२२ मराठाचे कमांडर म्हणून कर्नल संभाजी पाटील यांनी तवांग ते बुम्ला हा रस्ता १९८३-८४ मध्ये तयार केला होता. हा रस्ता भारत-चीन सीमेकडे जाणारा एक मोठा दुवा होता. संरक्षण दृष्ट्या या रस्त्याचे महत्त्व खुपच महत्वाचे होते. सीमेवरील सैनिकांना रसद पुरवण्यासाठी हा खास रस्ता बांधण्यात येणार होता.समुद्र सपाटी पासून १२४००फुट उंचीवर असणारा हा भाग अस्तिशय दुर्गम. अशा भागात काम करणे खुपच अवगड. स्थानिक लोकांची मदत घेणे खुपच आवश्यक होते. यातूनच, दोरजीखांडू, तवांग भागाती एक उत्साही युवा नेतृत्व व कर्नल संभाजी पाटीलांची चांगलीच मैत्री झाली. खांडू ते नित्य नेमानेमराठा रेजिमेंटच्या(MLI) युनिटला भेट देत असत व काही मदत लागल्यास ती गावातील लोकांच्या मदतीने करत असत. या काळातच त्यांना मराठा लाईट इनफंट्रीचे मुख्यालय बेळगाव येथे खास प्रशिक्षणासाठी पण पाठवण्यात आले होते. एक मस्त नाते दोरजी खांडू व मराठा लाईट इनफंट्रीच्या सर्वं जवानांचे झाले होते.
२२ किलोमीटरचा हा रस्ता म्हणजे तवांग भागातील अरुणाचली बांधव, २२ मराठा लाईट इनफंट्रीच्या सर्वं जवानांचे देशासाठीचे खूप मोठे योगदान होते. कर्नल संभाजी पाटील व श्री दोरजी खांडू यांच्या मैत्रीचेच फक्त हा रस्ता प्रतिक नाही तर पश्चिमेकडील मराठी लोकांच्या व अति पूर्वेकडील अरुणाचली बंधूंच्या मैत्रीचे ते प्रतिक आहे.
श्री दोरजी खांडू यांनी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर स्थानिक अरुणाचली बंधूंच्यावतीने २२ मराठा लाईट इनफंट्रीच्या सर्वं जवानांसाठी एका पार्टीचे आयोजन पण करण्यात आले. सर्वं जवानांचा गौरव त्यात करण्यात आला. काही रोख रक्कम त्यांनी बक्षीस म्हणून २२ मराठा लाईट इनफंट्रीसाठी त्यांनी देऊ केली. सर्वांनी ते बक्षीस साभार परत केले व अरुणाचली बंधूना त्यांनी विनंती केली की या रस्त्याला मराठी माणसांचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे व या रस्त्यावर महाराजांचे दोन पुतळे उभे करावेत. एक तवांग युद्ध स्मारकाजवळ व दुसरा रस्त्यात एखाद्या महत्वाच्या ठिकाणी.
श्री. दोरजी खांडू व स्थानिक अरुणाचली बांधवानी ही रास्त मागणी लगेच मान्य केली. त्या रस्त्याचे नामकरण छत्रपती शिवाजी मार्ग असे करण्यात आले व केवळ दोन महिन्याच्या अवधीतच महाराजांचा अर्धाकृती पुतळा रस्त्याच्या एका महत्वाच्या ठीकानी उभा केला. छत्रपतींच्या शिल्पाच्या अर्पण समारंभात सर्व २२ मराठा लाईट इनफंट्रीच्या जवानांच्या सोबत मराठा लाईट इनफंट्रीचे मराठा स्फूर्ती गीत खड्या आवाजात श्री दोरजी खांडू यांना गाताना बघून अनेक जणांना आश्चर्य वाटले.
मर्द आम्ही मराठे खरे , शत्रूला भरे कापरे |
देश रक्षाया, धर्म ताराया, कोण झुंजीत मागे सरे ....
जनरल जे. जे. सिंग-
तब्बल २५ वर्षांनी दिल्लीस झालेल्या एका भेटीत कर्नल संभाजी पाटील यांनी दोरजी खांडू बरोबर चहा पीत असताना महाराजांच्या दुसऱ्या पुतळ्या बद्दल विचारले. आता दोरजी खांडू अरुणाचलप्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते. मग या कामाला उशीर कसा होणार त्यांनी याची कल्पना अरुणाचलचे राज्यपाल जनरल जे. जे सिंग यांना दिली. हे राज्यपाल सिंग दुसरे कुणी नव्हे तर पूर्वीचे मराठा लाईट इन्फन्ट्रीचे जनरल होत.
फाळणीदरम्यान जनरल सिंग यांच्या कुटुंबीयांना स्थलांतर करावे लागले नी त्यांनी थेट पुणे गाठले. तेव्हापासून ते बनले पुणेकर! ते स्वतःला महाराष्ट्रीयनच मानतात ! म्हणूनच, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यात त्यांची पत्नी स्वत: पुरणपोळीची मेजवानी देऊ शकल्या !!
त्यांच्या तीन पिढ्या भारतीय सैन्याशी निगडीत आहेत. त्यांचे आजोबा सरदार आत्मा सिंग यांनी पहिल्या महायुद्धात भाग घेतला होता. आपला मुलगा कर्नल व्हावा आणि नातू जनरल बनावा असं त्यांचं स्वप्न. ते त्यावेळी मराठा रेजिमेंटबरोबर काम करत होते. त्यामुळे त्याच्या तिन्ही पिढ्यांचा मराठा रेजिमेंटशी संबंध. हा ऋणानुबंध ४३ वर्षांचा.
मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये १९६४ साली जनरल जे. जे. सिंगांचे कमिशनिंग झाले .त्यांना लष्करात टायगर म्हणून ओळखलं जातं आणि त्यांच्या बलवान शरीरयष्टीकडे पाहिल्यावर हे नाव सार्थ वाटतं. ते १९८२ -८४ च्या काळात अरुणाचल मध्ये ९ मराठा बटालियनचे कमांडर होते. ब्रिगेड कमांडर असताना कश्मीर खोऱ्यात १९९१ साली दहशतवाद्यांशी दोन हात करताना जखमी झालेले लेफ्टनन्ट जनरल जे. जे. सिंग पुढे भारताचे पहिले शीख लष्करप्रमुख झाले.
पुढे अरूणाचलचे राज्यपाल झाल्यानंतर एका कार्यक्रमात ते म्हणाले-
“छत्रपती शिवाजीमहाराजांचे बुद्धिचातुर्य आणि सुराज्याची हिंमत लाभलेल्या मराठा लाईट इन्फंट्रीतील मराठा जवान तगडा,चिवट आणि धाडसी आहे. त्यांच्यासोबत आपण ४३ वर्षे सैन्यदलात कर्तव्य बजावले. यावेळी त्यांच्याकडून मिळालेले सहकार्य आणि ताकदीमुळेच भारताच्या पायदलाचा मी लष्करप्रमुख होऊ शकलो. मराठा जवानांबरोबरची एकजूट आपल्या जीवनाचा एक भाग बनली. या एकजुटीने आम्ही लढत राहिलो. त्यामुळे अनेक कामगिरी फत्ते झाल्याने या एकजुटीचा आनंद मिळत गेल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. मराठा जवान सच्चा लढवय्या व बहादूर असून, शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची देण लाभल्याने सैन्यदलात त्यांना मोठा मान आहे. त्यांच्यासोबत कर्तव्य बजावताना एकजुटीने झालेल्या कर्तृत्वामुळेच सैन्य दलातील आपली उंची उत्तरोत्तर वाढतच गेली. लष्करप्रमुख झालो. लोकांचा राज्यपाल म्हणून गौरविला गेलो. राष्ट्राचे, सैन्य दलाचे, जनतेचे प्रेम मिळाले. परमेश्वराचा कृपाशीर्वाद लाभल्याने आयुष्यात समाधानी असून, भाग्यवान असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. या सर्वातून उतराई होण्यासाठी सैन्यदलातून मी निवृत्त झालो असलो तरी ती मला मान्य नाही. जनतेच्या हिताचे आणि राष्ट्राच्या विकासाचे काम करण्याची माझी दुसरी इनिंग सुरू झाली.”
महाराजांचा पुतळा उभा करण्याच्या संकल्पनेला त्यांचा पूर्ण पाठीबा मिळाला व ते काम त्याच्या नजरेखाली पूर्ण झाले.
२ जुन २००९ बुधवारी,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली ती भूमी नव्हती मात्र तरीही तिथल्या जनतेला महाराजांच्या कर्तृत्वाविषयी आस्था आहे. त्या आस्थेचे मूतिर्मंत रुप साकारले. मराठा रेजिमेंटने अरुणाचल प्रदेशात गाजवलेल्या कर्तृत्त्वाला सलाम करण्यासाठी तवांग येथे राज्यपाल निवृत्त जनरल जे. जे. सिंग यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
अनावरण समारंभास छत्रपती शाहू महाराज, कर्नल (निवृत्त) एस डी के पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी विनायक निपुण आदी उपस्थित होते. पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी पोवाडाही सादर करून शौर्यगान केले. अशाप्रकारे तवांग परिसरात शिवछत्रपतींच्या दुसऱ्या पुतळ्याचे कार्य पूर्ण झाले. जवानांचा तो संकल्प पूर्ण झाला.
डिसेंबर मध्ये कोल्हापूरात राज्यपाल निवृत्त जनरल जे. जे. सिंग यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले- “भारत-चीन यांच्यातील अरुणाचलमध्ये येणाऱ्या सीमाप्रश्नी चिंतेची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अरुणाचल प्रदेशमध्ये उभारण्यात आला आहे. हा पुतळा कोल्हापुरातच तयार केला आहे. या पुतळ्याची नजर चीनकडेच आहे. म्हणजे शत्रूकडेच करड्या नजरेतून राजे लक्ष ठेवत आहेत.”
जय हिंद !!!
||फक्तइतिहास||
Comments
Post a Comment
... मग कशी वाटली पोस्ट