कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क
बऱ्याच वर्षांपासून राजूरा या गावाविषयी अनेक लोककथा कानावर येत होत्या. येथील बुरूजबंदी वाडा, प्राचीन देवळं आणि लोकमुखातून पिढ्यान् पिढ्या बोलली जाणारी एक शौर्यकथा. मग जे जे जुनं ते ते कुतूहल अन् जिज्ञासा निर्माण करते. आणि मनास वेध लागतात ते इतिहासाचे.!
मग गेलो मित्रांसह राजूरा गावच्या स्मृती पटलावरचा इतिहास जिवंत करण्यासाठी, तो अनूभवन्यासाठी !
शुक्रवारी अगदि पहाटेच मित्रांसह राजूरा गावात पोचलो. (३०/९/२०१६)
राजूरा येथील ७६ वर्षांचे वयोवृद्ध किर्तनकार श्री नामदेव विठोबा गोरे यांनी गावाच्या चालीरीती व ऐतिहासीक घटनांबद्दल बरीच माहिती दिली.
मध्ययुगीन कालखंडात राजूरा येथील राजूरकरांचे जवळच्या बऱ्याच मुलूखात वर्चस्व होते. आपल्या भागावर सत्ता गाजवने व बाहेर मुलूखात मुलूखगीरी अर्थात हल्ला करून संपत्ती गोळा करणे असा हा तत्कालिन कार्यक्रम. आपल्या शक्तीच्या जोरावर राजूरकरांनी पिढ्यान् पिढ्या आपले वर्चस्व अबाधित ठेवले. त्यांच्याकडे सोळा गावच्या पाटिलक्या होत्या असे लोक सांगतात.
सन १८०० मध्ये राजुरकरांच्या घराण्यांतील बाजीराव, उत्तमराव, त्रिंबकराव, धारराव, नारायणराव, रूस्तुमराव व बहादूरराव या बंधूंचे गावात व शेजारील भागात बरेच वर्चस्व होते.
रामराव राजुरकर
तो काळ होता ब्रिटिश सत्तेचा, स्वातंत्र्यापूर्वीचा.
चांदनी चतारी या गावात एक दरोडा पडला. त्याच्या संशयाहून तत्कालिन ब्रिटिश शासनाने रावसाहेब मंडळींना वाशीम येथे बोलावले. शिंदेशाही पगड्या व बुलंद पेहराव धारण करून घोड्यावरून मोठ्या थाटात ते वाशीमला गेले. वाशीम हे ब्रिटिश शासनाचे जिल्ह्याचे ठीकाण. रावसाहेब मंडळींचा थाट पाहून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना ब्रिटिश शासनात सामावून वेग-वेगळ्या अधिकारपदावर नियुक्त केले. एक मात्र बोलले जाते, की त्या दरोड्यातून रावसाहेब मंडळींना पाच किलोग्राम वजनाची सोन्याची मूर्ती मिळाली होती. पण आज तीचे अस्तीत्वाबाबत कुणालाच काहीही ठावूक नाही. तसे कुणी सांगेलही कसे.? पण मानसाच्या जिज्ञासेची कमाल, ती ठीक-ठीकाणच्या खड्ड्यांमधून बघावयास मिळाली.
असो,
पुढिल पिढित विश्वासराव, दिनकरराव, रामराव, रूस्तुमराव, बाबाराव(त्रिविक्रमराव), जगदिशराव हे सुद्धा आपले वर्चस्व टिकवून होते.
यातील दिनकरराव हे अकोला जनपथचे अध्यक्ष होते. राजूरकरांचा ब्रिटिश सत्तेशी बराच सलोखा निर्माण झाला होता.
नवरात्री हे स्त्री शक्तीचे प्रतिक. राजुरकर घराण्यांतील धाडसी स्त्रीयांनी दाखवलेल्या शौर्याचे प्रतिक म्हणून नवरात्रीचा उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरा होई. राजुरकर मंडळी गावात मोठ्या मेजवानीचे आयोजन करीत. दसऱ्याचे आदल्या दिवशी गावाबाहेर वीरांगनांच्या शिळास्तंभास नैवेद्य दाखवला जातो. दसऱ्याचे दिवशी ग्रामभोज ठेवला जाई. ब्रिटिश सत्तेत नवालेल्या या मंडळींचा मोठा थाट असे. गोरगरीबांनी तर म्हणच पाडीली की-
ना पावा देव पण पावा राजूरचा राव ।।
बाबाराव राजूरकर हे एक पट्टीचे शिकारी होते. दोन लांब नळ्यांच्या त्यांच्या बंदूकिने जंगलातील बऱ्याच वाघांची शिकार केल्याचे किस्से लोक सांगतात. ब्रिटिश सरकारने यांना "रावबहादूर" पदवीने नवाजले होते.
बुरूजबंदी वाड्याचे अवशेष
गावातून माहिती गोळा करत आम्ही मग गेलो त्या बुरूजबंदी वाड्याकडे. राजुरकरांच्या घराण्यांतील श्री अजीत राजुरकर यांनी आपल्या पूर्वजांच्या बुरूजबंदी वाड्या बद्दल बरीच माहिती दिली. कधिकाळी ज्या बुरूजबंदी वाड्याने सत्ता गाजवली त्याचे आज मात्र अवशेष उरले आहेत. बुरूजावर आज एक प्राचीन विहिर आहे. बुरूजावरील बहूतांश भाग ढासळला आहे. या बुरूजबंदी वाड्याच्या पायथ्याशी समोरील भागात जमिनीवर एक विस्तीर्ण वाडा होता. तोही आज पडक्या अवस्थेत आहे. एक- दोन दालना शिवाय फक्त भिंतीच उरल्या आहेत. त्यातील दिवानखाना नावाची एक इमारत ध्वस्त पण बऱ्यापैकी शाबूत आहे. त्याच्या दरवाजे व खिडक्यांच्या बांधणीवरून ब्रिटिश कालाची जाणीव होते.
मागील २५ वर्षांपूर्वी या वाड्यात शाळाही भरत असे. पण आज केवळ पाऊलखूनाच उरल्या.
गावाच्या बाजूस राजूरकरांची वंशपरंपरागत स्मशानभूमि आहे.
श्री अजीत राजुरकर
श्री अजीत राजुरकर यांच्या सोबत आम्ही त्या स्मशानभूमिकडे निघालो. एक लोखंडी गेट ओलांडून आम्ही आवारात दाखल झालो. त्यांच्या पूर्वजांनी बांधलेले महादेवाचे एक प्राचीन देवालय तेथे दिसले. त्याची बांधनी दगड -विटांची असून चून्याचा वापर केलेला आहे. मात्र सालाचा अंदाज लावता ते १७०० च्या उत्तरार्धातील असावे असे वाटते.
पूर्वजांच्या समाध्या
पण आवारात असलेल्या पूर्वजांच्या समाध्या ह्या त्यावरील सालावरून अतिप्राचीन असल्याचे वाटते. स्त्रीयांच्या समाध्या व पुरूषांच्या समाध्या ह्या दोन वेगळ्या रांगांमध्ये बांधलेल्या आहेत.
सन १२९९ असे साल व्यक्तिच्या नावाच्या वर कोरलेले आढळते. याचा अर्थ ह्या समाध्या सन १२०० मधिल आहेत असे अनुमान चूक ठरते. कारण त्या शतकात इंग्रजी सन वापरला जात नसे. तसे इंग्रजांचा प्रवेश भारतात १५ व्या शतकात झाला. मग समाधिवरील हे साल कदाचीत सुहूर सन असेल. त्या कालात दक्षिणेत फारसी सुहूर सन वापरला जाई. सुहूर सनात ६०० मिळवले असता आजचे इंग्रजी सन निघते. याप्रमाणे १२९९+६००= १८९९ हे मृत्युचे साल निघते. अर्थात सन १८०० मधिल काही व्यक्तिंच्या या समाध्या होत.
समाधिचे बांधकाम शंभर वर्षांपूर्वीचे असावे. कारण ते चून्याचे असून शाबूत आहे. अर्थात या घराण्यांतील कुणीतरी व्यक्तिने १०० वर्षांपूर्वी या समाध्या बांधल्या असाव्या.
शिवमंदिर व शिलालेख
श्री गणेशभाऊ मोहळे यांनी गावाच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या दोन देवळांबद्दल सांगितले. तेव्हा आम्ही सर्व ते बघावयास गेलो. या दोन्ही देवळांबद्दल स्थानिक लोकांना फार काही माहित नाही. त्यातील एक शिवमंदिर होते. कारण देवळात शिवलिंग होते. तसेच बाहेरील भिंतीवर एक शिलालेख कोरवलेला होता. आता यावरून काहीतरी माहिती नक्कीच हाती लागेल असे मला वाटले. एक विटीने तो घासून पाहिल्यावर समजलं, की तो संस्कृतमध्ये असून शके १८१० मध्ये या देवळाचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख त्यात आहे.
देवी मंदिर
शेजारील दुसरे देऊळ ज्यातील मूर्ती बाहेर ठेवलेली होती. ते देवीचे होते. मात्र फार वर्षांपूर्वी असलेली मूर्ती भग्न झाली असावी. कारण देवळाच्या पायथ्याशी देवीचा फक्त दगडी मुखवटा दिसला. अर्थात शिव-पार्वतीचे हे दोन देवालये आहेत.
हे सर्व बघत असताना मात्र त्या स्त्रीयांच्या शौर्यकथेबद्दल जिज्ञासा वाढत होती. त्या रणभूमिवर त्यांच्या रक्ताने लाल झालेल्या त्या मातीस स्पर्श करण्याची उत्कट इच्छा मनात दाटत होती. आणि निघालो, राजूऱ्याहून ब्राह्मणवाडा ते गांगलवाडीच्या दिशेने. गाडी रस्त्यावरून तर मन इतिहासात धाव घेत होते.
दोन स्त्रीयांनी केलेल्या एका देदिप्यमान जंगाची ती कहानी, जी रोमांच खडे करणारी ती दृष्टिपुढे तरळू लागली-
मुलूखगीरीच्या कालात १५० वर्षांपूर्वी वा कदाचीत जास्तच. एक दिवस राजुरकरांच्या घरची पुरूष मंडळी बाहेर निघून गेल्याची बातमी मिळताच कोठूनतरी काही लोक जमून राजुरकरांच्या बुरूजबंदी वाड्यावर चालून गेले. दरोडा टाकून त्यांच्या संपत्तीची लूट करावी या हेतूने ती हत्यारबंद टोळी गावात शिरली. मात्र या समयास बुरूजबंदी वाड्यावर राहणाऱ्या दोन तरूण धाडसी स्त्रीयांनी मनाशी एक प्रण करून रावसाहेबांचा पुरूष वेश धारन करून लढण्याचा निर्धार केला. हातात तलवार धारण करून त्या घोड्यावरून सवार होऊन दौडत निघाल्या. त्यांना पुरूष समजून आक्रमकांनी पलायन केले. सर्व आक्रमकांना हूसकावून लावल्यानंतर पिंपळवाडीजवळ जंगलात त्या थांबल्या.
सर्व आक्रमक गेल्याचे पाहून त्या बोलू लागल्या...
"दरोडेखोर पळून गेले, आता आपण परत जावे. घरी आपली मुलं रडत असतील.. "
मात्र त्यांना काय ठावूक की आक्रमकांपैकी एक बाजूच्या झाडीत लपून बसलेला होता. बहूदा त्याच्या पायास जखम झाल्याने तो झाडीत आश्रयास दडून बसला होता. मात्र या दोन घोडेस्वारांच्या संभाषनातून त्या पुरूष नसून चक्क स्त्रीयाच असल्याचे झाडीतील त्या दरोडेखोरास पक्के समजले. त्याने झाडीतून आडमार्गाने जाऊन कसेतरी आपल्या टोळीस गाठले व ते दोन घोडेस्वार स्त्रीयाच असल्याचे वर्तमान विदीत केले. आता मात्र चवताळून या टोळीने परत फिरून घोडेस्वारांकडे धाव घेतली. त्यांना पाहून घोडेस्वारही हत्यार चालवून गेले. आणि काही क्षणांत आक्रमकांच्या टोळीने त्यांना घेरले. प्राणांतीक जंग करत त्या शूरांगनांनी लढने सोडले नाही. मात्र थोड्याच अवधित टोळीवाल्यांच्या शस्त्रांनी त्यांच्या शरीरास रक्तांकीत केले. एखाद्या बुलंद योद्ध्यास लाजवेल असेच रणशौर्य गाजवून अखेर दोन्ही स्वार घोड्यावरून पडले.!
शक्तिस्तंभ'
या वीरांगनांच्या शौर्याची याद देणारे राजूरकरांनी उभारलेले ते स्मृतिस्तंभ आजही खडे आहेत. आणि आता आम्हीसुद्धा तेथे पोचलो होतो.
गांगलवाडीच्या समोर काही अंतरावर एक वळण लागते. येथून पिंपळवाडीस व राजूरा गावात जाता येते. येथून राजूरा गावाचे अंतर फक्त ३ किलोमीटरच भरते. अर्थात याच रस्त्याने त्या स्त्री घोडेस्वार आल्या होत्या. आणि याच वळणावर ते शौर्यस्तंभ आजही त्यांच्या बलिदानाची साक्ष देत खडे आहेत. आजही या रणभूमिवर त्यांच्या शौर्यस्मृति दृष्टिपुढे खड्या राहतात...तेव्हा दिसू लागतात मर्दानी वेशातील त्या दोन स्वार.... हातात तेग धरून घोड्यावरून दौडणाऱ्या त्या साक्षात महिषासूरमर्दिनीच वाटू लागतात..... घेराव टाकनाऱ्या हत्यारबंद टोळीवाल्यांच्या किलकाऱ्या.... गर्दितून तलवार चालवनाऱ्या वीरांगना.... त्यांच्या देहातून सांडणारे ओजस्वी रक्त....भूमिवर पडणारे ते ज्वलंत रक्तथेंब.... आणि शेवटी रणभूमिवर निवांत पहुडलेले त्यांचे देह व आसमंताकडे निर्वीकारपणे बघनाऱ्या त्यांच्या नजरा बोलून जातात की हे मरण नव्हे...!
हे तर अमरण होय.!
राजुरकरांच्या पिढ्यांनी तो सन्मान दसऱ्याचे रूपात अखंड जपला. या शक्तिस्तंभावर महिला व घोड्याची आकॄती कोरलेली आजही बघावयास मिळते. आणि येथील लाल माती रणरागीनींच्या धाडसी रक्ताची याद देते तेव्हा मनातले भाव शब्दबनून ओठांमधून बाहेर पडतात-
विजयेन लाभते लक्ष्मी।
मॄत्यूनापि शूरांगना।।
क्षण विध्वंसीनी काया।
चिंता का ती मरणे रणे।।
खरेच, मरण हे शरीरास येते. शौर्य तर अमर आहे. आणि बलिदानातूनच सिद्ध होतो लौकीक साहस अन् शौर्याचा.....!!!
खरेच, काळाच्या ओघात जिथे बुरूजबंदी सत्ता जमिनदोस्त होतात आणि संपत्तीचे कारंजे आटून जातात. तिथे दिव्य कर्म अखंड उरतात, जिथे आजही मानसे मानाने सॅल्यूट देतात.!!
वाशीम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील ४००० लोकसंख्येच्या या सामान्य गावाकडे पाहिलं की कुणालाच न वाटाव की किती गुपितं अन् किती कथा आपल्या अंर्तमनात सांभाळून हा आजही कसा साधेपणाने मानसाच्या वर्दळीकडे बघतोय. माणसाच्या पिढ्या अन् मनाच्या घड्या पाहिलेला हा साक्षिदार बोलू पाहतोय त्याची कहानी.! मातीचे ढिगारे अन् दगडावरचे नक्षिकाम हिच त्याची जूबानी...!!!
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर,मालेगाव
||फक्तइतिहास||
पुनश्च या शौर्यस्तंभांना भेट देऊन एक व्हिडिओ बनविला-
Khup chan mahiti bhau
ReplyDeleteKhup chan mahiti bhau
ReplyDeleteधन्यवाद... जोहार..!
Deleteधन्यवाद... जोहार..!
Delete