Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

शिवरायांची राजनीति शत्रुमध्ये भेद...



इतिहासाच्या पोटात अनेक घटना गुप्त बनून राहिल्या. त्यांचे परिणाम मात्र जगात दृश्यमान झाले. हिंदुस्थानच्या इतिहासात सुद्धा भारतीय सुरक्षा दलांनी अनेक गुप्त मोहिमा(ऑपरेशन्स) राबविल्या, ज्या जगास मान्य नव्हत्या मात्र त्या आमच्या अस्तित्वासाठी जिकिरीच्या होत्या. त्याला फक्त तो काळच साक्षी आहे. अशाच काही गुप्त आणि रहस्यमय गोष्टी शिवछत्रपतींच्या इतिहासात सापडतात.
शत्रूंमध्ये भेद हे महाराजांच्या युद्धनीती मधील एक महत्त्वाचे अंग होते. आपल्याबद्दल शत्रूच्या सरदारात सहानुभूती निर्माण व्हावी असे महाराजांचे सतत प्रयत्न असत.
बिकानेर चा राजा राव कर्ण हा मोगलांच्या पदरी दोन हजारी मनसबदार होता. त्याला दौलताबादची किल्लेदारी(१६३३-१६५३पर्यंत) देण्यात आली होती. पण त्याने बादशहाची मनःपूर्वक सेवा केली नाही असे भीमसेन सक्सेना हा मोगल इतिहासकार आपल्या ग्रंथात म्हणतो. मात्र रजपूत दस्तावेजा प्रमाणे राव कर्ण हा बादशहाच्या धर्मांधतेचा निषेध करीत असे. त्यामुळे बादशहाचा त्यावर कायमच रोष राहिला. हा बिकानेरचा राजा व त्याची मुले पदम सिंह व अनुप सिंग हे बरीच वर्षे दक्षिणेत मोगल सेवेत राहिले. कर्णाच्या मनातील अस्वस्थता कदाचित महाराजांनी हेरली असावी.
१६६० मध्ये शाहिस्तेखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी बिकानेरचा राजा रावकर्ण याच्याशी संपर्क ठेवला होता ही माहिती कवी संकर्षण यांच्या संस्कृत शिव काव्यातून शोधावी लागते.
संकर्षण हा कवी राव कर्ण ह्याचा मुलगा अनुपसिंग याच्या पदरी होता. त्याने आपल्या संस्कृत काव्यातून राजकीय गुप्त मसलती संदर्भात गुप्त व भुलावणी करणारे सत्य दडवून ठेवले आहे. अर्थात आपण मोगल चाकरीत आहोत हे समजून त्याने हे सत्य दडवून ठेवले आहे. आपल्या काव्यात तो कूर्प सूत असा शब्द वापरतो. कूर्प अर्थात खूर्रम. शाहिस्तेखानाच्या छाप्या संदर्भात तो आपल्या काव्यातून राव कर्ण व शिवाजी महाराज यांची मसलत मांडतो. पण त्यात आव असा आणतो की जणू शिवाजी महाराज आपला दूत औरंगजेबास भेटावयास दिल्लीकडे पाठवतात. दूत म्हणतो -

"... तुझ्या सैन्यातील यवनाकडून शिवाजीच्या मुलखात उपद्रव होत आहे.... तुझा सेनापती साठ हजार सैन्य रात्र सज्ज ठेवून शिवाजीच्या भीतीने पुण्यात जागृत राहिला आहे. यवन सेनापती चाकण जिंकल्यानंतर शिवाजीच्या भीतीने तसाच आहे. जहाजावरील धन लुटून शिवाजीने समुद्रात हजारो यवन मारले. तू युद्ध करत नाहीत असेही नाही व युद्ध करणे ही टाळत आहेस. हे दोन्ही सहन न होऊन शिवाजीने मला तुझ्याकडे पाठविले आहे..."

यावर आलेल्या दूताला औरंगजेबानेच उत्तर दिले असे संकर्षण कवी भासवितो. त्याची शब्दरचना पहा-

"... माझा मित्र जो शिवाजी त्यास एकांतात तू असे सांगितल्याने आमचे वडील वारल्यानंतर बंधू वर्गाशी युद्ध चालू असता व या देशात दुष्काळ पडला असता माझ्या मामाने कपटाने  देवगिरीच्या रक्षणाचे दुर्घट कार्य माझ्यावर सोपवून व तुझ्याशी निष्कारण कायमचे वैर निर्माण करून स्वार्थाने येथून काढता पाय घेतला. तो तुझ्याशी युद्ध करण्यास आला असेल तर त्यास लवकरात लवकर स्वतःचा पराक्रम दाखव आणि माझा हा निरोप गुप्त ठेव..."

खरेतर राव कर्णाचा बाप सप्टेंबर १६३१ मध्येच मरण पावला होता. अर्थात औरंगजेब आपल्या बापाबद्दल - शहाजहान बद्दल बोलत आहे असे कवी भासवितो. खरेतर ही सर्व मसलत महाराजांचा वकील आणि राव कर्ण यांच्यामधील आहे. शाहिस्तेखानावरील कटा संबंधीचे सर्व बोलणे आहे. संकर्षण यात कर्णाचे नाव टाळतो. नाहीतर औरंगजेब माझ्या यवन सेनापती विरुद्ध अर्थात मामा विरुद्ध पराक्रम कर आणि माझा निरोप गुप्त ठेवा असे कशाला म्हणेल..?
अर्थात कर्णाला महाराजांना निरोप द्यायचा आहे की त्यांनी शाहिस्तेखानावर स्वारी करावी. असा या सांकेतिक वर्णनाचा अर्थ लागतो. संकर्षण कवी आपल्या शिव काव्यात ही सांकेतिक भाषा वापरतो त्याला कारण म्हणजे औरंगजेब त्यावेळी जिवंत होता हे लक्षात घेतले पाहिजे.
असो, शाइस्तेखानाविरुद्ध महाराज कूटनितीने हलचाली करीत होते. त्यातील हा एक प्रकार म्हणजे मोगलांच्या असंतुष्ट सरदारांशी संपर्क होय. जोधपूरचा जसवंतसिंग काय आणि बिकानेर चा राजा रावकर्ण काय, या दोघांनाही औरंगजेबाची धास्ती होतीच. ती पूर्वी धर्मत च्या (वारसाहक्काच्या) लढाईत जसवंत सिंग शहाजान बादशहाच्या बाजूने औरंगजेबाविरूद्ध लढला म्हणून ! आणि राव तटस्थ राहिला म्हणून ! उलट शाहिस्तेखान हा औरंगजेबाचा कट्टर पक्षपाती होता. यातूनच महाराजांनी शाहिस्तेखानावर छापा घातला तेव्हा अफवा पसरली ती महाराज आणि जसवंतसिंग यांचे संगनमत झाले. समकालीन मोगल इतिहासकार भीमसेन सक्सेना हा सुध्दा असेच बोलतो. भीमसेनचा भाऊ यावेळी शाहिस्तेखानाच्या छावणीत होता व पुढे भीमसेन स्वतः जसवंतसिंगाच्या छावणीत नोकरीस होता. काही अनुभव वा तर्कातूनच त्याने हे विधान केले असावे. किती सत्य असावे..? तो कालच जाणो..!
असो, साऱ्याच गोष्टी इतिहासाला ठाऊक असतात असे नाही. कारण इतिहास हा फक्त पुराव्याने बोलतो. पण काही गोष्टी कायम रहस्य बनून राहतात. रावकर्णा प्रमाणे..!
पण, ती अफवा असवी तरी तिचा उपयोग महाराजांना मोगल छावणीत अस्थिरता निर्माण करुन मोगल सेनापतींचे खच्चीकरण करण्यासाठी नक्कीच झाला.
असो,
बिकानेरचा राजा रावकर्ण याचा मृत्यू औरंगाबाद येथे २२ जुन १६६९ रोजी झाला. पण शिवाजी महाराजांनी कर्णाशी जोडलेले संबंध नंतरही एकदा आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगी पडले.
१६७९ च्या नोव्हेंबर मध्ये महाराजांनी जालना शहरावर हल्ला चढविला. यावेळी जालण्याचा मोगल अधिकारी रणमस्तखान हा होता.
"... मोगलांचे सैन्य चालून येत आहेत, सावध राहा.."
असा इशारा मोगल सरदार किशनसिंह राठोड याने जालण्याच्या मोहिमेत महाराजांना दिला. म्हणून महाराज अधिक हानी न होता जालन्यातून निघून गेले.
याविषयी सभासद बखरकार म्हणतो -
".. त्याचे कुमकेस केसरसिंग व सरदारखान व बाजे उमराव असे वीस हजार फौज तीन कोसांवर राहिली. मग केसरसिंग यांनी अंतरंगे सांगून पाठविले की 'उभयपक्षी भाऊपणा आहे. आमची गाठ पडली नाही तोवर तुम्ही कूच करून जाणे' हे वर्तमान कळताच राजे तेथून निघाले.. "
शिवाजी महाराजांना वेळीच सावधगिरीचा इशारा देणारा हा केसरसिंग म्हणजेच राव कर्ण याचा मुलगा होय.
पुरंदरच्या वेढ्यात दतियाचा राजा शुभकर्ण बुंदेला मराठ्यांची रसद पुरंदरच्या किल्ल्यात जाऊ देतो असा उघड आरोप झाला. तिकडे काणाडोळा केल्याबद्दल औरंगजेबाने जयसिंगाची कान उघडणी केली. जयसिंगाला माफी मागावी लागली. पण जयसिंग आणि रामसिंग यांची सहानुभूती महाराजांकडे आहे हा संशय औरंगजेबाच्या मनातून कधीच गेला नाही. दिलेरखानाची तर याबाबतीत जवळजवळ खात्रीच होती.
आग्रा मुक्कामी वजीर मोहम्मद जफर, बक्षि मोहम्मद अमीनखान हे महाराजांच्या बाजूने बोलू लागले होते हे महाराजांच्या अंतस्थ संपर्काचे द्योतक असले पाहिजे. दोघांनाही महाराजांनी भरपूर नजराणा देऊन थोडे का होईना, नरमवले होते. यातील बक्षि अमीनखान ज्याचा बाप मिर जुम्ला हा मोगल वजीर होण्यापूर्वी कुतूबशाहीत होता. त्या वेळी शहाजीराजांशी त्याचे काही राजकीय संबंध आले होते. महाराजांनी त्या आठवणींचाही उपयोग केला, अर्थात अमीनखानाचा मेंदू वश करण्यासाठी !
एवढेच नाही तर महाराजांनी शत्रू मधील फुटीचा उपयोगसुद्धा स्वतःसाठी करून घेतला. शत्रू सरदारांतील आपापसातील मतभेदांचा उपयोग महाराज आपल्या राजकारणास करून घेत. शत्रू गोंधळला आहे हे पाहून त्यांनी सुरतेवर हल्ला चढविला, मुअज्जम आणि दिलेरखान यांच्यातील कलहाच्या वेळी त्यांनी सुरत दुसर्‍यांदा लुटली. महाबतखान आणि दाऊद खान यांच्या भांडणाचा लाभ महाराजांनी घेतला. शत्रू सेनापतींच्या स्वभावाचा अंदाज घेऊन महाराजांनी अनेक शत्रूंची वित्तंबातमी राखली होती.
जसे,
सौम्य मध्यम कामे दिरंगाईवर टाकणारा शाहिस्तेखान, ऐषारामी महाबतखान, लाचखाऊ आणि भंपक व बहादूरखान, तापट पण द्वेषी दिलेरखान, औरंगजेब आला असून घेऊन वागणारा व मुअज्जम चा मित्र निष्क्रिय जसवंत सिंग या सर्वांचे पाणी महाराजांनी जोखले होते. शत्रुवर विजय मिळवायचा तर शत्रूच्या स्वभाव मनाचा अभ्यास होणे गरजेचे असते. तेव्हा त्याच्या क्षमतेचा अंदाज काढणे सोपे जाते. त्यावरून त्याच्या पुढील चालीचा ओघ लक्षात येतो. असे महाराजांचे तंत्र होते.
एक मिर्झा राजा जयसिंग मात्र त्यांना तेवढा मुत्सद्देगिरीत बरोबरीचा भेटला पण तेथेही जयसिंगाच्या सहानुभूतीतून त्यांनी स्वराज्याचा तुकडा वाचवीलाच. ह्या तुकड्यातूनच त्यांनी १६७० मध्ये प्रचंड शक्ती निर्माण करुन स्वराज्याच नव्हे तर बहुत काही मिळविले. जयसिंगाला सुद्धा त्यांनी बादशहाच्या सभा गुणाबद्दल सांगितले होते. मात्र माणसाची पारख करण्याचे तंत्र जे महाराजांपाशी होते ते आलम हिंदुस्थानात कोणापाशीच नव्हते. महाराजांच्या भविष्य निदानाकडे जयसिंगाने दुर्लक्ष केले आणि औरंगजेबाच्या संशयाची झळ त्याला लागली ती लागलीच.!
असो, छत्रपती शिवाजी महाराज हे तर थोर नियोजन सिंधू ! आपण सामान्यांनी काय जाणावे अनुमान मात्र तेवढे करावे...
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्त इतिहास।।

हालचालींची योजनाबद्ध मांडणी-
मत्प्रिय, मागे आपण महाराजांच्या राजनीतीचा आणि कूटनीतीचा अभ्यास केला. हालचालींची योजनाबद्ध मांडणी हासुद्धा महाराजांच्या रणनीतीचा एक महत्त्वाचा होता. मोगल दुर्बळ आहे असे दिसले की महाराज आक्रमणाची योजना आखीत.
सन १६५७ मध्ये मोगल इलाख्यातील हल्ले, सुरतेवरील छापे, आणि १६७० मधील संघर्ष ही याची उदाहरणे होत.
जयसिंगाच्या स्वारीनंतर व पुरंदरच्या तहानंतर काही काळ महाराज शांत राहिले. नंतर तीन वर्षेपर्यंत ते मोगलांच्या वाटेला गेले नाहीत. वरकरणी मोगलांशी सला करून संभाजीराजांना मनसबदार म्हणून मोगलांकडे पाठविले. पण १६७० मध्ये आपली तयारी पूर्ण झाल्यावर त्यांनी मोगलांशी प्रखर लढाई चालू केली तीही औरंगजेब तिकडे वायव्य सीमेवर पठाणांच्या बंडात गुंतला आहे हे पाहून.!
सन १६७४ मध्ये पठाणांच्या मोहिमेत औरंगजेब सापडला त्यावेळी चांगली मोगल सैन्य उत्तरेकडे गेली या गोष्टीचाही त्यांनी लाभ घेतला. तोच प्रकार रजपूत मोगल युद्धाच्या वेळी १६७९ मध्ये घडला. जसवंत सिंग याच्या मृत्यूनंतर त्याचे जोधपूरचे संस्थान खाली करण्यासाठी औरंगजेबाने युद्ध छेडले याचा फायदा महाराजांना दक्षिण दिग्विजयाची मोहीम काढण्यासाठी नक्कीच झाला.
मोगलांच्या मानाने आपली साधने अल्प आहेत ही जाणीव महाराजांना होती. मोगलांशी त्यांनी समोरासमोर युद्धे टाळली पण काही युद्धे घडली. उबरखिंड, साल्हेर, वणीदिंडोरी, जालना ही नावे याबाबतीत घेता येतील. पण त्यांचा खरा रोख जलद हलचालीवर असे. कोणत्याही ठिकाणी महाराज इरेस गुंतत नसत. आपल्या उद्दिष्टाप्रत ते दक्ष असत. वणी दिंडोरीच्या लढाईत त्यांनी सुरतेचा खजिना सुरक्षित आणण्यासाठी त्यांना अडविणाऱ्या मोगल सैन्याला खडे चारले पण लागलीच ते तेथून पुढे सरकले. जालन्याच्या वेळीही असेच घडले.
जयसिंगाशी झालेल्या तहात स्वराज्यातील गेलेले किल्ले त्यांना परत घ्यावयाचे होते ते त्यांनी घेतले. मोगलांच्या बागलाण इलाख्यातील किल्ले घेणे आवश्यक होते कारण त्यामुळे खान्देश- गुजरात ची वाट मोकळी होणार होती, ते त्यांनी घेतले. पण मोगल सुभ्यातील इतर ठिकाणी विनाकारण किल्ले घेण्यात ते गुंतले नाहीत. उगीच साम्राज्याचा हव्यास त्यांनी बांधला नाही. आपली आक्रमक प्रवृत्ती, घबराट गोंधळ पसरविणे, चौथ- सरदेशमुखी वसूल करणे हे उद्देश त्यांनी तडीस नेले ते शत्रूसैन्यावर कायम दबाव ठेवण्यासाठी.
सह्याद्रीच्या अभेद्य डोंगर दर्‍यांच्या आश्रयानेच आपल्या लहानशा पण चपळ आणि काटक सैन्यच्या द्वारे मोगलांना दमून सोडावे आणि आपले स्वराज्य वाचवावेत हा त्यांचा उद्देश त्यांनी सफल केला.
मोगलांपाशी मनुष्यबळ आणि अगणित संपत्ती. नका एवढी भूमी सुध्दा ती सोडण्यास तयार नाहीत हे महाराजांना आग्रा भेटीनंतर कळून चुकले. हा लढा दीर्घकाळचा आहे हे त्यांना दिसत होते. असे असूनही आपल्या तुटपुंज्या साधनांची जाणीव असूनही महाराजांनी मोगलांशी झुंज एका घेतली? याला उत्तर म्हणजे महाराजांचा आत्मविश्वास मोगलांचा डोलारा हा पोकळ आहे आणि भ्रष्टाचार यामुळे त्या राज्याला स्थैर्य नाही हे त्यांच्या दूरदृष्टीला दिसले. आपली बाजू न्यायाची, सत्याची व नितीधर्माची आहे, आपल्यावर परमेश्वराची कृपा आहे, लढा दीर्घ काळ चालेल पण शेवटी जय आपलाच ! ही मनोमन श्रद्धा महाराजांची होती आणि म्हणूनच अफाट मोगल साम्राज्याच्या विरोधात ते युक्तीने, साहसाने, धाडसाने आणि आत्म विश्वासाने लढले..!
आणि होय सत्यासाठी केलेली दौड ध्यासाच्या जिनाने पूर्ण होतेच.!
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts