Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

“जगांत चिरकालिक असे काहीच नाहीं. जगाचा क्रम सर्वास सारखाच माहीत आहे.”


मित्रांनो,

आजही युरोपियन राष्ट्रांच्या दफ्तर खान्याची पाने उलटली की त्यांच्या काळजात धडकी भरवणारं.. अंगावर काटा आणणारं नाव दिसत..

Angriya the pirates !!!

अर्थात आंग्रे म्हणजे कर्दनकाळ.! ज्यांनी एकाच वेळी इंग्रज, पोर्तुगीज, डच, सिद्दी आणि मोगल आरमारास परास्त केले. ज्यांचे किस्से युरोपियन दूरदेशीचे लोक आजही कुतूहलाने पण धास्तीने वाचतात.!

ते म्हणजेच मराठा आरमार प्रमुख

“सरखेल कान्होजी आंग्रे”

Pirates of Caribbean या प्रसिद्ध सिनेमाच्या तिसऱ्या भागामध्ये ज्यावेळी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात जगातील सर्व पायरेट्स नेते एकत्र होतात तेव्हा त्यातील एक भारतीय पायरेट्स नेता ‘संभाजी’ म्हणून पात्र दाखविण्यात आले आहे. ते कान्होजींचे पुत्र संभाजी आंग्रे यांच्या नावावरूनच.! अर्थात परकीयांच्या बुद्धी दारिद्र्याचे उदाहरण! कोणी काही प्रदर्शित केले वा लिहिले तरी आंग्रेंनी आमचा सागर आमची हद्द परकीय दास्यापासून मुक्त ठेवली हेच सत्य.!

असो,

शिवाजी महाराजांच्या पश्चात् कोकण किनाऱ्यावर परद्वीपस्थ लोकांचा पाय न लागूं देण्याचे कामी जर कोणीं पराकाष्ठेची दक्षता दाखविली असेल तर ती फक्त कान्होजी आंग्रे यांनीच होय. (इंग्रज व मराठे: केळकर)

कान्होजी आंग्रे ह्यास परदेशीय(नेदरलँड, इंग्लंड, पोर्तुगाल आदि) इतिहासकारांनी चाच्यांचा नायक वगैरे निंदास्पद विशेषणांनी संबोधले आहे. खरेतर ते सागरी चाच्यांचे नायक नसून मराठ्यांच्या आरमाराचे पुनरुद्धारक होते. थोर राजनितीज्ञ, दर्यावर्दी युद्धामध्यें निपुण, अद्वितीय पराक्रमी आणि अचाट साहसी पुरुष ! 

छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकीर्दीत औरंगजेबाच्या जबड्यात संपूर्ण हिंदुस्तान गेला असतानाही सर्व समुद्रकिनारा मराठ्यांच्या ताब्यांत शाबूत राहिला तो केवळ कान्होजी आंग्रेमुळेच.!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालात कान्होजी आंग्रे सुवर्णदुर्गावर चाकरीला होते. छत्रपती शंभू कालात सन १६८८ मध्ये सुवर्णदुर्गचा किल्लेदार अचलोजी मोहिते पैसे घेऊन फ़ितूरीने किल्ला सिद्दिकडे सोपवणार असे कळल्यावर कान्होजींनी किल्ला लढवला. पुढे १६९८ मध्ये सरखेल सिधोजी गुजर गेल्यानंतर राजाराम महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना सरखेल(आरमाराचा सरसेनापती) पद सोपवले.

॥श्री॥

राजाराम चरणीसादर तुकोजी सुत कान्होजी आंगरे निरंतर” असा राजाराम महाराज कालीन त्यांचा शिक्का. तर छत्रपती शाहू कालातील त्यांचा शिक्का प्रचंड विजयाची साक्षा देतो.

॥श्री॥

श्रीशाहूनृपती प्रित्या तुकोजी तनुजन्मना कान्होजी सरखेलस्य मुद्रा जयति सर्वदा


मराठ्यांचे आरमार आंग्र्यांच्या हाताखाली लखलखत्या अजिंक्य तलवारीप्रमाणे सागरावर तळपत राहिले.

कान्होजी आंग्रेंनी विजयदुर्ग येथे आपल्या आरमाराचे मुख्य ठिकाण केले; आणि सर्व बंदरीकिल्लयांस उत्तम तटबंदी करून तेथेही आरमाराचा पक्का बंदोबस्त केला. मुंबईपासून गोव्यापर्यंत सर्व समुद्रकिनाऱ्यावर एकही खाडी, एकही बंदर, किंवा एकही नदीचे मुख तटबंदी वाचून किंवा जहाजांच्या नाक्यांवाचून मोकळे ठेवले नाही. अशाप्रकारे कान्होजींनी मराठ्यांची सत्ता व वर्चस्व कोंकणामध्ये पुन्हां संस्थापित केलें.

कान्होजीच्या आरमाराबद्दल इंग्रज ग्रंथकारांनी जी माहिती दिली आहे, त्यावरून तें बरेच मोठे असावे असें दिसून येते. त्यांच्या मोठ्या जहाजांस दोन किंवा तीन शिडें असत. ज्या जहाजांस तीन शिडें असत त्यांची शक्ति ३०० टन ओझें वाहण्याची असे. बाकीची सर्व १५० पासून २०० टनांपर्यंत ओझ्याची असत. भूमध्यसमुद्रांतील जहाजांप्रमागे त्यांच्या नाळी निमुळत्या आलेल्या असून त्यांच्यावर चांगले खंबीर मजले असत. मोठ्या गुराबांवर सहांपासून नऊ पौंड गोळा फेंकणाऱ्या तोफा असत. 

सन १७१६ मध्यें ३२ तोफांचें एक मोठे जहाज, २० पासून २८ तोफांच्या ४ गुराबा, आणि ५ पासून १२ तोफांचीं २० गलबतें इतकें इंग्रजांचे आरमार असून ह्याच सुमारास कान्होजींचे आरमार म्हणजे १६ पासून ३० तोफांच्या १० गुराबा आणि ४ पासून १० तोफांची ५० गलबतें एवढेच होते. तरी कान्होजींनी सन १७१६ मध्यें ईस्ट इंडिया कंपनीच्या 'प्रेसिडेंट ' नामक जहाजाशी लढाई करून त्याचा पार नाश केला.!

सन १७१७ मध्ये त्यांनी 'सक्सेस ' नावाचे जहाज लढून काबीज केले.!

सन १७१९ मध्ये सिद्दी, फिरंगी आणि मोगल ह्या सर्वांनी मिळून प्रबल होऊन बसलेल्या कान्होजींची खोड मोडण्याचा प्रयत्न केला; परंतु कान्होजींनी त्या सर्वास आपल्या आरमाराच्या जोरावर परास्त केले, उलट त्यांचा मुलुख काबीज करण्याचा सपाटा चालविला. शेवटी जंजिऱ्याचा सिद्दी व मोगल आंग्र्यांस वसूल देण्यास राजी झाले.!

सन १७२२ मध्ये इंग्रज व पोर्तुगिज ह्यांनी एकत्र होऊन कुलाब्यावर स्वारी केली, परंतु त्यांना यश मिळाले नाही. पुढे दोन वर्षांनी डच लोकांचे ३० ते ५० तोफांच्या सात प्रचंड जहाजांचें आरमार विजयदुर्गावर चाल करून आले; पण तेसुद्धा छिन्नविच्छिन्न होऊन परत गेले.! ह्याप्रमाणे आंग्रयांच्या आरमाराची पराक्रमशक्ति परराष्ट्रीयांस चांगली व्यक्त होऊन त्यांचे एकही व्यापारी गलबत लढाऊ आरमाराच्या साह्याशिवाय फिरकेनासे झाले. मित्रांनो, एक काळ होता, पोर्तूगीजांचे ‘कार्ताज’ (परवाना) घेतल्याशीवाय शहाजहानकालीन मोगल जहाजे सुद्धा मक्केसही जाऊ शकत नव्हती. पण महाराजांनी आपला सागर परकीय दास्यातून मुक्त करण्यासाठी आरमाराची निर्मिती केली, शिवाय आपल्या हद्दीतून जाण्यास या माजेल परकियांना परवान्याची गरजही निर्माण केली.!!

आपण हिंद महासागराचे सार्वभौम सम्राट आहोत असे मानणारे पोर्तुगीज व नंतर आलेले इंग्रज जसे पूर्वापार हिंदुस्तानी लोकांकडून जकात घेत होते आता तीच जकात त्यांच्याकडूनच सक्तीने वसूल होऊ लागली तेव्हा त्यांना आंग्रे लुटारू वाटू लागले.!

‘ज्याचे आरमार त्याचा समुद्र’ हा न्याय बहुदा ते विसरले.! म्हणून आग्र्यांच्या गुराब- गलबतातून आग ओकणाऱ्या तोफा आणि दर्यावर्दिंच्या किलकाऱ्या सागरावरच्या सत्तेचा इशारा देत होते, आणि मायदेशी गेलेले परकीय आग्र्यांच्या शौर्य कथा दरोड्च्या व्यथा म्हणून विदित करत होते.!

भूमध्यसमुद्रांतील आल्जेराईन्स नामक चाच्यांचे नांव ऐकतांच ज्याप्रमाणे तिकडील जहाजांवरील व्यापाऱ्यांचा थरकांप होत असे, त्याप्रमाणे या दर्यावर्दी मराठा वीराचे नांव ऐकून इंग्रज व्यापाऱ्यांची गाळण उडत असे," असे लो नामक इतिहासकार म्हणतो.

सन १७१५ मध्ये इंग्लंडहून भारतामध्ये आलेल्या क्लेमेंट डाउनिंग याने ‘अँग्रिया द पायरेट उदय, प्रगती, सामर्थ्य आणि शक्ती’ या नावाने अहवाल (१७३७ मध्ये) प्रकाशित केला. (History of the Indian Wars; with an Account of the Rise, Progress, Strength, and Forces of Angria the Pyrate)

क्लेमेंट डाऊनिंगनेच्या मते, आंग्रेने युरोपियन लोकांना त्रास दिला, चाचेगिरी केली, एकूणच सर्व राष्ट्रांसोबत खुले युद्ध घोषित केले.

किंबहुना, इंग्रज, डच आणि पोर्तुगीज जहाजांवर बर्‍याचदा प्रबळ नौदल शक्तीच्या पद्धतीने हल्ले केले. 

पुढे 

सन १७२७ व १७२८ मध्ये आग्र्यांच्या हातून इंग्रजांच्या आणखी दोन जहाजांचा पाडाव झाल्यामुळे ते जेरीस आले व त्यांनीं वाडीकर सावतांशी तह करून त्यांचे साहाय्य घेण्याचे ठरविले.

सन १७२९ मध्ये कान्होजी मुत्यु पावले. त्यापूर्वी त्यांच्याशी सलोखा करून आपला कार्यभाग साधावा म्हणून मुंबईच्या हुषार ब्रिटिश गव्हर्नराने त्यांची मन धरणी करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी कान्होजींनी मोठ्या चतुरपणाने उत्तर दिले. मुंबईच्या गव्हर्नराने कान्होजींना लिहिले की, 

“तुमचे व आमचे सौरस्य नाही ह्याचें कारण केवळ तुम्ही आहांत; तुम्ही दुसऱ्याचा माल घेण्याची इच्छा करितां हे अविचारीपणाचे आहे; अशा प्रकारचे गुन्हे म्हणजे एक प्रकारची चांचेगिरी आहे, अशा रीतीचे तुमचे वर्तन फार दिवस चालावयाचें नाही. तुम्ही प्रथमपासून व्यापार वाढविला असता व व्यापारी लोकांवर मेहेरबानी ठेविली असती तर तुमच्या ताब्यांतील बंदर आजमितीस परमेश्वरकृपेनें भरभराट पावून त्यानें सुरतेवर ताण केली असती आणि तुमचा लौकिक सर्वत्र पसरला असता.... ही गोष्ट सरळ रीतीनें व्यापारवृद्धि केल्यावाचून होणार नाहीं" असे लिहून गवर्नरने तह करण्याबद्दल मत व्यक्त केले. 

त्यास कान्होजींनी मोठ्या खुबीने उत्तर दिले. त्यांनी लिहिले की , 

"तुम्ही लिहिलें ते सर्व प्रशंसनीय आहे. आजपर्यंतच्या तुमच्या आमच्या भेदभावाचें व तंट्याचें कारण मी आहे असें तुमचे म्हणणें आहे, परंतु तुम्ही दोन्ही बाजूंचा विचार केला म्हणजे त्यांतील सत्य तुम्हांस कळून येईल. दुसऱ्याची संपत्ति अपहार करण्याची माझी इच्छा आहे म्हणून तुम्ही म्हणतां; पण तुमच्यासारखे व्यापारी तसल्या महत्त्वाकांक्षेपासून अलिप्त आहेत असे मला वाटत नाहीं. कारण, सर्व जगाचा एकच मार्ग आहे. ईश्वर स्वतः थोडेच कांही देतो ! ह्याची संपत्ति त्यास व त्याची ह्यास अशीच मिळत असते. आमचे राज्य जुलूम बलात्कार अथवा चांचेगिरी ह्यांच्यावर चाललें आहे असे म्हणणे तुम्हां व्यापारी लोकांस शोभत नाहीं. शिवाजी महाराजांनी चार बादशहांबरोबर लढाया केल्या, आणि स्वपराक्रमानें स्वराज्य स्थापन केले. ह्याप्रमाणें आमच्या सत्तेचा प्रारंभ आहे. ह्याच साधनांच्या योगानें आमचें राज्य टिकले आहे, हे तुम्हांस कळतच आहे. हें चिरकालिक आहे किंवा नाहीं ह्याचा विचार तुम्हींच करावा. जगांत चिरकालिक असे कांहींच नाहीं. जगाचा क्रम सर्वास सारखाच माहीत आहे.”

कान्होजींच्या उत्तरातून नाना कळा व्यक्त होतात. व्यापाराचे सोंग करून सत्ता काबीज करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीचे कान्होजींनी चांगलेच कान पिळले. तसं ब्रिटिशांचं साम्राज्य काही चिरकाल टिकलं नाही पण कान्होजींच्या शौर्यकथा अमर राहिल्या.!

कान्होजी आंग्रे व त्यांचे वंशज ह्यांच्याबद्दल डग्लस ब्रिटिश अधिकाऱ्याने जे वर्णन लिहिले आहे त्यांत तो म्हणतो, “हिंदी महासागरांतील तिन्ही युरोपियन राष्ट्रांस (इंग्रज, पोर्तुगीज, डच) पराक्रमाच्या कामांत आंग्र्यांनी खालीं पाहण्यास लाविलें आणि कोणासही त्यांची बरोबरी करतां आली नाही.” 

असो,

जेव्हा दर्यावर स्वार होऊन उसळणाऱ्या लाटा आग्र्यांच्या जंगे दिलेरीच्या कथा सांगू पाहतात.. तेव्हा सागरावरून वाहणाऱ्या वाऱ्याने थेट युरोपातली पाने फडफडू लागतात.. अन् पृथ्वीवर कधीकाळी साम्राज्य गाजवणाऱ्या इमारतींनाही कापरे भरू लागतात.!!!

Angriya the Great..!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts