Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

गनिमी युद्धाचा अजेय सेनापती: संताजी घोरपडे

 


सरसेनापती संताजी घोरपडे म्हणजे पराक्रम..!

संताजी घोरपडे म्हणजे मराठेशाहीचा ढाण्या वाघ.! संताजी घोरपडे म्हणजे मोगलांचा कर्दनकाळ.!

समकालीन मोगल इतिहासकार खाफीखान म्हणतो-

"नरकवासी संभाजीची(राजे) कैद आणि वध ही घडून आल्यानंतर अनेक नामांकित मराठे सरदार रामराजाच्यातर्फे देशभर उच्छाद करीत फिरत होते. बादशाही फौजांच्या भोवती ते शस्त्रास्त्रांनी सज्ज होऊन घिरट्या घालीत. त्यांचे धाडस आणि उच्छाद ही वाढली आणि त्यांनी इतकी तडफ दाखविली की, त्याचा तपशील लिहीणे लेखणीला शक्य नाही.

मराठे सरदारात प्रमुख म्हणजे संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे होते. त्यांच्यापाशी पंधरा-वीस हजारांच्या जंगी फौजा होत्या. इतर फौजबंद मराठे सरदार त्यांच्या हाताखाली काम करीत. या दोघा सरदारांच्यामुळे बादशाही सेनापतीवर कमालीचे आणि भयंकर आघात झाले. यात तो नालायक (नाबकार) संताजी प्रमुख होता. समृद्ध शहरांवर हल्ला करून त्यांचा नाश करणे आणि नामांकित सेनापतींच्या वर तुटून पडणे, यात त्याची खूपच प्रसिद्धी झाली. ज्याला ज्याला म्हणून संताजीशी मुकाबला करण्याचा आणि लढण्याचा प्रसंग आला त्याच्या नशिबी खालील तीनपैकी एक परिणाम ठेविलेला-एकतर तो मारला जाई, किंवा जखमी होऊन कैदेत (संताजीच्या) सापडे; किंवा त्याचा पराजय होई आणि त्याचे सैन्य आणि बाजारबुणगे गारद होत. आपण जिवानिशी निसटलो हाच आपला पुनर्जन्म झाला असे त्यास वाटे.

याचा उपाय कुणालाच सुचेना. युद्ध करण्यासाठी जिकडे तिकडे म्हणून तो नालायक आणि हलकट कुत्रा (सगे लयीन नाबकारसंताजी) तयार होऊन जाई तिकडे त्याचा मुकाबला करण्यास बादशहाच्या प्रतिष्ठित सरदारापैकी एकही तयार होत नसे. जगात धडकी भरवून सोडणारी (जहान आशोब) फौज घेऊन तो कोठेही पोहोचला की, नरव्याघ्राप्रमाणे असलेल्या अनुभवी योद्ध्यांची हृदये कंपायमान होत (दिले शेरमर्दान रज्मआजमारा दर तज़लजुल मी अंदाख्त)."¹(Every loss be inflicted on their forces made the boldest warrior quake-डाऊसनचा अनुवाद)

..म्हणजे औरंगजेबाच्या सेनापतींना संताजींच्या तलवारीची काय दहशत.!!!

मित्रांनो,

कर्नाटकात शिमोगा जिल्ह्यातील दोड्डेरी हे नाव आज महाराष्ट्रात असंख्य लोकांना ठाऊक नसेलही. पण औरंगजेब आणि मराठे ह्यांच्यामधील पन्नास वर्षांच्या संघर्षाचे आणि मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाचे एक अत्यंत तेजस्वी प्रकरण येथे घडले. 

इ. स. १६९५ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर, स्वराज्याची राजधानी किल्ले जिंजी मध्ये राजाराम महाराज.! धनाजी जाधव वेल्लोर किल्ल्यात दाखल. पाठोपाठ संताजी जिंजी कडे रवाना. बादशहाचा सक्त हुकूमत की मराठा सैन्य जिंजी कडे जाता कामा नये.! फौज बंद कर्नाटकाचा सुभेदार कासिमखान अधोनीहून संताजीला अडवण्याच्या तयारीत... त्याच्या मदतीला कूमक म्हणून बादशाही छावणीतील खास शहजादा कामबक्ष याचे फौजेसह नामांकित सरदार खानाजादखान उर्फ रुहुल्लाखान दुसरा(औरंगजेबाच्या मावस बहिणीचा नातू), तोफखान्यासह प्रमुख सफशिकनखान, शहाजादा कामबक्षचा बक्षी महंमद मुरादखान, दतियाचा राजा दलपतराय बुंदेला याचा मुलगा रामचंद असे कित्येक कर्नाटक प्रांती कूच... कर्नाटक प्रांती कासिम खान आणि बादशाही छावणीतून खानाजादखान बुलंद लष्कर..! दोन्ही फौजा संताजीला कैचीत पकडणार...?

मात्र रणझुंजार संताजी (चित्रदुर्ग जवळ) तलाकूच्या लढाईत मोगलांचा दणदणीत पराभव करतात..! घाबरलेले मोगल सरदार आश्रय घेण्यासाठी तलाकूपासून ९ मैलांवर असलेल्या दोड्डेरी च्या लहानशा गढीत आश्रय घेतात.. संताजीचा कहर... मोगलांच्या रसदेच्या वाटा बंद.! ...बादशहाच्या सर्व नामांकित सरदारांची कोंडी अन् हाले-हाल.!

..कासिमखानाची आत्महत्या..आणि अखेर शरणागती, खानाजादखाना सारख्या बुलंद उमरावांची हात जोडून पाया पडून शरणागती.!!

... हैदराबादेतून रुस्तुमदिल खान आणि बादशाही छावणीतून हमिदुद्दिनखान मदतीस निघतात.. वाटेत संताजीच्या दराऱ्यानेच थबकतात..! हिम्मतखान बसवापट्टणच्या लढाई ठार.!

समग्र हिंदुस्तान पायदळी तुडवनाऱ्या मोगलांच्या शरणागतीचे आणि संताजींच्या पराक्रमाचे हे सुवर्णपान.!

मराठी साधनांमध्ये जेधे शकावली च्या नोंदी शिवाय फार काही सापडत नाही मात्र खाफीखान, भीमसेन सक्सेना व साकी मुस्तैदखान यांच्या फारशी ग्रंथांमध्ये अस्सल वर्णने मिळतात. यापैकी खाफिखानाचा मित्र महंमद मुरादखान हा तर प्रत्यक्ष वेढ्यात अडकला होता.

साकी मुस्तैदखान हा औरंगजेब बादशहाचा चिटणीस, त्याने लिहिलेला वृत्तान्त प्रसंगाचे अस्सल वर्णन आहे. तो लिहितो : 'खानाजादखान(रुहुल्लाखान दुसरा) आणि कासिमखान बहादुर यांच्यावर आकस्मिकपणे संकट कोसळले ह्याची ही हकीकत. 

बादशहांना विनंती करण्यात आली, दुष्ट संताजी दुर्दशेच्या अवस्थेत निवासस्थानाकडे जलद गतीने चालला आहे. त्याची जाण्याची वाट लष्करापासून ८० कोसांवर आहे.'

कासिमखान हा सिरा(कर्नाटक) प्रांताचा अधिकारी होता. तो उत्साही व तडफदार होता. तो अधोनीच्या(अडोनी) जवळ पोहोचून तळ देऊन होता. त्याला बादशहाने आज्ञा केली : 'तुम्ही आपले सैन्य घेऊन त्या दुष्टाची (संताजीची) वाट अडवावी. खानाजादखान(रुहुल्लाखान दुसरा), सफशिकनखान, सय्यद असालतखान, महंमद मुरादखान यांच्याबरोबर बादशाही छावणीतील आणि बादशहाच्या निकट असलेले निवडक मन्सबदार, हफत चौकीतून निवडलेले मुबलक सैन्य व तोफखाना दिमतीला देण्यात आला आहे. त्यांच्याशी एक होऊन तुम्ही संताजीचा धुव्वा उडवावा.'²

संताजींची व्यूहरचना: तलाकूची लढाई-

कशाप्रकारे कर्नाटकात फौज बंद कासिम खान आणि बादशाही छावणीतून निघालेला फौज बंद खानाजाद खान हे अडोणी च्या जवळ पोचतात. पुढे साकी मुस्तैदखान म्हणतो-

" जमादिलाखर महिन्याच्या २३ तारखेस (नोव्हेंबर १६९५) मोगलांची सैन्ये संताजी जाण्याच्या वाटेपासून सहा कोसांवर एकत्र आली. कासिमखानाचे सर्व सामान अधोनीच्या किल्ल्यात होते. खानाजादखान(बादशहाचा नातेवाईक) आणि इतर सरदार(बडे उमराव) यांना मेजवान्या द्याव्या असे कासिमखानाने ठरविले. त्याने अधोनीच्या किल्ल्यातून आपले उत्तमोत्तम सामान बाहेर काढले. तंबू, सोन्याचांदीची भांडी, तांब्याची आणि चिनीमातीची भांडी इत्यादी सामान गोळा करून त्याने ते दुसऱ्या दिवशी आपल्या आणि इतर सरदारांच्या पेशखान्याबरोबर तीन कोस पुढे पाठविले.

पण गनिमांना (मराठ्यांना) हा पेशखाना (मुक्कामाचे सामान) रवाना झाल्याची खबर लागली. त्यांनी आपल्या सैन्याचे तीन भाग केले. एका तुकडीने हल्ला करून पेशखाना लुटण्यास सुरुवात केली. मराठ्यांची दुसरी तुकडी मोगल सैन्यावर चालून येण्यास सज्ज झाली. तिसरे दल राखीव म्हणून ठेवण्यात आले. पहाटे चार घटका गेल्यावर मराठ्यांच्या एका तुकडीने पेशखान्यावर हल्ला केला. त्यांनी अनेकांना ठार केले, कित्येकांना जखमी केले आणि सगळा पेशखाना लुटून फस्त केला. ही बातमी कासिमखानाला कळली. त्याने खानाजादखानाला झोपेतून उठविले नाही. तो स्वत: लढण्याच्या स्थळी चालून आला. तो पेशखान्याच्या दिशेने कोसभर गेला असेल नसेल तोच मोगल सैन्याशी गाठ घेण्यास तयार असलेली मराठ्यांची तुकडी त्याच्यावर चालून आली. कासिमखान आणि मराठे यांच्यात युद्धाला तोंड लागले.

इकडे खानाजादखान झोपेतून जागा झाला. कासिमखानावर मराठ्यांनी हल्ला केला हे त्याला समजले. त्याने आपली छावणी, बुजारबुणगे इत्यादी सामान तेथेच टाकून दिले आणि तो तडक कासिमखानापाशी आला. मराठ्यांपाशी असंख्य घोडेस्वार होते. त्यांच्या पायदळ सैन्यात बंदुकांचा सपाटून भरणा होता. यामुळे उभय दलात घनघोर युद्ध झाले. उभय दलातील अनेक माणसे ठार झाली. मोगल सरदार आणि सैनिक यांनी ठाण मांडून निर्धाराने युद्ध केले.

मराठेही एक पाऊल मागे हटले नाहीत. त्यांचा निश्चय थोडासुद्धा डळमळला नाही.

मोगल आपली छावणी आणि बाजारबुणगे सोडून पेशखान्याच्या दिशेने पुढे आले होते. ही संधी साधून मराठ्यांच्या राखीव तुकडीने मोगलांच्या छावणीवर हल्ला केला आणि तो तळ पूर्णपणे लुटून फस्त केला. कासिमखान आणि खानाजादखान हे मराठ्यांशी लढण्यात गुंतले होते. आपली छावणी गारद झाली ही खबर त्यांना युद्धाच्या ऐन धुमश्चक्रीत समजली. त्यांचा धीर सुटला. त्यांनी आपापसात सल्लामसलत केली. शेवटी पेशखाना रवाना केला होता त्या जागी जावे असे ठरले. तेथून जवळच दोड्डेरीचा किल्ला होता. त्याच्याजवळ एक तलाव होता. एक कोसभर लढत झगडत मोगल सैन्य या तलावापाशी पोहोचले. मराठ्यांनी या सैन्याच्या वाटेला न जाता जवळच आपला तळ दिला."³

मोगलांचा सपशेल पराभव: दोड्डेरीचा वेढा-

किल्ल्यात आश्रय घेतलेल्या मोगलांवर संताजी चा कसा कहर झाला याविषयी साकी मुस्तैदखान म्हणतो-

"दोडेरीच्या किल्ल्यात मोगलांची शिबंदी होती. तिने किल्ल्याचे दरवाजे लावून घेतले. खुद्द कासिमखान व खानाजादखान यांच्या सैन्याला ते किल्ल्यात येऊ देईनात.

कासिमखान, खानाजादखान आणि ज्यांच्याबरोबर खाण्याचे काही सामान होते असे इतर सरदार यांनी आपापसात अन्न वाटून घेतले. पण सामान्य सैनिकांना खाण्यास अन्न नव्हते. तलावाचे पाणी तेवढे त्यांना पिण्यास मिळाले. हत्ती, घोडे इत्यादी जनावरांना दाणाचारा मिळण्याचे नाव नाही. इतक्यात रात्र झाली. त्या काळतोंड्या गनिमांनी (मराठ्यांनी) मोगल सैन्याला चहुकडून कोंडले. मोगल सैन्य प्राण पणाला लावण्याच्या निर्धाराने तयार होऊन उभे राहिले. मराठे समोर येत, पण ते लढत नव्हते. त्यांनी मोगलांचा कोंडमारा केला होता. असे तीन दिवसपर्यंत चालले. चित्रदुर्गाच्या राजाला कासिमखानाने जेरीस आणले होते. त्याला आता कासिमखानावर सूड उगवण्याची संधी मिळाली. त्याचे हजारो पायदळ सैनिक लढण्यासाठी मराठ्यांना येऊन मिळाले. (पूर्वी कासिमखानाने चित्र दुर्गाच्या बरमाप्पा नायकास जेरीस आणले होते, संताजीने त्याला आपल्याकडे वळविले)

चौथा दिवस उजाडतो न उजाडतो तोच पूर्वीच्या पायदळ सैन्याच्या दहापट सैन्य समोर चालून येत असलेले त्यांना दिसले. या कृष्णवर्णीय पायदळामुळे सूर्यप्रकाशाच्याऐवजी वातावरण काळेठिक्कर झाले.!

युद्धाला सुरुवात झाली. मोगलांचा दारूगोळा बहुतेक गारद झाला होता. उरलेला दारूगोळा खर्च झाला होता. त्यामुळे मोगल सैनिक हताश झाले. हे काय दुर्दैव (रोजेसियाह - काळा दिवस) ओढवले म्हणून मोगल सैन्य इकडे तिकडे धावत आणि आक्रोश करीत सुटले. दुष्ट काफरांच्या सैन्याने गोळ्यांचा सारखा वर्षाव चालविला होता. त्यामुळे या ठिकाणी अनेक मोगल सैनिक प्राणास मुकले. उरलेल्या सैन्याला मराठ्यांच्या कोंडमाऱ्यातून बाहेर पाडण्याची वाट सापडेना. त्यामुळे ते सैनिक जबरदस्तीने किल्ल्यात घुसले. ह्या प्रलयंकारी युद्धात जे हजर होते ते मर्दुमकीने लढले असे विश्वासू सैनिक सांगतात, 'पेशखान्यावरील हल्ल्यात वाटेत आणि तलावाच्या काठावर मिळून मोगल सैन्यातील एक तृतीयांश सैनिक दुष्ट काफरांच्या तीक्ष्ण खड्गांच्या भक्ष्यस्थानी पडले.'

मराठ्यांनी किल्ल्याला चहुकडून वेढा दिला. किल्ल्यात आश्रय घेतलेले सैनिक उपाशी मरतील याची मराठ्यांना खात्री वाटत होती. किल्ल्यात जे काही धान्य शिल्लक होते त्यातून पहिल्या दिवशी लष्करात ज्वारी आणि बाजरी यांच्या भाकऱ्या वाटण्यात आल्या. घरांच्या छपरांवरचे जुने गवत जनावरांना देण्यात आले. दुसरा दिवस उजाडला. आता माणसांना ना भाकरी ना जनावरांना दाणापाणी अशी स्थिती झाली. आता प्राण गेले तर जावोत असे सर्वांना वाटू लागले. इतकी हलाखीची अवस्था झाली. कासिमखानाला अफूचे भयंकर व्यसन होते. ती न मिळाल्यामुळे तो किल्ल्यात दाखल झाल्याच्या तिसऱ्या दिवशी मरण पावला असावा. अशा रीतीने गनिमांच्या तावडीतून त्याची सुटका झाली.

कासिमखानाच्या मरणाची बातमी कळल्यावर मराठे आणखी शेर झाले. उलट किल्ल्यात निराशेचे वातावरण पसरले. मोगल सैन्यातील शूर वीर म्हणत : ‘उपासमारीने आणि अशा दुर्दशेच्या अवस्थेत मरण्यापेक्षा काफरांवर तुटून पडणे बरे. एक जय तरी मिळेल नाही तर आम्ही शहीद तरी होऊ. या परिस्थितीतून आमची सुटका होईल आणि पुण्य पदरी पडेल.' पण मोगल सरदारांनी शूर सैनिकांचे हे म्हणणे मान्य केले नाही. कित्येक लोक उपासमारीने मेले. मोगल लष्करातील घोडे एक दुसऱ्याच्या शेपट्या गवताप्रमाणे खाऊ लागले! 

याच सुमारास मराठ्यांनी किल्ल्याचा एक बुरूज मुळापासून उखडून काढला. तेथे त्यांनी चहुकडून एकच गर्दी केली. खानाजादखानाने मराठ्यांपाशी तहाची याचना केली. खालील अटींवर तह ठरला. 'कासिमखानाची हत्ती, घोडे, जहजवाहीर, नगदी सोनेनाणे ही सर्व संपत्ती संताजीला देण्यात यावी. याशिवाय वीस लाख रुपये संताजीला देण्यात यावे..'

त्याप्रमाणे अंमलबजावणी झाली. संताजीने सांगून पाठविले : 'किल्ल्यातील लोकांनी काही भय न बाळगता बाहेर यावे! किल्ल्याबाहेर त्यांनी दोन रात्री बाहेर काढाव्यात. कुणापाशी काही चीजवस्तू असल्यास त्याला कोणत्याही प्रकारचा उपसर्ग होणार नाही. त्यांनी कुठल्याही जिनसा माझ्या लष्करातून विकत घेण्यास माझी परवानगी आहे.' 

किल्ल्यात दाखल झाल्यापासून तेरा दिवसांनी बादशाही सैन्य किल्ल्यातून बाहेर पडले. मराठ्यांच्या सैनिकांनी मोगल सैनिकांना भाकरी आणि पाणी पुरविले. अशा रीतीने मोगल सैन्य किल्ल्याच्या बाहेर दोन रात्री मुक्काम करून होते. तिसऱ्या दिवशी खानाजादखान हा आपल्या सहकाऱ्यांसहित बादशहाच्या दरबाराकडे येण्यास निघाला. त्याचे रक्षण करण्यासाठी बरोबर मराठ्यांचे पथक होते!"⁴

दोड्डेरीच्या या लढाईत संताजीच्या हाती मोगलांकडून ही जी लूट मिळाली ती कमीत कमी पासष्ट लाख रुपयांची होती असा समकालीन इतिहासकारांचा अंदाज आहे.

अशाप्रकारे फजित मोगल सरदार अडोनीकडे निघाले.

बसवापट्टण ची लढाई: हिम्मतखान ठार-

औरंगजेबाने दोड्डेरीत अडकलेल्या सरदारांच्या मदतीसाठी तीन सरदार दक्षिणेत पाठविले होते. एक हिंमतखान, दुसरा हमीदुद्दीनखान आणि तिसरा हैदराबादच्या सुभेदाराचा मुलगा रुस्तुमदिलखान.

यापैकी हमीदुद्दीनखानाला पुढे जाणे जमले नाही व मराठ्यांच्या भीतीमुळे रुस्तुमदिलखानही मुंगीच्या पावलानेच हैदराबादहून पुढे सरकू लागला. रुस्तुमदिलखान व हमीदुद्दीनखान अधोनीजवळ दोड्डेरीहून फजित पाऊन आलेल्या खानाजादखानाला येऊन मिळाले. वेढ्यातून फजित पावलेल्या सरदारांना त्यांनी तंबू, कपडेलत्ते, नगद रक्कम इत्यादी देऊन ब्रह्मपुरी च्या बादशाही छावणीकडे रवाना केले.

तिसरा नामांकित सरदार हिंमतखान, त्याला दोड्डेरीकडे चाल करून जाण्याची हिंमत झाली नाही. तो कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यातील बसवापट्टण येथे थांबला होता. हा हिम्मत खान म्हणजे नामांकित खानजहान बहादूरखान याचा मुलगा. त्याचाही संताजीशी सामना झाला. त्याविषयी साकी मुस्तैदखान म्हणतो-

'गनिमांना भक्कम लूट मिळाली होती. आता ते आपल्या मुलखाकडे जाण्यास निघाले होते. हिंमतखान (बहादुरखानाचा मुलगा) हा बसवापट्टण येथे होता. त्याने चाल करून जावे आणि मराठ्यांचा मोड करावा म्हणून त्याला बादशहाने आज्ञा केली होती. पण सैन्य कमी असल्यामुळे तो बसवापट्टण येथे राहिला होता. मराठ्यांनी त्याच्यावर हल्ला करण्याचे ठरविले. हिंमतखानापाशी एक हजारापेक्षा अधिक सैन्य नव्हते. तो त्या 'दुष्ट काफरां'वर चालून गेला. काफरांना त्यांच्या दुष्कृत्यांची शिक्षा मिळणार असा रंग दिसू लागला. तोच हिंमतखानाच्या छातीवर गोळी लागली. तत्क्षणी तो गतप्राण झाला. माहुताने हत्ती मागे वळविण्याचे ठरविले. पण हिंमतखानाचा सरदार बाकी बेग हा जवळ येऊन पोहोचला. तो माहुताला म्हणाला, 'खान जिवंत आहे, हत्ती पुढे चालीव. मी गनिमांना परतवून लावीन' बाकी बेग निर्धाराने आणि ठाम मांडून लढला, पण सेनापतीविना सैन्य किती वेळ लढणार? तेथून जवळच एक लहान किल्ला होता. बाकी बेग त्या किल्ल्यात दाखल झाला. गनिमांनी हिंमतखानाचे सगळे बाजारबुणगे लुटले. त्यांनी काही दिवस किल्ल्याला वेढा घातला. पण त्यात काही अर्थ नाही असे पाहून ते तेथून निघून गेले. बाकी बेग संधी साधून तेथून निसटला आणि बादशहापाशी आला.'⁵

औरंगजेब या घटनेने अक्षरशः हादरून गेला होता. खाफीखान लिहतो ही बातमी बादशहांना सांगण्यात आली तेव्हा बादशहा म्हणाले-

"जे काही घडले ते परमेश्वरी इच्छेने झाले. सरदारांच्या हातची ती गोष्ट नव्हती. पण बादशहाला फार वाईट वाटले. त्याने सरदारांना आपल्या समोर येऊ दिले नाही. त्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या लांब लांब बदल्या केल्या."⁶


औरंगजेबाने संताजीवर जाण्यासाठी शहाजादा बेदरबख्त यास ताबडतोब दक्षिणे कडे रवाना केले. बसवापट्टणचे लढाईनंतर संताजी काही काळानंतर कर्नाटकातून जिंजीकडे राजाराम महाराजांच्या भेटीस जातात.

एकूणच तलाकू, दोड्डेरी आणि बसवापट्टण ची रणनीती म्हणजे संताजींचा अभूतपूर्व पराक्रम आणि दोड्डेरीचा वेढा हा या पराक्रमाचा कळस होय. मोगल मराठे यांच्या संघर्षात मोगलांची दुर्दशा एवढी कधीच झाली नव्हती. संताजीच्या यशाचा हा परमोच्च बिंदू., मराठ्यांच्या गनिमी युद्धचा उत्कृष्ट नमुना.!

संताजींनी आपल्या सात वर्षांच्या कारकिर्दीत (१६९०-१६९७) मोगलांचे असे एका पेक्षा एक १२-१३ धुरंदर नामांकित सेनापतींना रणांगनी लोळविले. सामान्य सरदारांची तर गिनतीच नको. छत्रपती शंभूराजेंच्या मृत्यूनंतर विजयाच्या व सामर्थ्याच्या गर्वाने धुंद मोगलांना उघड्या मैदानावर परास्त करून ते अजिंक्य नाहीत असे दाखवून दिले. आणि मराठ्यांत दुर्दम्य आत्मविश्वास निर्माण केला.. आम्हाला गुलाम बनवणे तर दूरच, वेळ पडली तर तुमचा बादशाह सुद्धा उत्तरेत जाऊ शकणार नाही.!!!

... आणि उत्तरेचा तो बादशाह दक्षिणेतच कब्र नशीन झाला.!!!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

।।फक्तइतिहास।।

संदर्भ-

1-तारिखे खाफीखान-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध,स.से.पगडी-३-११९

2-मासिरे आलमगिरी-मराठे व औरंगजेब,स.से.पगडी-३-४१६

3-मासिरे आलमगिरी-मराठे व औरंगजेब,स.से.पगडी-३-४१७

4- मासिरे आलमगिरी-मराठे व औरंगजेब, स.से.पगडी-३-४१८

5- मासिरे आलमगिरी-मराठे व औरंगजेब,स.से.पगडी-३-४१९

6-तारिखे खाफीखान-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध,स.से.पगडी-३-१२६

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts