Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

एक सहज चिंतन- महाराज आणि शाहिस्तेखान


अफजलखानाच्या वधानंतर आदिलशहा अस्वस्थ झाला. विजापुराहून सिद्दी जोहर ३५-४० हजारांची फौज घेऊन पन्हाळ्यावर चालून आला. पन्हाळ्याचा वेढा पडला आणि महाराज वेढ्यात अडकून पडले ! ही घटना १६६० च्या मार्च महिन्यातील होय. तत्पूर्वी मागील वर्षीच्या १६५९ च्या जुलै महिन्यात औरंगजेबाला आपल्या गादीची शाश्वती मिळाली आणि त्याने दक्षिणेच्या सुभेदारीवर शायीस्तेखानाची नेमणूक केली.
१६५९ च्या १४ जुलै च्या पत्रात शिवाजी महाराजांना त्याने आपल्या राज्य रोहणाची बातमी कळवली. औरंगजेबाने महाराजांना लिहिले-
शाहिस्तेखानाच्या आज्ञेप्रमाणे वागा. त्याच्या आज्ञा पालनापासून कधीही ढळू नका. तुम्ही दिलेली आश्वासने उत्तम प्रकारे अमलात येतील यासाठी प्रयत्नशील राहा म्हणजे तुमच्या मागन्या मान्य करता येतील."

औरंगजेबाच्या सरकारी चरित्रग्रंथात म्हणजेच आलमगिरनामा या ग्रंथांमध्ये त्यावेळी औरंगजेबाचे काय हेतू होते यासंबंधी म्हटले आहे. त्याप्रमाणे-
बळ वाढत गेले तसे शिवाजीला विजापूरची भीती आणि परवा वाटेनाशी झाली. त्याने कोकण प्रदेशात आक्रमणे करून तो उध्वस्त करण्यास सुरुवात केली. काही वेळा संधी साधून त्याने बादशाही महालावर आक्रमणे केली. ही बातमी कळल्यावर बादशहाने दक्षिणेतील आपला सुभेदार अमीरूल-उमरा उर्फ शाहिस्तेखान याला पुढीलप्रमाणे आज्ञा केली-
"भक्कम सैन्य घेऊन तुम्ही चाल करून जा. त्या दुष्टाचे परिपत्य करण्यासाठी झटा. त्याचा प्रदेश आणि किल्ले जिंकून घ्या. आणि त्या प्रदेशातील सगळी बंडाळी मोडून काढा."
या आज्ञे प्रमाणे अमीरूलउमरा यांनी जमादिलावल च्या ५ तारखेस औरंगाबाद सोडले. नांदेडचा फौजदार मुक्तारखान याची औरंगाबादचा प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली. जमादिलावल महिन्याच्या ९ तारखेस (११ फेब्रुवारी ,१६६०) तो दक्षिणेकडे जाण्यास निघाला."

मोगलांनी तळकोकण प्रदेशाचा ताबा घेतला.  कल्याण-भिवंडी ही त्यांच्या ताब्यात आली. सलाबतखान दखनी याची तेथे तळकोकणचा फौजदार म्हणून नेमणूक करण्यात आली. शाहिस्तेखानाचा सिद्दी जोहरची ही पत्रव्यवहार होता. विजापूर दरबारातील मोगल वकील मोहम्मद अमन यास हालविण्यात येऊन त्याच्या जागेवर शाहिस्तेखानाचा विश्वासू अधिकारी मोहंमद सादिक याची नेमणूक करण्यात आली.
९ मे १६६० रोजी शाहिस्तेखान पुण्यात दाखल झाला.

औरंगाबाद येथून चालणारा दक्षिण सुभ्याचा कारभार आता पुण्यातून चालू लागला. शंभू छत्रपतींच्या काळात पुढे जेव्हा औरंगजेब आला तेव्हा त्याच्याबरोबर रेव्हेन्यू डिपार्टमेंट, फायनान्स डिपार्टमेंट, कस्टम डिपार्टमेंट असे सारे अधिकारी, सेक्रेटरी मिळून त्या छावणीत असत. तसेच काहीसे चित्र आता दिसू लागले. एकूण शाहिस्तेखानाचा मोठाच दबदबा निर्माण झाला !
मैदानी मुलुख मोगलांनी बळकटपणे आपल्या ताब्यात ठेवला, शिवाजी महाराजांनी तितक्याच मजबुतीने आपले किल्ले राखले. किल्ले हातात आल्याशिवाय मोगलांचा ताबा पूर्ण झाला असे म्हणता येत नव्हते. म्हणून पुण्याच्या उत्तरेस चाकण आहे. घाटाच्या वर शिवाजी महाराजांचे ते एक बळकट स्थळ होते. खानाने चाकण वर स्वारी केली. चाकणचा किल्ला हा काही डोंगरी किल्ला नव्हे. तो साधा भुईकोट होता. सारे मोगल सैन्य या किल्ल्याभोवती गोळा झाले. यावेळी प्रत्यक्ष शाहिस्तेखान नेतृत्व करीत होता. असे असूनही मराठ्यांनी अडीच महिन्यांच्या वर किल्ला लढविला, याचे श्रेय किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यास आहे.
मोगलांच्या पक्षात मोगल अधिकार्‍यांची प्रभावी रांग होती. तरी मोगलांचे २६८ सैनिक मारले गेले आणि ६४० जखमी झाले. ईशान्येकडील बुरूज कोसळला तेव्हा कोठे किल्ल्यातील शिबंदीने १५ ऑगस्ट १६६० रोजी किल्ला सोडून देण्याचे मान्य केले. मात्र या पश्चात शाहिस्तेखान पुण्यात येऊन छावणी करून राहिला.
महिन्यापूर्वीच महाराजही सिद्दी जोहरच्या वेढ्यातून निसटले होते. गजापुरच्या खिंडीत साक्षात मृत्यूला अडवून बाजी प्रभु देशपांड्यांनी महाराजांस वाट दिली. महाराज विशाळगडी सुखरूप पोहोचले.(१३ जुलै १६६०)
पन्हाळा किल्ला मात्र त्यांनी आदिलशहाला दिला. कारण एकाच वेळी मोगल आणि विजापुरी सैन्यास तोंड येणे शक्य नव्हते.
मोगलांच्या ताब्यात कोकण प्रांतातील कल्याण भिवंडीचा भाग होता. या प्रदेशाच्या दक्षिणेला असलेला किल्ला म्हणजे रायगड हा महाराजांच्या ताब्यात होता. महाराजांना त्याच्याही दक्षिणेकडे रेटण्याचा प्रयत्न मोगलांनी केला. अशाच एका मोहिमेचे नेतृत्व शाहिस्तेखानाचा अधिकारी कारतलबखान याच्याकडे होते. वर्षाच्या अखेरीस कारतलबखान हा बरेच सैन्य घेऊन लोणावळ्या जवळील घाटावरून कोकणात उतरला. महाराजांनी या सैन्याला घनदाट अरण्यात येऊ दिले. हे अरण्य नऊ किमी लांब होते. उंबर नावाच्या खेड्यावरून ह्या घाटाला उंबरखिंड  म्हणत.

खानाची कोंडी झाली. महाराजांनी त्याचा सारा सरंजाम जप्त करून मगच त्याला परत जाऊ दिले.
महाराजांनी आपले सैन्याचे दोन भाग केले. एका सैन्याचे नेतृत्व नेतोजी पालकर याकडे तर दुसरे सैन्य स्वतः महाराजांच्या नेतृत्वखाली.
महाराजांनी याच सुमारास दक्षिणेकडे आदिलशाही कोकणच्या इलाख्यात चाल करून दाभोळ, पाली, संगमेश्वर, चिपळूण, राजापूर आणि इतर महत्त्वाची ठिकाणे ताब्यात घेतली. मुबलक संपत्तीचाही लाभ झाला. मोगलांशी लढा चालू ठेवण्यासाठी या संपत्तीची अतिशय आवश्यकता होती. पाली आणि शृंगारपूर येथील लहान राज्ये स्वराज्यात सामील करण्यात आली. राजापूरकर इंग्रजांनी सिद्दी जोहरला वेढ्यात दारूगोळ्याची मदत केली होती. त्यांनाही कैद करण्यात येऊन प्रथम वासोटा नंतर सोनगड किल्ल्यातून ठेवण्यात आले.

शाहिस्तेखानाचे मुख्य ठाणे म्हणजे पुणे आणि पुण्याहून जवळच असलेले पुरंदर सिंहगड तोरणा आणि लोहगड हे जबरदस्त किल्ले महाराजांच्या ताब्यात होते.
याप्रमाणे मैदानात मोगल आणि किल्ल्यावर महाराज यात बदल होण्याची चिन्हे दिसेनात. जितके लढावयास हवे तितके शाहिस्तेखानाकडून होत नव्हते हे उघड आहे. यामुळे औरंगजेब बादशहा असंतुष्ट झाला. १६६१ मध्ये शाहिस्तेखानाला मदत करण्यासाठी म्हणून त्याने जोधपूरचा महाराज जसवंतसिंग
याला दक्षिणेत पाठवले पण परिस्थिती काही बदलली नाही. मोगल मराठ्यांच्या किल्ल्यांना काही करून हात लावत नव्हते. ते निष्फळ आणि निरर्थक फक्त छापेमारी करीत राहिले. २६ जानेवारीच्या(१६६२) च्या अखबार मध्ये अशा प्रकारच्या एका हल्ल्याचे एक उदाहरण आहे-
"बातमी आली की पुण्यापासून चाळीस मैलावर लोहगड आणि इतर किल्ल्यांच्या पायथ्याशी हलकट शत्रूंची खेडी वसली आहेत. सुभेदारांनी (शाहिस्तेखान) ११ तारखेस गुरुवारी नामदारखान आणि इतर मनसबदार यांना या खेड्यांच्या दिशेने पाठविले... रस्त्याच्या कडेला असलेल्या खेड्यांना त्याने आगी लावल्या.. गुरेढोरे जप्त केली.."
असो,
आता प्रश्न असा आहे की महाराज दोन वर्षांपर्यंत (१६६१-६२ मध्ये) दक्षिण कोकणात आहेत. अर्थात सिद्धी जोहरच्या वेढ्यातून महाराज निसटले त्यानंतर महाराजांनी पन्हाळ्याच्या वेढ्यात सिद्दी जोहरला मदत करणाऱ्या स्थानिक राजांना शासन करण्याचे ठरविले. म्हणून त्यांनी शृंगारपुरचे सुर्वे, पाली चा राजा यशवंतराव यांना शासन केले. राजापुरात जवळ इंग्रजांना शासन केले वगैरे, त्याहीपुढे जाऊन मग त्यांनी गोव्या पर्यंत धडक मारली.
कल्याण परत मिळविण्याचाही प्रयत्न केला पण कल्याण भिवंडी त्यांच्या हाती लागली नाही.
असो,
शाहिस्तेखानाच्या ताब्यात असलेल्या या पुणे प्रांतात शाहिस्तेखानाचे सुभेदार, फौजदार(कलेक्टर), मामलेदार असे एकूण संपूर्ण सिविल ऍडमिनिस्ट्रेशन कार्यरत आहे. या भूमीची मोजणी झालेली असते व मोगल त्यापासून शेतसारा सुद्धा वसूल करतात. मात्र येथून सिंहगडाचा किल्ला केवळ बारा मैलांवर उभा आहे आणि तेथे मराठ्यांची शिबंदी रात्रंदिवस पहारा करीत उभी आहे.
बाजूला २५ मैलावर राजगड आहे. एवढेच नाही तर ज्या कल्याणच्या भागात मोगलांचा राबता आहे, त्या भागातील कर्नाळा आणि माहुली हे किल्ले मात्र महाराजांच्या ताब्यात आहेत. अर्थात मराठ्यांचे किल्ले एवढ्या जवळ असुन सुद्धा शास्ताखानाने त्यावर आक्रमण का केले नाही याबद्दल मत व्यक्त करताना जदुनाथ सरकार म्हणतात की, चाकणच्या वेढ्यामध्ये शाहिस्तेखानाची जबर हानी झाली यावरून त्याला असे वाटले की मराठ्यांची एक लहानशी गढी घेण्यासाठी मला जर ५६ दिवस लागतात व त्यामध्ये सुद्धा ९०० माणसांची हानी सोसावी लागते आणि किल्ला हाती येतो तर सिंहगडा पुढे माझे काय होणार ? रायगडाला माझी काय स्थिती होणार ? पुरंदर हाती कसा येणार ?त्यापेक्षा शिवाजी महाराजांच्या ताब्यात किल्ले राहू द्यावे, मैदान आहे माझ्या ताब्यात. ठाण मांडून पुण्याला बसतो, मी तिथून हलत नाही. हळूहळू मराठ्यांना कळू लागेल की भोवतालचा प्रदेश हाती आल्याशिवाय किल्ले ताब्यात असून काय उपयोग ? आणि मग मराठे तडजोड करतील. ही भूमिका शाहिस्तेखानाची असावी असे जदुनाथ सरकार म्हणतात.
असो,
परंतु किल्ल्यांवर हल्ला का झाला नाही, किमान महाराज जेव्हा दाभोळच्या दक्षिणेला मोगल राज्यातून वेंगुर्ले राजापूर मालवण आणि सावंतवाडी कडे जातात तेव्हा मोगल पुण्याला बसून काय करीत होते. त्यांना राजगड, लोहगड वगैरेची शिबंदी कमी असावी व महाराज जर कुठेतरी बाहेर गेले तर तिथे त्याचा किती टिकाव लागू शकेल याची कल्पना असू नये काय ?
पुढे जयसिंगाने तीन महिन्यांच्या आत महाराजांना शरण यावयास लावले म्हणजे काय ? शाहिस्तेखानाने ते का केले नाही ? आता याला उत्तर देणे कठीण आहे. याला पुरावा सापडत नाही. आपल्याला तर्कच करावा लागतो. कदाचित अलिखित सुद्धा बोलणी असावी.. परंतु महाराज काय करताहेत हे शाहिस्तेखान स्वस्थ पाहतो आहे असे कळल्यावर महाराजांना असे वाटले असावे की, मी दक्षिण कोकणमध्ये काही ढवळाढवळ केली तरी मोगल काही पाठलाग करीत नाहीत. याची कोणत्या ना कोणत्या रीतीने तरी महाराजांना खात्री झाली असावी.
नाहीतरी इतक्या निर्धास्त मनाने महाराज दक्षिण कोकणात आपले सैन्य कसे उतरू शकतील हा एक प्रश्न आहे.
आता दुसरा एक मार्ग आहे भीमसेन सक्सेना हा इतिहासकार ! तो औरंगाबादेला आहे. त्याचा काका शाहिस्तेखानाच्या छावणीमध्ये कारकून आहे. आणि तीन वर्षेपर्यंत शाहिस्तेखान पुण्यात आहे त्यावेळीच्या जीवनाचे वर्णन भीमसेनने करून ठेवले आहे. तो म्हणतो की-
ते इतक्या ऐषारामात ते राहत होते की पाच रुपये पगाराचा मनुष्यसुद्धा अतिशय राजेशाही थाटात राहत असे. मेजवान्या काय आणि अमुक तमुक काय थाट असे. दहा रुपये पगार असलेला स्वार आपल्या बायकापोरांची सांभाळ करीत असे, शिवाय घोड्यावर लक्ष देत असे. एकंदरीत व्यवस्था चांगली होती असा उल्लेख केलेला आढळतो. सगळा कारभार आरामात चाललेला आहे आणि शाहिस्तेखानाचा थाट काय वर्णावा ? सभासदानेच एका शब्दात वर्णन केले आहे - "बादशहाची केवळ प्रतिमा."
हा शाहिस्तेखान म्हणजे तीन पिढ्यांचा उमराव. शाहिस्तेखानाचा बाप आसफखान हा शहाजहानचा मुख्य प्रधान, असफखानाची मुलगी मुमताज महल ही शहाजहानची बायको, आसफखानाचा बाप इतमादद्दौला हा अकबराचा मुख्यप्रधान. शहाजहानची बायको व औरंगजेबाची आई ही शाहिस्तेखानाची बहीण. ही सगळी नाती अशी गुंफलेली आहेत. मुमताज महलच्या चार बहिणी मोठमोठ्या सरदारांना दिलेल्या. त्यात जाफर बेग आहे, तो माळव्याला सुभेदार आहे. त्यालाही सांगण्यात आले होते की शाहिस्तेखानाच्या मदतीला जा.
त्यानंतर भविष्यात त्याची नेमणूक व्हावयाची होती ते मुख्यप्रधान म्हणून. त्याचे दोन मुलगे नामदारखान व दुसरा कामदारखान. कामदारखानाशी शाहिस्तेखानाची मुलगी परी बेगम हिचा निकाह मुक्रर झाला आहे. तोच विवाह समारंभ पुण्यात याच सुमारास झाला त्याचे मोठे रसभरीत वर्णन भीमसेन सक्सेनाने केलेले आहे.
१२ मैलावर सिंहगडावरून मराठे पाहताहेत, राजगडावर शिवाजी महाराज संधीची वाट पाहात आहेत आणि इकडे पुण्यात महिनाभर लग्नाचा जल्लोष उडाला आहे. परीबेगम आणि कामदारखान मेजवान्या झोडीत आहेत, लाखो रुपयांच्या देणग्या देत आहेत, आहेर आहेत, आंदण आहे, काही विचारूच नका !
महिनाभराचा जल्लोष  झाल्यानंतर फक्त जाफरबेग आपली रजा संपवून जेव्हा आग्र्याकडे परत जायला निघाला तेव्हा शाहिस्तेखान सहज म्हणाला की, "नबाबसाहेब आपण चालला आहात दिल्लीकडे, तेव्हा जाताना जरा औरंगाबादला उतरा, आणि म्हणावे आम्हाला जरा तोफखाना कमी पडतोय. त्या तोफा जरा पाठवून द्या म्हणावं,"
तर भिमसेन सक्सेनाने लिहिले की -
(भीमसेन सक्सेना चा बाप रघुनंदन सक्सेना हा औरंगाबादच्या तोफखान्याचा हिशोबनिस व सुप्रीटेंडंट होता)
जाफरबेग आल्यानंतर त्याने रघुनंदन सक्सेना ला सांगितले की, 'उद्या सकाळी परेड करा. मला सगळ्या तोफा पाहावयाच्या आहेत. आणि त्या सगळ्या तोफा शाहिस्तेखानाकडे पाठवायच्या आहेत. नवाब साहेब आताच कुठे लग्न कार्यातून मोकळे झाले आहेत.
मोगलांच्या काळात लग्न म्हणजे बाकी सगळे बंद. असेच आपल्याला उत्तर पेशवाईतील प्रसंग आठवतोय तो सवाई माधवराव पेशव्याच्या लग्नाचा. त्यावेळी महिनाभर सर्व कचोऱ्या बंद होत्या आणि कलकत्त्याचा लॉर्ड कॉर्नवॉलिस याची सारखी पत्रे येतात की, कॉन्टेक्ट समबडी इन पुना.
असो,
शाहिस्तेखानाच्या परी बेगमच्या लग्नाची तीच हकिगत आहे. गंमत म्हणजे जाफर बेग जायला निघाला अन् सहजच शाहिस्तेखानाला आठवलं ते तोफांच!
नामदारखान हा लढाऊ वृत्तीचा. भीमसेन सक्सेना म्हणतो ते आपल्या भाषेत सांगायचं तर,
बघा पाऊन लाखाचे सैन्य पुण्याला बसलेले आहे. या जाफर बेगचा मुलगा नामदारखान हरावल(बिनीला) अर्थात एडवांस गार्ड ! तो पुण्यात आला आणि त्यानं पाहिले की, महिन्यातून पंधरा दिवस मोगल माशा मारीत बसलेले असतात. उगीच आपली हूल उठवावयाची. मराठ्यांनी आमक्या खेड्यावर हल्ला केला. शे-पन्नास लोक जायचे, परत यायचे. असे वर्षभरानंतर पाहून एक दिवस त्याने शाहिस्तेखानाला विचारले-
"नवाब साहेब, आपण नात्याने माझ्या मावशीचे यजमान आहात व माझे बॉस आहात. मला एक शंका आली की विचारू का? ते म्हणाले "विचारा" नवाब साहेब हुक्का ओळीत बसले होते.
तो म्हणू लागला, "शिवाजी शिवाजी आपण म्हणता. आपले सैन्य मेटाकुटीला यावे एवढे सैन्य त्याच्यापाशी नाही. माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यापाशी तीन हजार घोडेस्वार व पाच हजार पायदळ आहे व काही किल्ले आहेत. याचे राज्य हे पुणे, सुपे, इंदापूर, बारामती हे सुद्धा आम्ही 'ऑक्युपाय' केलेले आहे. तेव्हा जास्तीत जास्त दहा हजार सैन्य आपण माझ्याजवळ द्या. मी तीन महिन्यांमध्ये त्याला वठणीवर आणतो व तो कुठे आहे ते पाहतो."
शाहिस्तेखानाने उत्तर काय द्यावे, तो म्हणाला- "तुम्ही अजून बच्चे हो, अजून लहान आहात."
तो म्हणाला-
इथे लहान आणि मोठ्याचा प्रश्न काय ?
शाइस्तेखान म्हणाला-
हे पहा एक प्रश्न मला विचारायचा आहे. शिवाजी महाराजांची मोहीम संपली तर या भारतामध्ये औरंगजेबाला कोणी शत्रू आहे का ?
"नाही बुवा"
शाहिस्तेखान म्हणाला -
आसामपासून गोहत्तीपासून काठेवाड पर्यंत व काबुलपासून खाली कन्याकुमारी, विजापूर गोलकोंडा आपल्याच हातात आहे. दुसरा मला तर कोणी शत्रु दिसत नाही. नाही म्हणायला एक आहे तर कंधारचा किल्ला.!

(कंदहारचा किल्ला- तो आपल्या ताब्यात यावा म्हणून मोगल बादशहा सारखी धडपड करीत. अकबराच्या काळात कंधार मोगलांकडे होता पश्चात जहांगीर च्या काळात तो जिंकून घेतला. शहाजहानच्या काळात अनेक वेळा त्याला वेढे घालण्यात आले मात्र तो हाती आला नाही.
इराणचा शहा अब्बास हा मोठा कर्तबगार होता.
कंधार कडे मोगलांची वाकड्या डोळ्यांनी पाहण्याची सुद्धा छाती होत नव्हती. पण इच्छा अशी की कंधारचा किल्ला आपल्या ताब्यात यावा. पण कंधारचा तो हिवाळा व कंधारचे ते कडवे पठाण त्यात तिकडे इराणची शक्ती म्हणून कुण्याही मोगल सेनापतीला कंधार च्या नावाने अंगावर काटा येई!)

मग शाहिस्तेखान म्हणाला- नामदारखान, समजा आपण शिवाजीची मोहीम संपवली ! संपवू- तीन महिने, चार महिने, पाच महिने, पुढे जाऊन जाऊन कुठे जाणार आहे ? समजा आपल्याला बादशहाचा हुकूम आला तर आनंदाची गोष्ट आहे. अभिनंदन, शिवाजी वरची मोहीम तुम्ही संपवली, आता हे सगळे सैन्य घ्या आणि कंधारचे सीमेवर जाऊन मरा !!
तुमची तयारी आहे काय ? त्या मोहिमेवर जाण्यास तुम्ही तयार असाल तर शिवाजी वरची मोहीम संपविण्यास माझी काही हरकत नाही.

नामदार खान म्हणाला "नाही".
शास्ताखानाने म्हंटले "मग बोलू नका" आणि दुसरे म्हणजे समजा आपण शिवाजीची मोहीम संपवली. पाऊण लाख सैन्य आहे, मग बादशहा म्हणेल कंदाहारच्या मोहिमेवर जाता येत नसेल तर आता सैन्य बरखास्त करा. त्यांना घरी बसवा. जाऊ दे शिपायांना घरी. सत्त्याहत्तर हजार फौज. जे लोक कमी केले तर त्या गरीब लोकांनी पोटाला काय खावे ? यासाठी शिवाजीविरुद्ध चाललेली मोहीम लांबवावी आणि बढतीची आशा बाळगून राहावे हे बरे. आपले सगळे प्रयत्न याच दिशेने झाले पाहिजेत.  तोपर्यंत सत्त्याहत्तर हजार पोटं भरणार. तोपर्यंत कंधारची मोहीम लांबणीवर पडणार.
बादशहाला आम्ही लिहून कळविणार, आज हा किल्ला घेतला, आज हे मैदान मारलं, आज अमुक केलं उद्या तमुक करणार असे सारखे 'डिस्पेचेस' पाठवत जाऊ, पण मोहीम काही संपविणार नाही."
नामदारखान गप्प झाला. अर्थात राजकारण हे सर्वश्रेष्ठ असते हे त्याच्याही लक्षात आलय एव्हाना !
किती भयानक प्रकाश पडतो मोगल सेनापतींच्या या धोरणावर. हे जर त्या भिमसेन सक्सेनाने आपल्या आत्मचरित्रामध्ये नोंदवून ठेवले नसते तर आपल्याला खरं सुद्धा वाटलं नसतं ही परिस्थिती आहे.
तिकडे दिल्लीत बादशहा जवळचे लोक म्हणताहेत शिवाजी महाराजांची मोहीम लांबते का? पण व्यवस्था अशी की येथुन तिकडे जाणार्‍या प्रत्येकाने सांगावं - अरे काय समजता, शिवाजी महाराजांशी लढणं म्हणजे काय पंजाबमध्ये लढल्या सारखे आहे काय?  किती मोठे डोंगर आणि किती कठीण हे काम. सगळे वचकून गेले आहेत तिकडे !
आणि इकडे शाहिस्तेखान मुलीचे लग्न ठरवतो, जल्लोषात सगळे काही छान चाललं आहे. पण शिवाजी महाराजांच्या समोर प्रश्न उभा राहिला की आता मैदानावर पुणे त्याच्या ताब्यात गेलेले आहे. गावं सगळीच ताब्यात गेली आहेत. किल्ले फक्त आपल्या ताब्यात राहिले आहेत. मोगलांच्या हातून हा प्रांत हिसकावून घ्यायला पाहिजे. पहिल्यांदा त्यांनी काय केलं, की सोनोपंत डबीर यांना पाठविले शाईस्तेखानाकडे. सोनोपंत खानास म्हणतात- फक्त एवढेच आहे की देवस्थान तीर्थ दर्गे वगैरेंना इनामे जी चालली होती ती चालूच ठेवा.
"पूर्वी आम्हास  मोकासा असताना अफझल खान पावेतो दर्गे देवस्थाने वगैरे यांची ही इनामी चालत होती ती तशीच चालत राहावी असा तह जाहला आहे" अशा प्रकारचे पत्र आहे.
त्यावर खानाने सांगितले की -
"त्याची काळजी करू नका."
दुसरे पत्र ९१ कलमी बखर मध्ये आहे. मोठी गंमत आहे. शाहिस्तेखानाने म्हणे आपल्या दरबारातील संस्कृत जाणणाऱ्या पंडितांकडून एक कविता लिहून पाठवली शिवाजी महाराजांकडे-
"तू डोंगरात फिरणारा वानर आहेस  तर  पर्वताचे पंख कापणारा मी वज्रपाणी इंद्रा आहे."
त्याला महाराजांनी उत्तर पाठवलं की-
एका वानराने लंका जाळली हे विसरू नका.
असो,
आता महाराजांच्या समोर प्रश्न पडला तो हा की किती दिवस हा इथे ठाण मांडून राहणार आहे ?आणि मोगलांनी नेहमीप्रमाणे पैशाची पिशवी मोकळी ठेवलेली आहे. महाराष्ट्रातले वतनदार, देशमुख, देशपांडे, देसाई, नाडगौडा, नाडकर्णी त्यांच्यापैकी लोक आता शाईस्तेखानाकडे चालले आहेत.
भलेभले म्हणणारे खांद्याला खांदा लावून लढणारे लोक सुद्धा पैशाला बळी पडू लागले. अत्यंत शोचनीय गोष्ट म्हणजे संभाजी कावजी ज्याने चंद्रराव मोरेच्या मोहिमेमध्ये व अफजलखान प्रसंगांमध्येही मोठी कामगिरी केली. शिवाजी महाराजांचे अंगरक्षकांत असलेला हा संभाजी कावजी शाहिस्तेखानाच्या नोकरीत जातो आणि त्याची नेमणूक होते ठाणेदार म्हणून ! आणि महाराजांनी प्रतापराव गुजर यांना पाठवल्या बरोबर त्याच्याशी लढत असतांना हा ठार मारला जातो !
आम्ही दक्षिण कोकणात किती धडपड केली, वाडीच्या सावंतांना आम्ही जेरीस आणलं, मालवण वेंगुर्ल्यापर्यंत चा भाग जरी आम्ही जिंकला तरी पुण्यामध्ये हा शत्रू ठाण मांडून बसलेला आहे तो लढतही नाही. मात्र फितवतो. ही कोंडी फोडली पाहिजे !
भीमसेन म्हणतो-
"शाहिस्तेखान पुण्यात होता. शिवाजीच्या बुद्धिमत्तेची, चातुर्याची आणि योजनांची शाहिस्तेखानला अजिबात कल्पना नव्हती. तो दुर्लक्ष करीत राहिला. शिवाजीची साधने मर्यादित होती. तरीही त्याने मोगलांशी लढा चालू ठेवला होता. मर्यादित साधने असूनही त्याचे हल्ले मात्र धाडसी असत. आपल्या हेरांकडून शिवाजीने शाहिस्तेखानाच्या छावणीचा बाजार आणि तेथील रस्ते आणि गल्ली बोळ याची इत्थंभूत माहिती मिळवली होती."
असा प्रसंग रोमांचित करणारा घडला तो ५ एप्रिल १६६३ रोजी मध्यरात्री !!

आणि हो शाहिस्ताखान पूर्वी म्हणाला त्याप्रमाणे जाफरखानाने औरंगाबादेत गेल्यावर आठवणीने भीमसेनच्या बापाकडे तोफांची विचारणा केली होती बरं ! मग या भीमसेनच्या बापाने काही तोफा मैदानात दाखविल्या व म्हणाला- साहेब या तोफा आहेत, पहा बरं''
त्या पाहुन खानाकडे पाठवायचे सांगून जाफरखान दिल्लीकडे निघून गेला. पुढे भीमसेन म्हणतो की आम्ही व आमचे वडील पुण्याकडे तोफा पाठविण्याच्या बेतात होतो, पण इतक्यात बातमी आली ती-
शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर छापा घातला आणि त्याची बोटेच छाटली.!!!
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts