Skip to main content

Featured

नागझरी आणि दरेगाव येथील वास्तुशिल्पांची अनुभूती..

  मित्रांनो, या भारत भूमीवर प्राचीन सुंदर कलाकृती जगप्रसिद्ध आहेत, मात्र सामान्य दर्जाची, कमी कलाकृतीची दुर्लक्षित असलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आजही खेड्याबाऱ्मध्ये बरीच आहेत. अशा दुर्लक्षित इतिहास पुरुषांचा शोध मनाला नेहमीच असतो. आज बुलडाणा जिल्ह्यात फिरत असताना नेहमीप्रमाणे शोध घेतल्यावर समजले की शेंदुर्जनाच्या जवळ दोन ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मग काय, आम्हाला इतिहासात टाईम ट्रॅव्हल करण्याची संधी चालून आली.! मित्रांनो,  शेंदुर्जन(सिंदखेड तालुका) येथून उजवीकडे वळून आम्ही साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर नागझरी फाट्यावरून डावीकडे वळलो. एक किलोमीटर अंतरावर नागझरी हा छोटा गाव लागला. या गावाच्या पिछाडीवर अतिशय खडतर रस्त्याने खाली उतरत एक किलोमीटर मोटर सायकलने गेल्यावर आम्ही डोंगराच्या कुशीत एका रमणीय ठिकाणास पोचलो. येथे एक प्राचीन महादेवाचे देवालय असून त्यासमोर धार कुंड आहे. देवालय बाह्य दर्शनी पाहिल्यास सुंदर कलाकृतीचे असून लहान लहान विटांनी बांधलेले दिसते. देवालयाचा जीर्णोद्धार झाला असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. असो, देवालयात प्रवेश केल्यावर हेमाडपंथी बांधणीचे सहा दगडी स्तंभ दिसत...

साकेश्वर मंदीर - साकेगाव




चिखलीपासून पश्चिमेस सहा मैलांवर एका छोट्या खेड्यात साकेगाव येथे हे साकेश्वराचे एक अप्रतिम मंदिर पाहिले की दक्षिणेत आल्याचा भास होतो !
एकेकाळी या मंदिराचा विमानाचा भाग पडला होता तो पुरातत्व खात्याने पुनश्च जसाच्या तसा दगडामध्ये बांधून काढला. आता त्याच्या या सुंदर शिखरावरील नक्षीकाम आपणास बघावयास मिळते. हे मंदिर यादवांच्या काळातील असावे असे वाटते, पण राष्ट्रकूट आणि चालुक्यांची ही राजवट विदर्भात होती म्हणून नक्की काही सांगता येत नाही. असो,
मंदिराचे शिखर भव्य आणि उंच असून नक्षीदार आहे. त्यावर अनेक लहान-लहान मंदिराच्या शिखर आकृती कोरलेल्या आहेत.

शुक्र नाशिकवर दर्शनी बाजूस भूज नटेश असून त्याच्या खाली तीन शिल्पपटात अनुक्रमे ब्रह्मा-सरस्वती शिवपार्वती व विष्णुलक्ष्मी आहेत तसेच दक्षिणोत्तर भागावर सरस्वती इंद्र व महिषासुरमर्दिनीच्या प्रतिमा आहेत.
हे मंदिर गाभारा, अंतराळ, गूढमंडप व मुख मंडप युक्त आहे.
सध्या मंदिराच्या मुख मंडपात तीन नंदी ठेवलेले आहेत. मंडपाचे छत मुख्य अशा चार खांबांवर व भिंतीवरील अर्ध स्तंभावर नऊ भागात विभागलेले आहे.
स्तंभ मध्याच्या खालच्या भागावर विविध आकृती कोरलेल्या आहेत. यापैकी अंतराळाकडे जे दोन स्तंभ येतात यावर कीचक आकृती कोरलेली आहे. पैकी एक स्त्री चतुर्भुज आहे व एक अंकुश व मोदक वगैरे हाती घेतलेला चतुर्भुज गणेश आहे. अंतराळातून गाभाऱ्याकडे जाताना आपल्याला दोन्ही बाजूस समोरासमोरील दोन्ही बाजूस कोष्टकामध्ये  कोरलेल्या देव गणेश व कुबेर या देवतांच्या प्रतिमा दिसतात.

गाभार्‍याच्या दारावरील शाखांवर प्रतिहरी, मांगल्य, विहग व घट्टपल्लव वगैरे आढळतात.
गाभारा सभामंडपापेक्षा चार फूट खोल आहे. तीन पायऱ्या उतरून गेल्यावर गाभार्‍यात स्थायिक असलेली शिवपिंडी नजरेत दिसते. मानवास आदि मध्य आणि अंताचे ज्ञान देणारा हा ईश्वर पाहिल्यावर ब्रम्हांड दर्शन होते. आणि साकेश्वराच्या मंदिराचे सुरेख नक्षीकाम बघितल्यावर माणसाच्या कल्पकतेची जाणीव होऊन जाते. त्यावर पडलेल्या आघातांमुळे क्षीण झालेल्या देव प्रतिमांकडे पाहिल्यावर आम्हाला आमच्यातील देव अन् दानव दोन्ही दिसू लागतो...!
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts