Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

कथा विल्यम पामराची.!!!



मित्रांनो मला भेटल्या पैकी काही मित्रांनी सामान्यपणे 'आम्ही बुवा पामर तुम्ही थोर' असा शब्द प्रयोग केल्याचे मला आठवते. पण 'पामर' शब्दप्रयोगाचा अर्थ सोडून इतिहास खाली देत आहे, मग बघा वापरून, गंमत वाटेल.

हैद्राबादचे निजामी राज्य म्हणजे सुधारणांचा अभाव आणि गोंधळाचा प्रभाव.!

गैरव्यवस्थेमुळे म्हणा की जुलमामुळे म्हणा, हैद्राबाद राज्यविरुद्ध सारखी बंडे होत. सुधारणांचे नाव नाही आणि प्रजेने दंगल केली की इंग्रजांनी बंड मोडायचे. सारांश, 'आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना' अशी प्रजेची स्थिती झाली. खुद्द काही इंग्रज अधिकाऱ्यांना हा प्रकार आवडत नव्हता.


"A starved peasantry was crushed and much British blood was spilt in this bad business", असे उद्गार जेम्स स्टुअर्ट या इंग्रजाने आपल्या १० नोव्हेंबर, १८१९ च्या इतिवृत्तात काढले आहेत.

बंडे मोडण्यासाठी बाजारबुणग्यांच्या सैन्यावर निजामाचा अतोनात खर्च होई. त्यामुळे खजिना नेहमी रिकामा असे. ही अडचण दूर करण्याकरिता निजामाचा दिवाण चंदुलालने भरमसाट कर्ज काढण्यास सुरुवात केली. जबर व्याजावर कर्ज काढणे आणि कर्जफेडीस तालुके लावून देणे हा क्रम चंदुलालने आरंभिला. आश्चर्याची गोष्ट ही की निजामाचेच मुलकी आणि लष्करी अधिकारी राज्याला कर्ज देत आणि त्याबाबत तालुके आपल्याकडे लावून घेत. हेच अधिकारी मग रयते कडून जबर वसुली करत, त्यातून दंगे उद्भवत. कारण जमिनीची मोजणी आणि माफक शेतसारा याकडे कायम दुर्लक्ष!

याशिवाय रोहिले, अरब इत्यादी हजारो लोकांचा हैद्राबाद राज्यात सुळसुळाट! त्यांची दंडेली तर शिगेला पोहोचली होती. मारामारी करणे हे प्रकार नेहमीच चालू असत.

त्यात भर म्हणून की काय, पामर नावाच्या इंग्रजाने निजाम राज्याला कर्ज देण्याकरिता म्हणून एक पेढी उघडली.! ही कथा त्याच 'बिचाऱ्या' पामराची!

पुण्याच्या रेसिडेन्सीत एकेकाळी वावरणारा जनरल पामर याला मुसलमान स्त्रीपासून झालेला मुलगा म्हणजे हा विलियम पामर होय. निजामाच्या सैन्यात हा प्रथम नोकरीत लागला. महिपतरामशी(वऱ्हाडचा सुभेदार) झालेल्या युद्धात हा कैद झाला. नंतर त्याने नोकरी सोडून हैद्राबादेस इ. स. १८११ मध्ये स्वतंत्र धंदा सुरू केला. इ. स. १८१४ मध्ये त्याने हैद्राबादेत बँक उघडण्यास परवानगी मिळावी म्हणून गव्हर्नर जनरलकडे अर्ज केला. त्या वेळी हैद्राबादेस हेन्री रुसेल हा रेसिडेंट होता. गोदावरीच्या काठावरील सागवानी लाकडाचा व्यापार हाही आपला उद्देश आहे, असे पामरने आपल्या अर्जात लिहिले होते.


निजाम राज्याचा गोंधळ पाहता रेसिडेंट रुसेल लाही या धंद्यात रस वाटला. पामरच्या या पेढीत त्याने स्वत: आपल्या रकमा गुंतविल्या. या पेढीत विलियम पामर, हेस्टिंग्स पामर, विलियम करी (हा रेसिडेन्सीत सर्जन होता), बंकटीदास आणि सॅमूएल रुसेल ही मंडळी होती. जॉन पामरने पुढे आपल्या जबानीत सांगितले, की आपल्या पेढीच्या मार्फतीने रेसिडेंट रुसेलने निजाम सरकारला शेकडा अट्ठेचाळीसच्या व्याजाने कर्ज दिले.!!! 

खुद्द रेसिडेंटच पाठीराखा असल्यावर पामर पेढीचे बस्तान बसण्यास काय वेळ लागणार ? पामरने आपले ऑफिस रेसिडेन्सीच्या आवारातच थाटले. आपण इतर व्यवहार करतो हे जरी पामरने भासविले तरी त्याचा मुख्य धंदा सावकारीचा होता. पेढीने शेकडा बाराने रकमा गोळा करावयाच्या आणि शेकडा पंचवीसने कर्ज द्यायचे असा हा अजब-गजब प्रकार होता.!

रेसिडेंटचा पेढीला पाठिंबा आहे, हे पाहून दिवाण चंदुलाल आणि इतर अमीर उमराव यांनी पेढीकडून भरमसाट कर्ज काढण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी रेसिडेंटने पेढीतून आपले अंग काढून घेतले आणि पेढीची कचेरी रेसिडेन्सीच्या आवारातून हलविण्यात आली, पण पामरने याच वेळेस एक युक्ती केली. गव्हर्नर जनरल लॉर्ड हेस्टिंग्स हा एका सधन मुलीच्या इस्टेटीचा पालक होता. त्याचे त्या मुलीवर फार प्रेम होते. त्याने त्या मुलीचे लग्न सर विलियम रंबोल्ड नावाच्या माणसाशी लावून दिले होते. हा रंबोल्ड म्हणजे लॉर्ड हेस्टिंग्सचा मानलेला जावई म्हणा ना, तोच पामर कंपनीचा भागीदार बनला! रुसेल रेसिडेंट याचा पाठिंबा कंपनीला होताच.


२७ जून, १८१६ मध्ये कंपनीने निजाम सरकारला कर्ज देण्याची आपल्याला परवानगी मिळावी म्हणून अर्ज केला. युरोपियन नागरिकांनी देशी राजाबरोबर देण्याघेण्याचे व्यवहार करू नयेत, असा ब्रिटिश पार्लमेंटचा कायदा होता, तो फक्त इंग्रजी इलाख्यात लागू आहे, देशी संस्थानात नव्हे, अशी पळवाट काढण्यात येऊन पामर कंपनीला परवानगी देण्यात आली. 

...अर्थात ब्रिटिश काळातील स्कॅमच म्हणा !

असो,

याच सुमारास निजामाचे सैन्य सुधारण्याकरिता इंग्रज अधिकारी नेमण्यात आले होते. इ. स. १८०० च्या तहाप्रमाणे निजामाने इंग्रजांना सैन्यानिशी मदत करायची असे ठरले होते. ते सैन्य 'कंटिजेंट सैन्य' म्हणून ओळखले जाई. त्या सैन्याची सुधारणा इंग्रज करू लागले, पण या कंटिजेंट सैन्याला पगार वेळेवर मिळणे आवश्यक होते. निजामाच्या खजिन्यात पैशाचा नेहमीच ठणठणाट असल्यामुळे सैन्याला पगार वेळेवर कधीच मिळत नसे. याचा परिणाम असा झाला, की नोव्हेंबर, १८१२ मध्ये निजामाच्या कवाइती पायदळातील शिपायांनी बंड केले आणि आमचा पगार मिळत नाही. तर आमच्या इंग्रज अधिकाऱ्यांना ठार मारू अशी धमकी देऊन त्यांनी मेजर एडवर्ड गॉर्डन या इंग्रज अधिका-याला तोफेच्या तोंडी बांधले. ही बातमी रेसिडेंटला कळताच तो ताबडतोब घोड्यावरून बंडाच्या स्थळी गेला आणि इंग्रज अधिकाऱ्याची ताबडतोब मुक्तता करून त्याने आपल्या खजिन्यातून सैन्याचा पगार वाटला.

पामर कंपनीने कंटिजेंट सैन्याचा पगार वेळेवर मिळावा म्हणून निजाम सरकारला कर्ज देण्यास सुरवात केली. दर महिन्यास दोन लाख रुपये या हिशेबाने वर्षाला चोवीस लाख रुपये कर्ज कंपनीतर्फे निजाम सरकारला मिळू लागले. यावर कंपनी शेकडा पंचवीस रुपये व्याज आकारीत. कर्जफेडीकरिता वार्षिक तीस लाख रुपये उत्पन्नाचे व-हाडातील जिल्हे लावून देण्यात आले.

गव्हर्नर जनरल हेस्टिंग्सचा जावई पेढीतील भागीदार. मग त्यांना खूष केले की आपले आसन स्थिर, असा युक्तिवाद करून चंदुलालने आपली सत्ता टिकावी म्हणून पामर कंपनीची खुशामत करण्याचा एकही उपाय सोडला नाही. त्याने रेसिडेंटच्या अधिकाऱ्यांनाही मोठमोठ्या लाचा चारून आपलेसे करून घेतले होते.

पामर आणि त्याच्या कुटुंबियांना पेन्शन म्हणून निजाम सरकार महिन्याला ऐंशी हजार रुपये देत असे. विलियम पामरची दोन मुले इंग्लंडमध्ये शिकत. त्यांचा संपूर्ण खर्च निजामाकडून पोहोचे.!

..आता हे जरा जास्तच झाले नाही का.?

असो,

पामरची पेढी दिवसेंदिवस प्रबळ बनू लागली. व-हाडचा सुभेदार आपल्या कर्जाची फेड बरोबर करीत नाही, या सबबीवर सुभ्याचा शेतसारा आपल्या एजंटामार्फत वसूल करण्याची परवानगी कंपनीने मिळविली. यापुढे जाऊन कंपनीने निजामाचे आर्थिक व्यवहार आपल्या मार्फतीने व्हावे, असा दावा मांडला. म्हणजे तिचे पेढीचे स्वरूप जाऊन एका सर्वव्यापी कमिशनचे स्वरूप तिला प्राप्त झाले. जनमनात तर ही भावना रूढ झाली की, पामर कंपनी म्हणजे इंग्रज सरकारच.! 

कुठेही जावे, दंडेली करावी, आपल्या कर्जाची रक्कम वसूल करावी, इतकेच नव्हे तर निजाम सरकारचे नाठाळ सरदार आपल्याकडे बाकी असलेल्या रकमा सरकारला देत नसतील, तर त्यांच्याकडून चापून वसुली करून कमिशन मारावे, असाही उद्योग कंपनीने स्वीकारला. पुढे पुढे तर इंग्रज रेसिडेंट हा निस्तेज बनला आणि साहेबाची कोठी म्हणून पामरची मंडळी ऐश्वर्याने मिरवू लागली. ते हैद्राबादच्या रस्त्यातून जात तेव्हा पालखी, मेणे, लवाजमा असा त्यांचा थाट असे.

रेसिडेंट ही काही कमी नव्हता. पामरच्या पेढीत पैसे गुंतवून निजामाला शेकडा पंचवीसच्या भावाने कर्ज देऊन त्याने पैशाच्या गंगाजळीत भरपूर न्हाऊन घेतले होते. 

अशा परिस्थितीत मेटकाफ हा डिसेंबर, १८२० मध्ये रेसिडेंट होऊन आला. पामरची हैद्राबाद राज्याला बसलेली मगरमिठी त्याने पाहिली आणि ती दूर करण्याचा त्याने चंग बांधला. त्याने गव्हर्नर जनरलला सुचविले की, निजामाकरिता शेकडा सहाच्या भावाने कलकत्त्याला कर्ज उभारण्यात यावे आणि त्या रकमेतून पामर कंपनीच्या कर्जातून निजाम सरकारला मुक्त करण्यात यावे.

आपले महत्त्व कमी होत आहे हे पाहताच पामर कंपनीने आकाशपाताळ एक केले. त्यांनी मेटकाफची कागाळी केली की, हे सर्व वैयक्तिक द्वेषामुळे तो करीत आहे. लॉर्ड हेस्टिंग्सने याबाबत त्याला ताकीद केली. हैद्राबादेत पामरच्या पाठीराख्या इंग्रजांनी रेसिडेंट मेटकाफ वर बहिष्कार घातला. पामरने चंदुलालला असे भासविले की, मेटकाफ म्हणजे कोण झाडाचा पाला. आम्ही त्याला हा हा म्हणता बडतर्फ करू. अशा परिस्थितीतही मेटकाफही डगमगला नाही. त्याने कंपनीच्या हिशेबाची कसून चौकशी करविली; तो त्याला दिसून आले की, पामर कंपनीने निजाम सरकारला साठ लाखांचे कर्ज दिले असे दाखविले आहे. त्यांपैकी एक पैही निजाम सरकारच्या खजिन्यात जमा झाली नाही!!!

मागील चाळीस लाखांचे कर्ज नवीन कर्जात वळते करून घेतले होते. शिवाय चौदा लाख रुपये कर्ज म्हणून दाखवून देणग्या आणि बोनस म्हणून कंपनीला दिल्याचे दाखविण्यात आले होते.!

...अरेरे, केवढा मोठा हा घोटाळा!!!

असो,

मेटकाफला दिसून आले की, निजाम सरकारकडे कंपनीचे एकंदरीत साडेब्याऐंशी लाखाचे कर्ज होते. याशिवाय इतर देशी सावकारांकडून सतरा लाखांचे कर्ज घेतले होते. शिवाय माजी रेसिडेंट(रुसेल) आणि इतर अनेक इंग्रज अधिकारी गुप्तपणे कंपनीत भागीदार होते. मेटकाफने लॉर्ड हेस्टिंग्सची नाराजी पत्कारून हा प्रश्न धसास लावला आणि शेवटी हिंदुस्थान सरकारने निजामाचे कर्ज आपल्या अंगावर घेतले. त्याच्या मोबदल्यात निजामाने मछलीपट्टण वगैरे जिल्ह्याबाबत इंग्रजांकडून वार्षिक पेशकश म्हणजे नजरदाखल रक्कम मिळे, तिच्यावरचा आपला हक्क कायमपणे सोडला.!

पामर कंपनीचे दिवाळे लवकरच वाजले. लॉर्ड हेस्टिंग्स इ. स. १८२३ मध्ये इंग्लंडला परत गेला. ब्रिटिश पार्लमेटमध्ये पामर प्रकरण बरेच दिवस गाजले. त्यातून लॉर्ड हेस्टिंग्सची फार बेअब्रू झाली. असो,

तर मित्रांनो अशी ही कथा ब्रिटिश काळातील एका स्कॅम ची, सावकार पामराची.!

आणि हो यानंतर 'आम्ही बुवा पामर'असे म्हणण्यापूर्वी तुम्हाला ही कथा नक्कीच आठवल्या शिवाय राहणार नाही..

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

।।फक्तइतिहास।।

संदर्भ-

Palmer and company: an Indian banking firm in Hyderabad state

KAREN LEONARDU, University of California, Irvine, USA

इतिहासाचा मागोवा: सेतू माधव पगडी

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts