Skip to main content

Featured

नागझरी आणि दरेगाव येथील वास्तुशिल्पांची अनुभूती..

  मित्रांनो, या भारत भूमीवर प्राचीन सुंदर कलाकृती जगप्रसिद्ध आहेत, मात्र सामान्य दर्जाची, कमी कलाकृतीची दुर्लक्षित असलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आजही खेड्याबाऱ्मध्ये बरीच आहेत. अशा दुर्लक्षित इतिहास पुरुषांचा शोध मनाला नेहमीच असतो. आज बुलडाणा जिल्ह्यात फिरत असताना नेहमीप्रमाणे शोध घेतल्यावर समजले की शेंदुर्जनाच्या जवळ दोन ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मग काय, आम्हाला इतिहासात टाईम ट्रॅव्हल करण्याची संधी चालून आली.! मित्रांनो,  शेंदुर्जन(सिंदखेड तालुका) येथून उजवीकडे वळून आम्ही साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर नागझरी फाट्यावरून डावीकडे वळलो. एक किलोमीटर अंतरावर नागझरी हा छोटा गाव लागला. या गावाच्या पिछाडीवर अतिशय खडतर रस्त्याने खाली उतरत एक किलोमीटर मोटर सायकलने गेल्यावर आम्ही डोंगराच्या कुशीत एका रमणीय ठिकाणास पोचलो. येथे एक प्राचीन महादेवाचे देवालय असून त्यासमोर धार कुंड आहे. देवालय बाह्य दर्शनी पाहिल्यास सुंदर कलाकृतीचे असून लहान लहान विटांनी बांधलेले दिसते. देवालयाचा जीर्णोद्धार झाला असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. असो, देवालयात प्रवेश केल्यावर हेमाडपंथी बांधणीचे सहा दगडी स्तंभ दिसत...

पात्शाच्या नावानं चांगभलं..

 


..काही दिवसांतच बहादुरगडाहून निघालेली बादशाही छावणी आगे कूच करत ३ मार्च (१६८९) रोजी पुण्याच्या जवळ भीमा नदीच्या काठावर तुळापूरपासून तर कोरेगावापर्यंत ५-६ मैल अशी ऐसपैस पडली. शंभूराजे आणि कवी कलश यांनी अन्नपाणीतर त्यागलेच होते. छावणीत सुरू असलेल्या त्यांच्या अनंत छळाला सिमा नव्हती. अखेर ११ मार्च रोजी बादशहाच्या हुकूमाने शंभूराजे व कवी कलश यांना छावणीच्या बाहेर नेऊन वढू या गावाच्या रानात त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.

यानंतर औरंगजेबाचा मुक्काम याच छावणीत नऊ महिने होता.(मार्च १६८९ ते नोव्हेंबर १६८९)

१९ ऑक्टोबरला रायगड पडल्यानंतर महाराणी येसूबाई आणि बालराजा शाहू यांना येथेच तुळापूरच्याच छावणीत आणण्यात आले.(नोव्हेंबर)

याच वेळी औरंगजेबाच्या महसूल अधिकाऱ्यांनी पुणे प्रांतातील देशमुख, देशपांडे आणि इतर वतनदार मंडळी यांची एक कॉन्फरन्स भरविली होती. त्यासंबंधी हकीकत सुप्याचे देशपांडे आपल्या कैफियतीत म्हणतात- (राजवाडे, खंड वीस, पान पन्नास)

"या उपरी कित्येक रोजा हजरत बादशहा तुळापुरास आले ते समयी खानबालाखान जुल्फिकार रायरी फते करून राजश्री (शाहूराजे) स बरोबर घेऊन आले ते समयी कुलपरगण्याचे जमीनदार हुजूर तलब केले की तमाम मुलूक आबाद होय म्हणून मुचलके लेहोन घेतले म्हणौन तलबा केल्या. ते समयी रामाजी बाबाजीसही तलब केली. ते दरबारास कुल परगणा घेऊन गेले. कुल मुलुकास सिरपाव देऊन कौल घेतला.'

..सनदा तयार व्हाव्या तो जुल्फिकारखान रायगडची मसलत सुरू करून लष्करास आले. त्याजपाशी सूर्याजी पिसाळ बिरादर...दरापातीत पडोन खानास गड हस्तगत करून दिला. हे गोष्टीकरिता खानमशारनिल्हेची कृपा त्यावरी विशेष झाली. खान हजरतीचे (औरंगजेबाचे) दर्शनास आले. (नोव्हेंबर, १६८९); तेव्हा सूर्याजी स्तुत हजरती पावेतो करून सीर नहाणी करविली.' (बेंद्रेकृत संभाजी, पान ६४२)

शंभूराजे गेले पश्चात रायगड पडला आणि स्वराज्याचा वारस शाहू राजा हा आपल्या कैदीत सापडला. अर्थात आता स्वराज्य संपले असे बादशहाला वाटले. पण स्वराज्यातील स्वार्थी मंडळींनाही हेच वाटले आणि म्हणून आपला स्वार्थ साधण्यासाठी ते बादशहाच्या हुजूर दाखल झाले.

बादशहाच्या नावानं आपलं चांगभलं करण्यासाठी खेड्याचे, परगण्यांचे आणि प्रांतांचे शेतसाऱ्याच्या वसुलीचे कागदपत्र, गावझाडे, जमाबंदी, हक्कासंबंधीचे कागद हे सर्व घेऊन ही मंडळी तुळापुरास मोगल छावणीत जमली. आपापल्या खेड्यांच्या परगण्याच्या सरकारी महसुलांच्या रकमा ठरवून घेणे, वसुली करून मोगलांच्या खजिन्यात जमा करणे, आपल्या वतनाच्या सनदा कायम करवून घेणे इत्यादी कामे करण्यात ही मंडळी गुंतली होती आणि याच छावणीत शाहूराजे आणि महाराणी येसूबाई मोगलांच्या कैदेत अडकून पडली होती.! 

काही महिन्यांपूर्वी याच छावणीत शंभूराजांची हत्या आणि पश्चात याच छावणीत महाराणी येसूबाई व शाहू राजे कैदेत आणले जातात, आणि याच छावणीच्या दिवाण दरबारात पुणे मुलखातील तमाम वतनदार व अधिकाऱ्यांची आपली वतने-जागीर आणि हुद्द्यांसाठी दान पदरात पाडून घेण्याची कैफियत.!!!

व्वा..! किती विस्मयकारी आणि आश्चर्यकारक असा हा नजारा..!

पहिल्या धन्याच्या बलिदानाची कसलीच जाणीव न ठेवता बेशर्मीचा आणि लोभाचा मनोरा.! आणि हो या गर्दीत ‘जात’ शोधण्याचा प्रयत्न करू नका सगळे आपलेच आहेत.!

असो, युद्धातून स्वार्थ शोधणारे जसे होते तसे निष्ठेतून युद्ध करणारेही होतेच.! लढत होते, जंग जंग पछाडत होते, शिव-शंभू सूर्य अस्तं पाऊच शकत नाही हे सिद्ध करण्यासाठीच!!!

म्हणूनच बादशहा स्वराज्यात कब्रनशीन झाला तो यासाठीच.!!!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts