Skip to main content

Featured

कनकादित्य सूर्य मंदिर कशेळी

मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणच्या निरागस आणि दिव्यभूमीला स्पर्श करण्याचा योग आला. आदित्य म्हणजे सूर्य. तसे सूर्य मंदिर भारताबाहेरही आढळतात. त्यापैकी भारतात ओडिशा राज्यातील कोर्णाकचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्या वेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतिक होते. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आन अशी सूचना पुजारीने त्या व्यापाऱ्याला सांगितले. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्...

काजी हैदर: स्वराज्यातील तथाकथित निष्ठावान


कथा कोथळीगडाची -
काझी हैदर नावाचा एक हुशार व्यक्ती शिवछत्रपतींच्या दरबारी सेवेसाठी आला.याला छत्रपती शिवाजी महाराजांनी सन्मानाने वागविले. दरबारातील काही छोट्या-मोठ्या न्यायाचे अधिकार दिले, कधी वकिलाचा दर्जाही दिला.
महाराजांच्या निधनानंतर तो सन १६८१ मध्ये औरंगजेब चालून आला तेव्हा संपत्तीच्या मोहापायी छत्रपती संभाजीराजांशी गद्दारी करून हाच काझी हैदर बादशहाकडे (जुलै १६८३) गेला. बादशहाने त्याला " खान" पदवी देऊन नवाजिले. तसेच त्याला दहा हजार रोख आणि दोन हजारांची मनसब दिली.
याच काजीने अनेकांना फोडून बादशहाच्या चाकरीत आणले़. त्याला बऱ्याच वतनदारांची मनस्थिती ठाऊक होती, किल्ल्यांची माहिती होती. थोडक्यात त्याकडे स्वराज्यातील किल्ले आणि व्यक्तीची ब्लूप्रिंट होती.!
कर्जतच्या ईशान्येस असलेला "कोथळगड" बादशहाला त्यानेच मिळवून दिला. कसे बघा-
त्याच्या भावाचा मुलगा काजी मुहंमद आणि अब्दूल कादीर यांना बादशहाने मराठ्यांचे किल्ले जिंकण्याच्या कामगिरीवर नेमले. काझी हैदर ला किल्ल्याच्या मुलूखातील जहागीरदारांची चांगली माहिती होती. त्याने त्या जहागिरदाराला बादशाही मनसब मिळवून दिली. त्याच्याकडून किल्ल्याची महत्त्वीची माहिती काढली. गडावर किती
सैनिक आहेत, तोफा वगैरे किती तसेच गडावरील मानसे केव्हा व कोठे धान्य गोळा करायला जातात अशी सर्व माहिती दिली. एक दिवस गडावरील लोक धान्य गोळा करायला बाहेर गेले. हे समजल्यावर (१९ नोव्हेंबर १६८४ रोजी) काळ बघून काजी हैदर गडाजवळ आला. आपली फौज त्याने डोंगराच्या पायथ्याशी लपवून ठेवली. त्याने ओरडा केला की, 'दार उघडा माणसे धान्य घेऊन आले'. दार उघडले गेले आणि एल्गार झाला. मराठा सरदार नारोजी शौर्याने लढला पण कैद झाला.
कोथळगडाची किल्ली बादशहाकडे नगरच्या छावणीत पाठविण्यात आली. बादशहाला संभाजीराजांशी युद्ध पुकारून चार वर्षे लोटली तरी एकही किल्ला जिंकता आला नव्हता. कोथळगड हा पहीला व तोही फितूरांच्या कारवाईने मिळाला होता. काही असो हा पहीला विजय असल्याने बादशहाने किल्ल्याचे नाव ठेवले
". मिफ्ताउलफत्तेह. "
अर्थात विजयाची किल्ली.!कारण बादशहाच्या मते आता स्वराज्यातील सर्व किल्ल्याचे ताले तसेच फितुरीच्या चाबीने उघडणार होते!
थोडक्यात असे म्हणता येईल की छत्रपती शंभूराजांच्या बुलंद स्वराज्याला खिंडार पडलं ते कोथळी गडाच्या जाण्याने आणि ते पडणारा "काझी हैदर" हाच 'तथाकथित' निष्ठावान अर्थात फितूर होता!!
बिचार्‍याने सिद्धि हिलाल सारखी नमक हलाली दाखवली असती तर..
अफसोस इतिहास आपल्या मनानुसार चालत नाही..! पण इतिहास वारंवार आपले अस्तित्व दाखवून जातो..
....सुज्ञांस बहुत ते लिहणे काय.
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
||फक्तइतिहास||

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts