मित्रहो आज इतिहासातील एक मजेशीर बाब सांगणार आहे. पण फक्तइतिहासच.!
औरंगजेबाला धर्मांध व क्रूर म्हणून आपण ओळखतो. पण त्यात काही गुण असे होते की त्याची दखल एक माणूस म्हणून आपण घेतलीच पाहीजे.
औरंगजेब हा कुराण ग्रंथाचे वचन कडकपणे पाळणारा सर्व मोगल बादशहातील एकमेव होता. इतर मोगल सम्राटांप्रमाणे छंद त्याने कधी जोपासले नाहीत. आपल्या साधी राहणी व ईश्वर भक्तीमुळे त्याला लोक "आलमगीर जिंदा पीर" म्हणत. कुराणाने निषिद्ध सांगितलेले मद्यपान तो करत नसे. त्याच्या या निग्रहाचे एक उदाहरण सांगण्यासारखे आहे.
तसे सर्वप्रथम अकबराने परकिय ख्रिस्ती लोकांना आपल्या राज्यात मद्य गाळण्याची व पिण्याची परवानगी दिली होती. पण नंतर जहांगीर काळात ती सर्वस्वी सुरू झाली. औरंगजेब तख्तावर येईपर्यंत मद्यपान ही बाब मामुली झाली.
औरंगजेब मात्र मद्यपानाचा कट्टर विरोधक होता. एकदा तळतळाटाने तो म्हणाला की, सर्व साम्राज्यात मद्य न पिणारी दोघांपेक्षा अधिक माणसे सापडणे कठीण आहे. ते एक म्हणजे मी खुद्द आणि दुसरा म्हणजे माझा मुख्य काजी अब्दुल वहाब.
मात्र औरंगजेबाची माहिती चुकीची होती, कारण हा काजीपण मद्यपान करीत असे.!
औरंगजेबाचा वजीर जाफरखान हा सुद्धा मद्यपी होता. त्याने मदीरा सोडावी म्हणून औरंगजेबाने इतरांच्या मार्फत त्याला अनेकदा कळविले. शेवटी एक दिवस औरंगजेब जाफरखानास म्हणाला-
'तुम्ही मोगल साम्राज्याचे वजीर आहात व हे राज्य मुसलमानांचे आहे. तुम्ही मद्यपान करणे चांगले नाही. इतरांना चांगला धडा घालून देणे तुमचे कर्तव्य आहे...'
तेव्हा जाफरखानाने औरंगजेबास मोठे मार्मिक उत्तर दिले की,,
'बादशहा सलामत,,
मी म्हातारा झालो आहे, माझ्या हातापायात प्राण राहीले नाही, नीट दिसतही नाही.
मद्यपान केल्याने मला दृष्टी येते. आपले काम करण्यासाठी लेखनीला बळ येते. आपण बोलावले की चालण्याचे पायाला बळ मिळते. म्हणून~ मी पित असतो..!
मदीरेने गरीब श्रीमंत होतात, आंधळे पाहू लागतात आणि अपंगांना अवयव लाभतात..!
म्हणून~ मी पित असतो..!
वजीराचे हे बोल ऐकून औरंगजेब मनोमन हसला. मात्र त्याने वजीराचा हुद्दा कमी केला. आपल्या साम्राज्यातही मद्यपान बंदी केली. मद्य विकणाऱ्यावर व पिनार्यावर कठोर कारवाई करण्यात येऊ लागली. पण नेहमीप्रमाणे ते सफल झाले नाही, होईलही कसे ? बहुतांश मोगल अधिकारीच मद्य हौशीने पित असत.
असो,
मित्रांनो इतिहास मग तो कुणाचाही असो, ऐकण्यासारख काहीतरी बोलून जातो... म्हणूनच कधी कधी भस्मासुराचा इतिहासही सहानुभूतीने हाताळावा लागतो,
माणूस म्हणून..!!!
संदर्भ- स्टोरीया दी मोगोर, औरंगजेब
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
||फक्तइतिहास||
Comments
Post a Comment
... मग कशी वाटली पोस्ट