Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

दत्ताजी महाराज जाधवराव-शर्थ स्वाभिमानाची -झुंज मृत्यूशी!!!

 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ माँ साहेब यांचे माहेर म्हणजे विदर्भातील सिंदखेडच्या जाधव यांचे घराणे होय. लखुजीराजे हे वर्‍हाडातील मोठे प्रस्थ. या घराण्यात पुढे अनेक नामवंत योद्धे होऊन गेले. त्यातीलच एक म्हणजे दत्ताजी महाराज जाधवराव.!!!

लखुजीराजे जाधव यांचे नातू दत्ताजी हे इ.स. १६६५ मध्ये मिर्झाराजा जयसिंग यांच्यासह विजापूरकरांशी युद्ध करण्यात गुंतले होते. मंगळवेढ्याचा किल्ला जिंकून निलंग्याच्या आसमंतात जयसिंगाची छावणी पडली होती. विजापुरी सैन्य त्यावर छापेमारी करून रसद लुटत होते. जयसिंगाने छापे घालणार्‍या विजापुरी फौजेवर जाण्याची आज्ञा जाधवांना केली. त्याप्रमाणे आपली फौज घेऊन ते निलंग्याच्या रोखाने निघाले. कूच मुक्कामात एक दिवस ते शिकारीला गेले. दोन प्रहरी दत्ताजी अमराईत विसाव्यासाठी थांबले. लोकांनी पागोटी उतरवली, कमर बंद सैल केले, घोड्यावरची जिने उतरली. दत्ताची आराम करीत होते. अशातच विजापुरी सरदार सर्जा खानाची फौजी तिकडे आली. सर्जा खानाने हेजीब पाठवून दत्ताजींना अपमानास्पद शब्दात निरोप पाठविला की आम्ही मोठ्या फौजेचा आलो आहोत, "आमच्याशी सामना देणे तुम्हास केवळ अशक्य आहे. इथून निघून जाणेच बरे होईल!" या अपमानास्पद निरोपाने दत्ताजींची आग झाली. त्यांनी आपला पेशवा रखमाजी यास सांगितले की, "आपण येथून पळून गेलो तर आपली दुष्कीर्ती होईल. काय वाटेल ते झाले तरी आपण शत्रूशी लढायला उभे राहणार.!!!"

आणि अखेर दत्ताजींनी सर्जा खानाच्या हेजीबाला उलट निरोप देऊन पिटाळून लावला. मग थोड्याच वेळात सर्जा खानाच्या फौजेने येऊन दत्ताजीच्या तळाला घेराव घातला आणि उभयपक्षी रणकंदन सुरू झाले.!!!

सर्जा खानाच्या राऊतांनी फळी फोडून दत्ताजीरावांना जिवंत पकडण्याची शर्थ केली पण त्यावेळी दत्ताजींचे पुत्र यशवंतराव त्वेषाने तुटून पडले, त मारीत मारीत शर्जा खानाच्या निशाणा पर्यंत गेले. त्यांचे शौर्य पाहून खासा सर्जा खानही,"खुब किये समशेर"म्हणून मान डोलावू लागला. मात्र यशवंतरावांना चांगले आत येऊ देऊन सर्जा खानाने त्यांस ठार केले. दत्ताजींचा दुसरा पुत्र रघुजी रुस्तुमराव यानेही अचाट पराक्रम केला. त्यांस २१ जखमा झाल्या. येसाजी, संताजी, दावजी आणि हंसाजी यांनीही निकराची झुंज दिली. दत्ताजी सारखे लढतच होते. त्यांनी हातात बरची घेऊन शत्रूचे अनेक मुडदे पाडले.

इतक्यात शत्रुच्या कोणी शिपायाने पाठीमागून वार केला. त्यामुळे दत्ताजीच्या हातातील बरची उडून गेली. तेव्हा दत्ताजीने कमरेचा गुरदा घेऊन हत्यार चालविले. पण लवकरच गुरदाहि शत्रूच्या शिपायांनी उडविला. अखेर नाइलाजाने दत्ताजी पायउतार झाले आणि लढू लागले. त्यांना अनेक जखमा झाल्या. अखेर डोक्याला जबरदस्त प्रहार झाल्याने ते मरणोन्मुख होऊन रणात पडले. दत्ताजीराव रणात पडले!!!

शत्रूच्या लोकांनी त्यांच्याभोवती गोल करून त्यांचे शव लोकांना काढू दिले नाही. खासा सर्जाखान आला व त्याने दत्ताजींचे शीर तोडून जयघोष करीत निघून गेला.!

दत्ताजी पडल्यावर लढाई संपली, रात्र झाली होती. मुगल सरदार दिलेरखानाला बातमी लागताच तो दिव्या मशाली घेऊन मैदानात दत्ताजीरावांचे शव शोधण्यास रणभूमीवर आला. धड तेवढे मिळाले ते उचलून पालखीत घालून मोठ्या सन्मानाने तळावर आणले गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या पत्नी सती जाण्यास निघाल्या. मात्र शरीर होते पण शीर नव्हते. तेव्हा अग्नी संस्कार होणे शक्य नसल्यामुळे त्यांनी सर्जा खानाकडे माणूस पाठवून दत्ताजीराव यांच्या शीराची मागणी केली. सर्जाखान मस्तीत होता. तो म्हणू लागला, उमराव का शीर मै भेजुंगा दरबार" पण अखेर सर्जा खानाकडील सरदार बाबाजी घाडगे यांनी रदबदली केल्यामुळे सर्जा खानास दत्ताजींचे शीर पाठवावे लागले. दत्ताजींचा अग्निसंस्कार झाला व त्यांच्या पत्नी सती गेल्या.

असा वृत्तान्त जाधव रावांच्या एका पोवाड्या मध्ये वर्णिला आहे.(ऐतिहासिक पोवाडे खंड २)

समकालीन मोगल इतिहासकार भीमसेन सक्सेना हा आपल्या 'तारीखे दिलकशा' या चरित्र ग्रंथात म्हणतो-

"मोगल सैन्य विजापूरकडे रवाना झाले (१० नोव्हेंबर १६६५). दत्ताजी जाधव हा चार हजारी सरदार होता. तो अद्वितीय असा शिपाईगडी होता. निलंग्याजवळ तो (विजापूरकरांशी) मर्दुमकीने लढत असता मारला गेला. त्याच्याबरोबर असलेले अनेक सरदार व सैनिक मारले गेले. दत्ताजीचा लहान मुलगा जगदेवराव ह्यास जयसिंग ह्याने मनसब दिली. बादशहाकडून त्याला पाचशे जात आणि तीनशे स्वार अशी मनसब देण्यात आली. दत्ताजीचा मोठा मुलगा रघोजी हा ह्या लढाईत जखमी झाला. त्याची मनसब वाढविण्यात आली. दत्ताजीचा आणखी एक मुलगा नौबतराव हाही या लढाईत मारला गेला."

जाधव घराण्याच्या बखरीतही या युद्ध प्रसंगाचे मोठे वीरोचित वर्णन केले आहे-

“दत्ताजी महाराज ह्यांचा घोडा पाच गोळ्या लागून मोती नामे जरदा रंगाचा रणात पडला. पाठीस ढाल होती ते दाईहाती व हातात पट्टा होता. पायउतार होऊन इकडून तिकडे असे पातशाही लोक जागा करू लागले. मग सर्वांनी घेऊन मार शस्त्राचा केला. दत्ताजी महाराज ह्यांना पंधरा - वीस तीराच्या जखमा लागल्या व गोळ्या दोन आणि पट्टे व तलवारीच्या जखमा दहा-बारा झाल्या. ढाल हनुवटीखाली देऊन टेका घेऊन बसले. तरी पट्याचा हात चालत होता आणि मस्तकावर, खांद्यावर जखमा चढल्या तो गतप्राण."

दत्ताजी हे अतिशय शूर आणि कर्तबगार होते. निलंग्याच्या लढाईत त्यांनी पराक्रम गाजवून धारातीर्थी देह ठेवला. त्यांच्या अंगावरील जखमा त्यांच्या शौर्याची साक्ष देत होत्या. त्या लढाईत दत्ताजी, त्यांची दोन मुले रघोजी आणि यशवंतराव हे मारले गेले. दत्ताजी महाराजांची पत्नी सगुणाबाई ह्या सती गेल्या. दत्ताजी महाराज आणि सगुणाबाई ह्यांच्या समाध्या निलंगे येथे आहेत. 

मित्रांनो,

शौर्य हे अमर आहे म्हणून शौर्य गाथा विसरल्या जात नाहीत.! दत्ताजी महाराजांच्या जंगेबहाद्दरी आणि दिलेरीला मानाचा मुजरा.!!!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

।।फक्तइतिहास।।

#lakhojirao #dattajirao_jadhao

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts