Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

सह्याद्रीचा छळ..

 


अजीके तू गोयी के हम मर्दुमंद, बीश्तरे गाव व खरे बेदुमंद

अर्थात, तुम्ही म्हणता की ही माणसे आहेत. छे! ते बिनशेपटाचे बैल आणि गाढव आहेत.!”

मित्रांनो,

औरंगजेब बादशहाचा चरित्र लेखक साकी मुस्तैदखान याचा ग्रंथ ‘मासिरे-आलमगीरी’ यात त्याने बऱ्याचदा काही वैशिष्ट्यपूर्ण लिखाण केले आहे. या ग्रंथाचे भाषांतर इतिहासाचार्य सेतू माधव पगडी यांनी केल्यामुळे ते सर्वसामान्यांना उपलब्ध झाले, आणि इतिहासाचा अनमोल खजिना आपल्याला प्राप्त झाला.

मित्रांनो,

४ जून १७०२, औरंगजेब बादशहाने विशाळगडचा किल्ला जिंकून घेतल्यावर १० जून १७०२ रोजी आपल्या सैन्यासहित भीमेच्या काठावरील बहादुरगडच्या (नगर जिल्हा) दिशेने कूच केले. विशाळगडाहून गजापुरच्या घाटाने मोगल बादशहा औरंगजेब त्याचे प्रचंड सैन्य, सामान लादलेले असंख्य उंट, हत्ती,खेचरे व गाढव सह्याद्रीची ही अवघड वाट चालू लागले. 

या मोहिमेत हजर असलेला औरंगजेबाचा चरित्रकार साकी मुस्तैदखान आपल्या ग्रंथात लिहितो, 'हा (घाटाचा) रस्ता उन्हाळ्यात पार करण्यास मोगल सैन्याला जर कित्येक दिवस लागले तर रात्रंदिवस पाऊस पडत असता हा रस्ता आक्रमण्यास आता किती काळ लागेल याची कल्पनाच केलेली बरी. सामान वाहून नेणाऱ्या जनावरांची स्थिती काय वर्णन करावी!

उंटांनी तर जणू शपथच घेतली होती की, 'आमचे आयुष्य कल्पांतापर्यंत असले, सुईच्या भोकातून निघून जाण्याइतके कौशल्य आम्हाला लाभले, आम्हाला अनकचा मुलगा अवज याची उंची आणि शक्ती यांचा लाभ झाला, आणि पैगंबर मुसासारखी माणसे आपल्या काठ्यांनी आम्हाला हजार वेळा बडवू लागली तरी आम्ही पुन्हा म्हणून या प्रदेशात पाऊल ठेवणार नाही!!'

मित्रांनो, अवज हा अतिशय उंच मनुष्य होऊन गेला. समुद्राचे पाणी त्याच्या गुडघ्याला लागत असे. तो तीन हजार पाचशे वर्ष जिवंत होता. शेवटी पैगंबर मुसा याने त्याला आपल्या काठीने मारले. ती काठी त्याच्या गुडघ्याला लागून तो मरण पावला अशी दंतकथा आहे. ग्रंथकर्त्याने मोठ्या अलंकारिक भाषेत उंटाची व्यथा मांडली आहे. पुढे तो आणखीनच रूपक भाषेत इतरांची व्यस्था मांडताना म्हणतो-

‘गाब व गुजरात रफ्त व खर व खुरासान शिताफ्त' 

वरील फारशी काव्यद्वारे तो म्हणतो- लष्करांतील गाब (बैल) गुजरातेत आणि खर (गाढव) खुरासानात पळून गेले. हत्तीला तर आपल्या शरीराचा आणि शक्तीचा भारी गर्व. त्या धुंदीतच मस्त होऊन तो लष्करचे सामान आपल्या पाठीवर घेऊन चालला. पण काळाच्या अंकुशाच्या इतक्या टोचण्या त्याला बसल्या की गाढवाप्रमाणे तो चिखलात रुतून बसला. मोगलांच्या लष्कराच्या सामानाचा भार आकाशालाही वाहणे शक्य झाले नाही. ते काम पीडित मानवाला करण्याची वेळ आली. मोगलांना जे भोगावयाचे नशिबी होते ते भोगावे लागले (कशीद आचे कशीद). लष्कराचे सर्व सामान मजुरांना, त्यांना शक्य झाले तितके, आपल्या डोक्यावर वाहून न्यावे लागले.

अजीके तू गोयी के हम मर्दुमंद, बीश्तरे गाव व खरे बेदुमंद

वरील फारसी काव्यद्वारे माणसांची व्यथा मांडताना तो म्हणतो- तुम्ही म्हणता की ही माणसे आहेत. छे! ते बिनशेपटाचे बैल आणि गाढव आहेत.!”

... तर असा तो आलमगीर म्हणवणारा बादशहा आणि त्याला छळणारा आमचा सह्याद्री..!!! आणि त्याचे हास्यपूर्ण वर्णन करणारा साकी मुस्तैदखान.!

हे सर्व आम्हाला शिवकालात घडलेल्या त्या क्षणाची जाणीव करून देतात. आणि महत्त्वाचे म्हणजे शिवछत्रपतींनी आपले स्वराज्य सह्याद्रीच्या कुशीतच का निर्मिले याचे रहस्य खुद्द शत्रूचा लेखकच आपल्याला सांगून जातो हे विशेष नाही काय.? हिच तर इतिहासाची अनुभूती आहे..!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर 

।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts