Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

कसा होता टिपू सुलतान..?


दशकापासून हैदर अली व टिपू सुलतान यांना स्वातंत्र्य योद्धे तर कधी टिपूला कर्नाटकाचा शिवाजीराजा म्हणून संबोधले गेले. पण हे स्वातंत्र्य युद्धे ठरतात किंवा नाही; तसेच जाणता राजा शिवछत्रपतीं बरोबर टिपूची तुलना करणे कितपत योग्य आहे, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीच पुढील अभ्यास व लेखन.
यासाठी आदरणीय सेतू माधव पगडी यांचा 'भारतीय मुसलमान शोध आणि बोध' हा ग्रंथ उपयुक्त ठरला. या ग्रंथात हैदर अली व टिपूचा चरित्रकार मीर हुसेन अली खान किरमानी याच्या ग्रंथाचे भाषांतर दिले आहे.
 प्रस्तुत फारसी ग्रंथाचे भाषांतर इंग्रजीमध्ये माईल्स या इंग्रजी लेखकाने केले आहे. त्यावरूनच वरील प्रश्नांचा शोध आणि बोध!
तर सुरू करूया,
अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत आजचा कर्नाटक अनेक लहान-मोठ्या राज्यांमधे व्यापला होता.
कर्नाटकातील काही भाग हैदराबादच्या निजामाच्या अंमालाखाली, काही भाग विजापूर, धारवाड, बेळगाव हे जिल्हे मराठ्यांच्या अमलाखाली, तर निजामाकडे बिदर, रायचूर हे जिल्हे होते.
तसेच तुंगभद्रेच्या दक्षिणेस जवळ रायचूर त्याखाली अधोनि, बिल्लारी, करणूल आणि कडप्पा हे भाग निजामाच्या अंमलाखाली होते.
याशिवाय तुंगभद्रेच्या दक्षिणेस तीन प्रमुख राज्ये होती. ती म्हणजे म्हैसूर, चित्रदुर्ग आणि बिदनूर.
याशिवाय निजाम आणि मराठ्यांची काही ठाणी होती.

सन १७६० च्या नंतर या तीन राज्यांपैकी म्हैसूर जेथे छत्रपती संभाजी राजांसोबत युद्ध करणारा चिक्कदेवराय वडियार याचे वंशज घराने राज्य करीत होते. तेथे हैदर अली या शूर आणि धोरणी सेनापतीने सर्व अधिकार प्राप्त केला. मैसूरचे वडियार घराणे नामधारी बनून राहिले.!
पानिपताच्या परिस्थितीचा फायदा घेऊन हैदरअलीने शेजारील बिदनूर व चित्रदुर्ग राज्य नष्ट करून म्हैसूर राज्याचा विस्तार केला.
माधवराव पेशव्यांनी तीन स्वाऱ्या करून हैदर अलीला पायबंद घातला.
पण माधवराव पेशवे यांच्या निधनानंतर हैदरअलीने तुंगभद्रा ओलांडली व तो कृष्णा नदीपर्यंत येऊन पोहोचला.!

आपले शासन भक्कम करण्यासाठी राघोबाने तुंगभद्रेच्या दक्षिणेची सर्व मराठा ठाणी सोडून दिली आणि नाममात्र खंडणीच्या बोलीवर कृष्णेच्या दक्षिणेकडील भाग हैदर अलीला देऊन टाकला.
इंग्रज मराठा युद्धात सहकार्याची निकड असल्यामुळे ही योजना पार पडली. मात्र संधी सापडताच गेलेली ठाणी परत मिळवू अशी नाना फडणवीसांची धडपड होती.
इंग्रज-मराठा युद्ध संपले. सन १७८२ मध्ये हैदरअली वारला होता आणि त्याच्या जागेवर त्याचा मुलगा टिपू सुलतान आला होता.
या सुमारास म्हैसूर राज्यात अनेक ठिकाणी बंडे उद्भवली होती. टिपू ने आपल्या राज्यातील बंडे मोठ्या क्रूरपणे मोडून काढली. त्यातील एक उदाहरण कूर्ग प्रांतातील बंडाचे येथे देण्यासारखे आहे.

कूर्ग प्रांतातील बंड-
सन १७८३-८४ मध्ये उद्भवलेले कूर्ग प्रांतातील बंड मोडून काढताना टिपूने अतिशय क्रूरपणा दाखविला.
हैदरअलीने म्हैसूरला लागून असलेला कूर्ग प्रांत पूर्वी जिंकून घेतला होता.
खरेतर कूर्ग प्रांतातील बंडाचे कारण म्हणजे टिपूचा तेथील फौजदार जैनुलाब्दीन खान मेहदवी हा होता. टिपूचा त्यावर अतिशय विश्वास असल्याने तो स्वच्छंदी, जुलमी आणि स्वैराचारी बनला. त्याच्या अनियंत्रित शासनामुळेच हे बंड उद्भवले.
त्याने अनेक स्त्रियांची केलेली मानहानी, अनेक सुंदर स्त्रियांवर केलेली जबरदस्ती हा जुलूम असह्य होऊन कूर्गाचा जमीनदार राजा (पाळेगार) याचे प्रमुख अधिकारी मुम्मुटी नायर आणि रंगा नायर यांनी सैन्य जमविले आणि कूर्गचे मुख्य ठिकाण जाफराबाद यावर चाल करून फौजदाराला कोंडले.
बंडाची बातमी कानी पडल्यावर टिपूने स्वतः जाऊन बंड मोडण्याचा निश्चय केला. श्रीरंगपट्टण पासून दोन मैलावर सुलतानपेठ मुक्कामी टिपू हा डेरेदाखल झाला.
टिपूने आपला सेनापती पुढे पाठवला मात्र बंडखोरांच्या प्रखर आक्रमणापुढे तो हतबल ठरला.
अधिक सरंजाम पाठवून त्याने बंडखोरांचा नायनाट सुरू केला. त्यासाठी फ्रेंचांचे एक पथक दुसऱ्या भागात बंडाचा मोड करण्यासाठी गेले होते.
हे बंड मोडून काढण्यात प्रतिस्पर्धी सैनिकांपैकी हजारो माणसे बळी पडली. त्यात माणसे, स्त्रिया, मुले आणि वृद्ध ही होती. तरुणांना तर जबरदस्तीने इस्लामची दीक्षा देण्यात आली आणि त्यांना श्रीरंगपट्टण ला नेऊन टिपूच्या सैन्याच्या पलटणीत भरती करण्यात आले. या धर्मांतरित सैनिकांना अहमदी तर फलटणीस रिसले म्हणत. आणि रिसाले प्रमुखास रिसालदार म्हणत.

धर्मांतराचे उदाहरण-
बंडखोरांच्या अनेक स्त्रिया कैद झाल्या. त्यापैकी अनेक स्त्रियांना सैनिकांच्या हवाली करण्यात आले. बंडखोरांचा पुढारी मुम्मटी नायर हा जखमी होऊन वारला आणि रंगा नायक याला मुसलमान करण्यात आले. त्याचे नाव शेख अहमद ठेऊन त्याला रिसालदार म्हणून नेमण्यात आले.
अफझलखानाच्या वधानंतर सिद्धी हिलाल महाराजांच्या सेवेत दाखल झाला, म्हणून काय महाराजांनी त्याचे धर्मांतरण करुन त्याला हिंदू धर्म स्वीकारण्यास भाग पाडले नाही.! छत्रपतींशी तुलना करतात म्हणून तुलना द्यावी लागेल.

जुनी नावे बदलणे-
टिपूला नवीन बदल करावेसे वाटत. त्याने शक, संवत्सर आणि महिने यांची नावे बदलून आपली स्वतःची म्हणून नवीन नावे घडविली तसेच किल्ल्याची व गावांची जुनी नावे बदलून त्यांना अरबी आणि फारशी नावे दिली. एकूणच इस्लामी करण्याचा हा प्रयोग होता.
उदाहरण दाखल म्हैसूरचे नजरबाग झाले तर बंगलोरचे दारूसुरू असे नामकरण झाले.

मराठ्यांशी युद्ध-
टिपूचे आक्रमक धोरण आता नवीन युद्धाची सुरुवात करणार होते. पूर्वी रघोबाने हैदरशी तह करून त्यास तुंगभद्रेच्या उत्तरेकडील ठाणी दिली होती, ती ओलांडून टिपूची आक्रमणे मराठ्यांच्या प्रदेशात बेळगाव, विजापूर पर्यंत येऊ लागली.
त्याची धर्मवेड क्रौर्य आणि तडफ यामुळे लोकांनी धास्ती खाल्ली. याची जाणीव महादजी शिंदे यांना प्रखरपणे होणे शक्य नव्हते.
महादजी शिंदे प्रचंड मोठी फौज घेऊन उत्तर भारतात होते. इंग्रज आपला मुख्य शत्रू आहे अशी जाणीव असल्यामुळे त्यांना उत्तरेतील राजकारणातून दक्षिणेत येणे शक्य नव्हते. शिवाय मोगल बादशहा शहाआलम याची सुरक्षा आणि परीचे नियंत्रण त्यांच्याकडे होते.
पण पुणे दरबाराला टिपू विरुद्ध पाऊल उचलणे भाग होते. मराठ्यांनी निजामाशी सल्ला करून टिपू विरुद्ध लढा सुरू करण्याची तयारी चालवली. मात्र या अवधीत टिपू ने नरगुंद वर स्वारी केली. त्यातूनच मराठ्यांना अधिक चीड आणणारा प्रसंग घडला.!
टिपूच्या सैन्याने नरगुंद ला वेढा घातला. नरगुंद म्हणजे व्यंकटराव भावे यांचे संस्थान. नरगुंद चे कारभारी काळो भैरव पेठे हे मोठे कर्तबगार. राघोबाने केलेल्या तहामुळे नरगुंद हे कक्षेत आले असले तरी नरगुंदकर हे म्हैसूर करांना जुमानीत नसत. कारण आपल्या पाठीशी मराठी सत्तेचे बळ आहे असा त्यांना विश्वास वाटे.

सन १६८५ च्या सुरुवातीस टिपू ने नरगुंद वर २५ हजारांची फौज पाठविली. काळोपंत पेठे यांनी किल्ला चिकाटीने लढविला मात्र परशुरामभाऊ पटवर्धन व बेहेरे हे २० हजार फौज घेऊन नरगुंद रक्षणासाठी आले.
अशातच टिपूचा सेनापति बुर्‍हानुद्दीन याला म्हैसूर येथून १० हजार फौजेची मदत मिळाली.
परशुराम भाऊंनी नाना फडणवीस यांच्या आज्ञेवरून शत्रूसमोर आपले सैन्य पाठवून मागे नेले. ह्या अवधीत टिपूच्या सैन्याने नरगुंद चा किल्ला सर केला.
नरगुंद वाचण्यासाठी चाल करून जावे हे परशुरामभाऊ चे म्हणणे पण नानाचे म्हणणे की संपूर्ण तयारीनिशी आक्रमण करावे म्हणून नानाची आज्ञा प्रमाण मानल्यामुळे परशुराम भाऊंची सैन्ये परत गेले व नरगुंद चा किल्ला टिपूच्या हाती पडला.
एवढ्यावर हे प्रकरण थांबले नाही. भावे व त्यांचे कारभारी पेठे यांना पायात जबरदस्त वजनाच्या बेड्या घालून त्यांच्या कुटुंबियांसमवेत श्रीरंगपट्टण कडे नेण्यात आले.
काळो पेठेंची विवाहित कन्या या अनर्थात सापडली. टिपूचा चरित्रलेखक किरमाणी म्हणतो-
तिच्या सौंदर्याची ख्याती जगभर पसरली होती, काहींच्या मते मुसलमानी धर्म स्वीकारण्याचा मान तिला मिळाला. तिचा निका लावण्यात येऊन ती टिपू सुलतानच्या अंतःपुरात राहिली.

याविषयी वासुदेवशास्त्री खरे म्हणतात-
काळू पंतांची लग्न झालेली एक सुंदर मुलगी होती, तिला टिपूने आपल्या जनानखान्यात ठेवले!
बघा,
मराठ्यांनी टिपू विरुद्ध युद्ध आरंभिले त्याच्यामागे राजकीय तसेच वरील प्रमाणे प्रक्षोभक चीड निर्माण करणारे कारणही होते हे नक्कीच.
मग इंग्रजांशी लढणाऱ्या महान टिपू वर मराठ्यांनी हल्ला केला असे म्हणून मराठ्यांची संभावना आणि टिपू चे महत्व वाढविणे म्हणजे पोरखेळ होय.

निजामालाही कडप्पा आणि करणूल हे प्रांत गमवावे लागले तेव्हा या दोन्ही शक्ती स्वसंरक्षणार्थ सिद्ध झाल्या यात वावगे काय..?
टिपूची आक्रमणे निजाम आणि मराठे या दोघांच्याही विरुद्ध असल्यामुळे या दोन्ही सत्ता एकत्र आल्या आणि अखेर मराठे-निजाम विरुद्ध टिपू असे युद्ध आरंभले.!
हे युद्ध सन १७८५ पासून सन १७८७ पर्यंत चालणार होते.
टिपूच्या आक्रमक धोरणामुळे त्याच्या राज्यातील जमीनदार पळून मराठ्यांकडे जाऊ लागले.
लष्करी खर्चाची भरपाई म्हणून आपल्या राज्यातील जमीनदारांना त्याने मोठ्या रकमेची मागणी केली. सावनूरचा नवाब हा तर टिपूचा नातेवाईक पण टिपूची रक्कम देणे त्याला अशक्य असल्यामुळे तो पळून मराठ्यांच्या आश्रयाला गेला. तेव्हा टिपू ने सावनूर उध्वस्त केले.
(सावनूर च्या नावाबाची कथा स्वतंत्र लेखामध्ये घेतली आहे.-० सावनूर चे नवाब माधवराव पेशव्यांचे मामा.?)

या युद्धादरम्यान टिपूने धार्मिक अतिरेकाचे एक उदाहरण इतिहासाला दिले-
मराठी आणि टिपू यांचे युद्ध सुरू असताना टिपू हा तुंगभद्रा ओलांडण्याच्या प्रयत्नात होता. बल्लारी जिल्ह्यात कंचनगड हे स्थळ आहे.
तेथील जमीनदार मरण पावल्यानंतर त्याच्यातर्फे त्याची बायको विधवा तुंगम्मा हीच जमिनदारीचा कारभार करीत होती.
तिने मराठ्यांशी संधान बांधले ह्या आरोपावरून टिपूने या स्थळावर हल्ला चढविला. त्यामुळे घाबरून जाऊन तुंगम्माने तुंगभद्रा ओलांडली आणि मराठ्यांच्या आश्रयाला गेली. मात्र तिचा दहा वर्षाचा मुलगा टिपूच्या हाती सापडला.!
किरमाणी म्हणतो त्याची सुंता करण्यात आली. इस्लाम स्वीकारण्याचा त्याला मान मिळाला.
वाह रे धर्मांतराचा मान..?
असो,
किरमाणी म्हणतो मराठ्यांनी बदामीचा किल्ला मोठ्या शर्तीने सर केला आणि हळूहळू ते टिपूच्या मुलुखात पसरले. इकडे टिपूने निजामाचा किल्ला अधोनी याला वेढा घातला. अधोनी किल्ल्याचा प्रमुख हा निजाम अलीचा जावई आणि भाऊ बसलत जंग याचा मुलगा महाबतजंग हा होता. त्याला मराठ्यांकडून फोडून आपल्याकडे वळविण्यासाठी टिपूने प्रयत्न केले.
त्याने महाबत जंगाला पाठवलेला निरोप मोठा मसालेदार आहे. टिपूने महाबत जंगाला कळवले-

'तुमच्याशी मला दुश्मनी असण्याचे कारण नाही. पण निजामाने पुण्याच्या विश्वासघातकी ब्राह्मणांशी एकी करून माझ्या देशाचा नाश करण्याचे ठरविले आहे. आपण दोघेही एकाच धर्माची असताना निजामाने असे करावे आणि आपल्या घराण्याचे शत्रू जे मराठे त्यांच्याशी एक व्हावे याचा परिणाम निजामाला कळून येईल. मूर्तिपूजाकांनी (मराठ्यांनी) मुसलमानी प्रदेशावर आक्रमण केले असून त्यांनी गरिबांना लुटले आणि मुसलमानांच्या मशीदी जाळून टाकल्या आणि त्यांची घरे लुटली आहेत. या धर्मयुद्धात आम्ही कंबर कसली आहे. आमचा उद्देश इस्लामची स्थापना मजबूत पायावर व्हावी हाच आहे. खुदाची कृपा आणि त्याच्या लेकरांचे संरक्षण व्हावे हीच आपली इच्छा.'

उपरोक्त पत्रामध्ये टिपूने धर्मयुद्ध(जिहाद), इस्लामचे संरक्षण, इस्लामची स्थापना या शब्दांचा वापर करून धर्माचा अभिमान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
मराठ्यांना निजामाकडून फोडण्यासाठी टिपू जिहाद ची भाषा वापरतो.
व्वाह!
औरंगजेब बादशहाच्या जिहादची आठवण झाली. एवढेच नाही तर पानिपताला अवतन देणाऱ्या नजीबखानाने व शहा वलीउल्लाह ने अहमद शहा अब्दलीला लिहिलेल्या आव्हानात्मक पत्राची याद आली.!
त्यासाठी वाचा-पानिपताचे आवतन देणारा थोर धर्मशास्त्रज्ञ शहा वली उल्लाह.!

असो, सन १७८५ पासून तर सन १७८७ पर्यंत चालणारे हे युद्ध संपले होते. टिपू तडफेने लढला. मात्र त्याला मराठ्यांशी तह करावा लागला. मराठ्यांना कित्तूर, नरगुंद, सावनूर, नवलगुंद जालिहाळ, बदामीचा किल्ला, गजेंद्रगड इत्यादी स्थळे द्यावी लागली. शिवाय बरीच खंडणी द्यावी लागली.
एकूणच राघोबामुळे गेलेले काही प्रदेश मराठ्यांना परत मिळाले.
नरगुंदचा किल्ला मिळाला मात्र काळोपंताच्या विवाहित कन्येचे काय...?
कल्याणच्या सुभेदाराची सून हाती लागली तीला महाराजांच्या पुढे पेश करण्यात आले. महाराजांनी तिला आई संबोधून तिची मोठ्या सन्मानाने रवानगी विजापूरला केली.
कशी तुलना होऊ शकते..? टिपूला कर्नाटकाचा शिवाजीराजा म्हणणाऱ्यांना काय म्हणावे..?
असो,
टिपू ने निजामाशी वैवाहिक संबंध जोडण्याचे प्रयत्न केले मात्र निजामाने त्याला हलक्या जातीचा म्हणून फेटाळले. टिपूचा बाप हैदर हा प्याद्याचा फर्जी बनला होता. या गोष्टीमुळे आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचे प्रयत्न त्याने चालविले.

त्रावणकोरचे निमित्त,तिसरे इंग्रज-म्हैसूर (१७८९-९२) युद्ध-
उत्तरेकडे मराठे प्रबळ त्यामुळे विस्ताराची शक्यता नाही. तामिळनाडूचे (कर्नाटकाचा पाईनघाट)नबाब(अर्काटचे) इंग्रजांच्या आहारी गेलेले. अशा परिस्थितीत टिपूच्या महत्त्वाकांक्षेला आता एकच दिशा राहिली. ती म्हणजे त्रावणकोरची. उत्तर केरळात त्याची सत्ता होती. (उत्तर मलबार)तेथील नायर जमीनदारांनी मोठ्या प्रमाणावर बंड केले; तेव्हा हे निमित्त साधून टिपू मोठे सैन्य घेऊन मलबार प्रदेशात उतरला.
किरमाणी म्हणतो- 'त्रावणकोरचा राजा आणि केरळातील जमीनदार हे एक झाले. टिपूचा फौजदार हा आगतिक किंवा उदासीन झाला होता. टिपू शस्त्रास्त्रे आणि सरदार असा सरंजाम घेऊन केरळात उतरला. त्याचा अंतस्थ हेतू बंडखोर काफरांना मुळासकट फेकून देणे हा होता.'

टिपूने सन १७८९ मध्ये त्रावणकोरवर आक्रमण केले. पण त्रावणकोरचा ह्यापूर्वीच इंग्रजांशी मैत्रीचा तह झालेला असल्यामुळे इंग्रज त्यांच्या मदतीला धावून आले व टिपूला माघार घ्यावी लागली. टिपूला पायबंद घालण्यासाठी योग्य संधीची वाट बघत होते. गव्हर्नर जनरल लॉर्ड कॉर्नवालीस याने मराठे आणि निजाम यांच्याशी मैत्रीचा तह केला. या तिन्ही शक्तींनी मिळून टिपूवर चाल केली.!
युद्धातील पक्ष
हरिपंत फडके सरदार
जामखंडी चे राजे सरदार पटवर्धन

टिपूला श्रीरंगपट्टणमजवळ आरिकेरा येथे कोंडीत पकडले. मार्च, इ.स. १७९१ मध्ये कॉर्नवॉलिसने बंगलोरवर आक्रमण करून बंगलोर शहरावर ताबा मिळविला.
टिपूच्या ताब्यातील धारवाडचा किल्ला घेण्यासाठी ब्रिटिश, निजाम आणि मराठ्यांच्या संयुक्त फौजांना शर्थीची झुंज द्यावी लागली. नंतर पावसाळा आणि रसदीचा अल्पपुरवठा यामुळे हा वेढा उठवावा लागला. वेढा उठविल्यानंतर कॉर्नवॉलिस नवीन योजना आखण्यासाठी मद्रासला परत आला. नवीन योजनेनुसार सन १७९२ च्या सुरुवातीला ब्रिटिश फौजेने श्रीरंगपट्टणमवर दुहेरी हल्ला केला. मराठे व निजामाच्या लष्करानेही म्हैसूर राज्यात धुमाकूळ घालून टिपूचे प्रचंड नुकसान केले. म्हैसूरचे डोंगरी किल्ले एकामागून एक ब्रिटिश फौजेच्या हाती पडू लागले. टिपू सुलतान त्याच्या तटबंदी असलेल्या राजधानीत आश्रयाला गेला होता पण तिथेही त्रिमित्र फौजेने त्याला घेराव घातला. शेवटी त्रस्त झालेल्या टिपू सुलतानाने शांततेसाठी कॉर्नवॉलिसकडे विनवणी केली. कॉर्नवॉलिसनेही स्वतःच्या अटींवर त्याला मान्यता दिली.
टिपू सुलतानाने शांततेसाठी केलेल्या विनवणीनुसार कॉर्नवॉलिसने त्याच्याशी मार्च, सन १७९२ मध्ये एक तह केला. हा तह श्रीरंगपट्टणमचा तह म्हणून ओळखला जातो. या श्रीरंगपट्टणमच्या तहानुसार तिसऱ्या इंग्रज-म्हैसूर युद्धाची समाप्ती झाली. या तहानुसार टिपू सुलतानाने त्याचा अर्धा भूप्रदेश आणि तीन कोटी तीस लाख रूपये युद्धखंडणी (सोने व चांदीच्या रुपात) ब्रिटिशांना देण्याचे मान्य केले. या युद्धखंडणीपैकी अर्धी रक्कम त्वरीत व उरलेली अर्धी रक्कम तीन हप्त्यात द्यावी असे ठरले. या तहानुसार टिपूने सर्व ब्रिटिश युद्धकैद्यांची मुक्तता केली.
टिपूच्या दोन मुलांना ताब्यात घेताना कॉर्नवालीस

तहाच्या अटींची पूर्तता होईपर्यंत स्वतःच्या दोन अल्पवयीन मुलांना इंग्रजांकडे ओलीस ठेवले. टिपूने दिलेला प्रदेश आणि रक्कम ब्रिटिश, निजाम आणि मराठे यांच्यात विभागली गेली.

टिपू शौर्याने लढला. तो शूर होता हे निसंशय पण निजाम आणि मराठे यांना कसपटासम लेखून आणि त्यांचा मुलुख घेऊन त्याने त्यांचे शत्रुत्व संपादन केले. ही काही मुत्सद्देगिरीची बाब म्हणता येणार नाही. इंग्रजांना मराठे-निजाम न मिळता तटस्थ राहिले असते तर कदाचित त्रावणकोरच्या युद्धात टिपू बचावला असता; मात्र जो मुत्सद्दीपणा इंग्रजांनी दाखविला तो टिपूने दाखविला नाही. अखेर त्याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला. या लढाईत टिपूचा पराजय झाला आणि अर्धे राज्य गेल्याने तो शक्तीहीन बनला.

धर्मांतर आणि क्रूरपणा-
टिपूवर हा जबरदस्त प्रहार होता. कदाचित त्याच्या मनावरही प्रहार झाला होता. त्याच्या हाती उरले राज्य काही कमी नव्हते. मात्र काळाची पावले ओळखून लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न त्यांने केला नाही. त्याचा स्वभाव तापट होता. तो अधिकच संशयी बनला. लहान-सहान संशयावरून तो कडक शिक्षा करू लागला. आपल्या भोवती सर्व द्रोही पसरले आहेत अशी त्याची समजूत झाली. युद्धात बंगलूर हातचे गेले ते कृष्णराव नावाच्या आपल्या अधिकार्‍यामुळे अशी त्याची पक्की धारणा झाली.
श्रीरंगपट्टण येथे कृष्णराव याच्या घरावर हल्ला करण्यात आला. त्याला ठार करण्यात आले. आणि क्षोभ आणणारी गोष्ट म्हणजे कृष्णरावांच्या सुंदर पत्नीला टिपूच्या जनानखान्यात टाकन्यात आले.
काय हे अघोरी कृत्य..!!!

कशी हो तुम्ही यांची शिवरायांशी बरोबरी करता..?
आपल्या अधिकाऱ्याने कारस्थान केले म्हणून त्याला शासन करावे, मान्य आहे! पण त्याच्या कुटुंबाची विटंबना..कसा हा न्याय आहे..?

टिपूच्या मंत्रीमंडळात एक पूर्णय्या हा मंत्री सोडता सर्व अधिकारी मुसलमान राहिले. खरेतर कृष्णराव आणि पूर्णय्या हे पदरी असलेले महाराष्ट्रीयन ब्राह्मण !
पण पूर्णय्या हासुद्धा कृष्ण रावाच्या कुटुंबावर आलेल्या आपत्तीमुळे पूर्ण हादरून गेला होता. पण टिपू समोर कोणी बोलू शकत नव्हते.
किरमाणी म्हणतो, कृष्णराव आला मारण्यासाठी जेव्हा टिपूच्या सैनिकांनी शास्त्री उगारली तेव्हा आपले मरण जवळ आले आहे हे पाहून तो म्हणाला, 'आग मी पेटवली आहे, तीत सुलतानाचा बळी पडेपर्यंत ती आग काही विझणार नाही.'
ह्यावर खेदाने किरमानी म्हणतो, 'कृष्ण रावाचे भविष्य तंतोतंत खरे ठरले.'
असो,
पूर्णय्याचे धर्मांतरण घडवून आणावे अशीही टिपूची उत्कट इच्छा होती. मात्र टिपूची आई समजूतदार, तिने टिपूला निक्षून ताकीद दिल्यामुळे तो अनर्थ टळला.!

पेशवाई धुमाकूळ घालणारा धोंड्या वाघ हा मराठा टिपूच्या तावडीत सापडला तेव्हा जे अपेक्षित होते तेच झाले. त्याला इस्लामची दीक्षा देण्यात आली आणि त्याचे नाव मलिक जान खान असे ठेवण्यात आले.
टिपू ची धर्मांतराबाबत आसक्ती पाहता याबाबतीत तर त्याचा औरंगजेब बादशहाच्या धार्मिकबैठकीत बसण्याचा मान आहे.!!

परकीय सत्तांशी हातमिळवणी-
टिपूने भारतात आपली सत्ता भक्कम करण्यासाठी भारतातीलच नव्हे तर भारताबाहेरील इस्लामी राज्यांशी संबंध जोडण्याचे प्रयत्न चालवले होते.
आपली महत्त्वाकांक्षा बाळगून त्याने अफगाणिस्तानचा बादशहा (अहमदशहा अब्दालीचा नातू आणि तैमुर चा  मुलगा) जमान शहा याच्याकडे आपले राजदूत पाठवून त्याच्याशी घनिष्ठ संबंध जोडण्याचा प्रयत्न केला.

टिपूने तुर्कस्तानच्या सुलतानाकडे शिष्टमंडळ पाठविले आणि तेही आपल्याला पाठिंबा मिळावा म्हणून प्रयत्न केले.
इराणचा एक राजपुत्र देशोधडीला लागून मैसूरला आला असता की पुणे त्याचा राजेशाही सत्कार केला. त्याला भरपूर अर्थसहाय्य देऊन तो परत जाण्यास निघाला असताना त्याला आवर्जून सांगितले की तुम्ही, झमानशहा आणि मी यांनी एक होऊनहिंदुस्तानचा आणि दख्खनच्या कारभाराचा बंदोबस्त करावा अशी माझी इच्छा आहे.'
काय विरोधाभास दिसतोय बघा, अब्दाली भारतावर आक्रमण करतो म्हणून देशी सत्ता एकत्र येऊन त्याचा मुकाबला करतात मात्र येथे तर टिपू नजीबखाना प्रमाणे बाहेरील सत्तेशी हातमिळवणी करून हिंदुस्तान ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात दिसतो.
मात्र येथे टिपूच्या राजनीति कुशलतेचा अभाव जाणवतो तो असा की,
इराणमधील अंतर्गत कलह आणि अफगाणिस्तानच्या जमान शहाचा दुबळेपणा टिपूच्या लक्षात आलेला नाही. यावेळी मराठे हे उत्तर हिंदुस्थानात आपल्या प्रचंड लष्करी सामर्थ्यानिशी ठाण मांडून बसले होते हे कठोर सत्य टिपूला उमगले नाही तरीही तो वेडगळ कल्पना उराशी बाळगून बसला.
कारण,
त्याचा चरित्रकार किरमानी आपल्या फारशी चरित्र ग्रंथात त्याच्या कट्टर इस्लामी निष्ठेचे आणि इतर धर्मासंबंधी च्या कार्याचे वर्णन करतो. शेवटच्या प्रकरणात किरमाणी म्हणतो, इतर धर्मीय यांसंबंधी त्याला अतिशय नावंड होती, किंबहुना तिटकारा होता. असे म्हटले तरी चालेल. (किरमाणी कृत टिपू सुलतान,-माईल्स, २८०'भारतीय मुसलमान: शोध आणि बोध, २१७)

म्हैसूरच्या राजघराण्याचा अवमान-
म्हैसूरचे वडियार राजघराणे नाममात्र राहिले होते. मात्र तरीही हैदरअलीने आपल्या कारकिर्दीत नावाला का होईना त्या घराण्याचा मान राखला. पण टिपू गादीवर येताच ही परिस्थिती पालटली. त्याने हे घराणे धुडकावून लावले आणि म्हैसूरचे आपले राज्य स्वतंत्र आहे असे घोषित करून त्याचे नाव 'सल्तनते खुदादाद अर्थात ईश्वर दत्त राज्य असे ठेवले.
म्हैसूरचे नामधारी राजा कृष्णराज महाराज मरण पावल्यानंतर त्याचा मुलगा श्यामराज व नंदराज ही एकामागून एक गादीवर आली मात्र त्यांच्या मृत्यूनंतर हैदरअलीच्या आग्राहून राणी लक्ष्मी अंम्माणीने एक मुलगा दत्तक घेतला. यावरून या हिंदु राजघराण्याची पकड जनसामान्यात किती होती याची कल्पना त्याला होती.
आपले राज्य आपल्या ला परत मिळावे असे राणीला वाटत होते. म्हणून तिने आपल्या विश्वासू लोकांच्या माध्यमातून इंग्रजांशी गुप्त करार केला. हा करार तंजावर येथे तिरुमलाय आणि इंग्रज अधिकारी यांच्यात झाला. तंजावरचे व्यंकोजीराजे भोसले यांचा जर्मन शिक्षक श्वार्ट्ज याने त्याच्यावर साक्षीदार म्हणून सही केली होती.
ही बातमी उघड होताच काही लोकांना शासन झाले.

तिसर्‍या म्हैसूर युद्धानंतर १७९६ मध्ये आधीच्या सावत्र मुलाप्रमाणेच लक्ष्मी अंम्माणी राणीचा दत्तक मुलगा शामराज याला विष प्रयोगाने मारले गेले.
त्यावेळी टिपूने राजधानी चालू ठेवण्यात कोणत्याही प्रकारची पर्वा दाखवली नाही. इतकेच नव्हे तर पुढील तीन वर्षे दसऱ्याचे दरबारही बंद पडले. आपल्या राज्याचे नाव 'सल्तनते खुदादाद' असे ठेवले.
मात्र राणीच्या जिद्दीची कमाल. राणीने कृष्णराज नावाचा तीन वर्षाचा मुलगा गादीवर बसविला. पण हा मुलगा कृष्णराज तिसरा हा वारस टिपूने मान्य केला नाही. इतकेच नव्हे तर टिपूच्या सैनिकांनी त्या घराण्याच्या पडक्या राजवाड्यात घुसून लुटालूट केली आणि या कृष्णराज बालकाच्या कानातील कुंडलेही हिसकावून नेली. आणि योगायोग पहा, टिपूच्या मृत्युनंतर ह्याच कृष्णराजाला इंग्रजांनी म्हैसूरच्या गादीवर बसविले.
कित्येक वर्षे पर्यंत हा कानाचा व्रण ग्रहण कृष्णराज बाळगून होता.
म्हैसूरचे कधी काळचे ते प्रतापी हिंदू राज्य नष्ट व्हावे आणि त्याची जागा हैदरअलीने घ्यावी याचे वैषम्य कर्नाटकातील असंख्य प्रजेला वाटत होते. टिपूने स्वतंत्र राज्याची घोषणा करून आणि जुन्या घराण्याचे नाते नाकारून जनतेच्या क्षोभात भरच पडली. तेव्हा जुन्या घराण्याच्या असंतुष्ट व्यक्ती टिपूचे राज्य उलथवून टाण्याच्या मागे लागल्या. या राजघराण्याच्या काही निष्ठावान सेवकांनी इंग्रज, मराठे व निजाम यांच्याशी संधान बांधून कारस्थाने सुरू ठेवली.
हे टिपूला समजत नव्हते असे नाही. पण फ्रेंचांना हाताशी धरून आपण इंग्रजांचा नाश करू असे त्याला वाटत होते.
तुर्क, इराण आणि अफगाण ह्यांच्या सहकार्याने भारत जिंकावा ही त्याची अफाट कल्पना. कायद्याने म्हैसूरचे राज्य हे मोगलांचे मांडलीक पण ही कल्पना टिपूने झुगारून दिली आणि स्वतंत्र म्हणून घोषित केले.

त्यानेएक मौल्यवान सिंहासनही तयार केले. मोगल राजे हे रजपुत राजांच्या मुली आपल्या अंतःपुरात घेत आणि हे आपल्या सार्वभौमत्वाचे लक्षण समजत असे टिपूच्या कानावर आले. तेव्हा त्यानेही तसेच करून पाहिले. त्यासाठी त्याने कच्छ चर्या राजाला लाखो रुपये देऊ केले आणि त्या घराण्यातील मुलगी मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र हा वेडेपणा जमून आला नाही!

हैदर अली आणि टिपू यांच्यातील फरक-
हैदर अली आणि टिपू यांच्या स्वभावात अतिशय अंतर होते. हैदरअलीने राज्य स्थापिले, त्याच्या ठाई धर्मवेड नव्हते. शत्रूंच्या अडचणीचे फायदे घेऊन तो राज्य वाढत गेला. मराठ्यांच्या पानिपत परिस्थितीचा फायदा घेऊन त्याने कृष्णे पर्यंतचा मुलुख मिळविला. तसेच निजामाकडून कडप्पा करनूलचा भाग घेतला. कोयमतुर वगैरे तमिळनाडूचा तसाच मिळविला. त्याने उत्तर केरळ जिंकला. पण आपल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत टिपू हा राज्यात नवीन भर घालू शकला नाही. उलट त्याने राज्य गमावले. धर्माच्या बाबतीत हैदरअली जितका उदासीन तितकाच टिपू कट्टर दिसतो. प्रजा पालनाचे कार्य करावे, असंतुष्ट गटांना समाधानात ठेवून कार्यात गुंतवावे, बहुसंख्य असलेल्या समाजाला प्रेमाने वागावे, असे टिपूला कधी वाटले नाही. राज्याचे इस्लामीकरण, मुसलमान अधिकाऱ्यांचा सुळसुळाट आणि टिपूच्या अफाट महत्त्वाकांक्षा या गोष्टींमुळे टिपूच्या राज्याला स्थिरता लाभली नाही. इंग्रज दाराशी उभा असताना टिपूच्या मनात विचार कोणते घोळत होते तर तुर्कस्तानचे सुलतान म्हणजे मुसलमानांचे धर्मगुरू खलिफा यांच्या शुभेच्छा घेणे.!

टिपूचा शेवट-
इंग्रजांची परिस्थिती पालटली होती. जागतिक रणांगणात इंग्रजांनी फ्रेंचांना परास्त केले होते. इंग्रजांचे बळ अतिशय वाढले होते. भारतात त्यांना लॉर्ड वेलस्ली सारखा महत्त्वकांक्षी आणि कर्तबगार गव्हर्नर जनरल लाभला होता. उलट टिपूच्या राज्यात बेदिली, असंतोष आणि फितुरी वाढीस लागली होती.
हे सर्व पाहुन त्याबद्दल मनात सहानुभूती असूनही १७९८ च्या युद्धात मराठे तटस्थ राहिले.
इंग्रज व टिपू या दोघांनी मराठ्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला मात्र मराठे तटस्थ राहिले.
टिपू फ्रेंचांच्या पोकळ विश्वासावर विसंबून राहिला.
असो,
टिपूचे इंग्रजांशी युद्ध भडकले, इंग्रजांनी श्रीरंगपट्टण घेतले आणि तेथे लढत असतांना टिपू मारला गेला.
टिपूचे मृत शरीर पाहातांना



टिपूचे इतिहासातील स्थान-
इंग्रजांशी झालेल्या युद्धात मारला गेल्यामुळे त्याच्या भोवती हुतात्म्याचे वलय निर्माण झाले ही जमेची बाजू, त्याचे शौर्य ही पण जमेची बाजू, पण इतिहासात याचे स्थान काय हा प्रश्न..?
उर्दू कवी इक्बाल ने म्हटले आहे- धर्म आणि पाखंड, दिन आणि कापर यांच्यातील प्रचंड संघर्षात आमच्या भात्यातील शेवटचा बाण म्हणजे टिपू.!

तो शूर होता पण भारताच्या इतिहासात इंग्रजांना अडथळा करणारा इतर संस्थानीकाप्रमाणे एक संस्थानिक एवढेच टिपूचे स्थान आहे. पण मोठ्या शौर्याने म्हैसूर साठी लढला म्हणून शेरे मैसुर ठरतो.!

स्वातंत्र्याचा झगडा केव्हा सुरू झाला असे समजावे तर त्याचे उत्तर एकच, स्वातंत्र्य गेल्यावर.!
हैदर अली किंवा टिपू हे इंग्रजांविरुद्ध लढले पण ते मरेपर्यंत स्वतंत्रच होते. टिपूने इंग्रजांशी तैनाती फौजेचा तह केला नव्हता.
जसे निजामाने सन मध्ये हैदराबादच्या तहाने आणि दुसऱ्या बाजीराव पेशव्यांने वसईच्या तहाने सन १८०२ मध्ये आपले स्वातंत्र्य गमावले. नागपूरकर भोसल्यांनी तैनाती फौजेचा तह १८१७ मध्ये केला.
अर्थात स्वतंत्रता गेल्यानंतरच त्याला स्वातंत्र्ययुद्ध आणि लढणार याला स्वातंत्र्य योद्धा म्हणता येईल.
कर्नाटकाच्या बाबतीत हैदर अली आणि टिपू यांचा स्वातंत्र्य संपादनासाठी चाललेल्या लढ्यात समावेश करता येणार नाही. यावरून ते स्वातंत्र्य योद्धे ठरत नाही.!
जसे इंग्रज-मराठा युद्ध हे कोणी स्वातंत्र्ययुद्ध म्हणत नाही तसे हैदर अली किंवा टिपू यांनी इंग्रजांशी लढलेले युद्ध हे स्वातंत्र्ययुद्ध ठरत नाही.!

टिपू स्वतंत्र म्हणून लढला आणि स्वतंत्र म्हणूनच मेला ही प्रशंसनीय गोष्ट असली तरी तो स्वातंत्र्यसंग्रामातील योद्धा ठरत नाही. स्वातंत्र्य युद्धातील शहीद ठरत नाही!!!
याउलट,
परकीय इस्लामी राज्यांच्या साह्याने हिंदुस्थानात राजकारणाचा बंदोबस्त करावा हा त्याचा हेतू होता. याचा अर्थ मराठ्यांची सत्ता नाहीशी करावी आणि इस्लामी सत्ता परत आणावी एवढेच नसून नजीबखान याप्रमाणे हिंदुस्तान परकीयांच्या दावणीला बांधण्या सारखा द्रोह ठरतो!!!
इतिहासात टिपूला स्थान घेऊ पाहणाऱ्यांनी टिपूचा स्वभाव धर्माबद्दलचे त्याचे जुलमी धोरण, प्रजेच्या धर्माचा तिटकारा आणि भारतातील राजवट बदलण्यासाठी भारताबाहेरील परकीय इस्लामी राष्ट्रांशी संपर्क साधण्याची मसलत; ह्या सर्व गोष्टींना धरूनच टिपूचे यथार्थ चित्रण करावे. सुज्ञास अधिक ते लिहिणे काय..?
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
llफक्तइतिहासll
म्हैसूरच्या वडियार राजघराण्यातील राजे

#tipusultan #faktitihas 

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts