युद्ध सुरू होते !
घमासान युद्ध ! हिंदभूमीवर वसलेली फिरंग्यांची इस्टेट हादरू लागली, गोवा किल्ल्याच्या माथ्यावरती फडकणाऱ्या ध्वज पताकेस कापरे भरु लागले. सागरात नांगरून पडलेली पोर्तुगीज जहाजे वाऱ्याने हेलकावू लागली...
होय, नोव्हेंबर-डिसेंबरच्या याच सुमारास अर्थात ३३५ वर्षांपूर्वी (१६८३) संभाजी राजांनी गोव्याच्या पोर्तुगीजांविरूद्ध युद्ध पुकारले. पोर्तुगीजांनी आैरंगजेबाशी हातमिळवणी करून शंभूराजांशी मैत्रीचा घात केला व कल्याण च्या रणात मोगल सेनापती रणमस्तखान याला धान्यरसदेची मदत केली. शंभूराजांनी कल्याणचे रण जिंकले मात्र तुकोजी सारख्या वीरांच्या यात आहुती पडल्या. पोर्तुगीजांनी मोगलांना रसद पुरवठा केला नसता तर तीन वर्षे हे रण ऐसे धगधगते नसते.! पोर्तुगीजांनी पुनश्च मोगल-मराठा युद्धात अशी लुडबूड करू नये म्हणून शंभूराजांनी एप्रिल १६८३ मध्ये त्यांच्या ठाणे, चोल व वसईच्या मुलखावर आक्रमण केले. मूर्ख व्हाईसरायने (विजरई) यातच एक आगळीक केली. त्याने गोव्याजवळी संभाजी राजांच्या फोंडा या दुर्गावर हल्ला केला. खुद्द अकबर बादशहाला ही सागरात आमची परवाने घ्यावे लागत असत असा आमचा इतिहास या घमेंडीत हा व्हाईसरॉय वागत असे.
|
हाईसराय- आल्वर |
१ नोव्हेंबरला पोर्तुगीज व्हाईसरायने सैन्यासह या किल्ल्यास वेढा दिला. पण येसाजी कंक व त्यांचा पुत्र कृष्णाजी यांनी केवळ ७०० सैनिकांसह कडवी झुंज दिली. असे तब्बल ९ दिवस गेले. १० व्या दिवशी खुद्द शंभूराजे २०००० सैन्य घेऊन फोंड्याच्या आसमंतात दाखल झाले ! पाेर्तुगीजांची गाळण उडाली. जीव वाचवून ते पळू लागले. व्हाईसराय त्याच्या कॅप्टनसह मराठ्यांच्या तावडीत सापडला. तलवारीचे घाव घेऊन कसातरी तो बचावला व गोवे शहरात पोहोचला. फोंडा एका दिवसात जिंकू म्हणणाऱ्या व्हाईसरायची घमेंड जिरली होती.
दहा दिवसांच्या या युद्धात कृष्णाजी हा येसाजींचा पुत्र गंभीर जखमी होऊन मरण पावला. जेधे शकावलीतील नोंद म्हणते-
"फिरंगी याने कोटास वेढा दिला.. तिथे येसाजी कंक व त्याचा लेक कृष्णाजी यांनी युद्धाची शर्थ केली"
शंभूराजांनी कृष्णाजीच्या मुलास खर्चासाठी सुभ्याची जहागिरी लावून दिली. शत्रूशी लढताना फोंडा ही बराच जखमी झाला होता.
राजांनी फोंडा किल्ल्याची डागडुजी न करता जवळच मर्दनगड असा नवा किल्ला उभारला.
संभाजी राजांनी तर आता थेट गोव्यातच शिरून निकाली हल्ला करण्याचे ठरवले. म्हणून मराठ्यांचे लक्ष आता गोव्यासमोरील ‘जुवे’ बेटाकडे लागले. यास पोर्तुगीज ‘सांत इस्तेव्हांव’ बेट असे म्हणत. हे गोव्याच्या ईशान्येला मांडवी नदीच्या पलिकडे दोन मैलावर आहे. अनेक वर्षांपूर्वी २५ नोव्हेंबर याच दिवशी गोमांतक म्हणजे गोवे पोर्तुगीजांच्या ताब्यात आले होते. मोगल सम्राट अकबरापासून आम्हास कुणीही जिंकू शकले नाही या घमेंडीत पोर्तुगीज असत. आणि नेमके याच तारखेला मराठ्यांचा हल्ला येथे झाला म्हणजे नियतीचाच सूड म्हणावा!
दि.२४-११-१६८३ रोजी रात्री ८ वा. च्या सुमारास मराठा सैन्यांनी जुवे बेटात जाऊन तेथील किल्ला काबीज केला. विजरईचे तर धाबेच दणाणले.
याबाबत मनुची लिहितो – " संभाजीने ओहटीच्या वेळी आपले चार हजार सैन्य पाठवून सँटो एस्टेव्होचा किल्ला ताब्यात घेतला. संभाजीचे सैन्य किल्ल्यात घुसले आणि किल्ल्यातील सर्व शिबंदीची कत्तल केली. संभाजीच्या सैन्याची मुळीच हानी झाली नाही. किल्ला ताब्यात आला याचा इशारा म्हणून संभाजीच्या सैनिकांनी अनेक(तोफेचे)गोळे (गोव्याच्या दिशेने) सोडले. त्यावेळी गोव्यात विलक्षण गोंधळ उडाला."
मराठ्यांनी केलेल्या तोफेच्या इशाऱ्याने नदीपल्याड गोव्यातील गस्तीचे शिपाई सावध झाले. फिरंगी ध्वज पताकेला कापरे भरले. भयकातर झाल्या फिरंगी सैनिकांनी धोक्याची घंटा अखंड बदडायला सुरुवात केली !
दुसऱ्या दिवशी, दि.२५-११-१६८३ या दिवशी सकाळी ७ वा. सुमारास विजरई कोंदि द आल्व्होर याने ४०० शिपायांसोबत जुवे बेटाकडे कूच केले. या लढाई मधे विजरई घायाळ झाला. केवळ सुदैवाने तो बचावला. जुवे बेट मराठ्यांच्या ताब्यात गेल्यामुळे नदीच्या बाजूस लागून ज्या शेतीच्या जमिनी होत्या त्याचे बांध पोर्तुगीजांनी फोडून टाकले. त्यामुळे जवळील मांडवी नदीचे पात्र वाढू लागले. पोर्तुगीज सैनिक पळू लागले. त्यांच्या सोबत आता विजरई कोंदि द आल्व्होर हा देखील पळत सुटला. तीरावर झालेल्या झटापटीत त्याच्या दंडाला गोळी लागली. यात त्याचे दीडशे सैनिक मारले गेले. कॅप्टन त्याच्या मदतीस धावला नाही तर त्याचा अध्याय आटोपलाच होता. विजरई व कॅप्टन कसेबसे जीव वाचवत मांडवी नदीच्या तीरावर आले. आता विजरई कोंदि द आल्व्होर पुन्हा एकदा दोन्ही बाजूने कात्रीत सापडला होता.!
बांध फोडून स्वःताच्याच हाताने नुकसान करून घेतले असे त्याला वाटू लागले कारण पोर्तुगीजांना आता पलीकडे काही जाता येत नव्हते कारण सर्व नावा आता पाण्यावर तरंगत होत्या आणि पाठीमागून त्याचा पाठलाग खुद्द संभाजी महाराज ससैन्य करत होते.
आपण संभाजी राजांच्या तावडीत सापडलो तर अंत निश्चित हे त्यास चांगलेच उमगले होते. साक्षात आपला काळ पाठीवर आहे असेच त्याला वाटत होते. अखेर जिवाच्या भीतीने विजरई व कॅप्टन छातीभर पाण्यातून चालत जाऊन नावे मध्ये बसले. संभाजीराजे देखील घोडा दौडवत तीरावर पोहचले होते. आपल्या तेज प्रतापी लखलखत्या भवानी तलवारीच्या धारदार पात्याने पळणाऱ्या फिरंगी सैनिकांना यमपुरीस धाडत होते. कसेतरी नदीच्या पलीकडच्या तीरावर पोचलेले सैनिक या दृश्याकडे मोठ्या भयकारी नजरेने बघत होते, नशिबानेच ती वाचले होते. जुवे बेटा वरील सर्व लोक विजरईच्या लोकांची ही शोकांतिका बघण्यासाठी गोळा झाले होते. नदीच्या पल्याड गोवा शहरातील लोकांनाही हे भीषण दृश्य दिसत होते.
एवढ्यात विजरईला मचव्यात बसून जाताना पाहताच त्या तुडुंब भरलेल्या मांडवी नदीच्या पात्रात संभाजी राजांनी आपला घोडा घातला ! आपल्या जीवाचे काय बरे वाईट होईल याची पर्वा देखील संभाजी राजांनी केली नाही. संभाजी राजे किती इरेला पेटले होते हे यावरून दिसते. नदीला आलेल्या भरतीमुळे संभाजी राजांचा घोडा आता पोहणीला लागला होता. यावेळी खंडो बल्लाळ तिथे शंभूराजांसोबत होता. घोडा पोहणीला लागलेला पाहताच, त्याने देखील त्या नदीच्या पात्रात उडी घेतली आणि घोडा ओढून राजांचे प्राण वाचवले. वर्षभरापूर्वीच संभाजी राजांनी खंडो बल्लाळ यांच्या वडिलांना (बाळाजी आवजी चिटणीस) देहदंड दिला होता. मनात कुठल्याही प्रकारची द्वेष न ठेवता स्वराज्याच्या छत्रपती साठी ही स्वामीनिष्ठा आणखी कुठे पहावयास मिळणार ? हे मराठी मातीचे गुण आणि सळसळत्या मराठी रक्ताचे ऋण आहे ! खंडो बल्लाळ यांनी केलेल्या कामगिरीबद्दल संभाजी राजांनी त्यांचा सत्कार केला. पण एक मात्र राहून गेले...
"ते दिवशी गोवे घ्यावयाचे परंतु फिरंगीयाचे दैव समुद्राने रक्षिले"
अर्थात भरती आली नसती तर त्याच दिवशी गोवे घेतले असते. विजरई कोंदि द आल्व्होर हा पुरता घाबरला होता. मांडवी नदी पार करून कसाबसा जिव वाचवत तो थेट सेंट झेविअर कडे आश्रयास गेला. त्याने झेविअरची करुणा भाकली. सर्व मशाली पेटवून तळघरात जाऊन सेंट झेविअरची शवपेटी उघडली. त्याने आपला राजदंड आणि राजचिन्हे, स्वलिखित अर्ज झेविअरच्या पायथ्याशी ठेवला आणि प्रार्थना केली – " हे राज्य तूच निर्माण केलेस आता तूच ह्याचा सांभाळ कर”.
विजरई पूर्णपणे हवालदिल झाला होता. या सेंट झेवियरची ममी आजही गोव्यीच्या चर्चमध्ये आहे. तीन वर्षांपूर्वी पोर्तुगीजांच्या आफ्रिकेतील अंगोला या वसाहतीचा गव्हर्नर राहिलेला हा गोव्याचा विजरई स्वतः मोठा योद्धा समजत होता. मात्र आपल्या फिरंगी तोफेची मिजास वाटणाऱ्या विजरई ला मराठी छातीचा कयास बांधता आला नाही !
मराठ्यांचा मोर्चा आता साष्टी आणि बारदेश कडे वळला. संभाजी राजेंनी २०००० शिपाई, ५००० स्वार, आणि १० हत्ती घेऊन स्वारी केली. मराठे साष्टी आणि बारदेशात शिरल्यापासून जिकडे तिकडे जाळपोळ आणि लुटालूट करत होते. साष्टी आणि बारदेश मधील आग्वाद, रेइशमागुश, रायतूर, मुरगाव हे किल्ले सोडून सर्व प्रदेश मराठ्यांनी जिंकला. विजरईने राजांकडे तहाचा प्रस्ताव पाठविला. वकीलाबरोबर निकोलाय मनुची हा सुद्धा होता. दरबारात शंभूराजांनी वकिलास आपली तलवार दाखविली आणि म्हणाले- पोर्तुगालच्या राजाने शेजाऱ्यांशी शांतता राखा असे हुकूम दिले असतानाही व्हाईसरॉयने आमच्या विरुद्ध युद्ध पुकारले...याच तलवारीने मी माझ्या शत्रूंचा शिरच्छेद केला आहे.!!"
शहा आलम सैन्य घेऊन दक्षिण कोकण मध्ये उतरत असल्याचे शंभूराजांना समजले होते, तरी फिरंग्यांना शासनकरत त्यांनी आपली मोहीम तडकाफडकी पूर्ण केली होती. तहाची बोलणी सुरु झाली.
मात्र संभाजीराजांच्या सोबत झालेल्या युद्धामधे विजरईस कळून आले की मराठ्यांविरुद्ध गोवे शहराचे रक्षण करणे ही एक अशक्य गोष्ट आहे. पोर्तुगीजांकडे आरमार होते. गोवे शहरास तट असून जागोजागी गडगंज बुरुज होते. शहरामधे मोठा दारूखाना होता. नदीच्या मुखावर मुरगाव, आग्वाद, रेइशमागुश, काबू असे किल्ले होते. असे असून देखील विजरईस मराठ्यांच्या भीतीने राजधानी गोवे शहरातून हलवण्याची गरज भासली.
हा तह नव्हे, तो फिरंग्यावर मिळालेला विजय होता. तो डिसेंबर १६८३ अखेर तो मुक्रर झाला. पून्हा चूकूनही पोर्तुगीज मोगलांच्या सोबत युद्धात उतरले नाही. एवढेच नाही तर जो मोगल शहजादा त्यांच्या मदतीस अहमदनगरहून गोव्याकडे आला होता, त्याला काडीचीही मदत पोर्तुगीजांनी केली नाही व अखेर मोठे हाल अपेष्टा सहन करत त्याला परत फिरावे लागले.
पोर्तुगीजांचे हे राज्य कोणत्या चांगल्या तत्त्वावर आधारलेले नव्हते त्याचा आधार पूर्वी व्यापार व आता धर्मप्रसार हा होता. म्हणून त्यांचा सहज विनाश झाला. कारण या युद्धात पोर्तुगीजांना स्थानिक प्रजेची साथ मिळाली नाही. शंभूराजांच्या या आक्रमणाने अनेक वर्षांपासून येथील चर्च फादर्स कंपनीच्या कर्मकांडांच्या गुलामीत राहणाऱ्या स्थानिक प्रजेची खऱ्या अर्थाने मुक्ती प्राप्त झाली. गोव्याच्या जनतेचीही पहिली मुक्ती नव्हे काय!! आणि हो ज्या गोव्यावर मोगलांना कधी आक्रमण करायची हिम्मत झाली नाही त्या गोव्याचे शंभूराजांच्या तलवारीने गर्वहरण केले!
गोव्याचे कॅथलिक संभाजीराजांच्या या स्वारीस व्हडले राजीक" अर्थात महा स्वारी असे म्हणू लागले. हिंदुस्थानच्या इतिहासात फिरंगीयास परास्त करणारा दुसरा कोणी योद्धा या आधी वा नंतर जन्मला नाही.!
-शौर्यशंभू ३३६-३५०।।
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
||फक्तइतिहास||
|
फोंडा येथील स्मारक |
Comments
Post a Comment
... मग कशी वाटली पोस्ट