!
कधीकाळी सत्ता गाजवणाऱ्या तटबंद्या आता अंग चोरून राहतात. मग नशिबानेही कोणी फिरकत नाही अशा आसमंतात. शेवटी आयुष्याची खंडरे आणि जीवनाच्या कथा फक्त इतिहास बनून जातात !!!
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्तइतिहास।।
२०१६. नोव्हेंबर.
Comments
Post a Comment
... मग कशी वाटली पोस्ट