Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

पानिपताचे अंतरंग....



थंडगार वार्‍यात अंधकार दाटत होता. त्याहून भयानक सडलेल्या जनावरांचा वास त्यात मिसळला होता.

'एक मरठ्ठा मुंडी लाओ, सोने का सिक्का पाओ.'

अफगाण सेनापती जहानखान शिपायांवर ओरडत होता. अंगात डगला आणि डोक्याला मुंडासे बांधलेला अफगाण शिपाई मायभूमीकडे ओढला जात होता. तरी काही उपरी मोहापाई घोडा दौडवीत होती. घनघोर त्या जंगलातून पळत सुटलेल्या घायाळ झालेल्या मराठा सैनिकांची काय दशा..'

... असा हा लढाईनंतरचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. आणि भर हिवाळ्यात आमच्या थंडगार काळजातील रक्त उसळू लागत.!

मित्रांनो,

दोन मोती गळाले, लाख बांगडी फुटली, २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणतीच नाही, असं या लढाईचं वर्णन केलं गेलं.

अर्थात हानी किती झाली याचं हे वर्णन, याचा अर्थ आपण आपला सपशेल पराभव झाला असे समजले. यज्ञ कुंडात स्वाहा होणाऱ्या आहुत्या आपण मोजल्या मात्र त्यांच्या आहुत्यांनी प्रज्वलित झालेला तेजोअग्नी आम्हाला दिसला कसा नाही..!

मित्रांनो,

पानिपतात मराठ्यांचा पराभव का झाला आणि कसा झाला याची चर्चा अनेक इतिहास संशोधकांनी केली आहे पण त्यांचे एकमत झाल्याचे दिसून येत नाही. काहींच्या मते भाऊसाहेबांच्या हट्टी दुराग्रही स्वभावामुळे पानिपताचा प्रसंग ओढवला तर काहीजण म्हणतात मराठ्यांनी आपली गनिमी काव्याची पद्धत सोडून दिली म्हणून त्यांचा पराजय झाला. काहींच्या मते भाऊसाहेबांनी आदल्या रात्री ठरविलेला गोल बांधून दिल्लीकडे निसटून जाण्याचा मनसुबा ऐनवेळी सोडून शत्रूशी समोरासमोर गाठ घेण्याचे ठरविले यामुळे मराठी सैन्यात गोंधळ उडाला आणि त्यातूनच पुढे पराभव झाला, हे असे बोलून जाणे सोपे आहे. पण आम्ही शोध घेऊ शकतो.!

पानिपतावर विपुल साहित्य उपलब्ध नाही अशातला प्रकार नाही. भाऊसाहेबांची कैफियत व बखर नाना फडणवीसांचे आत्मचरित्र, पानिपतावरून परत आलेल्यांची काही पत्रे यावरूनही चित्र स्पष्ट होण्यास मदत होते.

पानिपत बद्दल मराठीच्या इतकेच साहित्य फार्सी भाषेत आढळून येते. पानिपतच्या लढाईनंतर चार आठ दिवसातच खुद्द अहमदशहा अब्दालीने जयपूरचा राजा सवाई माधवसिंह यास पत्र लिहून लढाईची हकीकत कळविली होती.

त्या पत्राचे इंग्रजी अनुवाद पाटण्याचे सय्यद हसन अस्करी आणि सर जदुनाथ सरकार यांनी स्वतंत्रपणे प्रसिद्ध केली आहे. तर मराठी अनुवाद सेतू माधव पगडी यांनी केला आहे.

पानिपताच्या प्रसंगानंतर अवघ्या आठ महिन्यांनी गुजरातचा बादशाही दिवाण मिर्झा मोहम्मद हसन उर्फ अली मोहम्मद खान याने "मिराते अहमदी" नावाचा गुजरातचा इतिहास लिहिला. त्या ग्रंथाच्या शेवटी तीन-चार पानात त्यानेही पानिपताची हकीकत थोडक्यात दिली आहे. त्यातील काही माहिती त्याने पानिपतावरून बचावून आलेल्यांकडून गोळा केली. त्या मजकुराचा इंग्रजी अनुवाद सर जदुनाथ सरकार यांनी सरदेसाई अभिनंदन ग्रंथात दिला आहे.

पानिपतानंतर औरंगाबादचा गुलाम अली आझाद बिलग्रामी याने सन १७६३ मध्ये आपला फारसी ग्रंथ "खजाने आमिरा" लिहिला. भाऊसाहेब तर्फे शुजाउद्दौला कडे वकील म्हणून गेलेला भवानी शंकर हा गुलाम अलीचा शिष्य होय. त्याने मराठ्यांच्या छावणीतून गुलाम अली ला पत्रे पाठविली. त्याचा उपयोग करून घेऊन गुलाम अलीने आपल्या ग्रंथात पानिपताची हकीकत दिली आहे. त्या मजकुराचा इंग्रजी अनुवाद कलकत्त्याच्या "मुस्लिम रिव्ह्यू" या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

पानिपतावर हजर असलेल्या दोघा व्यक्तींनी फारशीतून युद्धाच्या हकीकती दिल्या आहेत. त्यापैकी काशीराज हा दक्षिणी गृहस्थ अब्दालीच्या पक्षातील अयोध्येचा नवाब सुजाउद्दौल्याचा कारभारी होता. आणि दुसरा मोहम्मद जाफर शामलू हा अब्दालीचा दुराणी सरदार शहापसंदखान याचा एक अधिकारी होता. काशीराजाने आपली हकिकत सन १७८० मध्ये लिहिली तर महंमद जाफर शामलू याने सन १७९० मध्ये “मनाजिले फतूह" नावाचा ग्रंथ लिहिला. काशीराज्याच्या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद सन १७९० मध्ये ब्राऊन या इंग्रजाने केला. त्याचे पुनर्मुद्रण मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आले. याशिवाय सर जदुनाथ सरकार यांनी काशीराजाच्या वृत्तांताचा काही भाग इंग्रजीत आणून “इंडियन हिस्टॉरिकल क्वार्टरली" या नियतकालिकात प्रसिद्ध केला. मोहम्मद जफर शामलू याच्या हकीकतीचा काही इंग्रजी अनुवाद इलियट आणि डाउसन यांच्या ग्रंथाच्या आठव्या खंडात प्रसिद्ध झाला आहे.

‘तारीखे अवध’ नावाने प्रसिद्ध अयोध्येचा इतिहास हा ग्रंथ नज्मुल्गनी यांनी उर्दू भाषेत चार खंडांत लिहून इ. स. १९१९ मधे प्रसिद्ध केला. या ग्रंथाच्या रचनेत त्याने अनेक फारसी ग्रंथांचा उपयोग करून घेतला आहे. पण एक महत्त्वाची गोष्टी आपल्याला नज्मुल्गनीकडून कळते. ती म्हणजे त्याने शुजाउद्दौल्याने सूरजमलला लिहिलेले अस्सल पत्र छापले आहे. त्या पत्रावरून सुजा उद्दौला हा अब्दालीच्या पक्षात मिळण्यास का तयार झाला, त्याने सुरजमल जाट राजाला कोणती राजकीय कारणे दिली, याचा इतिहास समजतो.

पानिपतच्या युद्धाचा कारणकार नजीबखानाचे चरित्र लिहिणारा सय्यद नूरुद्दीन हसन हा दिल्लीचा वजीर गाजीउद्दीन इमादुल्मुल्क याच्या पदरी होता. कामाच्या निमित्ताने त्याचा नजीबखानाशी अनेकदा संबंध आला. जाट, इमादुल्मुल्क आणि मल्हारराव होळकर यांनी दिल्लीला वेढा घालून नजीबखानाशी झगडा केला त्यावेळी नजीबखानाशी तहाची बोलणी करण्याकरिता नूरुद्दीन हा इमादुल्मुल्क तर्फे नजीबखानाकडे गेला होता. त्याने लिहिलेल्या नजीबाच्या अनेक गोष्टींवर प्रकाश पडतो.

‘अहवाले नजीबदौला' या ग्रंथाचा कर्ता बिहारीलाल याचे घराणे नजीबखानाचे पिढीजाद नोकर होय. त्याचा चुलता मनसुखराय हा नजीबखानाचा मुलगा जाबिताखान याचा कारभारी होता. बिहारीलालने नजीबखानाचे छोटेसे चरित्र फारसी भाषेत लिहिले. त्यातूनही महाराज दत्ताजी शिंदे, नजीबखान व पानिपत यांची हकीकत समजण्यास मदत होते. प्रस्तुत सर्व फारशी ग्रंथाचे मराठी भाषांतर इतिहासाचार्य सेतू माधव पगडी यांनी आपल्या ग्रंथात केले आहे.

मित्रांनो, पानिताच्या युद्धापूर्वी इ. स. १७५७ मध्ये अहमदशहा अब्दाली हा आपली हिंदुस्थानची मोहीम आटपून काबूलला परत जात असता, निजामुद्दीन हा अहमदशहाला चिनाब नदीच्या काठी भेटला. अहमदशहाने त्याला आपल्या पदरी ठेवून घेतले. निजामुद्दीनने नादिरशहाच्या चरित्रावर शहानामाये नादिरी हा काव्य ग्रंथ रचला. तो पाहून अहमदशहाने आपल्याही जीवनावर निजामुद्दीनने काव्य लिहावे अशी त्याला आज्ञा केली. निजामुद्दीनने यावरून शहानामाये अहमदिया हे महाकाव्य रचले. त्यावरून अहमदशाह अब्दालीचे पात्र समजण्यास मदत होते.

शिवप्रसाद हा रामपूरचा रोहिला नवाब फैजुल्लाखान याच्या पदरी होता. फैजुल्लाखान हा इतर रोहिले सरदर हाफिज रहमतखान, दुंदेखान इत्यादींबरोबर पानिपताच्या मैदानावर हजर होता. त्याच्याबरोबर शिवप्रसादही होता. शिवप्रसादने इंग्रज अधिकारी किर्कप्याट्रिक याजकरिता म्हणून रोहिलखंडच्या रोहितल्यांचा इतिहास लिहिला. या ग्रंथाचे नाव त्याने तारीखे फैजबख्श असे ठेविले. त्याच्या ग्रंथावरून अहमदशहा अब्दालीच्या पक्षातील भारतीय रोहिले पठानांची बाजू समजण्यास मदत होते.

मित्रांनो,

पानिपताच्या युद्धाला किती वर्षे लोटली याचा हिशेब नको. कारण वर्षे जरी वाढत असली तरी या युद्धाबद्दलचे कुतूहल कितीतरी पटीने मराठी मनात सातत्याने वाढत आहे, कारण पानिपताच्या रणभूमीवर देश रक्षणासाठी महाराष्ट्राच्या पूर्वजांनी रक्त सांडले आहे.!!!

मित्रांनो पानिपताचे अंतरंग केवळ खेदाचे व दुःखाचे नसून शौर्य स्वाभिमान आणि त्यागाचे आहे.! जय-पराजय बघण्यासाठी हा केवळ जीवन मरणाचा व्यापार नाही, तर तत्त्व सिद्धांताचा जयकार आहे.!

पानिपताच्या ज्वलंत स्मृतीस...

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर 

।।फक्तइतिहास।। 

#panipat

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts