दिल्लीचा एक धर्मशास्त्रज्ञ नाव होते शहा वलीउल्लाह !
या शहावली चा जन्म १७०३ मध्ये दिल्ली येथे झाला. त्याचा बाप अब्दुल रहीम हासुद्धा मोठा पंडित होऊन गेला. औरंगजेबाने व्यवहार धर्मशास्त्रावर विद्वानांकडून "फतवाये आलमगिरी" हा जो ग्रंथ लिहून घेतला त्यात अब्दुल रहीम याचाही वाटा होता.
अब्दुल रहीम ने दिल्ली येथे 'मदरसे रहिमिया' या नावाचे मुस्लिम धर्मशास्त्राच्या अभ्यासाचे विद्यापीठ स्थापन केले होते.
त्यात त्याचा मुलगा शहावलीचे शिक्षण झाले व आपल्या बापाच्या देखरेखीखाली हा शहावली अल्पकाळातच फारसी आणि अरबी या भाषांवर असामान्य प्रभुत्व मिळवून बसला.
इस्लामी धर्मशास्त्राचे प्रमुख अंगे म्हणजे कुराण, हदीस (पैगंबराच्या आठवणी) आणि फिका(व्यवहार धर्मशास्त्र).
व्यवहार धर्मशास्त्राच्या दृष्टीने सुन्नी मुसलमानात हनफी, मलिकी, शाफी आणि अंबाली हे भेद प्रवाह आढळतात.
यातील प्रत्येक भेदाचा शहावली ने कसून अभ्यास केला आणि थोड्याच काळात तो पारंगत झाला.
सन १७३१ मध्ये शाहवली ने मक्केची यात्रा केली. शहावलीच्या पांडित्याचा तेथील विद्वानांवर विलक्षण प्रभाव पडून त्याची कीर्ती जगतात पसरली. मक्केहून परत आल्यावर या शहावली ने आपले अध्ययन अध्यापनाचे कार्य चालू ठेवले आणि अनेक ग्रंथांचे लिखाण केले.
यापूर्वी कुराणाचा कोणी फारशी अनुवाद केला नव्हता कारण असे करणे अनुचित समजतं. पण प्रखर टीकेला न जुमानता शहावलीने हे काम तडीस नेले. त्याच्या ग्रंथांचा अभ्यास अद्याप ईजिप्त, सिरिया इत्यादी देशांतील धर्मपीठातून होत आहे.
आणि महान तत्त्वज्ञ म्हणून याच शहावली महाशयांचे शिष्य त्यांची तुलना रुसो, मार्क्स, हेगेल यांच्याशी करतात.! अर्थात फार मोठी व्यक्ती!!
पण येथे या शहावली उल्लाह साहेबांचे एवढे वर्णन सांगायचे कारण म्हणजे हाच शहावली प्रचंड महाभयंकर अशा पानिपताच्या युद्धास काही प्रमाणात का होईना पण कारण ठरला होता.!!
शहावली चा काळ म्हणजे मोगल साम्राज्याच्या पतनाचा काळ होय. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य मोडकळीस आले. गादीवर आलेले बादशहा हे नादान होते. सुभेदार स्वतंत्र झाले. मराठे आणि जाट यांनी तर दिल्लीपर्यंत धडका मारून साम्राज्याचा दुबळेपणा उघडकीस आणला होता.
दक्षिणेत निजाम आणि अयोध्येत साफ्दारजंग हे स्वतंत्र झाले तर पंजाब, काश्मीर आणि सिंध हे अफगाणांच्या ताब्यात गेले होते.
पंजाबात शिखांची बंडाळी सतत चालू होती. रोहिले सरदार नजीबखान, हाफिज रहमत खान, दुंदेखान वगैरेंनी रोहिलखंड बळकाविला होता.
नादिरशहा पश्चात अहमदशहा अब्दालीने दिल्ली अनेक वेळा लुटली होती.
या काळात प्रजेची स्थिती अत्यंत हलाखीची झाली. मुसलमानांचा वैभव त्यांचा दरारा ही सर्व नाहीशी होत असलेली पाहून या शहावली उल्लाह या मनुष्याला अतिशय तळमळ लागली होती. त्याचा मुख्य रोख मराठे आणि जाट यांच्याविरुद्ध होता. या जमाती मुळे मुसलमान हिनतेला पोचले अशी त्याची खात्री झाली. एकीकडे आपल्या बांधवांची सुधारणा व्हावी म्हणून त्यांने प्रयत्न केला तर दुसरीकडे बादशहा, नबाब आणि अमीर उमराव यांनी आपला आळस व दुर्बलता सोडून कार्यप्रवृत्त व्हावे म्हणून त्याने त्यांना सतत पत्रे लिहिली.
अनेकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. नजीबखान रोहिलाशी तर त्याचे गुरू-शिष्याचे नाते होते. भारतीय मुसलमानात हाच एक शक्तिमान असून मुसलमानाचे पूर्ववैभव प्राप्त करून देऊ शकेल असे त्याला वाटे.
पण शहावलीच्या आशा केंद्रित झाल्या त्या अहमदशहा अब्दालीवर. त्याने भारतात येऊन मराठ्यांचा नायनाट करावा म्हणून त्याने त्याला पत्रे लिहिली. शहा वली उल्लाहच्या या राजकीय पत्रांपैकी निवडक २६ पत्रे अलीगढ विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक खलील अहमद निजामी यांनी प्रसिद्ध केली आहेत.
"शहा वली उल्लाह देहलवी के सियासी मकतबात" या नावाने हा ग्रंथ १९५० मध्ये प्रसिद्ध झाला आहे.
आपल्या पत्रात महाशय शहा वली उल्लाह अहमदशाह अब्दालीला हिंदुस्थानात मोगल बादशहाची झालेली वाताहात कळवितात. दुसर्या एका पत्रात हा शहा वली उल्लाह म्हणतो की हे पत्र लिहीण्यास कारण इस्लाम चा अभिमान हा होय! परमेश्वर या पत्रातील मजकूर आपल्या कानापर्यंत पोहोचवो.
मुसलमान बादशहांचे अस्तित्व ही परमेश्वराची फार मोठी कृपा होय हे लक्षात ठेवले पाहिजे. की हिंदुस्थान हा एक विशाल देश आहे व गेलेल्या मुसलमान बादशाहनी अनेक कष्ट करून दीर्घ प्रयत्नानंतर हा देश जिंकला. दिल्ली प्रभावी बादशहाची राजधानी होती. याशिवाय प्रत्येक प्रांतात मुसलमानांची सत्ता होती. सर्व राज्याचे मोठे सैन्य आणि खजिना बाळगून होता.
हिंदुस्तानात मराठा नावाची एक जमात आहे. त्यांचा एक सरदार आहे. या जमातीने काही काळापासून दक्षिणेत आपले डोके वर काढले आहे. उत्तर हिंदुस्थानातील सगळे प्रांत यांनी घेतले आहेत. तैमूरवंशीयांच्या शेवटच्या बादशहांनी दूरदृष्टीचा अभाव आळस आणि आपसातील मतभेद यामुळे गुजरातचा प्रांत आपल्या हातांनी मराठ्यांना दिला. नंतर त्यात त्यांनी माळवा प्रांत सुद्धा त्यांच्या हातात दिला आणि मराठ्यांना त्या प्रांतावर सुभेदार म्हणून नेमले. हळूहळू मराठा जमात प्रबळ बनत गेली आणि तिने अनेक इस्लामी शहरांवर आपला ताबा बसविला. त्यांनी हिंदू आणि मुसलमान यांकडून खंडणी घेण्यास सुरुवात केली. या खंडणीचे नाव त्यांनी चौथ म्हणजे उत्पन्नाचा चौथा हिस्सा असे ठेवले.
दिल्ली आणि तिच्या आसपासचा प्रदेशात मराठ्याचा अंमल होऊ शकला नाही त्याचे कारण असे की दिल्लीचे अधिपती हे बादशहाचे आणि अमीर उमराव ही प्रतिष्ठित घराण्याचे वंशज आहेत. नाईलाजाने मराठ्यांनी या लोकांशी समोपचाराने घेऊन दिल्लीकरांना संरक्षण देऊन सोडून दिले. दक्षिणवर मराठ्यांचा ताबा होऊ शकला नाही त्याचे कारण असे की मरहुम निजामउल्मुल्क यांच्या वंशजांनी कधी मराठ्यांमध्ये फुट पाडली तर कधी युरोपियनांना आपल्याकडे मिळवून घेतले. बुऱ्हाणपूर, औरंगाबाद व विजापूर त्यांनी आपल्या ताब्यात ठेवली. पण त्याच्या भोवतालचा मुलूख त्यांनी मराठ्यांकडे सोडून दिला.
दिल्ली आणि दक्षिण हे दोन प्रांत सोडून बाकीचे सर्व प्रांत त्यांच्या पूर्ण ताब्यात आहेत. मराठ्यांचा पराभव करणे सोपे आहे. मराठे संख्येने कमी आहेत पण इतर असंख्य माणसे त्यांना मिळाली आहेत. म्हणजे हिंदुस्थानात मराठ्यांचा हा मोठा प्रलय आहे. हा प्रलय जो मोडून काढेन त्याचे परमेश्वर भले करो..
आम्ही परमेश्वराचे दास. पैगंबराचे फक्त आहोत. परमेश्वरापाशी आम्ही प्रार्थना करतो की त्यांनी काफिरांविरुद्ध लढण्यास आपल्याला प्रवृत्त करावे म्हणजे परमेश्वराशी आपला फार मोठा पुण्य संचय होईल. मुस्लिम मुजाहिद्दीन यांच्या यादीत आपले नाव नोंदले जाईल. अलोट संपत्ती गाजींच्या हाती येईल आणि काफरांच्या हातातून मुसलमानांची सुटका होईल. पण नादिरशहा प्रमाणे आपण करू नये असे मी परमेश्वरापाशी मागणी करतो. त्यांनी मुसलमानांचा धुव्वा उडविला आणि मराठे आणि जाट यांना पूर्णपणे सोडून दिले. त्यानंतर इस्लामची शक्ती छिन्नविच्छिन्न झाली आणि दिल्लीचे राज्य म्हणजे केवळ निव्वळ पोरखेळ झाला. परमेश्वर न करो काफरांची जात अशीच वरचढ राहिली आणि मुसलमान दुर्दैवी राहिले तर इस्लामचे नाव हे कुठे शिल्लक राहणार नाही.!
यानंतर शहा वली उल्लाहने आपल्या पत्रात महंमद पैगंबर, खलिफा उमर, खलिफा उस्मान व खलिफा अलीचा उपदेश लिहिला.
अहमदशहा अबदालीला केलेले हे धार्मिक आवाहन म्हणजे पानिपतच्या युद्धाचे आवतनं होय.!
एवढेच नाही तर इस्लामचे एकीकरण करण्यासाठी या शहा वलीउल्लाहने रोहिलखंडातील सरदारांनाही पत्रे लिहिली. नजीब खान तर त्याचा शिष्य होताच. त्याने सुद्धा अहमदशहा अब्दाली ला बोलावण्यात कुसूर केला नाही.
अशाप्रकारे 'ईस्लाम खतरेमे है।' असे धार्मिक आवाहन करून हिंदुस्थानातील म्हणवणाऱ्या या धर्मपंडिताने मातृभूमीशी मात्र प्रतारणा केली आणि परकीयांना आपल्या मातृभूमीस लुटण्याचे आवतण दिले !
म्हणून धर्म म्हणजे काय? जो श्रेष्ठ कर्तव्य रूपाने प्रकट होतो तो धर्म? की जो विशिष्ट प्रवाहात चालताना क्रमप्राप्त कर्तव्यास बाजूला सारतो तो धर्म.?
म्हणून मराठ्यांच्या दृष्टिकोनातून हे खरेच एक धर्मयुद्ध होते..!
कारण आपल्या देशाचं रक्षण करणे हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे.!!
राष्ट्राच्या शत्रुमध्ये सोयरसंबंध शोधणाऱ्या माणसाची फक्त एकच जात असू शकते, ती म्हणजे 'फितुरी' होय.!! म्हणून शहावली प्रमाणे जातीच्या भानगडीत पडून कर्तव्य करणारा मनुष्य जाती-धर्माने फक्त फितुरच होऊ शकतो!!!
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्तइतिहास।।
Comments
Post a Comment
... मग कशी वाटली पोस्ट