वाशिम जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे शोधतांना मानोरा तालुक्यातील कुपटा या गावी जाणे झाले. ते फक्त येथील जलकुंड पाहण्याच्या निमित्ताने. कुपटा अगदी छोटासा गाव. तेथे पोहोचल्यावर लोकांना बारव किंवा जलकुंड गावामध्ये कोठे आहे असे विचारत आम्ही अगदी गल्लीबोळातून गावाच्या बाहेर असलेल्या एका हेमाडपंथी मंदिरापर्यंत पोचलो. यादव कालीन शिवाचे हे मंदिर आणि त्यासमोर एक विस्तीर्ण बारव दिसला. एवढा विस्तीर्ण बारव बघून मनात खरोखरच हिडन ट्रेझर मिळाल्याचा आनंद झाला.!! कारण बुलढाणा जिल्ह्या सारखी संपदा वाशिम जिल्ह्यात नाही याची खंत मनात होती. म्हणूनच एवढी मोठी बारव त्याला देवकोष्टके पाहून मनस्वी आनंद झाला. वाशीम येथील देवतलाव सोडल्यानंतर वाशीम जिल्ह्यात एवढा प्रचंड देव कोष्टके असणारा बारव सापडत नाही.!
|
शिव मंदिरासमोरील बारव
|
|
यादव कालीन शिव मंदिर |
या बारवा शेजारी असलेलं यादवकालीन शिवाचा मंदिर दगडी बांधणीचं, मात्र आमच्या जीर्णोद्धाराच्या पद्धती- काय सांगावे..? मंदिराच्या आत दोन्ही बाजूने देव कोष्टके आहेत त्यात खंडित मूर्ती आहेत. एका देव कोष्टकात गरुडावर विराजमान विष्णू लक्ष्मी ची खंडित मूर्ती आहे.
खोलेश्वर मंदिराप्रमाणे मंदिराचा गाभारा थोडा सखोल आहे व त्यात शिवपिंड आहे. मंदिराच्या बाहेर उजव्या बाजूस वीरगळ ठेवलेली आहे. घोड्यावर बसलेला वीर योद्धा वीरगती प्राप्त झाला म्हणून त्याची पत्नी सती झाली.सती त्व दाखवणारा तिचा बागडे यांनी भरलेला हात. पूजनीय आहे म्हणून पूजन करताना दाखवलेली आकृती. आणि सर्वात वर चंद्र-सूर्य आकृती चंद्र-सूर्य असेतो किर्ती महान असल्याचे सिद्ध करतात.
|
शिव मंदिरा बाहेरील वीरगळ |
गावामध्ये आणखी चौकशी केली असता केशव मंदिराची माहिती मिळाली. त्या रस्त्याने जात असताना वाटेतच एक पडका बुरुज दिसला. त्याच्या शेजारी जुन्या धाटणीचा एक वाडा दिसला. मग जे जुनं ते आमच्या नजरेत भरत हा आमचा गुण स्वभाव.! घरातून आजोबा आले आणि त्यांनी आम्हाला बोलावलं. मग वाड्या विषयी कुतूहल निर्माण झालं. मात्र आधी केशव मंदिर बघायचं म्हणून मंदिराकडे निघालो. थोडसं पुढे गेल्यावर डावीकडे वळून अतिशय पडक्या अवस्थेत एक लहान मंदिर उंच टेकडीवर दिसलं.
|
माझे सहकारी-विनोद भाऊ नाईकवाडे, हरणे सर, नायक सर |
अतिशय ओबडधोबड दगडांनी रचलेली अस ते मंदिर उत्तर कालखंडात बांधलेलं असावं. मंदिराला सभामंडप नाही. एकच गर्भगृह. मात्र वेदीवर मूर्ती नव्हती. आजूबाजूला मुर्त्या होत्या. दोन देव कोष्टके होती. एक देव कोष्टक नष्ट झाले होते. तर डाव्या देव कोष्टकात नरसिंह लक्ष्मी ची गरुडावर आरूढ असलेली खंड झालेली मूर्ती दिसली. मूर्तीच्या रचनेवरून ते अप्रतिम असे शिल्प असावे.
|
मंदिरातील नृसिंह लक्ष्मीचे गरुड भारुड शिल्प |
बाजूला एक तसेच अप्रतिम गरुडावर आरूढ विष्णू लक्ष्मीची खंडित मूर्ती आहे. तसेच महिषासुरमर्दिनीची आणि भैरवाची मूर्ती आहे.
|
गरुडावर विराजमान विष्णू लक्ष्मी |
|
महिषासुरमर्दिनी शिल्प |
|
भैरव शिल्प |
या मंदिराची सर्वात विशेष बाब म्हणजे मंदिराचे छत. आजूबाजूला कुठेच न बघावं अशी त्याची रचना अप्रतिम.! दगडाचे गोल पट्टा उतरत्या क्रमाने होत जातात आणि मधोमध एका गोल दगडावर श्रीकृष्ण आणि गोपी यांचं सुंदर शिल्प कोरलेलं. ते पाहून तर मनात जो आनंद झाला तो खरच गगनात मावेनासा.
|
मंदिराच्या छताचे गोलाकार पट्टा व मध्ये मुरलीधर कृष्ण |
हे मंदिर केशवाचे आहे मात्र यातील मुख्य वेदीवरील मुख्य मूर्ती लोकांनी गावात नवीन मंदिर बांधून तेथे स्थापन केली. जवळच असलेल्या मंदिरामध्ये जाऊन आम्ही मूर्ती बघितली. या नवीन केशव मंदिरामध्ये प्राचीन केशव मूर्ती आणि त्या बाजूला इतर दोन मुर्त्या आहेत. त्यापैकी एक भैरव मुर्ती तर दुसरी महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. केशव मूर्ती ही काळ्या पाषाणात असून अतिशय सुबक आणि बारीक कलाकुसर त्यावर केलेली आहे. त्यावर विष्णूचे अवतार असून खालच्या बाजूस गोपी कोरलेल्या आहेत. वाशीम जिल्ह्यात वाशीम येथील बालाजी मंदिरातील मूर्ती तसेच वाशीम येथील गोंदेश्वर मंदिरातील मूर्ती प्रसिद्ध आहेत. मात्र या केशव मूर्तीकडे कुणाचे लक्ष नाही. त्यावरील कोरीव काम बघितल्यावर तिचे प्राचीनत्व आणि महत्त्व कळते. थोडक्यात मेहकरच्या बालाजी मूर्ती प्रमाणेच ती सुबक आणि सुरेख आहे. यावरुनच मूर्तीचा कालखंड शोधता येईल.
|
कृष्णाची मूळ मुर्ती |
यानंतर आम्ही देशमुखांच्या वाड्याकडे निघालो. वाड्यात आजोबांशी आम्ही भरपूर गप्पा केल्या. काही मोडी कागदपत्रे त्यांनी दाखविली. त्यावरून असे लक्षात आले की हे घराणे ब्रिटिशकालात सारा वसुलीचे काम करत असेल. यांचे पूर्वज हे ब्रिटिश काळात ज्युरी चे सदस्य होते.
वाड्याची बांधणी बघितल्यावर आणि द्वारा वरील नक्षीकाम बघितल्यावर कारंजा येथील कांन्नव बंगल्याची आठवण झाली. दरवाजावरील नक्षीकाम हे कान्नव बंगल्याच्या एका दरवाज्याशी समानता दाखवणारे आहे.
|
देशमुख यांच्या वाड्याच्या द्वारा वरील नक्षीकाम |
वाड्याच्या आत दगडी तळ घर आहे. त्याचा उपयोग धान्य साठवून ठेवण्यासाठी होत असे. वाड्याच्या आत उंच लाकडी खांबांवर सुबक नक्षी कोरलेली आहे.
एकूणच हे गाव म्हणजे वाशिम जिल्ह्यातील आमचं एक हेरिटेज साईट आहे. आर्किऑलॉजीशी संपर्क साधल्यावर समजले की हे मंदिर त्यांच्या साईटमध्ये नाही. तरी काय झाले, आम्ही वाशिम जिल्ह्यातील लोकांनी तरी याचा मान सन्मान आणि याचे महत्व टिकून ठेवायला पाहिजे.. तेव्हाच आम्ही म्हणू शकू की आमच्या जिल्ह्यालाही दिव्य इतिहास आहे.!!!
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
||फक्तइतिहास||
Muralidhar Mandir kupta
वाशिम जिल्ह्यातील इतर हेरिटेज साईट-
Comments
Post a Comment
... मग कशी वाटली पोस्ट