अकबराच्या काळात फैजी, अबुल फजल अशा उदारमतवादी मुसलमानांना दरबारात मानाचे स्थान मिळाले. कट्टरतेच्या लाटेतही भारतीय संस्कृतीची महानता समजून घेण्यासाठी अशा उदारमतवादी मुस्लिमांनी प्रयत्न चालवले.
कट्टरतेच्या या लाटेतही महाभारत, रामायण, योगवाशिष्ठ, पंचतंत्र, राजतरंगिणी अशा अनेक ग्रंथांचे फारसी अनुवाद होत राहिले.
श्रीराम कथेने प्राचीन कालापासून अनेकांना मोहिनी घातली. त्यातून मुस्लिम कविच नव्हे तर शासकही सुटले नाही.
अकबर कालात रामायणाचा अनुवाद झाला तो मुल्ला अब्दुल कादिर बदायुनी याने केला. (फेअर आर्ट गॅलरी वाशिंग्टन)
रामायणावर काव्य लिहिणाऱ्या रहीम कवीने तर म्हटले आहे,
रामचरित मानस विमल, संतन जीवन प्राण |
हिंदूअन को वेदसम, जमनहिं प्रगट कुराण ||
असो,
मुगल काळातही 'वसुधैव कुटुम्बकम' हा सांस्कृतिक धागा हाती लागल्यावर काही अस्सल कारागिरांनी (विद्वानांनी) सुंदर काव्य वस्त्र बनविले.! त्याच पंक्तीतील एक महान कारागीर आणि त्याच्या कारीगिरीची गोष्ट बघा.!
जहांगीरच्या काळात मुल्ला मसीहा नावाचा साहित्यिक संत होऊन गेला.
सन १६२७ मध्ये मुल्ला मसीहा यांनी फारसी भाषेत रामायण हे काव्य रचले. खरेतर ही रचना मूळ रामायणाचा अनुवाद नसून स्वतंत्र आहे.
भक्ती-प्रेम रसात धुंद होऊन मसीहांनी या काव्याच्या तेरा हजार ओळी लिहिल्या.
सुरुवातीच्या ओळीत आपण रामायण कसे लिहिण्यास घेतले हे सांगताना मुल्ला मसीहा म्हणतात-
आज जो प्रेमाचा आविष्कार हिंदुस्थानात दिसून येतो तसा कुठेच आढळून येत नाही. हिंदुस्थानातील कण न कण प्रेमाने धुंद आहे.
येथील घरे दारे सुद्धा प्रेम पुजक आहेत. येथील बायका प्रेमा करिता अशी कामे करून गेल्या आहेत की त्यापुढे दीपशिखा आणि पतंग यांच्या अख्यायिकाही फिक्या पडाव्या.
अशाच प्रेम कथांपैकी हिंदुस्थानात प्रसिद्ध असलेली रामकथा मी लिहीत आहे. लोक म्हणतात की, काफरांच्या गोष्टी का लिहितोस.? माझा त्यांना सवाल आहे कि, काफरांच्या गोष्टी सांगितल्याने कामी काफर होणार आहे.? आणि मी सांगतो ती तर दिव्य प्रेम कथा आहे ना? प्रेमभावनेत धुंद असलेली रयत परमेश्वराला आणि म्हणून इस्लामला जवळ असतात. राम कथेतील प्रेम मदिरा म्हणजे साधीसुधी नव्हे. ही रक्ताने घडलेली आहे. मसीहा, तू कुणाच्याही चुकीची पर्वा न करता निसंकोच मनाने राम कथा लिहि बरे.! प्रथम गंगाजलाने तोंड पवित्र करून घे आणि मग राम कथा सांग. मी कपाळाला टिळा लावतो, गळ्यात पावित्र्याचे जानवे धारण करतो (भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणजे जानवे असे समजण्याचा फारसी साहित्य संकेत आहे)
आणि प्रेम विजेच्या आधाराने काफिरी आणि इस्लाम ही बंधने जाळून भस्म करतो. ही काफीरी असेल तर त्यात शेकडो काबा (मुस्लिमांचे पूज्य स्थान) समाविष्ट आहेत हे लक्षात ठेवा. मी महाकवी खुसरो किंवा निजामी आहे असे म्हणत नाही पण माझे बोल हृदयातून निघतात हे ध्यानात आणा."
असे म्हणून मुल्ला मसीहा ने राम कथा सुरू केली आहे.
असो,
अशाप्रकारे मध्ययुगीन भारतात सर्वत्र मुस्लिम राजवटी असल्याने भारताबाहेरील परकीय फारशी भाषा या सुलतानांच्या सोबत आली आणि राज व्यवहारात वापरली जाऊ लागली. पण असे असले तरीही सुलतान व मोगलांच्या दरबारात असलेले फारशी कवी आणि त्यांच्या फरशी भाषेवर भारतीय संस्कृतीचा प्रभाव पाडल्याशिवाय राहिला नाही.
या काळात भारतीय संस्कृती मधील रामायण, उपषद आदि ग्रंथ विषय निवडून मुल्ला मसीहा, दारा शिकोह सारख्या अनेक फारशी साहित्यिकांनी स्वतंत्र रचना केली.
एवढेच नाही तर भारतीय संस्कृतीच्या या दिव्य ठेव्यामुळे तत्कालीन नांदत असलेली धार्मिक कट्टरता शिथिल झाली आणि या साहित्यिकांना भारत आणि भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान वाटू लागला. या भूमीचे मोठेपण सर्वांना आपलंसं करून ठेवते! तेव्हा 'वसुधैव कुटुंम्बकम' चे तात्पर्य कळू लागते, सारं विश्व या भूमीला नमन करू लागते..!
llफक्तइतिहासll
........................................................................... लेखनसीमा ll
Great information about Ramayan and its translation thank you!
ReplyDeleteधन्यवाद जोहार.!
Delete