थंडगार वार्यात अंधकार दाटत होता. त्याहून भयानक सडलेल्या जनावरांचा वास त्यात मिसळला होता.
'एक मरगट्ट मुंडी लाओ, एक सिक्का पाओ.'
अफगाण सेनापती शिपायांवर ओरडत होता. अंगात डगला आणि डोक्याला मुंडासे बांधलेला अफगाण शिपाई मायभूमीकडे ओढला जात होता. तरी काही उपरी मोहापाई घोडा दौडवीत होती. घनघोर त्या जंगलातून पळत सुटलेल्या घायाळ झालेल्या मराठा सैनिकांची काय दशा.."
मोहम्मद बंगश चे नाव मराठ्यांच्या इतिहासात प्रसिद्ध आहे ते त्याने छत्रसालावर हल्ला केल्यामुळे. बाजीराव पेशव्याला छत्रसालाच्या मदतीला जावे लागले. मोहम्मद बंगशला बाजीरावाच्या शौर्याने पुरते नामोहरण केले मग हाच मोहम्मद बंगश शेवटी बाजीरावचा स्नेहांकित बनला आणि बाजीरावच्या मातेची तीर्थयात्रा पूर्ण करण्यासाठी निघाला. ही बाजीरावच्या शौर्य प्रतापाची मोहिनीच नाहीतर काय. असो, याच मोहंम्मद बंगषचा मुलगा अहमदखान हा पानिपतावर हजर होता.!!
आयर्विन ने फर्रुखाबादेचे बंगश नवाब यांची हकीकत लिहिली असून ती एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या मुखपत्रातून प्रसिद्ध झाली होती.(1878)
ही हकीकत लिहून काढताना आयर्विनने अनेक फारसी हस्तलिखितांचा उपयोग केला आहे. पानिपत संबंधी मजकूर आयर्विनने थोडक्यात दिला आहे पण त्यातून पानिपत संबंधी लहान सहान का होईना पण महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला कळून येतात.
आयर्विन म्हणतो-
अहमदशहा दुराणीने(अब्दाली) हिंदुस्थानावर सहाव्यांदा स्वारी केली त्यावेळी अहमद खान आणि इतर रोहिले सरदारांनी १८ जुलै १६६० रोजी त्याची भेट घेतली. ही भेट अलिगड येथे घडून आली. अहमदखान बंगशने अहमदशहा अब्दालीच्या छावणीला रसदेचा पुरवठा केला. ही रसद येत असता मल्हारराव होळकराने यमुना ओलांडून अहमदखान बंगश याच्या सैन्यावर हल्ला केला. त्याने सैन्याची एक तुकडी मराठ्यांवर पाठवून त्यांना पिटाळून लावले.
अहमदशहा अब्दालीने यमुना ओलांडून अनुप शहर येथे आपली छावणी कायम केली. काही काळाने सुजाउद्दौलाचे (अयोध्येचा नबाब) मन अहमदशहा अब्दालीला येऊन मिळण्याविषयी वळविण्यात आले. स्थानिक इतिहासकारांच्या मते हा योग हाफिज रहमत खान आणि अहमद खान बंगश यांच्या मध्यस्थीने जुळून आला. त्यानंतर थोड्याच काळात सदाशिव भाऊ हा प्रचंड सैन्य घेऊन दत्ताजीच्या वधाचा(बलिदानाचा) सूड घेण्याच्या उद्देशाने दक्षिणेतून आला. त्याच्याबरोबर जनकोजी, मल्हारराव होळकर, इब्राहिम खान गारदी इत्यादी सरदार होते. २५ ऑक्टोबर १७६० रोजी अहमदशहा अब्दालीने अनुप शहराहून कूच केले. त्याने दिल्लीच्या उत्तरेस २० मैलावर यमुना ओलांडली. अहमद खान बंगश हा त्यावेळी आपल्या ५००० सैन्यासहित हजर होता. मराठ्यांनी पानिपत येथे छावणी केली. अहमदशहा अब्दालीने त्यांच्यासमोर आपला तळ ठोकला. दोन महिन्यापर्यंत उभय पक्षाच्या चकमकी चालू होत्या. मध्ये एक दोन छोट्या लढाया झाल्या. मराठ्यांच्या छावणीत रसदेचा अगदी तुटवडा झाला. त्यामुळे त्यांना मोठी लढाई देणे भाग पडले.
असे म्हणतात की मराठ्यांची डोकी कापून आणणाऱ्याला अब्दालीने प्रत्येक डोक्यामागे एक रुपया बक्षीस देऊ केले होते. अब्दालीच्या छावणीतून रोज दहा हजार घोडेस्वार बाहेर पडत. भोवतालची खेडी उध्वस्त करणे आणि शत्रूची रसद तोडणे ही कामे त्यांना दिली होती. गवत कापणारे मोलमजुरी करणारे किंवा मराठ्यांच्या छावणीतून बाहेर पडलेले कोणी दिसले की या स्वारांनी त्यांची डोकी कापून बादशहासमोर ठेवायची आणि बक्षिसी घ्यायची असा प्रकारच चाले. हे ऐकून अहमद खान बंगश याने आपला चिटणीस मुशर्रफ खान यास म्हटले की "मराठ्यांना जे जिवंत पकडून आणतील त्यांना मी प्रत्येक माणसामागे दोन रुपये देईन"
हे ऐकून दुराणी शिपाई माणसांना न मारता त्यांना कैद करून आणू लागली. अहमद खान बंगश शिपायांना प्रत्येक माणसामागे दोन रुपये देई आणि रात्रीच्या वेळी कैद्यांना सोडून देई. मराठे परत आपल्या छावणीत जाऊन अहमद खानाची पोटभर स्तुती करीत. शुजा उद्दौला आणि नजीब खान यांनी सगळी हकीकत अहमदशहा अबदालीला सांगितली. त्या दिवशीपासून अहमदशहा अब्दाली हा अहमद खान बंगश वर फार नाराज झाला. अब्दालीची नाराजी अधिक वाढावी म्हणून शुजाउद्दौला आणि नजीब खान यांनी बादशहाला सांगितले की -
"अहमद खान बंगश हा मोगल साम्राज्याचा अमीर उल उमरा आणि बक्षी म्हणतो पण त्याने अगदीच तुटपुंजे सैन्य आणले आहे".
अब्दाली काहीच बोलला नाही पण वजीर शहावली खान हा बंगशच्या जातीचा होता. त्यांने अहमद खानाला बोलावणं पाठविले. तो आल्यावर वजीराने त्याला आपल्या जवळ बसून विचारले की हिंदुस्थानातील प्रमुख उमरावपैकी तो असूनही त्याने अगदी थोडे सैन्य आणले आहे. शुजा उद्दौला आणि नजीबखान यांनी रात्री आपली चहाडी केली आहे हे अहमद खानाला यापूर्वीच जंगबाजखाना कडून कळले होते. त्याने शहावली खानाला म्हटले, की मी आपल्या पक्षातील बरेच सैन्य बरोबर न धरीता फरुखाबादचे (जहागिरीचे) रक्षण करण्याकरिता मागे ठेवले आहे. कारण गोविंद पंत (बुंदेला) हा ३००० सैन्यासहित यमुना ओलांडून आला असून त्याने त्या नदीच्या काठावर तळ दिला आहे. तेथे माझ्याबरोबर असलेले सैन्य लहान असले तरी प्रभावी आहे. या सैन्याच्या बळावर यापूर्वी मी सफदरजंग, सुरजमल, हिम्मत सिंह आदींचा पराजय केला आहे. यावेळी मी दिल्लीवर चाल करुन जाऊ शकलो असतो पण मोगल बादशहाची अदब राखावी म्हणून मी तसे केले नाही.'
वजीर शहावली खानाने म्हटले की, ही हकीकत यापूर्वी मी काबूलमध्ये असताना ऐकली आहे. अहमद खान बंगश म्हणाला की "माझे सैन्य लहान असले तरी त्याचे पाणी युद्धाच्या दिवशी दिसून येईल.'
अहमद खान बंगशच्या सैन्याचा तळ इब्राहीमखान गार्दीच्या मोर्चासमोर होता त्याच्या हाताखाली १२००० कवायती पायदळ होते. एके रात्री इब्राहिम खानाने हुकुम दिला की अहमद खानाचा मोर्चा हा लहान आहे. म्हणून त्याच्यावर हल्ला करावा. रात्रीच्या शेवटच्या प्रहरी इब्राहिम खानाच्या सैन्याने अहमदखानाच्या मोर्चा वर छापा घालण्याचा प्रयत्न केला. अहमद खानाच्या तोफा सज्ज होत्या. त्यांच्या संरक्षणार्थ त्यांच्यावर लोखंडी आवरणे घालण्यात आली होती. दिवस थंडीचे असल्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या होत्या आणि रोहिले आणि बाजारबुणग्यांची लोक शेकोटी पेटवून बसले होते. घोड्यांच्या टापांचा आवाज त्यांनी ऐकला आणि त्यांनी मराठे आले म्हणून ओरडाआरडा केला आणि मग त्यांनी शेकोट्यातून जळतील लाकडे उचलली आणि तोफांत घातली. तोफा धडाडू लागल्या शत्रूचे अनेक लोक मारले गेले, बाकीचे पळून गेले. अहमद खानाच्या बाजूने कोणालाही इजा झाली नाही. खानाची झोपमोडही झाली नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे हल्ल्याचे ठिकाणी अब्दाली पाहण्यासाठी गेला तेव्हा अहमद खान त्याला भेटला. त्याला पाहून अब्दालीने म्हणाला की 'तुमच्या शौर्याच्या गोष्टी ऐकत होतो पण आज प्रत्यक्ष त्याचा अनुभव आला' असे म्हणून अब्दालीने आपल्या पागोट्यामधून एक सुवर्णालंकार काढला आणि त्याला भेट म्हणून दिला. यानंतर मात्र अहमद खानाचे विरोधक गप्प बसले.
लढाईच्या दिवशी अहमदखानाची लहान म्हणून त्याच्याकडे बायका-मुलांचे रक्षणाचे काम देण्यात आले मात्र ही गोष्ट त्याला पटली नाही. मग अब्दालीने त्याला सैन्याच्या उजवीकडे नेमले. याच बाजूने मराठ्यांनी हल्ल्याचा प्रारंभ केला. या निकराच्या हल्ल्यात तो जखमी झाला पण मराठ्यांचा जोर भारी या कठीण परिस्थितीत खानाने आपला दरोगा मुशर्रफ खानाला अब्दालीकडे पाठवून मदतीची मागणी केली. तेव्हा शुजाउद्दौला आणि नजीबखानाने अब्दालीला म्हटले की अहमद खानाशी लढत असलेल्या शत्रूचे सैन्य फार नाही, उलट हाफिज रहमत खानाचा मुलगा आहे, त्याला मदत पाठवली पाहिजे. परत आलेल्या मुशर्रफ खानाने अहमद खानाला येऊन सांगितले की, अब्दाली काही बोलत नाही मग अहमद खानाने पुन्हा तातडीचा निरोप देऊन त्याला पाठवले. मग अब्दालीने दोन दल सैन्य पाठविले. त्याच्या सैन्याची उजवी फळी मजबूत झाली आणि मराठ्यांना हळूहळू मागे रेटण्यात त्याला यश आले. विश्वासराव मारला गेला व सदाशिवभाऊ नाहीसा झाला आणि मराठ्यांच्या सैन्यात एकच गोंधळ उडाला. दुपारी दोन वाजेपर्यंत अब्दालीने लढाई जिंकली होती...
असो, आयर्विनने केलेल्या वरील वर्णनातून काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात.
पानिपताच्या या युद्ध संग्रामात अनेक हिंदुस्थानी मग ते हिंदू असोत वा मुसलमान, परकीय शत्रू अहमदशहा अब्दालीला जाऊन मिळाले. कुणी मराठ्यांच्या सत्तेचा विरोध म्हणून तर कोणी हिंदू धर्माचा विरोध आणि इस्लामची सेवा म्हणून! सुरजमल अलिप्त राहाला तो स्वतःची राजकीय महत्त्वकांक्षा पूर्ण न झाली म्हणून तर शुजाउद्दौला आणि इतर रोहिले अब्दालीला जाऊन मिळाले ते मराठे हिंदू आहेत म्हणून वा त्यांचे वर्चस्व नको आहे म्हणून.!
पण मराठे पानिपतावर लढले ते हिंदुस्थानी म्हणून राष्ट्रासाठी.!
पण अशातही शत्रूच्या गोटात असलेला हा अहमद खान बंगश गवत आणि रसद गोळा करणाऱ्या सामान्य लोकांना कैदमुक्त करून सोडतो ही गोष्ट लक्षणीय वाटते. जसे काळोख्या अंधारात एखादा काजवा चमकावा अशी ही घटना. कदाचित त्याचा बाप मोहम्मद बंगश आणि बाजीराव चे जे काही शेवटी चांगले संबंध बनले होते त्याचा हा परिपाक असावा. कारण पूर्वी जेव्हा नादिरशहाचे हिंदुस्थानात आक्रमण झाले त्यावेळी या अहमद खान बंगश चा बाप मोहम्मद बंगश याने बादशाहाला आपण काबुल मध्ये जाऊन नादिरशहाचा पराभव करावा याबाबतीत सुचविले होते. शिवाय पेशवा बाजीराव आणि मोहम्मद बंगश यांच्यामध्ये हिंदुस्थानची घडी नीट बसवण्याविषयी व परकीय शत्रूपासून हिंदुस्थानचे रक्षण करण्या विषयी पत्रापत्री झाली होती. मात्र बाजीरावच्या निधनानंतर ही योजना विरून गेली. अर्थात आपला बाप जिथे परकीय शत्रूच्या विरोधात राहिला मात्र आज आपण परकीय शत्रूच्या सोबत काम करत आहोत याची तर जाणीव कदाचित त्याच्या मनाला चाटून जात नसेल..? त्यामुळे तर ही माणुसकी त्याने दाखविली नसेल..
तर, असो शेवटी इतिहासाचा विषय हा माणूसच नसतो काय..? माणसाने दाखवलेल्या मानवतेच्या उत्थान आणि पतनाची ही कहाणी म्हणजेच फक्त इतिहास होय।। इतिहासाच्या वाटेवर माणूस शोधण्याच्या प्रयत्नातून...
- प्रा रवि आत्माराम बाविस्कर
llफक्त इतिहासll
Comments
Post a Comment
... मग कशी वाटली पोस्ट