Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

औरंगजेब बादशहा इराणच्या बादशहाकडे राजदूत पाठवतो तेव्हा..


औरंगजेब बादशहास दिल्लीच्या सिंहासनावर स्थिर झाल्यावर त्याचे अभिनंदन करण्यासाठी बाल्ख व बुखारा, उरगंज, कॉन्सटेन्टिनोपल, अॅबेसीनीया, अरबस्तान, मध्य आशिया आदि देशांचे वकील भेटीस आले. पर्शीयन अर्थात इराणचा बादशहा शहा अब्बास दुसरा यानेही औरंगजेबाचे अभिनंदन करण्यासाठी आपल्या बंदुकधारी पथकाचा प्रमुख मुदाक बेग ह्याच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ पाठविले होते.(१६६१ज.स.११३)
इराणचे साम्राज्य हे मोगलांच्या शेजारील मजबूत मानले जाई. सर्व मुसलमान जगतात इराणच्या संस्कृतीचाही वरचष्मा होता. हिंदुस्थानातील सर्वच मुसलमान राजवटींत इराणच्या संस्कृतीचे वा फॅशनचे अनुकरण केले जाई. दरबारातील कामकाजही त्याला अपवाद नसे. थोडक्यात "आशियातील फ्रेंच' असे इराणचे स्थान होते. म्हणून इराणच्या शिष्टमंडळाची दखल मोगल दरबारात मोठ्या काळजीने घेण्यात आली. काही चूक होऊन आपले इराणच्या दरबारांत हसे होऊ नये असे मोगल अधिकाऱ्यांस वाटत होते. कारण तलवारीपेक्षा फारसी लेखक व कवींचा मोठा दरारा होता. यासाठी ही काळजी होती. भरपूर सन्मान व आदरातीथ्य करून इराणच्या शिष्टमंडळास निरोप देण्यात आला. शहाने पाठवलेल्या पत्रास उत्तर म्हनुन औरंगजेबाने पत्र लिहले. शहाने पत्रात मित्रत्वाची भावना व्यक्त केली होती. त्याबाबत औरंगजेबाने त्याचे आभार मानले, मात्र आपण सर्वस्वी अल्लाच्याच कृपेवर अवलंबून असल्याचे लिहले. आपणांस कोणत्याही माणसाच्या मदतीची गरज नाही, असाही मोठेपणा त्यात लिहला. तसेच आपल्या भावांवर मिळवलेल्या विजयाचेही त्याने लांबलचक वर्णन केले. हे पत्र इराणच्या शहाकडे पाठविण्यासाठी औरंगजेबाने मुलतानचा मोगल सुभेदार तर्बीयतखान या उजबेक माणसाची नीवड केली. तो उंच धिप्पाड व लांब दाढीवाला विचारी पुरूष होता. शहाला देण्यासाठी औरंगजेबाने आंबे,विड्याची पाने व बरेच हत्तीही दिले.(२ नोव्हें १६६३ज.स.पृ११३)
औरंगजेबाने अखबारनविस (बातमीदार) व खुफियानविस (गुप्तहेर) यांनाही त्याच्यासोबत पाठवीले. शहा आब्बासने मात्र या मोगल राजदुताची (तर्बीयतखानाची) चांगलीच टर उडवली. तो म्हणाला,
"तुम्ही कुणी क्षुल्लक मनुष्य असला पाहिजे किंवा तुमच्या बादशहाचा तुम्हावर विश्वास नसला पाहीजे. नाहीतर तुमच्या बादशहाने ही माणसे तुमच्या सोबत लावून दिली नसती."(अ.हो.मो.)
तर्बीयतखानास खेद वाटला. शहाने त्याला अपमानास्पद वागणुक दिली.
पुढे एक दिवस तर्बीयतखानाने शहास औरंगजेबाचे एक चित्र भेट दिले. त्या चित्रात एक देवदुत घोड्यावरील औरंगजेबास तलवार भेट देतांना दाखवलेला होता. एकप्रकारे खुद्द अल्लाने औरंगजेबास दायित्व सोपवीले आहे असा मोठेपणा त्यातून व्यक्त होत होता. शहाला त्याचा राग आला.
तर्बीयतखानाने शहास औरंगजेबाचा शिक्का(नाणे) भेट दिला.
तो पाहुन शहाने तर्बीयतखानास शिक्क्यावरील अक्षरे वाचायला सांगीतली. ती रात्रीची वेळ होती. अंधार असल्याने एक मशालजी तर्बीयतखानाच्या शेजारी उभा राहीला. तर्बीयतखान वाचू लागला. तेवढ्यात ठरल्याप्रमाणे ठेच लागल्याचे निमीत्त करून मशालजीने तर्बीयतखानाच्या दाढीला आगच लावली. दाढी पेटल्याने तर्बीयतखान घाबरला. तेव्हा शहा म्हणाला, "विशेष काही नाही..विशेष काही नाही. तुमची दाढी ठीक करायला खूप न्हावी आहेत." बिचारा खान शिक्क्यावरील अक्षरे वाचत होता...

            "सिक्का जद दर जहां चुं बद्र मुनीर
               शाहा औरंगजेब-आलमगीर"

(अर्थात जगज्जेता औरंगजेब याने सुर्य-चंद्राप्रमाणे या विश्वात आपला शिक्का बसवला)

दरबारी स्तब्ध होते मात्र शहा मोठ्या खोचकपणे म्हणला, या शिक्क्यावर ही अक्षरे पाहिजेत..
            "सिक्का जद ब कुर्से-पनीर
           औरंगजेब-बरादर -कुश-ए-फिदरगीर

(अर्थात आपल्या भावाला मारणाऱ्या आणि बापाला कैद करणाऱ्या औरंगजेबाने पनीरच्या गोळ्यावर शिक्का मारला आहे)

असे वर्षभर इराणास राहुन तर्बीयतखानाला शहाने निरोप दिला. औरंगजेबास भेट देणयासाठी त्याने सुरेख ४० घोडे दिले व म्हणाला, "औरंगजेब माझ्यावर चालून येऊ दे..आपल्याकडे पुरेसे घोडदळ नाही अशी सबब त्याने सांगू नये म्हणून हे घोडे देत आहे. त्याला माझ्यावर चालून येऊ दे म्हणजे राजा हा जगज्जेता कसा होतो याचा मी त्याला चांगला पाठ देईन."
हिंदुस्थानात परतल्यावर तर्बीयतखानाने औरंगजेबास सर्व वृत्तांत सांगीतला. तसेच शहाने औरंगजेबासाठी पाठवलेले पत्र दिले. त्यात शहाने लिहले होते-
"मला असे कळले की, हिंदुस्थानातील बादशहा हा दुर्बळ, अकार्यक्षम व निश्कांचन झाल्याने बहुतेक जमिनदारांनी त्याच्याविरूद्ध बंड पुकारले आहे. यातील एक प्रमुख म्हणजे दुष्ट काफिर शिवाजी. तुमचे सैन्य माघार घेत आहेत हे पाहुन एखाद्या पर्वताच्या शिखराप्रमाणे तो आता सर्वांना दृगोचर होत आहे. त्याने तुमचे अनेक किल्ले जिंकले आहेत. तुमच्या सैनिकांना कैद केले व ठार मारले आहे, तुमचा बराचसा मुलूख गिळंकृत केला आहे, तुमच्या मुलूखातील बरीच बंदरे व शहरे त्याने लुटली आहेत. त्याला तुमच्याशी आता शेवटची टक्कर द्यावयाची आहे असे आम्ही एेकतो. तुम्ही स्वत:स जगज्जेते किंवा आलमगिर म्हणवता परंतु खरी परिस्थिती अशी आहे की, तुम्ही तुमच्या वडिलांना फक्त जिंकले आहे व आपल्या भावांचा वध करून आता तुम्हाला मन:शांती लाभली आहे. बंडखोरांचा बंदोबस्त करण्याची शक्ती आता तुमच्यात उरली नाही. माझे वाड वडीलांनी जगातल्या अनेक राजांना आश्रय दिला. प्रत्यक्ष हुमायुन व नजरमहंमदखान यांना आम्ही त्यांची सिंहासने कशी परत मिळवून दिली याची साक्ष काढून पाहा. आता तुम्ही, हुमायुनचे वारस, अडचणीत आहात. म्हणून आमच्या प्रचंड सैन्यानिशी खुद्द हिंदुस्थानात यावे, तुम्हाला भेटावे व गोंधळ नाहीसा करावा अशी माझी तीव्र इच्छा आहे..!
हे पत्र वाचून औरंगजेबाचा तळतळाट झाला. त्याला शहाचा चांगलाच राग आला. त्याने आपल्याच वकीलावर राग काढला. शहाला चांगलाच धडा शिकवण्यासाठी त्याने राजपुत्र मुअज्जम व जयसिंग यांस कंदाहारकडे पाठवीण्याचे ठरवीले. मात्र शहा हिंदुस्थानवर स्वारी करणार या बातमीचा मोगलांवर गंभीर परिणाम झाला. औरंगजेबाने इराणी सरहद्दीवर करडी नजर ठेवली. ह्या शहाचा ऑगस्ट १६६७ मध्ये मृत्यू झाला व हिंदुस्थानवर आक्रमण करू अशी जी त्याने धमकी दिली होती ती नाहीशी झाली.
(संदर्भ-storia de mogor, असे होते मोगल,मासिरे आलमगीरी,औरंगजेब-जदुनाथ सरकार)

स्वत:स इस्लामचा धर्मरक्षक व जगज्जेता म्हणवणाऱ्या औरंगजेबास जग तर दूरच होते पण शिवाजीराजाने त्याला कसे हैराण केले याबद्दल उलट शहानेच त्याला सुनावले वा त्याचा दर्पणात चेहराच दाखवला म्हणा. तसेच पर्यायाने इराणचा बादशहाही राजांची स्तुतीच करून जातो. असो, इतिहास असेच मानव स्वभावाचे वर्णन करीत असतो. इतिहासातील काही मजेशीर खोचक रोचक गोष्टी अशाच मानवाच्या अंतरंगाचे दर्शन घडवतात.
||फक्तइतिहास||

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts