Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

चाकणचा वेढा आणि फ्रान्सचा तावेर्निये-


नव्या उमेदीने दख्खनच्या सुभ्यावर मुक्रर झालेला अमीरउल उमरा शाहिस्तेखान पाऊण लाख पागा लष्कर आणि बुलंद तोफखाना घेऊन पुण्यात दाखल झाला तो ९ मे १६६० रोजी !
शिरवळ, सुपे, बारामती, सासवड ही पुण्याच्या आसमंतातली अगदी छोटी भुईकोट ठाणी त्याला मिळाली आणि विजयी सेनापतीच्या अविर्भावात आता त्याने पुण्यापासून नऊ कोसांवर(३० किलोमीटर) असलेल्या चाकणच्या गढीला हात लावला.
पण चाकणचा भुईकोट फिरंगोजी नरसाळा या बुलंद काळजाच्या किल्लेदाराच्या ताब्यात होता. चाकण कोटाचे क्षेत्रफळ साधारणपणे अडीच एकरांचं होतं. आणि शिबंदी मात्र तीन-सव्वातीनशे मावळा फक्त.! एवढ्या छोट्या भुईकोट किल्ल्यास जिंकण्याचा खानाने बेत केला आणि त्यासाठी किती फौज मुक्रर करावी तर २१ हजार आणि मोठा तोफखाना !
असो,
२१ जून १६६० रोजी शाहिस्तेखान हा पुण्याहून निघून चाकणला पोहोचला. त्याने किल्ल्याला वेढा घातला. त्याचा तळ किल्ल्याच्या उत्तरेकडे होता. उत्तरेच्या बाजूस त्याच्याबरोबर गिरीधर कुवर, ब्रह्मदेव शिसोदिया, हवशखान, त्रिंबकजी भोसले आणि दादाजी हे सरदार होते. तर किल्ल्याच्या पूर्व बाजूस मुख्य प्रवेशद्वार होते. त्याच्या समोर शमसुद्दीन खान, तोफखान्याचा प्रमुख मीर अब्दुल्माबूद, सय्यद हसन,  उजबेगखान, खुदाबंद हबशी, उदयपूरचा सरदार विजयसिंह, सुलतान अली अरब आणि अल्लायार बुखारी हे सरदार होते.
किल्ल्याच्या दक्षिणेस राव भाऊ सिंग हाडा, सरफराज खान, जाधवराव आणि जौहरखान हबशी हे होते. किल्ल्याच्या पश्चिमेस राजा रायसिंग शिसोदिया यांची नेमणूक करण्यात आली.
शिवाय शाहिस्तेखानाने या वेढ्यासाठी दक्षिण सुभ्यातील निरनिराळ्या किल्ल्यातून तोफा मागविल्या होत्या. किल्ल्यासमोर लाकडाचे दमदमे उभे करण्यात आले. त्यावर तोफा चढविन्यात आल्या. मात्र सारेच व्यर्थ! अहोरात्र झुंजून मृगजळाप्रमाणे महिना लोटला पण यश आले नाही. तरी संग्रामदुर्ग तो एकाकी झुंजत होता. कोणत्याही बाजूने चाकणला मदत करणे जिजाऊसाहेबांस (मुक्काम राजगड) आणि नेताजी पालकरांसही (मुक्काम घोड्यावर) अशक्य होते. सर्व बाजूंनी चाकणचा संपर्क तुटला होता. चाकण एकाकी पडला होता. मोगल सागरात बेटा येवढा चाकण सर्व मारा सहन करीत झुंजत होता.
त्यावेळी पावसाचा जोरात मारा सुरू होता. मराठे किल्ल्याच्या आतून आगीचा भारी मारा करीत होते. मोगलही तोफांचा जोरदार मारा करीत होते. किल्ल्यातील सैन्य बाहेर येऊन त्यावर तुटून पडण्यासाठी एकही संधी सोडत नव्हते.
खानानं आपल्या छावणीपासून भुईकोटाच्या ईशान्य बुरुजापर्यंत जमिनीतून सुरुंग निर्माण करण्याचे योजिले होते. मोगल किल्ल्याच्या भिंतीपर्यंत खंदक खणीत आणू लागले. हे भुईखालचे भयंकर संकट किल्ल्यातील किल्लेदारास समजणे अशक्यच होते. आणि सुरुंग पूर्ण होताच तो सतरा जिल्हेज अर्थात १४ ऑगस्ट १६६० च्या मध्यरात्री अंदाजे (दोन अडीच वाजता) हा जमिनीखालून ठासलेला सुरुंग खानाने पेटविला. प्रचंड स्फोट झाला. ईशान्यबुरुज उडाला. खिंडार पडले.!

शाहिस्तेखान दमदम्यापाशी आला. तो किल्ल्यात घुसणे विषयी आपल्या सैनिकांना उत्तेजन देऊ लागला. मोगल पुढे सरसावले. शमसुद्दीन आणि राव भाऊसिंग यांनी कामगिरीची शर्थ केली, पण मराठ्यांनी उडून गेलेल्या तटाच्या मागे मातीचा तट उभा केला. त्याच्याआडून ते बंदुका, अग्नि गोळे आणि मोठमोठे दगड याद्वारे मोगलांशी लढा देऊ लागले. मोगलांना पुढे सरकण्याची हिम्मत होईना तो पर्यंत संध्याकाळ झाली मोगलांनी रात्र किल्ल्याच्या पायथ्याशी उघड्यावर काढली.
मोगल सैन्य दुसऱ्या दिवशीचे किल्ल्यावर पुन्हा चालून गेले. त्यांनी तटावर ताबा मिळविला आणि ते किल्ल्यात घुसले. मराठ्यांचे सैनिक मारले गेले व बाकीचे आतील कोटात घुसले.
पण चाकणला मदत होणे शक्य नव्हते. अखेर फिरंगोजीस कोटाचा ताबा सोडावा लागला. भाऊसिंग यांच्या मध्यस्थीने फिरंगोजी शाहिस्तेखानाला भेटले आणि त्यांनी किल्ला मोगलांच्या हवाली केला तो १५ ऑगस्ट १६६० रोजी.!
शाहिस्ताखान विजयी झाला होता पण त्यासाठी त्याला भारीच किंमत मोजावी लागली होती. यात मोगलांची २६८ माणसे ठार झाली आणि सुमारे ६०० माणसे जखमी झाली होती.
असो,
औरंगजेबाने किल्ल्याचे नाव इस्लामाबाद ठेवले आणि तेथे उजबेग खान याची किल्लेदार म्हणून नेमणूक केली.
आता योगायोग पहा कुठे चाकन आणि कुठे फ्रान्सचा व्यापारी जव्हेरी तावेर्निये.? पण ऐन वेढ्याच्या वेळी हा जव्हेरी चाकण येथे शाहिस्तेखानाला आपल्याजवळील रत्ने विकण्यासाठी म्हणून आला, आणि थोडक्यात का होईना, त्याने चाकणमधील आपले अनुभव लिहून ठेवले.!
यापूर्वीही तो जवाहिरे विकण्याच्या निमित्ताने पाच-सहा वेळा हिंदुस्थानात आला होता. प्रत्यक्ष औरंगजेबासही त्याने काही माल विकला होता. औरंगजेबाच्या मावशीचा नवरा वजीर मोहम्मद जाफर, मामा शाहिस्तेखान इत्यादींच्या बरोबर त्याचे स्नेहाचे संबंध होते.
१६५३ मध्ये तो हिंदुस्थानात आला असता त्याने अहमदाबादेस जाऊन शाहिस्तेखानाला माल विकला होता.
आता १६६० मध्ये तो परत हिंदुस्थानात आला. त्याने सुरतेहून दिल्लीला शाहिस्तेखानाच्या नावे पत्र पाठविले. त्यावेळी शाहिस्तेखानाची नेमणूक दक्षिणचा सुभेदार म्हणून झाली होती. 'मला बुऱ्हाणपूरला येऊन भेटा' असे शाहिस्तेखानाच्या पत्राचे उत्तर जाईपर्यंत तो औरंगाबादेस आला होता. पण सुरतेचा प्रशासक त्याला लवकर जाऊ देईना. शेवटी त्याची सुटका झाली त्यावेळी त्याला कळले की, शाहिस्तेखानाने चाकणला वेढा घातला आहे. तेव्हा तो चाकणला पोहोचला. तो आपल्या ग्रंथात त्याचा उल्लेख 'चाॅपार' असा करतो.
तावर्निये लिहतो-
मी चाकणला पोहोचलो. युरोपहून आणलेला बहुतेक माल मी शाहिस्तेखानाला विकला. तो मला म्हणाला, 'माझ्या सैन्याला पगार देण्यासाठी मी सुरतेहून खजिना मागविला आहे. खजिना येताच मी तुमच्या जवाहिराची किंमत देऊन टाकीन.'
माझा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसेना. इतके मोठे सैन्य आणि त्याचा पगार देण्यासाठी लागणारा पैसाही हा आपल्या जवळ बाळगून नाही. मला वाटू लागले की माझ्या मालाची पूर्ण किंमत देण्यात तो खळखळ केल्याशिवाय राहणार नाही.
'माझ्या आदरातिथ्यात काही पुणे पडता कामा नये असे शाहिस्ताखानाने आपल्या अधिकाऱ्यांना बजावून ठेवले होते. माझ्यासाठी रोज मांसाच्या चार थाळ्या आणि फळफळावळीच्या दोन थाळ्या येत; पण जवळजवळ रोजच मला शाहिस्तेखाना बरोबर जेवण घ्यावे लागे. त्यामुळे माझ्यासाठी म्हणून पाठविलेले भोजन माझ्या नोकरचाकरात वाटले जाई.'
नबाब शाहिस्तेखानाच्या सैन्यात पाच-सहा (रजपूत) राजे होते त्यांनीही मला मेजवान्या द्यावे अशी त्यांना आज्ञा करण्यात आली. त्यांच्या भोजनाचे प्रमुख प्रकार म्हणजे भात आणि भाज्या आपल्या पक्वान्नात ते मिरी आणि आले आणि इतर मसाले सपाटून वापरीत त्यामुळे त्यांच्या मेजवान्या नंतर माझी भूक जशीच्या तशीच राही. नबाबाच्या  आदरातिथ्याचा हा प्रकार दहा-बारा दिवस चालला. विकलेल्या मालाची रक्कम मला आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर मी वाट पाहत बसलो होतो. पण शाहिस्तेखान हा आदरातिथ्यात उणे करीना आणि पैसे देण्याचे नाव काढीना. शेवटी त्याचा निरोप घ्यावा असे मी ठरविले.

मी शाहिस्तेखानाच्या तंबूवर गेलो. मला पाहून त्याला थोडे आश्चर्य वाटले नि तिरसटपणे तो मला म्हणाला-
"मालाची किंमत तुला मिळाल्याशिवाय तू काय म्हणून निरोप घेत आहेस ? आणि पैसे न मिळता तू निघून गेलास तर उद्या तुला ती रक्कम कोण देणार आहे?"

शाहिस्तेखानाचे हे शब्द ऐकल्यावर मीही त्याच्याप्रमाणे चेहऱ्यावर ताठरपणा आणला आणि त्याला म्हटले-
"आमचे (फ्रान्सचे) राजे आमच्या रकमेची व्यवस्था करतील. आमचे (फ्रान्सचे) राजेसाहेब अतिशय उदार आहेत. त्यांच्या प्रजाजनांपैकी व्यापाऱ्यांना परदेशात त्यांच्या मालाची किंमत मिळाली नाही तर ते संपूर्ण रकमेची भरपाई करून देतात."
"अस्से ! पण मग व्यापाऱ्यांना दिलेल्या रकमेची भरपाई तुमचे राजेसाहेब कशा रीतीने वसूल करतात?"  शाहिस्तेखानाने विचारले.

यावर तावेर्निये याने दिलेले उत्तर अनेक दृष्टीने पाहण्यासारखे आहे. तो काळ मोगलांच्या वैभवाच्या शिखरावरचा. शाहिस्तेखान हा औरंगजेबाचा मामा, दक्षिणेचा सुभेदार, मोगल साम्राज्यातील सर्वश्रेष्ठ अमीर, सहस्रावधी सैन्यासह चाकणला वेढा घालून बसलेला सेनाधिपती ! अशावेळी शाहिस्तेखानाला उत्तर देताना कोणीही नम्रपणाची भाषाच काढील, पण या फ्रेंच माणसाचा ताठा आणि दर्प पाहा, तो म्हणाला-
"आमच्या रकमा आपल्याकडून वसूल करणे आमच्या राजेसाहेबांना मुळीच जड नाही. आमचे राजेसाहेब दोन-तीन युद्धनौका सूरत बंदरावर अगर त्या किनाऱ्यावरील इतर स्थळांवर पाठवतील. मक्केच्या यात्रेवरून तुमची जहाजे येथील. त्यांची (लूट करावी म्हणून) वाट बघत आमच्या युद्धनौका दबा धरून बसतील.
तावेर्निये पुढे म्हणतो-
माझे उत्तर शाहिस्तेखानाला झोंबल्यासारखे दिसले.
तिरसटपणाचा हा रोख चालू ठेवण्याची त्याला हिंमत झाली नाही. त्याने आपल्या खजिनदाराला बोलावले. औरंगाबादच्या खजिन्यावर मला माझ्या रकमेची हुंडी देण्यात यावी अशी त्याने तातडीची आज्ञा दिली. दुसऱ्या दिवशी मला हुंडी मिळाली. मी शाहिस्ताखानाचा निरोप घेतला. त्याचा राग नाहीसा झाला होता. पुन्हा हिंदुस्थानात आला असता भेटल्याशिवाय परत जायचे नाही असे त्याने मला सांगितले.'

असो, चाकणच्या वेढ्याचा थोडा का होईना पण उल्लेख ताव्हेर्न्ये ने केला आहे. मोगल साम्राज्याचे नाजूक मर्मस्थान म्हणजे आरमाराचा अभाव. नौका दलाकडे त्यांनी अक्षम्य असे दुर्लक्ष केले आणि नेमके तावेर्नियेने या मर्मावर बोट ठेवले. मक्केच्या यात्रेकरूंवर काय संकट ओढवेल याची जाणीव त्याने शाहिस्तेखानाला करून दिली. एका सामान्य व्यापाऱ्याने  दिलेला दम  पाहून शास्ताखान चरफडला असावा, पण तो करतो काय ?
दुसरे म्हणजे,
चाकण गढी ती केवढी ? महाराष्ट्रातील इतर भुईकोट किल्ल्यांच्या मानाने ती अगदी सामान्य म्हणावी लागेल. या एवढ्याश्या गढीवर सगळे मोगल सैन्य घसरले होते. पावसापाण्यात मोगलांचे हाल झाले. इतिहासकार मामूरी याचा बाप या वेळी वेढ्यात हजर होता. तो मोगलांच्या शौर्याचे वर्णन करण्याच्या भरात मराठ्यांच्या प्रतिकाराचा ही उल्लेख करून जातो-
'पावसाची झड लागलेली, दारुगोळा भिजलेला, किल्ल्यातील शिबंदी आणि बाहेर असलेले मराठ्यांचे सैन्य ईतके प्रखर हल्ले करीत की मोगल सैन्य धास्तावून जाई. या वेढ्याचे सुरूंगकाम करणारे आणि खंदक खणणारे सोडा, पण मोगल सैन्याचेच तीनशे सैनिक शहीद आणि सहाशे जखमी झाले.'
आणि खरेच या एका जबरदस्त अनुभवाने शाहिस्तेखानाने मराठ्यांच्या इतर किल्ल्यांवर हल्ला करणे सोडून दिले. खरेतर हा चाकणचा पराभव नसून मोगलांचा नैतिक पराभव ठरला !!
कारण या पश्चात शास्ताखान केवळ पुण्यात छावणी करून बसला व किल्ल्यांना झटण्याऐवजी खेड्यापाड्यांच्या मामुली लुटीवर आपल्या इभ्रतीची भूक भागवू लागला!!
तिकडे पन्हाळ्याच्या वेढ्यातूनही महाराज सहीसलामत निसटले होते. हे शास्ताखानास परवडणारे नव्हते आणि त्यात चाकण येथे झालेल्या प्राणहानीची भर ! सिद्दी जोहर सारख्या पराक्रमी सेनापतीवर आत्महत्या करायची वेळ आली. पण शाहिस्तेखान साहेब  म्हणजे मोगल साम्राज्यातील सर्वशक्तिमान ! त्यास कुणी बोटही लावू शकत नव्हते, पण नियतीने काय वाढून ठेवले होते हे नवाब साहेबांच्या बोटांनाही कुठे ठाऊक होते.??
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts