Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

मीर कवीच्या आत्मचरित्रातील 'पानीपत'

 



थंडी पडू लागली की आठवणीतील चित्रे तरळू लागतात...यमुनेच्या पात्रवरून वाहणाऱ्या थंडगार वार्‍याने इतिहासाची पाने पुनश्च फडफडून लागतात.. त्याच त्या युद्धकथा स्मरू लागतात...

होय पानिपत.!

उर्दू, फारसी, मराठी, इंग्रजी अशा विविध साधनातून पुढील काही दिवस आपण वेध घेऊ पानिपताचा...

बघूया

मीर कवीच्या आत्मचरित्रातील 'पानीपत'-

उर्दू कवि मीर तकी मीर याचा जन्म १७२२ साली आग्रा येथे झाला. मीरचे घराणे मूळ अरबस्थानातील. त्याचे पूर्वज गुजराथेंत अहमदाबाद येथे स्थायिक झाले. त्याचा आजा आग्र्यास गेला. मीरचा बाप हा एक नामांकित सूफी होता. मीरच्या ११ व्या वर्षी तो मरण पावला व मीरला दिल्लीस जाणे भाग पडले. वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत मीर दिल्लीस राहिला. दिल्ली अनेकदा उध्वस्त झालेली त्याने पाहिली. १७८२ साली तो लखनौच्या नवाबाच्या आश्रयास गेला. मग तो शेवटपर्यंत तेथेच राहिला. १८१० मध्ये तो मृत्यु पावला. मीरचे आत्मचरित्र फारसी भाषेत आहे. जदुनाथ सरकारांनी त्याचे भाषांतर केले आहे. मीरने मराठे दिल्लीस आले तेव्हा ते शहर सोडले व विजय संपादून अहमदशहा दिल्लीस पोचल्यावर मीर दिल्लीस आला.


पानीपतबद्दल मीर म्हणतो, “मराठे आपल्या गनिसी काव्याने लढते तर त्यांना जय मिळणे शक्य होते. भोवती तोफखाना ठेवून ते कोंडून बसले आणि बादशाही (अब्दाली) फौजेने त्यांची रसद बंद करण्याची व्यवस्था केली. कोंडमारा असह्य होऊन मराठ्यांची फौज लढण्याला उद्युक्त झाली... दक्षिणेचा सरदार (भाऊ) हिंमतीने मैदानात उतरला. त्याने बादशाही फौजेची अनेक पथके पिटाळून लाविली. पण यश अब्दालीच्या नशिबी लिहिले होते त्यामुळे त्यांच्या (मराठ्यांच्या) प्रयत्नाचा काही उपयोग झाला नाही. पहिल्याच हल्ल्यात विश्वासरावाला एक तीर लागला. तो राज्याचा युवराज होता. तो मारला गेला (खाको खून मे लौट गया). असे म्हणतात की भाऊ मोठा स्वाभिमानी होता. तो शौर्याची शर्थ करीत होता. जेव्हा त्याने विश्वासरावाचा प्रकार आपल्या डोळ्याने पाहिला तेव्हा तो म्हणाला की, दक्षिणेत जाण्यास आता मला तोंड राहिले नाही आणि मग त्याने जिवावर उदार होऊन अब्दालीच्या फौजेच्या मध्यावर हल्ला केला. म्हणजे त्याने जाणून बुजून आपल्याला मृत्यूच्या दाढेत लोटले. मल्हारराव दोन तीन हजार सैन्यासहित तेथून पळाला. बाकीचे सर्व लष्कर गारद झाले. जे सरदार वाचले ते भिकाऱ्यासारखे भटकू लागले. हजारो शिपायांचे घोडे आणि हत्यारे जवळपासच्या जमीनदारांच्या हाती लागली. या समाजाला (मराठ्यांच्या) किती वाईट दिवस पहावा लागला हे मी कसे वर्णन करू. हजारो उघडे नागडे, आणि रडतखडत रस्त्यावरून जात तेव्हा पाहणाऱ्यांना विलक्षण वाटे. गावचे लोक प्रत्येकाला एक एक मूठभर चणे देत आणि त्याच्या मानाने आपण कितीतरी बरे आहोत हे पाहून परमेश्वराचे आभार मानीत. असा धडा शिकविणारा पराजय क्वचितच कुणाच्या वाटेला आला असेल. अनेकजण उपासमारीने गेले. अनेकांनी थंडीमुळे कांकडून जीव दिला. दिल्लीत फौज होती ती बादशाही फौजेच्या भीतीने रातोरात पळून गेली. कोट्यावधी रुपयांची संपत्ती अब्दाली आणि त्यांच्या सरदारांच्या हाती लागली. ती त्यांनी आपसात वाटून घेतली. नगद रोकड आणि माल याशिवाय तोफखाना, हत्ती, बैल, घोडे, उंट हे शुजाउद्दौल्याने आपल्याकडे घेतले. दुराणीचे शिपाई फकीर होते ते संपन्न बनले. प्रत्येक दहबाशीला (दहा शिपायांचा नायक) शंभर उंटाचे सामान हाती लागले. प्रत्येकाचा आनंद गगनात मावत नव्हता. शहा अब्दालीसारखे घवघवीत यश भूतकाळातील कोणत्याच बादशहाला लाभले नाही. तो मोठ्या इतमामाने दिल्लीत दाखल झाला.'

मराठी साधने जेथे भाऊंना हट्टी दुराग्रही मानतात तिथे मीर कवीच्या या लेखणीतून भाऊ च्या स्वाभिमानाचे व शौर्याचे वर्णन मिळते. मल्हाररावांबद्दलही तो बोलून जातो. पण मल्हाररावांनी पानिपतनंतर नानासाहेबांना लिहिलेल्या पत्रात, आपणाला भाऊंनीच पेशव्यांचा कुटुंबकबिला घेऊन जाण्यास युद्धातून पाठवले होते असे लिहिले आहे. असो, विविध व्यक्तिमत्त्वांचा वेध विविध साधनांमधून उजेडात येईलच. मात्र हे नक्की,

रामायण महाभारत विसरता येत नाही आणि पानिपत हे आम्हाला विसरु देत नाही.!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

।।फक्तइतिहास।।


Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts