श्रीवर्धन-
कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान. एका बाजूला हिरव्यागार गर्द वनश्रीने नटलेला डोंगर तर दुसऱ्या बाजुला नयनरम्य स्वच्छ निळा समुद्र व रुपेरी वाळूने आकर्षित करणारा अमर्याद समुद्रकिनारा. "
पुण्याहून ताम्हिणी घाटातून माणगाव व तेथून प्राचीन अशा श्रीवर्धन गावी आम्ही पोचलो.
श्रीवर्धन सुंदर आणि टुमदार शहर ! कौलारू घरांच्या अंगणात सुपारीच्या आणि नारळाच्या विस्तीर्ण पसरलेल्या बागा !
विशेषतः सुपारी लागवड जवळजवळ वाडीतील प्रत्येक अंगणात, म्हणून श्रीवर्धन रोठा नावाने प्रसिद्ध असलेल्या सुपारीचे हे गाव !
श्रीवर्धन हे रायगड जिल्ह्यातील १५,१८७ लोकसंख्येचे तालुक्याचे ठिकाण.
हे ऐतिहासिक काळापासूनच एक व्यापाराचे ठिकाण होते. पूर्वी अरब व पश्चात पोर्तुगीज आणि इंग्रजांसाठी हे एक व्यापारी बंदर म्हणून प्रसिद्ध होते.
सोळाव्या-सतराव्या शतकाच्या सुमारास श्रीवर्धन हे अहमदनगरच्या निजामाच्या ताब्यात होते. नंतर हे विजापूरच्या आदिलशहाकडे गेले. निजामशाहीच्या पतनानंतर जंजिरेकर सिद्दी स्वतंत्र झाले. मात्र त्यांनी आदिलशहाची सत्ता मान्य केली. आदिलशहाने त्यांना श्रीवर्धन, हरिहरेश्वर, माणगांव असा मुलूख व जंजिर्याचा किल्ला जहागीर म्हणून दिला. तेव्हापासून हे शहर सिद्दीकडे होते.
श्रीवर्धन हे विजापूर राजवटीमधले एक महत्त्वाचे सागरी केंद्र होते. काही युरोपियन प्रवाशांच्या प्रवासवर्णनात याचे उल्लेख मिळतात. सन १५३८ मधील डोम जोआओ डी कॅस्ट्रो हा प्रवासी असे वर्णन करतो की 'ओहोटीला या गोदीमध्ये खूप कमी पाणी असते पण आतून ही बरीच मोठी आणि प्रशस्त आहे."
शिवछत्रपतींनी सिद्धीचा बराच मुलुख ताब्यात आणला होता तरी श्रीवर्धन, हरिहरेश्वर हे सिद्दीच्या ताब्यात होते. पश्चात शंभूराजांनी किनाऱ्यावरील हा मुलूखहि ताब्यात घेतला होता. मात्र शंभूराजेंच्या बलिदानानंतर मुघलांच्या मदतीने सिद्दीने हा मुलूख आपल्या ताब्यात आणला होता. औरंगजेब बादशहाशी झालेल्या युद्धानंतर मराठ्यांनी हा मुलुख पुनश्च आपल्या ताब्यात आणला.
त्याचबरोबर पेशवे घराण्याचे हे मूळ गाव असल्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्यासुद्धा हे गाव एक महत्त्वाचे ठिकाण म्हणून परिचित आहे.
।।श्री शाहू नरपती हर्षनिधान
बाळाजी विश्वनाथ मुख्यप्रधान।।
अशी त्यांची मुद्रा त्यांच्या दूरदृष्टीची आणि कर्तव्य निष्ठेची द्योतक आहे!
पेशव्यांचे मूळ आडनाव भट असे होते आणि त्यांच्याकडे श्रीवर्धनची देशमुखी होती. या गावात पेशवे कुटुंबियांचा त्यांच्या सामाजिक दर्जानुसार खूप मोठा आणि औरसचौरस असा वाडा होता. बाळाजी विश्वनाथ भट यांस त्यांची बुद्धिमत्ता आणि कामाची चिकाटी या जोरावर पुण्याची सुभेदारी मिळाली होती. शाहूछत्रपती आणि ताराबाई या मराठा राजघराण्यामधील कलहामध्ये बाळाजी विश्वनाथाने शाहू छत्रपतींची बाजू घेतली आणि बाळाजीच्या मुत्सद्दीपणामुळेच कान्होजी आंग्रे आणि इतर काही मातब्बर सरदार शाहूछत्रपतींना येऊन सामील झाले. बाळाजी विश्वनाथ यांना सन १७११ मध्ये सेनाकर्ते ही पदवी मिळाली. या पहिल्या पेशव्याचा अंत २ एप्रिल १७२० रोजी सासवड येथे झाला.
श्रीवर्धन मध्ये श्री लक्ष्मीनारायण मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर होयसळ शैलीचे आहे. गावात प्राचीन शिवमंदिर सुद्धा आहे.
मराठा साम्राज्य निर्माणाच्या पायाभरणीत महत्त्वाची भूमिका अदा करणाऱ्या या महान पेशव्यांचे स्मारक आज येथे खडे आहे. छत्रपतींचे त्यावरील उद्गार आजही त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची जाणीव करून देतात-
"कर्तव्य म्हणून फलाशेची परवा न करता स्वराज्यासाठी काया-वाचा-मने करून आजन्म खपणारे तुम्हा सारखा अतुल पराक्रमी सेवक असता स्वामींनी हृद्रोग धरावा असा प्रकार नाही!! - शाहू छत्रपती महाराज
सर्वत्र दिसणाऱ्या सुपारीच्या झाडांच्या हिरवाईमुळे श्रीवर्धन गाव मोठे रमणीय दिसते. लाल कौलारू छपरे असलेली टुमदार कोकणी घरे असे हे इतिहासाची व निसर्गाची भेट घडवून देणारे ठिकाण कायम स्मरणात राहील. श्रीवर्धनवरून वीस मिनिटात होडीने किंवा रस्त्याने हरिहरेश्वरला जाता येते. तसे माणगाव रेल्वे स्टेशन वरून श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर हे फक्त ४५ किमी अंतरावर येते.
हरिहरेश्वर-
रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वरला भारतातील एक महत्वाचे तीर्थस्थान मानले जाते. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे. गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे. या क्षेत्रास भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळाला असल्याचे मानले जाते. त्यामुळेच याचा संदर्भ देवघर किंवा देवाचे निवासस्थान असाही दिला जातो. श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत आहे. येथे असलेली काळभैरव आणि श्री योगेश्वरी यांची देवळे देखील महत्वाची स्थाने आहेत.
हरिहरेश्वरला homestay बरोबर महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे उत्तम विश्रामगृह राहण्यासाठी सज्ज आहे. येथून पुढे बागमंडले या गावाहून सावित्री नदी ओलांडण्यास बाणकोट किल्ल्याकडे जाता येते. तसेच नाना फडणवीसांचे जन्म गाव वेळास येथेही जाता येते.
असो, असे हे श्रीवर्धन आणि त्याच्या बगलेला असलेले हरिहरेश्वर म्हणजे पृथ्वीतलावरील आविष्कारच होय. सुंदर-सुंदर वाड्या आणि आणि वळणदार रस्ते, कडेकडेने सोबत चालणारा निळाशार समुद्र कधी पुराणात तर कधी इतिहासात तर कधी निसर्गात रममान करतो. तेव्हा आम्ही सारेच हरवून जातो या सुपारी अन् नारळाच्या जंगलात, कारण काँक्रीटची जंगले आणि माणसांच्या वस्त्या याच्याच सवयी झाल्या आम्हास.!!!
।।फक्तइतिहास।।
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
Comments
Post a Comment
... मग कशी वाटली पोस्ट