Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

अज्ञातवासातील एक राणी

 


इतिहासात आपण ऐतिहासिक दस्तावेज मार्गाने शोध घेत आहोत एका उपेक्षित राणीच्या अस्तित्वाचा.! एका रणझुंजार योद्ध्याची ती एक लाडकी राणी होती. मात्र दस्तावेज कागदपत्रांच्या नोंदी अभावी तिचे अस्तित्व इतिहासात कुठेतरी गडप झाले.!

लखोजी जाधवांची चार मुले होती. मोठा मुलगा दत्ताजी हा खंडागळे हत्तीच्या प्रकरणात मारला गेला.

लखोजी जाधवरावाचे दोन मुलगे अचलोजी आणि रघोजी हेही आपल्या बापाबरोबर देवगिरीच्या किल्ल्यात १६२९ मध्ये मारले गेले होते.

चौथा मुलगा बहादुरजी हा लखोजीचा भाऊ जगदेवराव ह्याच्याकडे दत्तक गेला होता. ह्या बहादुरजीला मुले नसावीत आणि त्याने आपला सख्खा भाऊ रघोजी (जो मारला गेला होता) ह्याचा मुलगा दत्ताजी ह्याला दत्तक घेतले असे सेतु माधव पगडी म्हणतात.(सेतू माधव पगडी खंड २,७३२)

खंडागळे हत्ती प्रकरण मारला गेलेला लखोजींचा ज्येष्ठ पुत्र दत्ताजी याचा मोठा मुलगा यशवंतराव हा सुद्धा आपल्या आज्याबरोबर देवगिरीच्या किल्ल्यात मारला गेला होता.(१६२९)

राहिला या यशवंतरावाचा धाकटा भाऊ ठाकोरजी हा वडील' शाखेचा वारस, ह्यालाच जाधवराव ही पदवी मिळाली. 

'तारीखे दिल्कुशा' या ग्रंथाचा ग्रंथकर्ता म्हणजे भीमसेन सक्सेना जो बहुतांश दक्षिणेत व महाराष्ट्रात राहिला. अगदी सुरुवातीपासून तो भोसले आणि जाधव या राजघराण्यांशी परिचित होता.

भीमसेन सक्सेना हा आपल्या आत्मचरित्रात म्हणतो ('तारीखे दिलकशा') मोगल सैन्य विजापूरकडे रवाना झाले (१० नोव्हेंबर १६६५). दत्ताजी जाधव हा चार हजारी सरदार होता. तो अद्वितीय असा शिपाईगडी होता. निलंग्याजवळ तो (विजापूरकरांशी) मर्दुमकीने लढत असता मारला गेला. त्याच्याबरोबर असलेले अनेक सरदार व सैनिक मारले गेले. दत्ताजीचा लहान मुलगा जगदेवराव ह्यास जयसिंग ह्याने मनसब दिली. बादशहाकडून त्याला पाचशे जात आणि तीनशे स्वार अशी मनसब देण्यात आली. दत्ताजीचा मोठा मुलगा रघोजी हा ह्या लढाईत जखमी झाला. त्याची मनसब वाढविण्यात आली. दत्ताजीचा आणखी एक मुलगा नौबतराव हाही या लढाईत मारला गेला."

ह्या वेळी जगदेवराव अवघे चौदा वर्षांचे होते. इतिहासकार भीमसेन सक्सेना ह्याची आणि जगदेवरावाची ओळख होती. देखणा आणि सालस तरुण असे त्याने जगदेवरावाचे वर्णन केले आहे. दत्ताजीच्या मृत्यूमुळे जाधव घराण्याच्या सर्व शाखा निस्तेज झाल्या होत्या. मोठ्या शाखेचे ठाकोरजी यांना मोगल बादशहा तर्फे जाधवराव ही पदवी होती.

यानंतर भीमसेन सक्सेना सन १६७२ मध्ये एका नोंदीत म्हणतो-

"शहजादा मुअज्जम यास बादशाहने बोलावून घेतले (जून १६७२). दक्षिणेचा सुभेदार म्हणून बादशहाने बहादुरखानाची नेमणूक केली. (माजी) वजीर जाफर खान यांचा मुलगा नामदार खान यांच्याकडे बागलानच्या रक्षणाचे काम सोपविण्यात आले.

जाधवराव दखनी आणि सिद्धी हिलाल खान यांची अनुक्रमे नाशिक गुलशनाबाद आणि वनी दिंडोरी या ठाण्यांवर ठाणेदार म्हणून नेमणूक झाली. मराठ्यांना त्या भागात फिरकू देऊ नये असे त्यांना बजावण्यात आले."

अर्थात सन १६७२ मध्ये जाधव दखनी म्हणजेच ठाकोरजी यांची नियुक्ती नाशिकच्या ठाणेदारीवर झाली होती.

यानंतर साल्हेरच्या युद्धाच्या हकीकती विषयी भीमसेन म्हणतो-

"इखलासखान आणि मोहकमसिंग चंद्रावत हे साल्हेरच्या युद्धात जखमी होऊन मराठ्यांच्या हाती सापडले होते. त्यांनी आपली सुटका करून घेतली आणि ते अहमदनगरला येऊन बहादुरखानाला भेटले. बहादूरखानाने त्यांची मनसब त्यांना बहाल केली."

...

"जाधवराव दखनी हा नाशिक गुलशनाबाद येथे ठाणेदार होता. सिद्धी हिलाल हा वनी दिंडोरी येथे ठाणेदार होता. मराठे या भागात पसरले (जुलै १६७२). बहादूरखानाने त्या दोघा ठाणेदारांची कडक शब्दात हजेरी घेतली. ती त्यांना सहन न होऊन ते शिवाजी ला जाऊन मिळाले.

जाधवरायाचा नातू जगदेवराव याला बहादुर खानाच्या विनंतीवरून बादशहाने पदवी, मनसब देऊन त्याची पिढीजात जागीर त्याच्या नावाने केली."

अर्थात सल्हेर युद्धाच्या वेळी शिवाजी महाराजांचा करावा तसा प्रतिकार न केल्याने मोगल सुभेदार बहादुरखान याने जाधवरावांची कडक शब्दात हजेरी घेतली. त्यामुळे जाधवराव(ठाकोरजी) मोगलांची चाकरी सोडून महाराजांना मिळाले. जाधवराव गेल्यानंतर त्यांच्या घराण्यातील जगदेवराव यांना त्यांची पदवी, मनसब व जहागीर देण्यात आली.(१६७२)

शंभुराजे-दुर्गाबाई विवाह नोंद-

यानंतर तीन वर्षांनी सन १६७५ मध्ये भीमसेन पुन्हा जाधवराव दखनी अर्थात ठाकोरजी विषयी लिहितो-

अकलूजच्या ठाण्यावर रणमस्तखान हा मोगल ठाणेदार होता. जाधवराव दखनी याचा पुतण्या रुस्तुमराव हा रणमस्तखान याच्या पाशी तैनात होता. शिवाजीने रुस्तुमरावाच्या मुलीशी आपला मुलगा संभाजी याचे लग्न ठरविले."

छत्रपती संभाजी राजांची दुसरी राणी दुर्गाबाई ह्या याच रुस्तुमरावांच्या कन्या असाव्या. असे मत सेतू माधव पगडी यांनी व्यक्त केले आहे. हे भीमसेन च्या वरील नोंदीवरून तरी वाटते.

छत्रपती शिवाजी महाराजांना आता आदिलशाही मुलुख जिंकायचा होता त्यासाठी त्यांना मोगल आघाडीवर काही काळ शांतता हवी होती. भीमसेन म्हणतो-

"शिवाजीने आपल्या किल्ल्यातून युद्धसामग्री मागविली. जाधवराव दखनी आणि हिलालखान हे मोगलांना सोडून त्याला मिळाले होते. शिवाजीने त्यांना सांगितले की,"माझा हेतू बहादुर खानाबरोबर तह करावा असा आहे, तर तुमचे माझ्या जवळ असणे योग्य होणार नाही." यावर ते शुभकर्ण बुंदेला याच्या मध्यस्थीने येऊन बहादूरखानाला भेटले. 

अर्थात तीन (१६७२) वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांकडे आलेले जाधवराव(ठाकोरजी) व सिद्दी हिलाल यांना शिवाजी महाराजांनी आपला तहाचा हेतू सिद्ध करण्यासाठी पुनश्च मोगलांच्या चाकरीत पाठविले. याप्रकारे महाराज शत्रूच्या गोटात आपली माणसे पेरून शत्रूची अचूक माहिती मिळवत. 

असो,

पुढे भीमसेन सक्सेना म्हणतो-

"शिवाजीने आपले कारभारी बादुरखानाकडे रवाना केले. शिवाजीने कानापाशी तहाची याचना केली.... बहादूरखानाने गंगाराम गुजराती आणि मलिक बरखुरदार यांना शिवाजीकडे पाठविले या अवधीत शिवाजीने आपल्या गुप्त हेतू तडीस नेले होते. त्याने विजापूरकरांकडून पन्हाळ्याचा किल्ला जिंकून घेतला होता. (६ मार्च १६७३)

... भेटीच्या दुसऱ्या दिवशी शिवाजीने त्यांना खणखणीतपणे बजावले, की तुम्ही काय पराक्रम गाजविला म्हणून मी तुमच्याशी तह करावा? येथून लवकर चालते व्हा कसे.! नाहीतर तुमची फटफजिती होईल ते बिचारे निराश होऊन परतले. घडलेली हकीकत त्यांनी बहादुरखानाला सांगितली."(जून १६७५)

अर्थात महाराजांचा तहाचा हेतू पूर्ण झाला होता. मात्र जाधवराव विषयी यापुढे अधिक माहिती मिळत नाही. पण येथे महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करण्यासारखी तीही कि शंभूराजांचे रुस्तुमरावाच्या मुलीशी लग्न.!!! 

जाधव घराण्यातील रुस्तुमरावांची ती कन्या म्हणजेच संभाजी राजांची दुसरी राणी दुर्गाबाई !!

तत्कालीन विवाह हे बहुदा राजनैतिक असत. स्वराज्य कार्यात अधिक घरानी जोडली जावी हासुद्धा हेतू असे.

दुर्गाबाई आपल्या मुलीसह मोगल कैदेत-

संभाजी राजे आणि दुर्गाबाई यांच्या विवाहानंतर तीन वर्षांनी संभाजीराजे इ.स. १६७८ मध्ये मोगलांकडे निघून गेले. तेव्हा त्यांच्याबरोबर एक बाई होती आणि संभाजीराजे १६७९ मध्ये शिवाजीमहाराजांकडे परत आले त्या वेळी ती बाई मोगल छावणीत मागे राहिली असे कागदपत्रांवरून दिसते. या बाई म्हणजेच राणी दुर्गाबाई असाव्यात.

राज कैद्यांची नगरच्या किल्ल्यातून बहादुरगडी रवानगी (१६८४)-

साकी मुस्तैदखान याने आपल्या 'मासिरे आलमगिरी' या ग्रंथात संभाजीराजांची पत्नी आणि मुलगी यांची नोंद दिली आहे-

"संभाजीच्या दोन बायका, एक मुलगी आणि तीन दासी या आपल्या ताब्यात आहेत अशा प्रकारची सहीशिक्क्यानिशी रशीद पोच बहादुरगडचा किल्लेदार अब्दुरहमान याने पाठविली ती बादशहासमोर ठेवण्यात आली."

-मासिरे आलमगिरी,पान २४६(सेतू माधव पगडी खंड ३,३९२)


म्हणजेच साकी मुस्तैदखान म्हणतो त्या दोन बायका नसून त्यापैकी एक दुर्गाबाई आणि दुसऱ्या संभाजीराजांच्या भगिनी बहुदा राणू अक्का असाव्या. पूर्वी संभाजी राजे (इ. स. १६७८ मध्ये) एक वर्ष मोगलांकडे होते. तेथे असताना त्यांना लवकरच एक मुलगी झाली असावी. त्यामुळे संभाजीराजांच्या मुलीचा उल्लेख वरील कागदपत्रात येतो.

दुर्गाबाई साहेब आपल्या मुलीसह नगरच्या किल्ल्यात कैदेत होत्या. म्हणून त्यावर शंभूराजांचे वारंवार हल्ले होत. याची नोंद मोगल दरबारात मिळते. बादशहाने त्यांना बहादुर गडच्या किल्ल्यात हलविण्याची आज्ञा केली होती. तेव्हा ही मंडळी बहादूर गडच्या किल्ल्यात हलविण्यात आली. ते पोचण्याची रशीद पोच किल्लेदार अब्दुल रहमान याने बादशहाकडे पाठविली.

राज कैद्यांचे लग्नसंबंध-

रायगड पडल्यावर मोगलांनी संभाजीराजांचा सगळा परिवार कैद केला. जिंजी पडल्यावर राजाराम महाराजांच्या दोन मुली मोगलांच्या ताब्यात सापडल्या. संभाजी राजे आणि राजाराम महाराज यांचे कबिले मोगल छावणीत ब्रह्मपुरी येथे ठेवण्यात आले होते. तेथे औरंगजेबाची बायको उदेपुरी बेगम आणि मुलगी जिनतुन्निसा याही होत्या. इ. स. १६९९ मध्ये धनाजी जाधवाने ब्रह्मपुरीच्या मोगल छावणीवर निकराचा हल्ला केला, त्या वेळी औरंगजेब साताऱ्यासमोर होता. मराठ्यांच्या निकराच्या हल्ल्यामुळे ब्रह्मपुरीतील मोगल अंत:पुरावर मोठा कठीण प्रसंग ओढवला. मोठ्या शर्थीने हे संकट दूर करण्यात आले. त्या वेळेपासून ब्रह्मपुरीतून बायकापोरांना हलवावे आणि सुरक्षित स्थळी ठेवावे असे औरंगजेबाला वाटू लागले. त्याप्रमाणे इ. स. १७०३ मध्ये आपले अंत:पूर ब्रह्मपुरीहून बहादुरगड (पेडगाव - दौंडपासून चौदा मैल भीमेच्या काठावर) येथे किल्ल्यात त्याने हलविले. त्याच कबिल्यात येसूबाई, संभाजीराजे व राजाराम राजे यांच्या मुली होत्या.

१६ जून १७०३ च्या बातमीपत्रात नोंद आहे. ती अशी की, संभाजीच्या मुली बहादुरगडच्या तळावर होत्या. त्यांना बादशाही छावणीत (पुण्यास) आणण्यात यावे अशी बादशहाने आज्ञा केली. राजारामाच्या मुलींच्या बाबतीतही असेच घडले. 

पुढे संभाजीराजांच्या दोन आणि राजारामाच्या दोन मुलींची लग्ने मोगल अधिकाऱ्यांबरोबर लावून देण्यात आली.

(सेतू माधव पगडी खंड दुसरा १३१२-१३)


लग्न संबंधाच्या नोंदी 'मासिरे आलमगिरी' या साकी मुस्तैदखान लिखित फारसी ग्रंथांमध्ये आढळतात-

(सेतु माधव पगडी खंड तिसरा मराठी व औरंगजेब ४६७-४६९)


इ.स.१७०३ हिजरी १११४-

राजा शाहू यास बादशहाने लाल मानके दडवलेला एक आरसा हिरे जडलेली सोन्याची पंछी (अलंकार), पाच रत्नजडीत अंगठ्या, एक रत्नजडित खंजीर. आणि सोनेरी साज असलेला घोडा या वस्तू दिल्या. बादशहाच्या आज्ञेने फतेह दौलत कौल याने शाहूला शहजादा कामबक्ष यांच्याकडे नेले.

राजाने त्याला एक आरसा आणि खिलतिची वस्त्रे दिली. बादशहाच्या आज्ञेने शाहूचा तंबू कामबक्षाच्या निवास्थानी शेजारी लावण्यात आला.

राजा शाहू याचा भाऊ मदनसिंग बादशहाच्या आज्ञेने इस्लामपूरी(ब्रह्मपुरी) येथून येऊन बादशाहाला भेटला. विशाळगडाचा किल्लेदार उदयसिंग (उधवत सिंग) हा तीन हजारी बाराशे स्वरांचा मनसबदार होता. त्याला बढती देण्यात आली.

बादशहा रजब महिन्याच्या ३० तारखेस(२८ नोव्हेंबर १७०३) रायगडास पोचला.


इ.स.१७०४ हिजरी १११५-

बादशहाने अगरखानाचा मुलगा शमशीर बेग याच्याशी रामा (राजाराम महाराज) च्या मुलीचे लग्न लावले.

...

रामा (राजाराम महाराज) च्या मुलीचे राजा नेक नाम याच बरोबर लग्न लावून देण्यात आले.

...

संभाजी च्या मुलीचे सिकंदर खान विजापुरी (विजापूरचा शेवटचा बादशहा सिकंदर आदिलशहा) याचा मुलगा मोहम्मद महियुद्दिन याचबरोबर लग्न लावण्यात आले.

राजा शाहू याचे लग्न बहादूरजीच्या(जाधव) मुलीशी ठरविण्यात आले. बादशहाने त्याला एक रत्नजडित कंबरपट्टा, एक शिरपेच आणि दहा हजार रुपयांचा चेगा (अलंकार) या वस्तू दिल्या."

प्रस्तुत नोंदीवरून शंभूराजे आणि दुर्गाबाई यांच्या मुलीचा विवाह सिकंदर आदिलशहाच्या मुलाशी करण्यात आला.

तसेच

इ. स. १७०३ मध्ये महाराणी ताराबाई यांनी गिरजोजी यादव ह्याला देशमुखीची सनद देताना त्याच्या कामगिरीचा तपशील दिला आहे. त्यातील मजकुराप्रमाणे संभाजीराजांची लाडकी राणी दुर्गाबाई ही ताम्रांचे (मोगल) निर्बंधात होती.' तिची चौकशी करून येण्यासाठी संभाजीराजांच्या आज्ञेने गिरजोजी यादव हा दौलताबादेस गेला होता असे नमूद आहे. याचा अर्थ असा की संभाजीराजांच्या हयातीत दुर्गाबाई मोगलांच्या कैदेत असल्याचे दिसते. 

अखेर मुक्तता झाली-

औरंगजेब बादशहाच्या मृत्युपश्चात छत्रपती संभाजी राजांचे पुत्र शाहू महाराज मोगल कैदेतून स्वराज्यात परत आले होते.

शाहू महाराजांनी सुभेदार सय्यद हुसेन याच्याशी करार करुन इ.स. १७१९ मध्ये सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या नेतृत्वात प्रधान बाळाजी विश्वनाथ,संताजी भोसले,राणोजीभोसले, तुकोजी पवार ,उदाजी चव्हान,राघोजी शिंदे, नारो शंकर आदी मराठा सरदार सोळा हजारा सैन्यासह 

मातुश्री येसुबाईसाहेब ,मातुश्री दुर्गाबाईसाहेब ,मातुश्री जानकीबाईसाहेब व इतर राजकैद्यांच्या सुटकेसाठी रवाना केले.

शाहू महाराजांनी सोबत यादी दिली, त्यामध्ये करारानुसार सय्यदबंधूंकडून घ्यावयाचा मुलुख आणि सोडावयाचे राजकैदी यांचा उल्लेख केला होता.

अशाप्रकारे साधारणपणे चाळीस वर्षांनी शंभूराजांच्या पत्नी दुर्गाबाईसाहेब यांची मुक्तता झाली. (राजवाडे खंड-१प्रस्तावना)

असो प्रस्तुत चर्चेचा उद्देश छत्रपती शंभूराजांच्या दुसऱ्या पत्नी राणी दुर्गाबाईंचे इतिहासातील महत्त्वाचे स्थान समजणे. त्यांचा त्याग हा स्वराज्यासाठी तेवढाच महत्त्वाचा ठरतो. म्हणून छत्रपती शंभूराजांच्या या इतिहासातून उपेक्षित राहिलेल्या त्यांच्या लाडक्या राणीला त्यांचा सन्मान मिळावा हाच अट्टाहास.!

राणी दुर्गाबाईंसाहेबांना मानाचा मुजरा.!!!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts