Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

दख्खन तख्त"


 
  ‘साल्हेरी अहिवन्तापासून ते चंदी कावेरी तीरापर्यंत निश्कंठक राज्य. शतावधी दुर्ग, चाळीस हजार पागा, दोन लक्ष पदाती..ऐसी केवळ सृष्टीच निर्माण केली..’
असे रामचंद्र अमात्य ‘आज्ञापत्र’ या ग्रंथातून मराठी साम्राज्य हिंदुस्तानात कुठवर पोचले होते, याचे वर्णन सांगतात.

आज्ञापत्रातील चंदी म्हणजेच दक्षिणेतील मराठय़ांचे तख्त असलेला हा जिंजीचा किल्ला होय. या किल्ल्याला राजगड आणि रायगडनंतर, शिवाजी महाराजांची तिसरी राजधानी मानतात. संभाजीराजांचे नंतर राजाराम महाराजांनी जिंजीच्या मदतीनेच हिंदवी स्वराज्याची पुनःप्रतिष्ठापना केली.
शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्या वेळी हा दुर्ग नासीर मुहम्मद या विजापूरी किल्लेदाराकडून जिंकून घेतला व त्यास नावे दिली- शारंगगड, गर्वगड आणि मदोन्मत्तगड!
छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकल्यावर आधीच दुर्गम असलेला हा गड अधिक बेलाग बनविला. त्यांनी केलेले हे बदल पाहून खुद्द इंग्रजही आचंबित झाले.
सन १६७८ च्या जुलै मध्ये लिहताना जेसुईट म्हणतात - "या प्रदेशातील मुख्य मुख्य स्थळे बळकट करण्यासाठी शिवाजीमहाराजांनी आपली सर्व शक्ती आणि साधने खर्ची घातली. त्याने जिंजीच्या भोवती नवे तट उभे, खंदक खणले, बुरूज बांधले. ही कामे त्याने इतकी उत्कृष्टपणे पार पाडली की युरोपियनांनाही त्याचा हेवा वाटावा"
हा गड जिंकून त्याला बेलाग बनवण्याची दूरदृष्टी मात्र भविष्यात कामी आली.
१६८९ मध्ये मुघलांनी रायगडाला वेढा घातल्यावर राजाराम महाराज निसटले. दक्षिणेतील या जिंजी किल्ल्याने त्यांना आश्रय दिला. आणि रायगड गेल्यावरही याच किल्ल्यावरून स्वराज्याचा जंग सुरू झाला. झुल्फिकारखान नुसरतजंग मुघल सरदाराने अखेर जिंजीला वेढा घातला. धनाजी जाधव हा मराठा वीर बाहेरून गनिमी हल्ले करत होता, पण वेढा काही ढिला पडत नव्हता. राजाराम महाराजांनी स्वत:ची सुटका करून घेतली. यानंतर चिडलेल्या मुघलांनी जिंजीवर निकराचा हल्ला चढविला. शिधा सामुग्री संपल्यामुळे मराठ्यांनी शरणागती दिली. ७ फेब्रुवारी १६९८ रोजी मुघल फौजांनी गड ताब्यात घेतला. मात्र जिंजीचा वेढा मोगलांना महागात पडला. कारण याने मराठ्यांच्या शक्तीचे पुर्नसंपादन होऊन गेले.
असो, इतिहास तसा फार मोठा पण आहे जागेचा तोटा !
स्थानिक तमिळ भाषेत या किल्ल्यास चेंगी अथवा ‘सेन्जी’ म्हटले जाते. सेन्जी अम्मा या देवीच्या नावावरून या किल्ल्याचे नाव ठेवले गेले. जिंजी शहराच्या पश्चिमेला कृष्णगिरी, चंद्रगिरी व राजगिरी या नावाचे मोठे पहाड आहेत. पूर्व घाटाच्या रांगा तामिळनाडूमध्ये याच दिशेने पोहोचतात. शेकडो टन वजनाचे दगड एकमेकावर रचून ठेवल्यासारखी विवक्षित रचना येथील डोंगरांची आहे. झुडूपी जंगल व पाषाणात पण उत्तम वाढणारी कुरु उर्फ कहाणडळाची झाडे येथे सर्वदूर आढळतात. तामिळनाडू शासनाच्या मुत्तकुडू राखीव वनक्षेत्रात जिंजीचा दुर्ग समूह येतो.
एकूणच जिंजी किल्ला हा राजगिरी, कृष्णगिरी आणि चांद्रायणगिरी अशा तीन प्रचंड पहाडांनी बनलेला आहे. या तिन पहाडांना एक ६० फूट रूंद व ११.२ किलोमीटर लांबीची भक्कम दगडी तटबंदी आहे. त्या पलीकडे पूर्वी खोल खंदकही होता. विस्तीर्ण आवारात भरपूर पाण्याची सोय आणि शेती आहे. या टेकडय़ांवर नैसर्गीक पाण्याची टाकी नाहीत. पण येथे विहिरी आणि अनेक हौद व पहाडातील पाणी साठवलेले काही तलाव आढळतात.
जिंजी दुर्ग समूहातील राजगिरी हा मुख्य समजला जातो. त्याची निर्मिती बाराव्या शतकात कोणार समाजाच्या आनंदा कोण याने केली. पुढे १२४० मध्ये कृष्णगिरीचा किल्ला कृष्ण कोण या राजाच्या राजवटीत बांधला गेला. १३८३ ते १७८० या कालखंडात जिंजीवर विजयनगर, नायक, मराठा, मुघल, नवाब, फ्रेंच व इंग्रज अशा अनेक राजवटी नांदल्या. या विविध राजवटीत या किल्ल्याचा विस्तार झाला.
राजगिरीला जाताना सुरूवातीस अर्काट आणि मग पॉण्डिचेरी दरवाजातून प्रवेश होतो. आज याचे अवशेषच आहेत. येथे व्यंकटरमणस्वामींचे सुंदर देवालय आहे. त्यात नरसिंहमूर्ती आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर समुद्रमंथनाचे सुरेख शिल्प आहे. या मंदिराचे सुरेख खांब पोर्तुगीजांनी पळवले असे सांगतात. विशेष म्हणजे याची रचना बहुतकरून तिरूपतीच्या मंदिरासारखिच आहे.

राजगीरीच्या पायथ्याशी असलेले विस्तीर्ण धान्य कोठार



पुढे राजगिरीच्या पायथ्याशी विस्तीर्ण प्रदेशात कल्याण महाल ही सातमजली आणि अतिशय सुंदर इमारत दिसते. या सातमजली इमारतीमध्ये वरपर्यंत खापरीनळाने पाणी पुरवठा केला होता. थोड्या अंतरावर प्रचंड मोठे धान्य कोठार, सुंदर हत्ती तलाव, शस्त्र सरावासाठी विस्तीर्ण तालिमखाना, बारूदखाना तसेच जवळच हजारो घोड्यांसाठी पागा व त्या समोर राजासाठी एक भव्य प्रसाद आहे. या वास्तूसमोर राजाचा भव्य दरबार आहे. त्यात सिंहासनासाठी मोठा चौथरा आहे. आणि येथेच बसून कधिकाळी राजाराम महाराजांनी स्वराज्याचा कारभार बघितला.
येथे मराठ्यांच्या इतिहासाबद्दल कुणास काहीच माहिती नाही. पण पच्चेयप्पन या सद्गॄहस्थाचे मुखातून "छत्रपती सिवाजी का दुसरा बेटा राजाराम यहा रहता था" असे ऐकल्यावर चिक्कार बसेसमधून दूरच्या प्रवासाचे ओझेच हवा होऊन गेले आणि विजेचा संचार झाला.
इथून पुढे थोडय़ाच अंतरावर राजगिरीला जाणारा पायऱ्यांचा रस्ता लागतो. हा रस्ता सात दरवाजांमधून जातो. वाटेत घनदाट जंगल आहे. काही दाक्षिणात्य शैलीची सुरेख देवालये आहेत. या राजगिरीचा वरचा भाग हा एका महाप्रचंड शिलाखंडावर बसला आहे. तेथे पोहोचण्यासाठी एक दगडी जिना आहे व नंतर एक लोखंडी पूल आहे. हा पूल पूर्वी लाकडाचा होता. या माथ्यावर काही कोठारे, काही महाल,
राजगीरीच्या माथ्यावरुन चांद्रायनगीरी दर्शन
राजगीरीवरील मंदिर
एक सुंदर मंदिर आहे. बहुधा विष्णूचे असावे. इथेच एक ध्वजस्तंभ आणि एक मोठी तोफ आहे. येथून आसमंत निहाळणे हा एक आगळा अनुभव आहे. राजगिरीच्या जवळच उजवीकडे चांद्रायण ऊर्फ चंकिली दुर्ग आहे. यावर फक्त एक प्रचंड मंडप आहे. सप्तमातृका मन्दिर आहे.
राजगीरीवरून कृष्णगीरी दर्शन
कृष्णगिरी थोडासा लांब आहे. वर जाण्याकरिता बांधीव पायऱ्या आहेत. या बालेकिल्ल्यावर एक मोठा सभामंडप आहे. येथील स्तंभांवर मूर्ती कोरलेल्या दिसतात. शिवाय येथे काही चित्रेही आहेत. आज जरी ती अस्पष्ट झाली असली तरी त्यांचे सौंदर्य जाणवते. या शिवाय येथे काही वैष्णव मंदिरे आहेत. येथे एक सुंदर महाल आहे. याच्या रचनेवरून हा राण्यांकरिता असावा असे वाटते. या शिवाय येथे प्रचंड धान्य कोठारे आहेत. पाण्याकरिता विहिरी आणि हौद आहेत. येथे एक तेलाची विहीर आहे. पूर्वी युध्दप्रसंगी जखमांवर लावण्याकरिता तेल आणि तूप साठवले जाई. जिंजीचा संपूर्ण किल्ला एका दिवसात पाहून होत नाही आणि किल्ल्याच्या परिसरात संध्याकाळी पाचनंतर फिरता येत नाही. राजगिरीवरही दुपारी तीन नंतर प्रवेश मिळत नाही. दुसरे दिवशी येऊन काही ठीकाण बघावी लागतात. मात्र राजगिरीच्या त्या उंच माथ्यावरून जिंजीच्या अफाट दर्शनाने छाती बुलंद तटासारखी प्रचंड विस्फारून जाते.!
असे हे दख्खन तख्त अतिविशाल व सामर्थ्याचे, हिंदवी स्वराज्याच्या जंगाचे साक्षिदार, काळजाच्या पाषाणावर अलौकिक छाप सोडून जाते..! दुसरे दिवशी परतीच्या वाटेवर बसच्या खिडकीतून जेव्हा दूर जात असलेल हे दख्खन तख्त नजरेस पडत होत तेव्हा काळजातून उठणाऱ्या आपल्या पराक्रमी पूर्वजांच्या आठवणी डोळ्यातून तरळून जात होत्या..!
||फक्तइतिहास||
http://www.faktitihas.blogspot.in

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts